डेहराडूनहून आम्ही मसुरीच्या हॉटेलमध्ये दाखल झालो. चार दिवस तिथे फक्त निवांत राहणे हाच उद्देश होता. सहज म्हणून इकडे तिकडे फिरलो तर तेवढेच फिरायचे आणि बाकीचा वेळ थंड हवेत डाराडूर पडून राहावे असे मनात होते. दुसर्या दिवशी तिथल्या तिथे निघण्यासाठी कुठली गाडी मिळते का अशी हॉटेल मॅनेजरकडे चौकशी केली. मॅनेजरने एक फोन नंबर आमच्याकडे पाठवतो असे म्हणून त्या गाडीवाल्या एजन्सीच्या मालकाशी आम्हालाच बोलून घ्यायला सांगितले. काही मिनिटातच व्हाट्सअपवर नंबर आणि नाव झळकले. ‘शरण अंकल’.
आम्ही त्या नंबरवर फोन लावला. बराच वेळ रिंग गेल्यावर फोन उचलला गेला, पलीकडून भारदस्त आवाज आला, ‘हॅल्लोऽऽ’
आम्ही विचारले, ‘ये शरण सिंगजी का नंबर है क्या?’
तिकडून उत्तर आले, ‘हांजी, बोलिये सरजी.’
मी मॅडम असूनही तिकडचा आवाज मला सरजी म्हणाला होता. त्यावेळी काम होणे ही प्राथमिकता होती म्हणून मी फार काही बोलले नाही, अन्यथा अशा गोष्टी मी सोडत नाही.
‘हमें कल मसुरी घूमने के लिये गाडी चाहिये.’
‘मिल जायेगी. कल सुबह नौ बाजे आपके हॉटलके गेटपे गाडी आ जायेगी. आप लोग तैयार रहियेगा. नाश्ता वगैरा हॉटेलमें कर लिजिएगा सरजी, वहा आपके पॅकेजमे होगा और बाहर पैसा, टाइम दोनो बरबाद होगा.’
कुठे कुठे जायचे आहे, किती वेळासाठी गाडी हवी आहे. त्याचे किती पैसे होतील असले फालतू प्रश्न शरणसिंग साहेबाना अजिबात पडलेले नव्हते. आम्ही कुठल्या हॉटेलातून त्यांच्याशी बोलत आहोत, हेदेखील त्यांनी विचारले नाही. तरीही ते गाडी
हॉटलेच्या गेटशी तयार ठेवणार होते. कशात काय तर आमचे नाश्त्यावर खर्च होणारे पैसे वाचावेत हा गजब विचार तेवढा साहेबांसाठी महत्वाचा होता.
आम्हीच आमच्या बाजूने कुठे उतरलो आहोत, कुठे फिरायला जायचे आहे असे त्यांच्यासाठी महत्वाचे नसलेले तपशील पुरवले. तेदेखील उडवून लावत शरणसिंग म्हणाले, ‘वोह सब मत बतायें मुझे, चालीस सालसे इस बिझिनेस में हूँ, कहाँ लेके जाना है वो मैं ड्राइव्हर को बताके भेजूंगा।’
किती पैसे होतील यावर त्याने दिलेल्या उत्तराला महाराष्ट्री खाक्यात आम्ही विचारले, ‘कुछ कम नही होगा क्या शरण सिंगजी? थोडा ज्यादा लग रहा है.’
यावर साहेब कडाडले, ‘पहली बात ऐसी है सरजी की आप मुझे शरण सिंगजी मत कहिये. शरण अंकल बुलाईये. दुनिया मुझे इसी नामसे बुलाती है. नब्बे सालका बुढा भी मुझे अंकल कहता है. और दुसरी बात ये है की मेरे बोले हुए प्राइसको कम करने की बात मत किजीयेगा. कहीं भी पूछके आइए, इससे कम किसीने बताया तो ये बिझिनेस छोड दूंगा.’
असे म्हणून या अंकलजींनी फोन ठेवून दिला.
हा माणूस आहे की कोण? ताडताड बोलतच सुटतो!
पण बोलण्यावरून माणूस सच्चा वाटत होता. थोडा मनस्वी होता, पण ठीक आहे. असाही गाडीसाठी दुसरा ड्रायव्हर येणार होता. आम्हालाच त्यांची एकतर्फी गरज असल्यासारखे त्यांना फोन करून दुसर्या दिवशी गाडी पाठवायला सांगितले. मी जरा तुटकच बोलले. त्यांच्या ते लक्षात आले असावे. मग म्हणाले, ‘देखिये सरजी. पैसे के लिये झिगझिग अच्छी नही लगती इसलिये मार्वेâट से कम पैसे लेते है, फिरभी कस्टमर कम कर दो कहेगा तो वैâसे चलेगा?’
‘ठीक है, शरण अंकल,’ असे मी उगीचच म्हणाले.
अंकल म्हणल्यावर मात्र माणूस खुलला आणि सरजी न म्हणता एकदम बेटा असा शब्द त्यांनी वापरला, ‘देखो बेटा, चालीस सालसे इस बिझिनेस में हूँ, गलत पैसे नही लूँगा. दुनिया और लोग देखते देखते जिंदगी चली गयी.’
अंकल एकदम तत्त्वज्ञानावर उतरले होते. पुढचा अध्याय सुरू होण्याआधी त्यांना थांबवणे गरजेचे होते. ‘अंकल, कल ड्राइव्हर टाइमपे आयेगा ना?’
आता हे विचारून मी गडबड केलेली होती. ‘देखो बेटा, वक्त के तो हम पूरे पाबंद है. लेकिन कब क्या हो किसने देखा है? आप कहो तो आधा घंटा जल्दी भेज देता हूँ.’
कसेबसे अंकलना आवरत मी फोन ठेवला. ड्रायव्हर म्हणून अंकल स्वतः येत नाहीत याबद्दल देवाला धन्यवाद दिले.
दुसर्या दिवशी आम्ही नाश्ता करून वेळेच्या आधीच तयार होतो. आदल्या दिवशीची अंकलनी दिलेली धमकी आठवत होती. म्हटले, आम्ही तयार नाहीत हे अंकलना कळले तर ते पाठवलेला ड्रायव्हर परत बोलावून घेतील. काही सांगताच येत नाही. आम्ही ठरलेल्या वेळेवर हॉटेलच्या पार्किंगमध्ये पोचलो. गाडी आलेली होती. गाडी अगदीच खटारा होती. आदल्या दिवशी सगळे व्यवस्थित समजावून सांगून देखील अंकलनी अशी गाडी पाठवलेली बघून आम्ही जरा चिडलोच. त्यानंतर दुसरी गाडी मागवणे, ती येणे या प्रक्रियेत खूप वेळ गेला असता म्हणून नाईलाजाने आम्ही गाडीत बसलो. तितक्यात अजून एक ड्रायव्हर आमच्यापाशी आला आणि म्हणाला, ‘शरण अंकल के कस्टमर?’
आम्ही हो म्हणालो. ‘आप मेरे गाडी में आईए.’
ही काय भानगड? दोन्हीही ड्रायव्हर त्यांना शरण अंकलनी पाठवले आहे असे सांगत होते. दोघे एकमेकांना ओळखत होते. अर्थातच ते शरण अंकलकडे काम करणारे सहकर्मचारीच होते. दुसरी गाडी जरा चांगली असल्याने आम्ही त्यातून जावे असे ठरवले. पण दोन्ही ड्रायव्हरना शरण अंकलशी न बोलता निर्णय घेणे पटेना. शेवटी म्हटले, थांबा. आपण शरण अंकलना फोन करूया. फोन लावला. अंकलनी उचलला नाही. आहोंनी लावला, उचलला नाही. दोन्ही ड्रायव्हरनी लावून बघितला. उचलला नाही. खूप वेळ सगळेच लोक फोन करत राहिलो. पण काही उपयोग झाला नाही. थोड्या वेळाने आम्ही ज्या गाडीत बसलो होतो त्या ड्रायव्हरने फोन लावला. तेव्हा उचलला गेला आणि एका बाईचा आवाज आला, ‘हॅल्लो’ अगदी अंकलच्या पद्धतीने ती बाई बोलत होती.
ड्रायव्हर म्हणाला, ‘मॅडमजी, शरण अंकल है क्या?’ ती म्हणाली, ‘मै मिसेस शरण अंकल. बोलो क्या काम है चंदर.’
ही कसली ओळख. मिसेस शरण अंकल. मला हसायलाच आले.
चंदरसाठी हे काही नवीन नसावे,
‘मॅडमजी, वो इधर थोडा प्रॉब्लेम हो गया है. आप अंकलको फोन दीजिए ना.’
‘अंकल नहा रहे है,’ तिकडून उत्तर आलं.
पण आम्ही खूप वेळापासून वाट बघतोय असे चंदरने सांगितल्यावर मिसेस शरण अंकल म्हणाल्या, ‘रुको जरा.’
काही सेकंद शांतता झाली आणि जोरात आवाज आला, ‘अजी सुनते हो. वो चंदर का फोन है.’
दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मग शॉवर बंद झाल्याचा आवाज आला. मी, आमच्या आहोंनी आणि लेकीने एकमेकांकडे बघितले. तिघांच्या देखील चेहर्यावर मिश्किल भाव होते.
‘चैनसे नहाने भी नहीं देते ये लोग. मेरे हाथ गिले है. तुम अपने हाथोमेही रखना मोबाईल.’
काही सेकंद पुन्हा शांतता. मग शरण अंकल,’बोलो चंदर. क्या कर दिया अब?’
चंदर चिडून म्हणाला, ‘ अंकल, मैने क्या किया है? आपने बोला तो मैं इस हॉटेलमें आया. लेकिन आपने कुशलको भेजा है. अब वो मुझसे झगडा कर रहा है.’
‘खोते हो तुम लोग,’ अंकलजी आता पंजाबीमध्ये चिडले होते, ‘फोन लेके बाजुमे आओ. फिर बात करो मुझसे.’
दहा मिनिटे चंदर आणि कुशल बाजूला जाऊन अंकलशी फोनवर बोलत होते. शेवटी दोघांनी आमची माफी मागितली आणि आम्हाला घ्यायला अंकल तिथे येत असल्याचे सांगून हतबुद्ध अवस्थेत आम्हाला सोडून आपापल्या गाड्या घेऊन निघून गेले. आमच्या अडचणीवर अंकलनी विचित्र उपाय शोधला होता. तो म्हणजे अंकल स्वतःच येणे. मोजून दहाव्या मिनिटाला अंकल तिथे हजर होते. फोनवर त्यांच्याशी झालेल्या संभाषणावरून अंकल पंजाबी सरदार असावेत असे वाटले होते. पण ते पगडी न ठेवणारे सरदार होते.
‘माफ करना सरजी. ये खोते लोगोने बड्डी गडबड कर दी. मैने कहा जाण दो, खुद ही चले जाता हूँ।’
आमच्या वाया गेलेल्या वेळेची भरपाई म्हणून अंकलनी नवी कोरी गाडी आमच्यासाठी आणलेली होती. शिवाय आम्ही सांगितलेल्या गाडीपेक्षा ही मोठीदेखील होती.
‘आप बिलकुल फिकर ना करना. अब मैं आ गया हूँ। सब मुझपे छोड दो बेटा।’
सगळं यांच्यावर सोडायचं म्हणजे नक्की काय करायचं हे आम्हाला न समजल्याने आम्ही काहीही न बोलता गुपचूप गाडीत जाऊन बसलो. अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट, त्यावर निळी पॅन्ट, पायात चप्पल, जेमतेम साडेपाच फूट उंची, पंजाबीपणाला आणि भाषेला न शोभणारा काळा कुळकुळीत रंग. मी पंजाबी लोक फार काळे कधी बघितले नव्हते. त्यामुळे मला अंकलना बघून जरासे आश्चर्य वाटले होते. त्याच्या विपरीत पांढरे केस. डाव्या हातात सोनेरी पट्ट्याचे जुन्या पद्धतीचे घड्याळ. बाबा आझमच्या काळात शोभावा असा जुनाट मोबाईल. गाडीच्या डॅशबोर्डवर वाहेगुरू लिहिलेली माळ आणि वाहेगुरूंचा फोटो.
गाडी चालू झाली आणि पहिल्या पाच मिनिटातच अंदाज आला की अंकल एक निष्णात ड्रायव्हर होते. मसुरीमध्ये आधीच्या दोन तीन पिढ्यांपासून स्थिरावले असल्याने इथल्या प्रत्येक भागाची त्यांना चांगलीच ओळख होती. अंकलचे वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला जे बघायचे आहे ते अंकलना एकदमच चिल्लर अथवा अर्थहीन वाटत होते. अमुक तमुक पॉइंटकडे न्या म्हटले की अंकल म्हणायचे, ‘क्या करोगे वोह देखके। कुच्छ नही है। खाली भीड पडी रेहती है। उसमे क्याही खडे रहोगे और क्याही देखोगे? आपको जाना है तो मै ले चलता हूँ, लेकिन उससे अच्छी जगह मैं आपको ले चलता हूँ।’
असे म्हणत आपली परवानगी आहे हे गृहीत धरून अंकल आम्हाला त्या जागी घेऊन जात आणि खरेच ते ठिकाण उत्तम आणि कमी गर्दीचे असे. मसुरीचा भूगोल आणि इतिहास दोन्हीही अंकलना चांगलेच ठाऊक होते. कुठल्या क्रिकेटरने इथे जागा विकत घेतली होती. ती किती होती, केवढ्याला घेतली होती, तो क्रिकेटर चांगला खेळला नाही तेव्हा लोकांनी त्या घरावर कशी दगडफेक केली अशी अत्यंत मोलाची माहिती अंकल आम्हाला देत होते. कुठल्या हिरोने तिथे कसे दुसर्याच्या नावावर घर विकत घेतलेले आहे. इंग्रज आले त्यानंतर त्या भागाचा कसा विकास झाला. पर्यटक वाढल्याने कसा पर्यावरणाचा र्हास होतो आहे असे आमचे सामान्य ज्ञान वाढवण्याचा त्यांचा अथक प्रयत्न चाललेला होता.
कुठल्याही पॉइंटला पोचल्यावर जर अंकलचे कथानक रंगात आलेले असेल तर काय बिशाद आम्ही गाडीतून उतरू? ‘अरे रुको यार, इतना तो सुनके जाओ। आपका पॉइंट कहा भागे जा रहा है। फ्री में आपको इतना अच्छा गाइड मिला है,’ असे म्हणत अंकल पुढचे दहा पंधरा मिनिटे काहीतरी घटना रंगवून रंगवून सांगत असत. आम्हाला तर असे वाटत होते की मसुरीमधील एखादा दिवस फक्त शरण अंकलकडून कथा ऐकण्यासाठीच ठेवावा की काय?
‘आप मराठी हो क्या?’ असे मधेच एके ठिकाणी त्यांनी आम्हाला विचारले. आम्ही हो म्हणल्यावर त्यांनी कचकन गाडीला ब्रेक लावला. ग्ााडी बाजूला घेतली. ‘लता दीदी भी मराठी है’ (तेव्हा लता मंगेशकर जिवंत होत्या) असे म्हणत वाहेगुरुंना नमस्कार केला. ‘वाहेगुरू वाहेगुरू’ असे म्हणाले. मनासारखी देवपूजा करता आली की निस्सीम भक्ताच्या चेहर्यावर जे भाव असतील ते अंकलच्या चेहेर्यावर होते.
‘लता दीदी अगर मसुरी आती है, तो मैं फ्री में उनके लिये गाडी चलाऊँ,’ असे म्हणत त्यांनी रेडिओवर गाणे लावले. नेमके ते लतादीदींचे होते. अंकलचा काळा चेहरा उजळून निघाला. लता दीदींची कित्येक नवी जुनी गाणी अंकलना पाठ होती. रेडिओवर ती लागली की अंकल त्यांच्या भसाड्या आवाजात ती गात. मधेच वाह वाह करून दाद देत.
आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि मसुरीवर अंकलचे निरातिशय प्रेम होते. ते ज्या शाळेत शिकले ती शाळा त्यांनी आम्हाला दाखवली. लांबूनच त्यांचे घर आम्हाला दाखवले. याच घरात ते त्या दिवशी स्नान करत असणार आणि आपल्याशी फोनवर बोलले असणार असा विचार मनात डोकावून गेला. जवळच्या गावातून गरीब मुलांना मसुरीत शाळेत येणे अवघड होते. चालत यावे लागे. अशा मुलांसाठी अंकल प्रâी गाडी चालवत. आमच्याबरोबर असताना त्यांनी एक गाडी त्या मुलांसाठी पाठवली होती. ज्या शाळेत ते मुलांना सोडत त्या तीन शाळा त्यांनी आम्हाला आडवाटेवर असूनही मुद्दाम नेऊन दाखवल्या.
आम्हाला एखाद्या पॉइंटला सोडले की अंकलच्या सूचना चालू होत, ‘देखो बेटा, मैं यहा आपको उतार दूंगा लेकिन पिकअप यहां नहीं है, वोह सामने झंडा लगा है, उसके नीचे आके मुझे फोन करना। बाकी जगह सिग्नल नही है। इसलिये झँडे के निचेही खडा रहना होगा। दुसरा ये कि ये मॅगी वगैरे या कोई भी चीज खाना मत। गंदा पानी इस्तेमाल होता है। भूख लगे तो भेल खा लेना. बंदर बहोत है। खाने की चीज बचा के लेके जाना। बंदर नजदीक आये तो खाने की चीज फेक देना। तिसरा ये की फोटो निकालने में यहा वक्त मत गवाना। मैं तुम लोगों को फोटो के लिये अच्छी जगह लेके जाता हूँ।’
आम्हाला मसुरीमध्ये रस्किन बॉन्डचे घर बघायचे होते. तशी इच्छा आम्ही व्यक्त केल्यावर त्यांनी आमच्याकडे अतिशय आश्चर्याने बघितले. तिथे कोणीही असे लेखकाचे घर वगैरे बघत नाही असेही ते म्हणाले. रस्किन बॉण्डचा पूर्ण इतिहास त्यांनी आम्हाला सांगितला. लांबून घर दाखवले. तिथल्या ज्या पुस्तकाच्या दुकानात लेखक जात असत ते दुकान दाखवले.
एव्हरेस्ट हाऊस आवर्जून दाखवले. तिथे गेल्यावर फालतू फोटो काढण्यापेक्षा एवरेस्ट महाशयांचा इतिहास वाचून काढा असेही मुद्दाम सांगितले. अंकलचा इंग्रजांवर भयंकर राग होता. खरे तर मसुरीचा विकास इंग्रजांमुळे झाला असे त्यांनीच सांगितले असले तरीही इंग्रजांनी भारत लुटून नेला याचा त्यांना अतिशय राग होता. इंग्रजांविषयी, मसुरी, डेहराडूनला उन्हाळ्यात येऊन राहणार्या व्हाइसरॉयविषयी ते इतके त्वेषाने बोलत होते की त्याक्षणी अंकलसमोर एखादा इंग्रज आलाच तर त्याचे काही खरे नव्हते. अंकलनी हाती येईल त्या शस्त्राने त्याचा मुडदा पाडला असता.
कुठेतरी एक देवीचे देऊळ होते. तिथे आम्ही जाऊन यायला हवे असे अंकलचे मत होते. पण आम्ही तिथे जाण्यास फार उत्सुक नसल्याचे बघून ते अतिशय नाराज झाले. ‘आपकी मर्जी. क्या कहें’ असे म्हणत रस्त्यावर बसणार्या एखाद्या वाया गेलेल्या मुलाकडे येणारे जाणारे ज्या नजरेने बघतील त्या नजरेने अंकलने आमच्याकडे बघितले.
चार दुकान भागात गेल्यावर कुठे खावे, काय चांगले मिळते, कुठे बसले तर लवकर नंबर लागतो अशा मोलाच्या टिप्सदेखील त्यांनी दिल्या.
अंकलनी दिलेली महत्वाची माहिती आणि अध्येमध्ये वेळ मिळाला तर मसुरी दर्शन असा एकंदर दोन दिवस आमचा कार्यक्रम चालला होता. रोजचे पैसे घेताना अंकल म्हणत, ‘ज्यादा पैसे नहीं चार्ज करता मैं। क्या है बेटा इमानदारी से कमायेगा, खायेगा तोही खाना हजम होगा नही तो बेहजमी हो जायेगी।’
अंकल अजून विस्तृतपणे बोलण्याच्या आधी आम्ही तिथून निघत असू. दोन दिवसात आम्ही अंकलबरोबर रुळलो होतो. ते आम्हाला आमच्यातील एक वाटू लागले होते. आम्ही ठिकाणे बघून येईपर्यंत ते छान झोप काढत. आग्रह करून देखील त्यांनी दोन दिवसात कुठल्याही हॉटेलात आमच्याबरोबर जेवण घेतले नाही की साधा चहा घेतला नाही. ‘बीवी घरमे नही लेगी. टिफिन दिया है’ असे म्हणत. त्यांचे स्वत:चे वय पासष्ठीच्या वर होते. डोळ्याला चष्मा नव्हता. संध्याकाळ झाली की हे गाडी कसे चालवतील अशी आम्हाला भीती वाटे. पण ते बिनधास्त होते. दर्याखोर्यातून गर्दीतून गाडी हाकण्याची त्यांना सवय होती. अथक बोलणे, लोक मसुरी बघायला आलेले आहेत तर एकही कोपरा न सोडता सगळे दाखवणे हे आपले इतिकर्तव्य आहे या भावाने, आम्ही थकलो तरीही एवढंच बघा म्हणून आग्रह करत आम्हाला स्थळ बघायला लावणे, आणि हे करत असताना आपल्या मनाचेच काहीतरी उपदेशाचे डोस आम्हाला पाजत राहणे हे अंकल करत होते आणि आम्हाला ते छान वाटू लागले होते.
तिसर्या दिवशी तिथून हृषिकेश आणि हरिद्वारला आमच्याबरोबर येणार का असे विचारल्यावर अंकल एकदम खुलले. शिवाय आम्ही देवाच्या द्वारी जाणार म्हणजे अगदीच नास्तिक नाही याचा आनंद चेहर्यावर झळकत होता. ‘उधर भी आप ही आओगे क्या?’ असे आम्ही विचारल्यावर अंकल म्हणाले, ‘आजकल मैं बाहर की ट्रिप लेता नहीं। रात को गाडी च्ालाना मुश्किल हो जाता है। जिन्दगी गाडी में गुजर गयी। लेकिन मरना गाडी में नही। आप लोग अच्छे लोग हैं। दो दिन बूढे आदमी की बाते सेह ली। मानी। आपके साथ मैं आऊंगा। रात हो गयी तो देहरादून में बहन के घर जाऊंगा।’
अजून एक दिवस अंकलचे तत्वज्ञान आम्हाला ऐकायला मिळणार याचा आम्हाला आनंद झाला होता. हृषिकेश, हरिद्वार असे सगळे मनोभावे फिरवून अंकलनी आम्हाला डेहराडूनला सोडले. आम्ही पैसे त्यांच्या हाती दिल्यावर म्हणाले, ‘आप लोग फिर कभी मसुरी आओगे ऐसे तो लगता नहीं। आपसे पैसे लेने तो नही चाहिये क्योंकि आप लता दीदी के गांव से आये हो। भले लोग हो।’ त्यांना दिलेल्या पैशातून पाचशे रुपये काढून आमच्या हातात देत आमच्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाले, ‘गुडिया को खूब पढाना। उसके लिये मेरी तरफ से ये रख लो।’
आयुष्य जगून झाल्यावर आलेलं शहाणपण त्यांच्या चेहर्यावर होतं आणि एक निरागस भावदेखील. अंकलसाठी का होईना पण पुन्हा तिथे जावं असं खूप वाटतं.
मी काय म्हणते की तुम्ही जर मसुरीला गेलात, तिथे पांढरा शर्ट-निळी पॅन्ट, बाबा आझमच्या काळातील मोबाइल घेऊन कायम तत्वज्ञान सांगणारे कोणी ज्येष्ठ काकाजी दिसले तर त्यांना फक्त एवढंच सांगा की तुम्ही लता दीदींच्या राज्यातून आला आहात. त्यानंतर त्यांच्या चेहर्यावर जो आनंद झळकेल तो एखाद्या लहान बाळाला खूप वेळाने आई दिसल्यावर जसा असेल ना अगदी तसा असेल.
– सारिका कुलकर्णी