सुप्रसिद्ध नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्मदिवस नुकताच येऊन गेला. या निमित्ताने स्टोरीटेल या ऑडिओ स्ट्रिमिंग कंपनीने ‘तें – एक श्राव्य अनुभव’ या नावाने विजय तेंडुलकर ऑडिओ नाट्य महोत्सव साजरा केला. ‘कावळ्यांची शाळा’, ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’, ‘कन्यादान’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ ही तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर या निमित्ताने ऐकायला मिळणार आहेत. मुंबईतील स्टोरीटेलच्या कार्यालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे प्रकाशन केल्यानंतर ‘तें’च्या चाहत्यांसाठी स्टोरीटेल ही पाच नाटके ऐकण्यास उपलब्ध करण्यात आली.
या सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्यासह पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक, पुष्कराज चिरपुटकर, दुष्यंत वाघ, संगीतकार मिलिंद जोशी, रत्नकांत जगताप, दिग्दर्शक मंगेश कदम, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, स्टोरीटेल इंडियाचे निर्मिती प्रमुख राहुल पाटील, कंटेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर उमेश बर्वे हेही उपस्थित होते. संवेदनशील पत्रकार असलेल्या विजय तेंडुलकरांच्या ६ जानेवारी या जन्मदिनीच पत्रकार दिवसही असल्याने हा महोत्सव खर्या अर्थाने विशेष असल्याचे स्टोरीटेलच्या वतीने प्रसाद मिरासदार यांनी सांगितले.
स्टोरीटेल आयोजित या उपक्रमाचा भाग म्हणून तयार करण्यात आलेला ‘वारसा तेंचा’ हा प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित लघुपट यावेळी स्टोरीटेलवर प्रदर्शित करण्यात आला. ४५ मिनिटांच्या या लघुपटात विजय तेंडुलकर यांच्या नाटकांची वैशिष्ट्ये, आजही नव्या पिढीतील दिग्दर्शकांना त्यांच्या नाटकांबद्दल वाटणारे आकर्षण, स्टोरीटेलवर ऑडिओ रूपात ही नाटके सादर करत असताना आलेले अनुभव तसेच विजय तेंडुलकर यांच्या व्यक्तिमत्वाचा तसेच साहित्याचा समीक्षेच्या अंगाने घेतलेला आढावा घेण्यात आला आहे. मोहन आगाशे, संदीप पाठक, दिग्दर्शक विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, अक्षय शिंपी, समीक्षक रेखा इनामदार साने, राजीव नाईक, राजू परूळेकर आदींनी या लघुपटात आपापली मते व्यक्त केली आहेत.
विजय तेंडुलकर यांच्या अनेक अजरामर नाटकांपैकीच निवडक पाच नाटके स्टोरीटेल अॅपवर उपलब्ध करून देत नाट्यरसिकांना अनमोल भेटच देण्यात आली आहे. स्टोरीटेलवर प्रकाशित झालेल्या या नाटकांपैकी ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’, ‘कन्यादान’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ या नाटकांचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले आहे तर ‘कावळ्यांची शाळा’ या नाट्यकृतीचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे. तेंडुलकरांच्या य्ाा कलाकृतींचे ऑडिओ रूपातील सादरीकरण करतानाचे अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.