भोळ्याभाबड्या, परिस्थितीनं गांजलेल्या बहुजनांना गंडवायला हातभर दाढीमिशा वाढवलेले, गावोगावी हिंडफिर्यासारखं भटकून मोठमोठ्या आवाजात पोकळ ज्ञान वाटणारे, प्रसिद्धीसाठी हपापलेले भोंदू साधूगोसावी तुकोबाच्या काळातही होते बरं का! पाठांतर केलेले संस्कृत श्लोक लोकांच्या तोंडावर मारून अडाणी बहुजनांना भुलवायचं आणि लुबाडायचं हा त्यांचा ‘धंदा’ होता. पण एकदा का आपल्या तुकोबारायाच्या तडाख्यात हे थापाडे सापडले की सुट्टी नसायची भावांनो! तुकोबारायाचे शब्द धनुष्यातनं सुटलेल्या बाणांसारखे बरसायचे…
‘जगी कीर्ती व्हावी ।
म्हणोनि झालासी गोसावी ।।
बहुत केले पाठांतर ।
वर्म ते राहिले दूर ।।
चित्ती नाही अनुताप ।
लटिके भगवे स्वरूप ।।
तुका म्हणे शिंदळीच्या ।
व्यर्थ श्रमविली वाचा ।।’
…जगात कीर्ती व्हावी, नाव व्हावं, मान मिळावा म्हणून तू दाढीमिशा वाढवून, ‘कॉस्च्यूम’ बदलून गोसावी झालास.
…पाठांतर तर तू जबरदस्त केलंस, पण त्या शब्दांमधलं ‘खरं वर्म’ तुला अजिबात कळलेलं नाही. ते ‘सार’ तुझ्यापासून लांबच राहिलं.
…तुझ्यात संवेदनशीलताच नाही, मानवता नाही… त्यामुळं, केलेल्या खोटारडेपणाबद्दल तुझ्या कुठल्याच कृतीतनं ‘पश्चात्ताप’ दिसत नाही, कारण तो तुझ्या ‘चित्तातच’ नाही. तुझं भगवं बाह्यस्वरुपही लटिकं आहे. फसवं आहे.
…शेवटी तुका म्हणे- अरे शिंदळीच्या… तू आतापर्यंत ही जी तोंडाची वाफ घालवलीयस ना… ती सगळी व्यर्थ गेलीय. सगळं वाया गेलंय.
तुकोबारायाला यातून अशा थापाड्यांना एकच इशारा द्यायचा आहे की तू कितीही बाष्कळ बडबड केलीस तरी शेवटी तुझ्या झोळीत खर्या अर्थानं काहीही पडणार नाही.
आजकालच्या काळात अनेक राजकारणी नेत्यांनाही हे लागू पडतं! पाठांतर केलेल्या भाषणातून समाजसेवेचा आव आणत भोळ्याभाबड्या जनतेला फसवणारे या भोंदुबुवांपेक्षा वेगळे नसतात. पण तुकोबाराया त्यांना ठणकावून सांगतो की, जनतेला एक ना एक दिवस तुझं खरं विद्रूप रूप दिसणारच आहे! हा माणूस फक्त ‘बड्या-बड्या बाता’ मारणारा आहे हे जगासमोर आल्याशिवाय रहाणार नाही. त्यानंतर मात्र तुला या जगात कुठंच, कुणीच मान देणार नाही. स्वत:ची खोटी प्रतिमा उंचावून मोठमोठ्या महात्म्यांशी बरोबरी करू पहाणार्या तुझ्यासारख्या दांभिकाचं बिंग फुटून तुझे सगळे कारनामे फोल ठरणार आहेत. ‘तुका म्हणे शिंदळीच्या… व्यर्थ श्रमविली वाचा.’
अशा भोंदू ‘घोकंपट्टीबहाद्दूर’ नेत्यांची, सत्ताधीशांची आज सद्दी आहे. अवतीभवती या पिलावळीचा उच्छाद आहे. त्यांना बघताना, ऐकताना तुकोबारायाचे असे अनेक अभंग मनात येऊ लागतात. त्याला मुस्काटीत देऊन ते अभंग सुनावावेसे वाटतात, पण तुकोबाराया न वाचल्यामुळं अनेक बहुजन या भपक्याला भुललेले दिसतात, तेव्हा मनाला वेदना होतात. आपल्या तुकोबानं ‘बुडतां हे जन… न देखवे डोळां… येतो कळवळा म्हणवोनी !’ या अत्यंत कळवळ्यापोटी बहुजनांना जागं केलं होतं. त्याच बहुजनांना खोट्या धर्मप्रेमाची भूल देऊन, त्यांच्यासमोर माजात उभं राहून, कर्णकर्कश्श मोठ्या आवाजात रेकून, नाटकी हातवारे करून हे नेते भाषण ठोकत असतात. गर्दी करकरून ऐकणार्या, बघणार्याला वाटत असतं, ‘काय अभ्यास आहे गड्याचा! काय कॉन्फिडन्स आहे. किती तळमळ आहे. हाच आपल्या धर्माचा तारणहार…’ त्याला माहीतच नसतं, या भंकस माणसाच्या पुढे
टेलिप्रॉम्प्टर आहे… दुसर्या कुणीतरी लिहिलेलं वाचून हा गडी तावातावात बोलतोय. एखाददिवशी भाषण, हातवारे सुरू असताना गचकन टेलिप्रॉम्प्टर बंद पडतो आणि हा बहाद्दूर सटपटतो. चेहर्यावरचा रंग झर्रर्रकन उतरतो. हातातलं वारं जातं. वाघाची शेळी होते. गर्भगळीत, हतबल होऊन तो समोर बघत रहातो आणि सगळं पितळ उघडं पडतं. जगात हसं होतं!
हेच तुकोबारायानं साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या आपल्या अभंगातून सांगितलंय!
असं ‘आत’ काहीच नसलेलं, वरवरचं पोकळ ‘ग्यान’ पाजळणार्याला फोडताना तुकोबाराया दुसर्या एका अभंगात म्हणतात,
‘वांझेने दाविले गर्हवार लक्षण ।
चिरगुटे घालून वाथयाला ।।
तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी ।
ज्ञान पोटासाठी विकुनिया ।।
बोलाचि च कढी बोलाचा चि भात ।
जेवूनिया तृप्त कोण जाला ।।
कागदी लिहिता नामाची साकर ।
चाटिता मधुर गोडी नेदी ।।
तुका म्हणे जळो जळो ती महंती ।
नाही लाज चित्ति निसुगाला ।।’
ज्याप्रमाणे वांझ बाईनं पोटाला चिरगुटं बांधून आपण गर्भार असल्याचं सोंग आणावं, त्याप्रमाणे घोकंपट्टी बहाद्दूर, पोकळ शब्दज्ञानी असलेले लोक पोटासाठी ते वर्म नसलेले कोरडे ज्ञान विकण्याचा चावटपणा करतात. पण बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊन कोण तृप्त होईल का?
कागदावर ‘साखर’ असं लिहिलं आणि तो कागद चाटला तर तो जिभेला गोड लागत नाही.
शेवटी तुका म्हणे- असल्या ढोंगी बुवांच्या महंतीला आग लागो. केवळ शब्दांच्या पाठांतराला ‘ज्ञान’ म्हणवून घेताना यांना मनाचीही लाज वाटत नाही.
त्या काळातले वर्चस्ववादी असेच आतून पोकळ होते. वेदांचं, उपनिषदांचं, पोथ्यापुराणांचं पाठांतर करून, ते शब्द बडबडून स्वत:ला ‘ज्ञानी’ म्हणवून घेण्यात या लोकांना धन्यता वाटत होती. त्या जोरावरच मोठ्या तोर्यात फिरायचे हे लोक… इतरांना तुच्छ, हलके, कमी लेखायचे. मग आपला तुकोबाराया त्यांचे कान पकडायचा आणि म्हणायचा, ‘ए भावा, नुस्ती घोकंपट्टी नाही चालणार. त्याचं मर्म, त्याचं वर्म ही कळायला पाहिजे माझ्या अडाणी गोरगरीबांना..’ ही कानउघडणी गरजेचीच होती. नुसतंच तोंडानं ‘अद्वैत’ शब्द उच्चारायचा आणि प्रत्यक्षात वागताना भेदाभेद करायचा, विटाळ मानायचा… हा दांभिकपणा का खपवून घ्यायचा? मग तुकोबाराया म्हणायचा, ‘त्याचं हे ज्ञान म्हणजे वांझ बाईनं पोटावर चिंध्या बांधून दाखवलेल्या गर्भारपणासारखं आहे.’
एक ध्यानात घ्या भावाबहिणींनो, इथं तुकोबाराया स्त्रियांच्या शारीरिक वांझपणाबद्दल बोलत नाही. त्याला या दांभिक लोकांचा वैचारिक वांझपणा उघड करायचा आहे. त्या काळातल्या अडाणी जनतेला समजेल अशा भाषेत बोलणं, उदाहरणं देणं ही त्यांची प्राथमिकता होती. त्या दृष्टीनं अशा उपमा आपण समजून घ्यायला हव्यात. असो.
पण तुकोबाराया कालबाह्य होत नाही, कारण आजसुद्धा अशा ढोंगी सुमारांची सद्दी आहे. शब्दांचे खेळ करून सामान्यजनांना भरकटवण्याचं काम जोरात सुरू आहे. राजकारणातही आणि अध्यात्मातही! लोकांपुढं मोठमोठ्या समाजहिताच्या, गोरगरीबांच्या उद्धाराच्या गप्पा मारायच्या आणि आतून मात्र धनाढ्य उद्योगपतींच्या हिताची धोरणं राबवायची. शिष्यगणांपुढे अध्यात्मिक प्रवचनं ठोकायची आणि एकांतात मात्र व्यभिचाराचं टोक गाठायचं. बोलणं भलतं आणि वागणं भलतंच. हल्ली अशा भंपकबाजीला भुलून लाख्खो-करोडो सर्वसामान्य जनतेची फसवणूक सुरू आहे.
आपल्याच काही भावाबहिणींनी अशा भोंदू नेत्यांना आणि बुवांना डोक्यावर बसवलंय. त्याचे अंधभक्त झालेत. त्यांनीही त्याचा फायदा घेऊन त्यांना गुंडाळून खिशात टाकलंय. प्रसंगी बोलताना हे टगे भावनिक होऊन रडण्याचंही नाटक करतात. जणू ते आपल्या अनुयायांचं हित चिंतत आहेत, असं दाखवत असतात. पण भावाबहिणींनो, आपण ज्या माणसांवर विश्वास ठेवतो, त्यांच्या सल्ल्यानं, आधारानं आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेतो. तो माणूस निवडताना इमोशनल होऊन चालत नाही. त्यात आपली चूक झाली की आयुष्याची दिशा चुकली. खूप मोठी किंमत मोजायला लागते आपल्याला. तो भोंदू मात्र आपल्याला लुबाडून खांद्यावर झोळी टाकून निघून गेलेला असतो. म्हणून तुकोबाराया आणखी एका अभंगातून आपल्याला त्याची लक्षणं सांगताना म्हणतात,
‘स्वयें आपण चि रिता ।
रडे पुढिलांच्या हिता ।।
सेकीं हें ना तेंसें जालें ।
बोलणें तितुकें वांयां गेलें ।।
सुखसागरीं नेघें वस्ती ।
अंगीं ज्ञानपणाची मस्ती ।।
तुका म्हणे गाढव लेखा ।
जेथें भेटेल तेथें ठोका ।।’
….आपण स्वत: नाकर्ता, रिता, रिकामा, पण दुसर्याच्या हिताची खोटी चिंता करत ढसाढसा रडणार.
…असल्या भंपकांची बोलण्यासारखी कृती नसते. त्याचं सगळं बोलणं तोंडातल्या वाफेसारखं वाया जातं. हवेत विरून जातं!
…आपल्याला तो सुखसागरात वस्ती करू देत नाही. ‘आपण खूप ज्ञानी आहोत’ अशी त्याच्या अंगात मस्ती असते.
…तुका म्हणे- ‘असलं गाढव लगेच ओळखा आणि जिथं भेटंल तिथं ठोकून काढा.’
आज शेकडो वर्षांनंतरही तुकोबांची गाथा अभ्यासण्याची प्रचंड गरज का आहे हे कळाले? अहो, तुम्हा-आम्हाला बौद्धिक, मानसिक गुलामगिरीच्या विळख्यातून सोडवून निर्भेळ, निर्विष स्वातंत्र्याचा मोकळा श्वास देण्याची क्षमता या गाथेत आहे! उगाच घाबरून या धर्ममार्तंडांनी ती बुडण्याची शिक्षा दिली होती का? काळ बदललाय. काळाला भेदून गाथा तरली, पण बहुजन आजही गुलामीच्या जोखडात अधिकाधिक अडकतच चाललाय. अशावेळी ही तरलेली गाथाच तुम्हाला मुक्त करू शकते. हा गाथाविचार मनामेंदूत मुरवून घ्या आणि तुकोबारायासारख्याच निडरपणे या वर्चस्ववादी ढोंग्यांचा मुखवटा ओरबाडून, त्यांचं खरं रुप लोकांसमोर आणा. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या उद्धारासाठी हे गरजेचं आहे.
– किरण माने