• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

असद शाह को गुलशन दिखाना है!

- वसंत वसंत लिमये (पुस्तकांच्या पानांतून)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 27, 2023
in पुस्तकाचं पान
0

शनिवार, १७ नोव्हेंबर. दुपारी ३ वाजता, पाकिस्तान.
तसं पाहिलं तर अरबाज यानं सकाळपासून खूप लांबची मजल मारली होती. करड्या रंगाच्या टोयोटा पिकअप व्हॅनवरील धुळीची चढलेली पुटं त्या दूरच्या प्रवासाची साक्ष देत होती. जलालाबाद, पेशावर असं करत अटकजवळ जीटी रोडवरून दर्या सिंध पार करताना उजवीकडे अटकचा किल्ला दिसून गेला. कोणे एके काळी हरामखोर मराठ्यांनी तिथे लावलेला भगवा झेंडा आजही बाभळीच्या काट्याप्रमाणे अरबाजच्या मनात सलत होता. टोयोटा गाडीचं बाह्य रूप खिळखिळं, म्हातारं दिसत असलं तरी तिचं पेट्रोल इंजिन दमदार होतं. दर्या सिंधच्या दक्षिण किनार्‍यावरून प्रवास करताना हरिपूर इथे तारबेला धरणाचा विस्तीर्ण जलाशय डावीकडे दिसत होता. हरिपूरसारखी सलणारी नावं! इस्लामाबाद टाळण्यासाठी अरबाजची गाडी आतल्या रस्त्यानं अ‍ॅबोटाबादकडे निघाली. गेल्या दोन दिवसांतील जबरदस्त शीण त्याला शरीरातील नसानसात अफूच्या गुंगीप्रमाणे जाणवत होता. दुपारची वेळ असली तरी हिंदुकुश पर्वतावरून उत्तरेकडून येणारे बोचरे थंडगार वारे अरबाजला जागं ठेवत होते. ‘जाबा’कडे जायचं असून, कुठलाही पाठलाग चुकविण्यासाठी तो आडवाटेवरील वेडेवाकडे रस्ते घेत होता. आजवरच्या त्याच्या यशाचं ते एक महत्त्वाचं कारण होतं. मनशेरानंतर बस्ती शेरखानजवळ मेंढ्यांचा एक कळप आडवा आला. मेंढपाळ आणि थंडीमुळे लोकर न कापलेली गुबगुबीत मेंढरं कुठलीच चिंता नसल्याप्रमाणे संथपणे रस्ता पार करत होती. अब्दुल वैतागून हॉर्न वाजवत होता. ‘क्यूँ, बहुत भूक लगी है?’ असं त्याला अरबाज हसत हसत म्हणाला देखील. लवकरच सिरानदर्याच्या काठावरील फैजल हॉटेलमध्ये, दोन घास पोटात ढकलण्यासाठी त्यानं अब्दुलला गाडी थांबवण्यास सांगितली. सकाळपासून अब्दुलच्याही पोटात काही नसल्यानं, अब्दुलनं तत्परतेनं पार्किंगमध्ये गाडी लावली. सुखा गोश्त आणि दोन नान खाऊन, अरबाजनं दोन कडक दालचिनीचा स्वाद असलेले काहवा रिचवले, तेव्हा त्याला जीवात जीव आल्यासारखं वाटून तरतरी आली. अब्दुलचं भरपेट जेवण झालं होतं. आता तोही खुशीत होता. तडक निघालेली गाडी लवकरच लबरकोट मागे टाकताच चढाच्या रस्त्याला लागली.
तलेसरपाशी उजवा रस्ता सोडून गाडी सरळ ‘चित्ता बट्टा’कडे निघाली होती. डोंगराळ भागातून जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा उतारावरील पायर्‍या-पायर्‍यांची शेती दिसत होती. अत्तरशीशामार्गे गाडी ‘एनएच-१५’ घेऊन जाबाकडे निघाली होती. या सार्‍या भागाला ‘खैबर पख्तूनख्वा’ म्हणतात. उजवीकडील उतारावर पाईनचं तुरळक जंगल दिसू लागलं होतं. जाबा सोडून जंगलातून बाहेर पडताच डावीकडे ‘ओल्ड डेनिश हॉटेल’ होतं. त्याचं नाव ‘ब्लू पाईन’ असं आहे. निसार पीरजादाच्या आजोबानं म्हणे, एका डेनिश टुरिस्ट मुलीच्या प्रेमात पडून लग्न केलं, आणि म्हणून हॉटेलचं ते नाव पडलं. अब्दुलनं गाडी डावीकडे कच्च्या रस्त्यावर वळवताना, ‘यहाँ गन्ने का ज्यूस बढिया मिलता है!’ अशी माहिती दिली. गाडी जंगलातील उताराच्या रस्त्याला लागताच, निसार पीरजादानं कॅम्पला फोन लावला. ‘एक ग्रे टोयोटा कॅम्प की तरफ आ रही है!’ पलिकडून उत्तर आलं, ‘हाँ, कमांडरसाब आ रहे हैं!’
थोड्याच अंतरावर अरबाजनं गाडी थांबवण्यास सांगितली. त्यानं पटकन बॅगेतून राखाडी ‘फिरान’ काढून अंगावर चढवला. ‘फिरान’ हा अफगाणी, काश्मिरी लोकांचा लोकरीच्या कापडापासून बनविलेला ढगळ अंगरखा असतो. ‘जनाब, यह क्या है?’ अब्दुलनं आश्चर्यानं विचारलं.
‘अब्दुल, अंग्रेजी में एक कहावत है, ‘व्हेन इन रोम, बीहेव्ह लाईक रोमन्स!’ अरबाज हसत हसत म्हणाला. उजवीकडे दुमजली ‘कॉम सेंटर’ लागून गेलं. रस्ता डोंगराच्या धारेवरून जात होता. दूरवर हिंदुकुश पर्वताची शिखरं डोकावत होती. डावीकडील आकाश मावळतीच्या सूर्यानं लालभडक केलं होतं. गाडी कागान गली येथील, जेमतेम अर्ध्या किमीवर असलेल्या कॅम्पवरील विस्तीर्ण मैदानात येऊन थांबली. समोरच्या इमारतीमागच्या गल्लीतून, पंधरा-वीस जणांची ट्रेनिंग घेणार्‍यांची एक तुकडी, रायफली डोक्यावर उंचावून ‘अल्ला हु अकबर!’ असं ओरडत धावत गाडीशेजारून निघून गेली. त्या थंडीतही घामानं निथळणारे ट्रेनी चांगलीच रपेट मारून आले असावेत! सामान गाडीतच ठेवून अरबाज लगबगीनं डावीकडील मुख्य इमारतीत शिरला.
हॉलमध्ये समोरच्या भिंतीवर, मौलाना मसूद अझर यांचं भलंथोरलं पोर्ट्रेट टांगलेलं होतं. काळ्या चौकटीचा डोक्यावर बांधलेला पांढरा काफिया, भरघोस काळी दाढी आणि मोठ्या काचांच्या चष्म्याआडून डोकावणार्‍या डोळ्यांतील विखार अंगावर येणारा होता. येणार्‍या-जाणार्‍यांचे सलाम स्वीकारत अरबाज उजवीकडील ऑफिसात शिरला.
पाकिस्तानातील जैश-ए-मुहम्मद या आतंकवादी संघटनेला आंतरराष्ट्रीय विरोध अफाट असला, तरी पाकिस्तानी आयएसआय या संघटनेचं कृपाछत्र त्यांच्या पाठीशी होतं. पाकिस्तान सरकारनं ‘जेईएम’वर तात्पुरती बंदी घालून केवळ देखाव्यासाठी काही धाडीदेखील टाकल्या होत्या. ‘जेईएम’चा मुख्य रोख भारताच्या कचाट्यातून काश्मीर मुक्त करणं असा आहे, ती संघटना कट्टरपंथीय जिहादी आहे. २००१मधील भारतीय संसदेवरील हल्ला, २०१४मध्ये ‘वाघा’ला खतम करण्याची चिथावणी, २०१६मधील पठाणकोट हल्ला अशा त्यांच्या भारतातील पूर्वीच्या घातपाती कारवाया भयानक होत्या. अतिरेक्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांचे अनेक कॅम्प्स अफगाणिस्तानात होते. सध्याच्या अस्वस्थ आणि अस्थिर काळात अफगाणिस्तानातील बहुतेक कॅम्पस् जीबी, म्हणजेच गिलगीट, बाल्टिस्तान भागात हलवण्यात आले होते. ‘असद शाह’ ऑपरेशनची फार मोठी जबाबदारी जैश-ए-मुहम्मदवर टाकण्यात आली होती. त्या ऑपरेशनचं खरं नाव होतं ‘रेन ऑफ डेथ’. त्या ऑपरेशनचा कमांडर होता अरबाज बिन ओमार कुरेशी, अरबाज म्हणजे गरुड आणि कुरेशी म्हणजे खाटिक. नाव अगदी साजेसं होतं! आयएसआयमधून त्याच्या हाताखाली देण्यात आलेल्या अधिकार्‍याचं नाव होतं अझीज!
अरबाज हा मूळचा ‘बुर्ज आरियान’ या सियालकोट जिल्ह्यातील छोट्याशा गावचा. तो लहानपणीच अनाथ झाल्यावर सियालकोट, लाहोर येथे मशिदींच्या आश्रयानं वाढला. त्याच्यातील चमक आणि हुशारी घ्एघ्च्या एका अधिकार्‍यानं हेरली. मग आयएसआयने शालेय शिक्षण आणि अमेरिकेतील उच्च शिक्षण यांची सारी जबाबदारी उचलली. सॉफ्टवेअर तंत्रज्ञान या विषयातील प्रावीण्याबरोबर त्याच्याकडे शस्त्रात्रांचं सखोल ज्ञान होतं. तालिबान, सीआयए यांच्या टेररिस्ट कॅम्पसमधे तो गेली अनेक वर्षं प्रशिक्षक म्हणून काम करत होता. ‘असद शाह’ ऑपरेशनचा लीडर होणं हा त्याचा विशेष बहुमान होता.
‘जनाब, बुरी खबर है! हमारे दो युनिट्स का सफाया कर दिया! एक कुपवाडा में और दुसरा नॉर्थ इस्टमें इम्फाल के पास!’ अझीजनं अरबाज खुर्चीत बसताच बॉम्ब टाकला. अरबाज काही क्षण मान खाली घालून शांत बसून होता. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. अचानक मान वर करून अरबाज ताडकन उठून उभा राहिला.
‘चलो, हम कॉम सेंटर चलते हैं!’ असं म्हणत तो ताड ताड पावलं टाकत गाडीकडे निघाला. त्याच्या मागोमाग काहीसा धावत अझीज गाडीत येऊन बसला. अझीजनंच अब्दुलला गाडी कॉम सेंटरकडे घेण्यास सांगितली. काहीतरी गडबड आहे, हे चाणक्ष अब्दुलच्या लक्षात आलं. अर्ध्या किमीचं अंतर पार करून टोयोटा कॉम सेंटरच्या वळणावर येऊन थांबली. कमांडरसाहेब कॉम सेंटरमध्ये शिरताच तिथले चारही सहकारी खाड्कन उठून उभे राहिले आणि म्हणाले, ‘सलाम आलेकुम!’
‘वालेकुम अस्सलाम!’ असं म्हणत कमांडरसाहेब सर्फराज खान या तरुण सहकार्‍याला बाजूला सारून त्याच्या खुर्चीत, शांतपणे खाली मान घालून बसले. अझीजच्या टीममधील सर्फराज खान हा एक अतिउत्साही ‘टेकी’ होता. सर्फराज खान कॉम्युनिकेशनसाठी वापरण्यात येणारी सर्व सॉफ्टवेअर सहजपणे हाताळू शकत असे. खुद्द कमांडरसाहेब भेटण्यास आले, त्यामुळे विशेष आनंदात सर्फराज बोलू लागला,
‘जनाब, कल रात में हमने ४८ जनों की लिस्ट पुरी की. सबको हमने ‘मेसेज’ भेज दिया है. साब, मेरी पुरी टीम कल रातभर काम कर रही थी. आखिरी मेसेज हमने चेन्नई के कॉन्टॅक्ट को सुबह चार बजे भेजा!’ उत्साहाच्या भरात सर्फराज बोलत होता. त्याच्या मागेच असलेल्या सर्फराजच्या कॉम्प्युटरकडे वळत अरबाज म्हणाला,
‘बहुत अच्छे! हमें फख्र है कि हम सारे गझवा-ए-हिंद के अन्सार है. नापाक हिंदोस्तानियों ने हमारे कौम के साथ बडी बेरहमी के साथ जिल्लत की है. थाऊजंड कट्स वाला नारा आज भी हमारे दिमाग में गूँजता रहता है. पुरे हिंदोस्तान पर अमल, यह गझवा-ए-हिंद की एक ही ख्वाहिश है!’ अरबाज़ अतिशय संथपणे काहिशा घोगर्‍या आवाजात बोलत होता. अरबाजनं फिरान बाजूला सारून जीन्सच्या खिशातून एव्हाना एक पेन ड्राइव्ह बाहेर काढला. तोच पेन ड्राइव्ह सर्फराजच्या कॉम्प्युटरला जोडून, स्वतः डेव्हलप केलेला ‘ईगल’ नावाचा ट्रॅकर त्यानं डाऊनलोड केला. अरबाजची बोटं चपळतेनं सराईतपणे कीबोर्डवर फिरत होती. तो सर्फराजच्या कॉम्प्युटरवरील गेल्या चोवीस तासातील सारी डेटा ऑपरेशन्स ट्रॅक करत होता. डिलीट केलेल्या ‘एण्ट्रीज’मध्ये ‘तोच’ मेसेज ४९व्या आयपी अ‍ॅड्रेसवर पाठवण्यात आला होता. ती एण्ट्री पहाटे ४ वाजताची होती. आयपी ट्रॅव्हल हिस्ट्री स्क्रीनवर दिसत होती. अ‍ॅबोटाबाद-हॉप टू हाँगकाँग- तिथून चेन्नई आणि शेवटी मुंबई! आयपी अ‍ॅड्रेस चेक करताच अरबाजचा संशय खरा ठरला. पाठीमागे उत्साहाच्या भरात सर्फराज भरभरून बोलत होता. इकडे अरबाज समोरच्या स्क्रीनवर टाईप करत गेला…
‘बिस्मिल्लाह-उल-रहमान-उल-रहीम अबू हुरैरा रादी अल्लाहू अनहू से रिवायत है कि जिस दिन नजाशी की वफात!’
ते शब्द एखाद्याच्या मृत्यूनंतर पढण्यात येणार्‍या नमाज-ए-जनाजाचे होते. अरबाज हलकेच सर्फराजकडे वळला. त्याचा उजवा हात फिरान बाजूला करून कमरेला लावलेल्या रिव्हॉल्व्हरकडे अलगदपणे गेला. ‘बहुत खूब!’ असं म्हणत अरबाज उठून उभा राहिला. त्याचबरोबर अचानक उजव्या हातातील रिव्हॉल्व्हर सर्फराजकडे रोखलं गेलं. हातवारे करत बोलणारा सर्फराज जागच्या जागीच थिजला. अरबाजनं अतिशय थंडपणे सर्फराजच्या गळ्यातील स्वरयंत्रावर नेम धरून गोळी झाडली. असं मरण अतिशय यातनादायक असतं! खूप मोठा आवाज झाला.
रात्र असूनही आजुबाजूच्या जंगलातील पक्ष्यांनी एकच कलकलाट केला. एक गद्दार संपविण्यात आला होता!
सर्फराजच्या गळ्यातून रक्ताचं कारंजं आणि अस्पष्ट घरघर उसळत होती. तो अर्धी गिरकी मारून त्याच्या मागील कॉम्प्युटरच्या
कीबोर्डवर कोसळला. हातपाय झाडत असलेल्या सर्फराजच्या गळ्यातील भगदाड कीबोर्डला रक्ताची अंघोळ घालत होतं. अतिशय थंडपणे दोन पावलं टाकून अरबाज पुढे झाला आणि त्यानी सर्फराजच्या मागील निळसर कॉम्प्युटर स्क्रीनवरील उर्दूत लिहिलेली अक्षरं संथपणे मोठ्यानं वाचली. अझीजसह सारे थक्क होऊन ऐकत होते. अरेबिकमधे (असद शाह को गुलशन दिखाना है!)

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

कीर्तनाच्या पैशात वर्षश्राद्ध!

Next Post

कीर्तनाच्या पैशात वर्षश्राद्ध!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.