(दोन म्हातारे रस्त्याकडच्या चहाच्या टपरीवर चहावरल्या भणभणणार्या माशा हाकलीत फुरके मारत बाकड्यावर बसलेले. मागे ढणढणणार्या शेगडीवरलं पातेलं ढवळीत काळवंडलेला चायवाला.)
निंबा : का रे तू नाही गेला?
भिका : कुठं?
निंबा : कारेक्रमाला!
भिका : अरे हा! पण कुठं ते सांगशील का नाही?
निंबा : अरे बरडावर! कीर्तनकार म्हाराजाचं कीर्तन होतं. परत काही सत्कार-चमत्कार होता म्हणी!
भिका : काही कल्पना नाही माला!
निंबा : हां, तुला तशी कवा कल्पना र्हाती म्हणा. तेच खायचा कारेक्रम असता तं सगळ्यांच्या आधी तूच गेला अस्ता, ते बी अख्ख्या घरादाराला घेऊन.
भिका : तू माला ईचारतोय, तू गेला होता का?
निंबा : माला हे डोळे चेक करायला जायचं होतं, मग गेलो होतो डोळ्यांच्या डॉक्टरकडं.
भिका : हां, बाबा-बुवा म्हंटलं का तुला दिसायचा
प्रॉब्लेम येतोच म्हणा, तेच पुण्या-मुंबैच्या नाचणार्या पोरी बोलवल्या असत्या तर पयल्या लायनीत बसून पाह्यलं असतं.
निंबा : हा फुकटचा चहा ढोस. दिला तो!
भिका : पण ईचारीत का व्हता तू?
निंबा : अरे चांगला कारेक्रम व्हता म्हणी. म्हंटलं तू गेला असशील.
भिका : गेलो अस्तो. पण ताप काय पडेले? उन्हाचं बरडावर बसायचं म्हणजे वरूनबी गरम, अन् खालून बी गरम. ढुंगणाचं आम्लेटच!
निंबा : शाकाहारी लोकांयचा कारेक्रम होता तो. अन् तुला आठवलं काय तर आम्लेट. का? बरं झालं नाही गेला ते! सरपंचांनं काय खर्च केला पण? अबाबा!
भिका : त्याच्यात काय अबाबा करायसारखंय? येड्या त्यानं मागं पावत्या नव्हत्या का फाडल्या? घरटी दोनशे रुपडे काढले होते ना त्या भामट्यानं!
निंबा : एवढा काय चिडतो? कारेक्रम झालाच ना?
भिका : अरे कारेक्रम आखाजीला ठेवायचा होता, त्यानं त्याच्यात बापाचं वर्षश्राद्ध साजरं केलं.
निंबा : जाऊदे बाबा. पण कीर्तनाच्या पैश्यात तमाशा नाही ना घातला? का पैसा कार्यक्रम न घेता घरात खर्च केला? थोडं फार इकडं तिकडं झालं तर राजकारण नको करायला…
भिका : आता मी तर पैशे गोळा केले तव्हा बी नव्हतो अन् कार्यक्रमाला पण नव्हतो. पण त्या भामट्यानं पावत्या छापल्याय त्याच्यावरच लिहिलंय कीर्तनानंतर भंडारा राहील म्हणून.
निंबा : पण लोकांनी कीर्तनालाच जावा की अश्या ठिकाणी! कश्याला पाहिजे पंचायतीच्या पैशाचं खाणं? धार्मिक कार्यक्रमात चार चांगले शब्द ऐकायला मिळाले, सार्थक झालं आयुष्य!
भिका : हा तो पंचायत समितीचा सभापती, तो कोण तो टोणगा? तिथून टोमणे मारीत होता, ‘ज्ञानसूर्याच्या प्रकाशात बसणार्यांना ह्या सूर्याचं काही अप्रूप नाही.’ असं काही! (कपबशी चायवाल्याच्या पुढ्यात ठेवतो. पलीकडल्या बाजूनं बसलेला निंबा अजून बशीतल्या माश्या हकालतोय.)
चायवाला : (काही आठवल्यागत, मध्येच) पण जेवण सांगितलं होतं त्यांनी! ढाब्यावरून मीच घेऊन गेल्थो, चांगलं पन्नासेक जणांसाठी होतं ते! बर्फीबिर्फी…
निंबा : हा, आता महाराजांना उपाशीपोटी पाठवणार काय? मागवलं तर बिघडलं कुठं?
भिका : हां, आता अख्खी ग्राम पंचायत टोकरू टोकरू खात्याय, तवा नाष्ट्याला धार्मिक कार्यक्रमाची वर्गणी बाबाच्या नावाखाली खाल्ली तर बिघडलं कुठं म्हणा?
निंबा : तुला कश्यात बी खुसपट काढायची सवय लागलीय बघ! ये बाबा, याला आणखी च्या दे जरा!
भिका : अन् पैशे माझ्याच नावावर लिहायला लाव आणखी!
(निंबा उठतो, कपबशी ठेवतो, चार बिस्किटं बरणीतून काढून घेतो, दात पडून तोंडाचं बोळकं झालेलं, त्यामुळे बिस्कीट हिरड्यांखाली घेऊन घोळू लागतो.)
निंबा : आयला तुह्यामुळं बिस्किटं बी खऊट लागू र्हायलेय.
भिका : खायच्या आधी हात कुठं लावला होता?
निंबा : हात नाही. पण तुह्या तोंडीतोंड लागलो ना?
(काही पोरं धावत पळत जाताना दिसत्या, मागून एक जीपडं, एक रिक्षा, काही मोटारसायकली.)
निंबा : पहाय, भिक्या तुझ्यामुळं पोरंबी पळापळ करायला लागली, घाबरली वाटतं तुला.
भिका : झालं काय असंल पण?
चायवाला : काही बायांना मेंढरानं टकरी दिल्या म्हणी!
निंबा : हे राम! वाईट झालं.
भिका : आरं पण घडलं कुठं? आणि कधी?
चायवाला : कार्यक्रमातून बाया निघत होत्या, तवाच काही मेंढ्या घुसल्या गर्दीत.
निंबा : हे भगवंता! काय येळ आणली ही!
भिका : पण मेंढरांच्या धडकीत लै झालं तर व्हईल काय? एवढ्या तेवढ्यासाठी एवढ्या गाड्या? अन् कारेक्रम संपून एवढा येळ झाल्यावर कसं सांगतोय तू?
चायवाला : काही बायाबापडे जखमी झाले म्हणी! त्यांना हलवायला गाड्या गेल्या असतील.
निंबा : फक्त जखमी?
भिका : निंब्या ऊठ! काय घडलंय हे काय कोणी सांगायचं नाही. सगळे भामटे त्या सरपंचाला मिळालेत. खरं बोलायला जिभ्या झडत्या यांच्या!
निंबा : हे पहाय भिका! याच्यात राजकारण करू नको!
भिका : त्यानं गर्दी जमवली कीर्तनानंतरच्या भंडार्याच्या नावानं, पैसा गावकर्यांचा, खर्च केला बापाच्या श्राद्धात. लक्ष येणार्या इलेक्शनवर, खेळला गोरगरीब भक्तांच्या जीवाशी. अन् मी शांत बसू काय?