राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक स्वयंसेवक सामाजिक संवेदना जागृत असणारा आणि समाजाप्रति बांधिलकी असणारा असतो, असा सर्वसाधारण समज आहे. आजपर्यंत तयार करण्यात आलेल्या या समजाला आरपार छेद देण्याचे काम राजकीय क्षेत्रात काम करणार्या संघाच्या स्वयंसेवकांनी हाती घेतले आहे की काय असे वाटण्यासारख्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत. त्यातील सगळ्यात दुर्दैवी घटना म्हणजे खारघर येथील कार्यक्रमात उष्माघातामुळे झालेला १४ श्रीसेवकांचा मृत्यू.
प्रत्येक माणसाचा जीव मोलाचा आहे. उगाच निष्पाप माणसांचा जीव जाईल असा निर्णय आपल्या हातून होणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. पक्ष-संघटनेचा प्रभाव-विस्तार, सत्तेचा बाजार, त्यासाठी नरेटिव्ह सेट करण्याची धडपड, शह-प्रतिशहासाठीच्या कुरघोड्या या सगळ्यांपेक्षा या देशातील नागरिकांचा जीव मोलाचा आहे, याची जाणीव सत्तेत असणार्यांना आणि विशेषतः संघ संस्कारातून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असली पाहिजे, अशी अपेक्षा ठेवण्यात काही गैर नसावे. राजकीय नेते गेंड्याच्या कातडीचे असतात, असा जनतेचा सर्वसाधारण समज आहे. पक्षात आणि पक्षाबाहेरही कायम दुसर्यावर कुरघोडी करून प्रसंगी दुसर्याचे राजकारण उद्ध्वस्त करून सत्तासोपान हस्तगत करणे आणि ते टिकवणे अशा निर्ढावलेपणाने काम करत राहणे, हेच राजकीय नेत्यांच्या जगण्याचे एकमेव उद्दिष्ट असते. संघसंस्कारातून राजकारणात आलेले स्वयंसेवक याला अपवाद असतील असा लोकांचा समज आहे. पण खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पाहिले तर संवेदनशीलता, संस्कार, सामाजिक बांधिलकी वगैरे अवजड शब्द हे केवळ भाषणांमध्ये किंवा बौद्धिकांमध्येच वापरायचे आणि सोडून द्यायचे असतात की काय, असा प्रश्न पडू शकतो. अर्थात कुणाला किती घडवायचे किंवा किती संस्कार करायचे हे संघाच्या नियंत्रणात नसते. संघकार्यात कितीही संस्कार केले आणि शेवटी तो नर्मदेचा गोटा निघाला, तर पालथ्या घड्यावर पाणी असेच म्हणावे लागेल. त्यासाठी संघटनेला जबाबदार धरता येत नाही. शेवटी माणुसकी, सज्जनपणा, संवेदनशीलता हे कुठल्या संघटनेच्या संस्कारातून येत नसते. असे संस्कार मुळात तुमच्यात जन्मतः आणि नंतर तुमच्या कुटुंबातून येत असतात. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या बाबतीत सब घोडे बारा टक्के असेच असते. त्याला भाजप आणि सत्तेत बसणारे स्वयंसेवकही अपवाद ठरत नाहीत.
पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा संघ परिवारातील अनेक संघटना लाखोंच्या उपस्थितीचे कार्यक्रम घेत असतात आणि त्याचे नियोजन अगदी चोख असते. त्यामध्ये हवामानापासून ते येण्या-जाण्याचे मार्ग, स्वच्छतागृहांची व्यवस्था, कार्यक्रमाचे नियोजन, वेळेची शिस्त असे सगळे आखीव रेखीव असते. त्याची तितक्याच चोखपणे अंमलबजावणी केली जाते. हे सगळे कौतुकास्पद आहे. अर्थात या सगळ्या व्यवस्थांमध्ये असणार्या स्वयंसेवक-कार्यकर्त्यांवर त्यातून योग्य ते संस्कार होत असतात. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लहानपणापासूनच अशा संस्कारी वातावरणात वाढलेले असताना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी लाखो लोकांना दुपारी बारा वाजताच्या तळपत्या उन्हात बसवण्याचा अट्टहास का घडला असावा? मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नवस्वयंसेवक आहेत आणि त्यांची जडणघडण वेगळ्या वातावरणात आणि संस्कारात झालेली असली तरी ध्यानीमनी नसताना पोटच्या अपत्यांचे अकाली निधन झाल्यावर मातापित्यांची मानसिक स्थिती काय होते, हे त्यांनी अनुभवलेले आहे. इतक्या संवेदनशील आणि संस्कारी व्यक्ती राज्यशकट हाकत असताना तळपत्या उन्हात लाखो लोकांना बसवून महाराष्ट्र भूषण कार्यक्रम घेण्यास कुणीच का विरोध केला नसावा? कशासाठी हा सगळा घाट घातला गेला? यातून काय साध्य झाले? निष्पाप श्री सदस्यांचा जीव गेला, याबद्दल कुणाला खेद ना खंत. संध्याकाळच्या वेळेस कार्यक्रम घेतला असता तर काय आभाळ कोसळणार होते?
व्यासपीठावरील राजकीय नेत्यांसाठी सावली. मोठमोठे कुलर्स आणि श्रीसेवक तळपत्या उन्हात ही कसली संवेदनशीलता? सगळ्यात मन विषण्ण करणारी गोष्ट म्हणजे आता यावर जास्त चर्चा होऊ नये, निष्पाप जिवांच्या मृत्यूची जबाबदारी कुणाची अशी चर्चा होऊ नये, याबाबत कुणी प्रश्न विचारू नयेत म्हणून या प्रश्नाचे राजकारण करू नका, असे टुमणे सत्तेतील राजकीय नेत्यांनी लावलेले दिसते. मुळात या कार्यक्रमाच्या आयोजनातच राजकारण असल्याचे स्पष्ट दिसते. कुणाचा जीव गेला, कित्येक मेले तरी चालतील, आम्ही मतपेढ्यांच्या विचार करून सगळे निर्णय घेणार आणि मग त्यावर कुणी काहीच प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, असे कसे चालेल? आम्ही तेवढे संस्कारी आणि म्हणून आमच्यावर कुणी काही आरोप करायचे नाहीत, प्रश्न विचारायचे नाहीत, जबाबदार कोण हे विचारायचे नाही. पालघरमधील साधूंच्या हत्येच्या घटनेचे आम्ही खच्चून राजकारण करणार, पण आमच्या चुकीने सर्वसामान्य कुटुंबातील निष्पाप हिंदू मरण पावले तर जबाबदारी कुणाची हे विचारायचे नाही, विचाराल तर, राजकारण करू नका म्हणून दरडवायचे. हे कुठले संस्कार? या घटनेला कुणीच जबाबदार नाही, व्ाâुणीच प्रायश्चित्त घेणार नाही ही कसली संवेदनशीलता? खरे तर लाखो लोकांना तळपत्या उन्हात बसवून स्वतः आच्छादित व्यासपीठावर कुलर्सच्या हवेत बसणार्यापैकी एकाने तरी खारघरच्या त्या मैदानावर दोन तास उन्हात बसून प्रायश्चित्त घेतले पाहिजे.
माध्यमांनी तर या सगळ्या प्रश्नांना बगल देऊन दुसर्याचा दिवसापासून राजकीय धुणी धुण्याचे काम हाती घेतले. अजित पवार काय करणार, कुठे गेले, किती आमदार संपर्कात अशा संभाव्य सत्तापालटाच्या पतंगबाज बातम्यांना हवा देऊन राज्यातील मोठ्या दुर्घटनेवर शिताफीने पांघरूण घातल्याचे दिसते. अर्थात सतत निर्ढावलेल्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून माध्यमांचा स्वभावही तसाच झाला असल्यास त्यांना दोष देऊन चालणार नाही.
आता किमान अध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्या गुरू-महाराजांनी, सत्संगातून लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणणार्या धार्मिक नेतृत्वाने तरी याबाबत पुढील काळात संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांपुढे मुंडी हलवण्याचे काम त्यांनी तरी करू नये, अशी अपेक्षा आहे. त्यापुढे जाऊन लोकांनीच आपण कुठे आणि कशासाठी गर्दी करतो याचा विचार केला पाहिजे. स्पर्धेच्या युगात समाधान, सौख्य, मनाची शांती, समस्यांची उत्तरे या सगळ्यांचा उलगडा होण्यासाठी ९९ टक्के मनुष्याच्या प्रयत्नांची आणि एक टक्का देवाच्या आशीर्वादाची गरज असते हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही ९९ टक्के देवावर अवलंबून राहिला तर तो तुम्हाला आयुष्यात कधीही मदत करणार नाही, हे मनाला ठामपणे सांगा. शेवटी `तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’ हेच खरे.