शनिवार १७ नोव्हेंबर २००७चा दिवस होता! दुपारी १२ वाजले होते. माझा मोबाईल वाजला. ‘‘अशोक, मी नवलकर बोलतोय! संध्याकाळी कार्यक्रमाला येताय ना? कार्यक्रमपत्रिका मिळालीच असेल!’’
‘‘कसला कार्यक्रम? मला पत्रिका अद्याप मिळालेली नाही!’’
‘‘नाही कशी? परवाच कुरियरने मनोहरच्या ऑफिसातून महाडिकने पाठवली असेल. माझ्या ‘झेप’ या पन्नासाव्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. जयंत साळगावकरांच्या हस्ते मनोहर आणि डॉ. विजया वाड पुस्तकावर बोलतील. तुम्ही एक काम करायचं!’’
‘‘कोणतं?’’
‘‘पद्मजा फेणाणीला घेऊन यायचं! तिला ईशस्तवन म्हणायला सांगायचं. मला पापक्षालन करायचंय!’’
‘‘पद्मजा ईशस्तवनासाठी येईल की नाही हे मला सांगता येत नाही. ती भारतात आहे वा नाही, हे ठाऊक नाही. मुंबईत असली तरी ती संध्याकाळी मोकळी आहे का हे पाहायला हवं! हवं तर ईशस्तवनासाठी मी दुसर्या कुणा गायिकेला विनंती करतो!’’
‘‘पद्मजा ईशस्तवनाला नसेल, तर ईशस्तवनच नको मला!’’
‘‘पद्मजाला फोन करून मी तुम्हाला कळवतो. कार्यक्रम कुठे व किती वाजता आहे?’’
‘‘आज संध्याकाळी साडेपाच वाजता प्रभादेवीच्या मनोहरच्या कोहिनूर हॉलमध्ये कार्यक्रम आहे. तुमची वाट पाहतो!’’
मी पद्मजाला फोन केला. पद्मजा म्हणाली, ‘‘मी ईशस्तवनासाठी किंवा एखाद्या गाण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमास जात नाही! आज माझा भाऊ गोव्याहून माझ्या आजारी आईला भरपूर सामानासह घेऊन येणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजताच मला विमानतळावर त्यांना रिसिव्ह करायला जायचंय. शिवाय आदित्यसाठी डेंटिस्टची अपॉईंटमेंटही घेतलेली आहे!’’
‘‘पद्मजा, तू नवलकरांसाठी यावंस असं मला वाटतं. त्यांना पापक्षालन करायचंय! तुला ठाऊकच आहे. नवलकर मरणाच्या दारातूनच मागील आजारपणात परत आले आहेत. कदाचित हे त्यांचे पन्नासावे पुस्तक अखेरचेही असू शकेल!’’
पद्मजा क्षणभर स्तब्ध झाली. म्हणाली, ‘‘ठीक आहे! कुणासाठीही मी ईशस्तवनासाठी आले नसते! पण नवलकर काकांसाठी येते. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी अगदी प्रâॉकमध्ये होते तेव्हापासून त्यांनी मला प्रोत्साहन दिलेले आहे!’’
‘‘तुला हवे ते व हवे तितके वादक घेऊन ये. नवलकरांनीच मला सांगितलंय की, पद्मजाने अशोक चिटणीसांच्या कानात काय ती मानधनाची रक्कम सांगावी. चिटणीसांनी नवलकरांच्या कानात मग ती रक्कम सांगावी. पद्मजा सांगेल ती रक्कम नवलकर तिला देतील!’’
‘‘मी वादक वगैरे कुणाला घेऊन येत नाही. फक्त माझा तानपुरा घेऊन येईन. मानधन वगैरे मला काही नको. हे काका पुतणीचे नाते आहे, काका पुतण्याचे नव्हे! तुम्ही साडेचारला माझ्या घरी या. पावणेपाचला आपण हॉलवर जाऊ. मला साऊण्ड-माईक व्यवस्था चेक करावी लागेल!
मी नवलकरांना लगेच फोन केला. पद्मजा ईशस्तवनासाठी येते आहे, म्हटल्यावर त्यांना खूप आनंद झाला. मला भरल्या आवाजात म्हणाले, ‘‘तुम्ही माझे मोठे काम केलेत! तुमची सारी व्यवस्था हॉलवर करून ठेवतो! मला खूप खूप आनंद झालाय!’’
… नवलकरांना आनंद वाटेल असे मला काही करता आले याचेच एक तुडुंब समाधान माझ्या मनावर व्यापून उरले होते. गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत मी नवलकरांना कधी दुरून तर कधी जवळून पाहिले होते. ‘मार्मिक’ आणि ‘दै. सामना’ अगदी शुभारंभाच्या अंकापासून ‘म.टा.’ ‘नवशक्ति’ आणि ‘लोकसत्ता’बरोबर आमच्या घरी नियमितपणे येत आहे. त्यामुळे नवलकरांशी त्यांचा वाचक-फॅन म्हणून माझे सर्वप्रथम नाते जडले. त्यांच्या ‘भ्रमंती’ने त्यांची धाडशी वृत्ती माझ्या कुमारवयापासून मला आकर्षक वाटत राहिली.
प्रमोद नवलकर हे ‘डेअर डेव्हिल’ कसे होते, अफाट प्रतिभेचे उत्कृष्ट संसदपटू कसे होते आणि बेधडक शैलीत भाषणे करून, संसदेत ते कधीकधी कशा भन्नाट क्लुप्त्या योजत असत हे माझ्या तारुण्यात मी मनोहर जोशींकडून आणि वृत्तपत्रांतील बातम्यांवरून समजून घेत होतो. त्यांच्यातील ‘भटक्या’ मला फार आवडायचा. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या इच्छेनुसार त्यांना व सोबत रिबेरो या मुंबईच्या तत्कालीन पोलीस कमिशनरना घेऊन व अरबांचा वेष धारण करून मुंबईच्या गुन्हेगारी जगाचे दर्शन नवलकरांनी कसे घडविले हे वृत्तपत्रांतून वाचून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. नवलकरांविषयी मला आदरच वाटला होता. एकदा सुरक्षेचे सारे अडथळे ओलांडून नवलकरांनी विधान परिषदेत पिस्तूल नेऊन दाखविले होते. त्याचप्रमाणे एकदा बॉम्ब बनविण्यास आवश्यक असणार्या स्फोटक जिलेटिनच्या कांड्याही त्यांनी विधान परिषदेत नेऊन सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडेच काढले होते. राष्ट्रपिता म. गांधी यांच्या मोहनदास करमचंद गांधी या नावाने दारूचा परवाना विधानपरिषदेत सादर करून, शहानिशा न करता पैसे दिले की, काहीही मिळू शकते याचे उदाहरण नवलकरांनी दाखवून दिले होते. मुंबई विद्यापीठात पैसे चारले की हवी ती पदवी सहज मिळू शकते हे नवलकरांनी बनावट प्रमाणपत्रे विधानपरिषदेत दाखवून, शिक्षण व्यवस्थेची लक्तरेच वेशीवर टांगली होती! ब्युटी पार्लरच्या आणि मसाज सेंटरच्या नावे वेश्याव्यवसाय मुंबईत कसा व कुठे चालतो हे भर सभागृहात त्यांनी पुराव्यांनिशी दाखवून देऊन सभागृहास व गृहखात्यास हादरे दिले होते!
विधिमंडळात्ा ३५ वर्षे वावरलेल्या निष्पाप, निर्लेप आणि निगर्वी अशा व्यक्तिमत्त्वाच्या प्रमोद नवलकरांना, लोकशाहीचे पहारेकरी म्हणून सर्व पक्षांचे नेते मानीत असत. कुशल राजकारणी, उत्कृष्ट संसदपटू आणि यशस्वी विरोधी पक्षनेते म्हणून मुख्यमंत्री विलासराव देशमुखांसह सर्वजण त्यांचा आदर करीत. त्यांचा विनोद हा खिल्ली उडवणारा असला तरी शत्रुत्व निर्माण करणारा नव्हता. तो जयवंत दळवींच्या विनोदासारखा निर्विष स्वरूपाचा होता. त्यामुळे प्रमोद नवलकर हे अजातशत्रू म्हणून ओळखले जातात हे मला ठाऊक होते. तसेच मूळच्या प्रजासमाजवादी पक्षातील नवलकरांनी शिवसेनेच्या प्रारंभापासून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दक्षिण मुंबईत शिवसेना वाढविण्यात सिंहाचा वाटा उचलला. आपली वाणी, लेखणी, बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बेधडक वृत्ती हे गुण शिवसेनेचे शिवधनुष्य पेलण्यासाठीच वापरले होते, हे मी काहीशा जवळून पाहत आलो होतो. नवलकर आणि मनोहर जोशी म्हणजे शिवसेनेचे सुसंस्कृत चेहरे म्हणूनच ओळखले जातात, हेही मी अनुभवले होते. प्रमोद नवलकरांनी आयुष्यात विविध भूमिका केल्या. नगरसेवक, शिवसेनेचा एकमेव आमदार, महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक मंत्री वगैरे भूमिका करताना मध्यमवर्गीय साधेपणा त्यांना सोडून गेला नाही. मंत्री असतानाही ते पिशवी हातात घेऊन स्वत: मासळी खरेदीसाठी बाजारात जात असत.
नवलकर सांस्कृतिक खात्याचे मंत्री असताना मलबार हिलवर त्यांचा बंगला होता. त्याच काळात मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सदस्य म्हणून नवलकरांच्या बंगल्याजवळच ‘अवंती-अंबर’ अपार्टमेंटमध्ये राहत होतो. तेव्हा नवलकरांच्या माझ्या गाठीभेटी होत असत. एकदा कवी वसंत बापट आणि ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक अरुण टिकेकर माझ्या घरी आले होते. ‘मौज’तर्फे पुणे शहराचा इतिहास दोन खंडात प्रकाशित करण्याची योजना होती. आर्थिक अडचणीमुळे प्रकाशन कसे करायचे हा प्रश्न होता. मी नवलकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींशी बोललो. नवलकरांना मी आणि वसंत बापटांनी भेटायचे ठरले. १९९७मधील ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात बापट रात्री माझ्याकडे मुक्कामास आले. भल्या पहाटे उठून सकाळी सहा वाजता आम्ही नवलकरांच्या बंगल्यावर गेलो. नवलकर ऑफ व्हाइट रंगाचा सफारी सूट घालून तयारच होते. चहापाणी घेऊन आम्हाला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीत बसवून वरळी नाक्यावर घेऊन गेले. त्यावेळी पेट्रोल पंपावर असलेला आचार्य अत्रे यांचा पुतळा हलवून १३ ऑगस्टला आचार्य अत्रे जयंतीस तो आज आहे त्या ठिकाणी बसविण्याची योजना होती. त्याकरिता पुतळा ठेवण्यासाठी आवश्यक चौथर्याचे बांधकाम चालू होते. पाऊस रिपरिप पडत होता. नवलकरांनी मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम, वीज विभाग, इंजिनिअरिंग इत्यादी बर्याच खात्याच्या अधिकार्यांना सकाळी सात वाजता वरळी नाक्यावर बोलावले होते. उभ्या उभ्याच सभा घेतली. १३ ऑगस्टला होणार्या समारंभास कोणतीही अडचण कोणत्याही खात्याकडून येणार नाही, याची खात्री करून घेतली. सूचना दिल्या. पंधरा मिनिटात सभा संपवली. मला व बापटांना आपल्या लाल दिव्याच्या गाडीत बसविले. आम्ही पुन्हा मलबार हिलच्या दिशेने निघालो. परंतु नवलकरांना वरळीच्या रस्त्यावर एक पत्र्याच्या टपरीतील ‘हॉटेल’ दिसले. मला म्हणाले, ‘‘अशोक, वडा खाऊ या का? चला!’’
नवलकरांनी ड्रायव्हरला गाडी टपरीपाशी घ्यायला लावली. मंत्री महोदयांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस गाड्यांची व जीपची पंचाईत झाली होती! आम्ही टपरीत शिरलो. पाच-सात टेबल्स व त्याभोवती कळकट बाकडी होती. काऊंटरवर एक मुसलमान बसला होता. आपल्याकडे गिर्हाईक म्हणून महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्राचा थोर कवी आलाय याची जाणीव त्या कौंटरवरच्या इसमास बराच वेळ लागलीच नव्हती! वडा, दही मिसळ आणि चहा घेऊन नवलकरांनी कौंटरवर बिलाचे पैसे सहजपणे देऊन आम्हाला घेऊन बंगला गाठला. वाटेत बापटांकडून, ‘पुणे शहर’ ग्रंथ प्रकाशनाबाबतची आर्थिक समस्या समजावून घेतली. ‘‘मुख्यमंत्र्यांपुढे मी ही समस्या ठेवतो’’, असे आश्वासन नवलकरांनी दिले.
निरोप घेता घेता नवलकर मला म्हणाले, ‘‘अशोक, तुम्ही आणि मनोहर वर्गमित्र आहात ना? वसंतराव बापट तुमचे गुरू आहेत ना? तुमच्या मुख्यमंत्री मित्राला सांगा की ‘पुणे शहरा’ला मदत देऊन गुरुदक्षिणा द्या!’’
मी बापटांना घेऊन मनोहर जोशींना ‘वर्षा’ बंगल्यावर भेटलो. दहा मिनिटांत चहापान व निरोप देऊन मनोहर जोशी मंत्रालयात गेले असावेत. नवलकरांचाही फोन येऊन गेल्याचे त्यांनी आम्हास सांगितले होते. बापटांनी त्यानंतर मला ‘मौज’च्या गिरगावातील प्रेसमध्ये नेले. ‘पुणे शहर’ या ग्रंथाचे छपाईचे अपूर्णावस्थेतील पहिल्या खंडाचे काम दाखविले. ‘‘अरुण टिकेकर या ग्रंथाच्या संकल्पित दोन खंडांचे संपादक आहेत आणि भारतात कोणत्याही शहराचा अशा तर्हेने इतिहास ग्रंथ प्रसिद्ध झालेला नाही,’’ असेही ते म्हणाले. माझा निरोप घेऊन नंतर ते पुण्यास गेले.
पुण्यास गेल्यावर चार दिवसांनीच पुन्हा बापट यांचा मला फोन आला. ‘‘पुणे शहर ग्रंथ प्रकाशनासाठी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी तात्काळ चार लाख रुपयांचा पाठविलेला चेक आजच मला मिळाला आहे,’’ हे वसंत बापट यांनी फार उत्साहाने मला सांगितले. मी लगेच नवलकर आणि मनोहर जोशी यांना फोन करून धन्यवाद दिले.
काही काळातच ‘पुणे शहर’ ग्रंथाचा मोठा प्रकाशन सोहळा पुण्यात झाला. मला निमंत्रण नव्हते. त्यामुळे मी समारंभास गेलो नव्हतो. नवलकरांना हे समजले तेव्हा त्यांना खूप खटकले आणि वाईटही वाटले. हा विषय त्यांच्या मनांत बरेच वर्षे का व कसा राहिला हे मला समजले नाही. दोन तीन महिन्यांपूर्वी आम्ही भेटलो असता ते अचानक बोलले, ‘‘अशोक, माणसांच्या वागण्याला गणित नसते. कोण, केव्हा, कधी, कसे वागतील हे सांगता येत नाही. मी पस्तीस वर्षे विधिमंडळात काढूनही अखेरच्या दिवशी मला सभागृहात निरोप दिला गेला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय, एक मंत्रीही त्यादिवशी सभागृहात उपस्थित नव्हता. निषेध म्हणून नितीन गडकरींनी सभात्याग करून लॉबीत मला निरोप देण्याचा समारंभ केला. अत्यंत दुखावलेल्या मनाने मी विधानभवनाच्या पायर्या उतरलो आणि अद्याप तेथे फिरकलोही नाही. आयुष्यात अनेक मान-अपमान आणि अपेक्षाभंग होतात. दु:ख विसरून जगायचे असते. पण काही घटना विसरू म्हणून विसरता येत नसतात!’’
चेष्टा-मस्करी करीत, हसत-खेळत खिल्ली उडवीत आणि फिरक्या ताणत बोलणारे प्रमोद नवलकर कधी क्वचित गंभीरपणे बोलायला लागले की मला वेगळे दिसत. मनोहर जोशींच्या सहवासातील नवलकर मला सदैव ताजेतवाने आणि हसते खेळतेच दिसले आहेत. एकमेकांची चेष्टा अत्यंत प्रेमाने करणारे असे मित्रच दुर्मीळ! मनोहर जोशी माझे वर्गमित्र. त्यांच्यामुळे नवलकरांना मी वेगवेगळ्या प्रसंगांनी भेटत राहिलो होतो. त्यांची व्याख्याने ऐकत राहिलो होतो. विविध संस्थांसाठी व्याख्यानांना त्यांना आमंत्रित करीत राहिलो. ठाण्यात मुख्याध्यापक म्हणून मी कार्यरत असतांना माझ्या शाळेत त्यांना निमंत्रित केलेच होते. पण ठाणे शाखेचा को.म.सा.प.चा अध्यक्ष म्हणूनही २००५च्या ठाण्यातील साहित्य संमेलनात, ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात अनेक शाळांत मी प्रमोद नवलकरांना विद्यार्थी-शिक्षकांना भेटविले. ऐकविले. नवलकरांना तो उपक्रम आवडला होता. भाषणांतून त्यांनी त्या उपक्रमाचे खूप कौतुक केले होते.
शेवटची काही वर्षे नवलकर अनेकदा मला फोन करीत. त्यांच्या घरी सहज गप्पा मारायला म्हणून भेटीला बोलावीत. भेटायला गेल्यावर कोपर्यावरून कुणाला तरी बटाटेवडे आणायला सांगत. कधी भजी मागवत. चहा मागवत. मनोहर जोशी माझ्याबरोबर असले की तेही अर्धाच वडा खात असत. खाण्या-पिण्याच्या बाबतीत जोशी कडक शिस्तीचे तर प्रमोद नवलकर एकदम बेशिस्तीचे! हालचालींच्या बाबतीत मनोहर जोशी तरुणांना लाजवतील असे चपळ तर गुडघेदुखीमुळे प्रमोद नवलकरांना घरातल्या घरातही उभे राहणे, चालणे अशक्य झाल्यासारखे गेल्या वर्षभरात झाले होते. भ्रमंतीसाठी प्रसिद्ध असलेले नवलकर असे घरातल्या घरात जखडलेले मला पाहवत नसत. नवलकरांना त्यांच्या गिरगावातील ‘सेठी निवासा’त भेटल्यावर चारदोन विनोद केल्याविना आणि दोनचार विनोदी किस्से ऐकविल्याविना प्रमोद नवलकरांबरोबरची बैठक संपत नसे. प्रत्येक भेटीत त्यांचा निरोप घेताना ते मला विचारीत, ‘‘आता केव्हा येणार?’’
‘‘केव्हा येऊ?’’
‘‘तुम्ही रोज भेटायला आलात तरी मला हवे आहात!’’
‘‘मग मी आता गिरगावचा पासच काढतो,’’ असे मी म्हणत असे! नवलकर माणसांचे फार लोभी होते. त्यांना गप्पा मारायला आणि माणसांचे कोंडाळे करून चहापाणी घेत बैठक रंगवायला खूप आवडे. हास्यविनोद करतानाच ते मधूनच गंभीर होत. गंभीर विषयांवर बोलत. मुंबईत पोलीस आणि पोलीस अधिकार्यांसाठी आपण काय काम केले ते सहजपणे सांगून जात. विधानसभेत वावरताना कुणाकुणाच्या कशा कशा फिरक्या ते घेत असत हेही ते हसत हसत सांगत असत. एकाच वेळी ते भूतकाळात व वर्तमानकाळात रमत असत. गप्पांचा विषय कोणताही असला तरी तोंडी लावायला त्यांना मनोहर जोशींचा विषय लागे!
प्रमोद नवलकरांच्या गप्पांत जसे मनोहर जोशी होते तसे मनोहर जोशींच्या बोलण्यातही नेहमी प्रमोद नवलकरांचा विषय असतो. प्रवास करताना मनोहर जोशींनी नवलकरांचा विषय काढला नाही, असे कधी घडले नाही. चार महिन्यांपूर्वीच्या कोकण दौर्यातून येताना मनोहर जोशी मला म्हणाले होते, ‘‘अशोक, तू प्रमोदला जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटून ये. मी परवाच जाऊन आलोय. त्याची तब्येत ठीक नव्हती! थांब, मी आत्ताच फोन करतो. वहिनींना. आता त्यांची तब्येत कशी आहे ते विचारतो.’’
सिक्युरिटी गार्डला मोबाईलवर सौ. वंदनावहिनींना फोन लावण्यास सांगितले. फोनवर वहिनींनी सांगितले, ‘‘नवलकरांची तब्येत ठीक आहे. आत्ताच डिसचार्ज मिळालाय. घरी जाण्याच्या तयारीत आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत!’’
कोकण दौर्यावरून परत येताच दुसर्या दिवशीच मी गिरगावात नवलकरांकडे जायचे ठरवले. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मजा फेणाणीचा मला फोन आला असता मी तिला नवलकरांच्या आजारपणाचा तपशील व मी त्यांना भेटायला जात असल्याचे सांगितले. पद्मजा म्हणाली, ‘‘तुमची काही हरकत नसेल तर मीही येते प्रमोदजींना भेटायला!’’
माझ्याबरोबर अनपेक्षितपणे आलेल्या पद्मजाला पाहून नवलकरांना खूप आश्चर्य व आनंद वाटला. ‘‘मी तुमचा फॅन आहे’’ असेही ते गप्पात म्हणाले. इस्त्रीचा पांढरा लेंगा व नवा वाटावा असा झब्बा नवलकरांनी घातलेला होता. पद्मजा आली म्हणून त्यांनी आतून सौ. वंदना वहिनींनाही बोलावून घेतले. चहाफराळाचा आग्रह केला. नुकतीच प्रसिद्ध झालेली आपली काही पुस्तके पद्मजाला व मला नवलकरांनी दिली.
नवलकरांना खूप बरे वाटावे, भेटीचा अविस्मरणीय आनंद द्यावा म्हणून पद्मजाने नवलकरांना म्हटले, ‘‘प्रमोदजी, आज तुम्हाला एक छानशी चीज ऐकवते. तुमचं आजारपण तुम्ही विसरून जाल!’’
अनपेक्षितपणे नवलकर घाईघाईने पद्मजास म्हणाले, ‘‘नको! गाणं ऐकण्याच्या आज मी मन:स्थितीत नाही. पुन्हा केव्हातरी तुमच्या मैफलीस येईन. आज माफ करा!’’
या घटनेस तीनचार महिने होऊन गेल्यावर ऑक्टोबर २००७च्या शेवटच्या आठवड्यात मला नवलकरांचा फोन आला होता. फोनवर ते मला म्हणाले होते, ‘‘‘मार्मिक’चा ताजा अंक विकत घेऊन वाचा. मला नंतर फोन करा!’’ मी लगेच बाहेर जाऊन २१ ऑक्टोबर २००७चा ‘मार्मिक’ आणला. ‘आठवड्याच्या आठवणी’ सदरात नवलकरांनी एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी ‘त्या’ प्रसंगाबद्दल लिहिले होते. पद्मजाने एक चीज गाऊन दाखविण्याची इच्छा व्यक्त केली असता आपण तिला नकार देण्यात कशी चूक केली होती, हे त्यांनी त्या लेखात विलक्षण पश्चा:तापदग्ध शब्दांत लिहिले होते. नवलकरांच्या स्वाभाविक तरीही शैलीदार लेखनशैलीबरोबरच त्यांच्या निर्मळ, प्रामाणिक, साध्यासरळ आणि नम्र व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारा तो लेख पुन्हा पुन्हा वाचावा असा होता. संगीताशी आपले सूत काही नीटपणे जुळले नसल्याचे सांगताना लता व आशा यांच्या गाण्यातही आपण रमलो नव्हतो, हे त्यांनी सांगितले होते. घराजवळ राहणार्या श्रीनिवास खळे यांच्याकडेही आपण फारसे कधी गेलो नव्हतो, हे सांगताना भीमसेन जोशींच्या मैफली ऐकल्याचे मात्र त्यांनी सांगितले होते. तसेच गायकांची थोरवी सांगताना त्यांनी लिहिले होते, ‘‘सारेगमप ही पाच आद्याक्षरे गायकांच्या ओंजळीत पडल्यावर त्यांचा चंद्र होतो आणि आसमंत प्रकाशमय होतो.’’ संगीताच्या प्रभावाने झाडेही फुलतात हे सांगताना प्रमोद नवलकरांनी लिहिले होते, ‘‘झाडाची वाढ व्हायची असेल तर त्याचे ट्रिमिंग करावे लागते आणि माणसालाही खरोखरीच मोठे व्हायचे असेल तर समाजात वावरताना अहंगंड सोडून लहान व्हावे लागते!’’
नवलकरांजवळ यत्किंचितही अहंगंड नव्हता. नको इतका प्रांजळपणा, साधेपणा आणि निर्मळपणा होता. लेखाच्या अखेरीस त्यांनी लिहिले होते, ‘‘पद्मजाला गाण्यास नकार देऊन माझ्या हातून चूकच घडली होती. त्याबद्दल पापक्षालन करण्यासाठी एखादी चीज असेल तर पद्मजानेच मला ती शिकवावी. मी आळवून आळवून आयुष्यभर ती गात राहीन!’’
नवलकरांच्या ‘झेप’ या पन्नासाव्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी ठरल्याप्रमाणे गेलो होतो. समारंभ अत्यंत आखीव-रेखीव झाला. नवलकर विलक्षण आनंदात होते. त्यांना मृत्यूची चाहूल लागलेली असावी. शांताबाई शेळकेंच्या ‘असेन मी नसेन मी’ या गाण्याचा उल्लेख त्यांनी भाषणाच्या अखेरीस केला. उद्या मी असेन किंवा नसेन परंतु माझे शब्द मात्र माझ्या ग्रंथांच्या रूपाने उरतील, अशा अर्थाच्या शब्दांत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला होता.
प्रकाशन समारंभाच्या शनिवार १७ नोव्हेंबर २००७नंतर सोमवारी सकाळीच मला नवलकरांचा फोन आला. मला म्हणाले, ‘‘परवा तुम्ही पद्मजाला आणलंत आणि तिनं ईशस्तवन म्हटलं याचा खूप आनंद वाटला. तिचं मन केवढं मोठं! एका ईशस्तवनासाठी आली! ग. दि. माडगूळकरांचं ते गाणंही किती अर्थपूर्ण होतं!
‘‘शारदे घे तसला अवतार!
संन्यासाचा पोर भिकारी
धरणे धरता तुझिया दारी।
पावलीस त्या शब्दसुंदरी।
महिषमुखाने ज्ञानदेव तो।
घडवी वेदोच्चार।’’
‘‘किती ही सुंदर शब्दरचना होती! तुम्ही एक गोष्ट करा!’’
‘‘कोणती?’’
‘‘लौकरच मला भेटायला या. कधी येताय?’’
‘‘उद्या मंगळवार आहे ना? गिरगावात अप्पा परचुरेंना भेटायला मी दुपारी एक वाजता येणार आहे. तुम्हाला तत्पूर्वी ११ वाजता भेटायला येतो!’’
नवलकरांचा फोन मी खाली ठेवला आणि अप्पा परचुरेंचा फोन आला. मंगळवारऐवजी बुधवारी भेटायचे ठरले. तसे मी लगेच नवलकरांनाही फोनवरून कळवले.
मंगळवारी ‘जाणता राजा’चा नाट्यप्रयोग पाहत ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर बसलो होतो. मोबाईल वाजला म्हणून कानाला लावला. दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका स्नेहा आघारकरने मला बातमी दिली, ‘‘सर, तुम्हाला कळलं का? आपले नवलकर आत्ताच गेलेत!’’ मी मोबाईल बंद केला. पण माझा मोबाईल वाजतच राहिला. सूत्रसंचालक अनिल त्रिवेदी, पद्मजा आणि दोनचार जणांचे फोन आले. तीच ती धक्कादायक बातमी! अंत:करण ढवळून काढणारी!
मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नवलकर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गेले होते. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता खरे तर मी त्यांना भेटणार होतो. पण मंगळवारची भेट मी बुधवारवर पुढे ढकलली होती! ‘‘अशोक, लौकर या भेटायला,’’ असे नवलकर म्हणाले होते. मला त्या ‘लौकर’चा अर्थच समजला नव्हता! मंगळवारी मी नवलकरांना न भेटल्याची विलक्षण अपराधी भावनाच आता आयुष्यभर माझ्या मनाला रुखरुख देत राहील. या पापक्षालनास माझ्यापाशी तरी आता उतारा उरलेला नाही!