अजित पवार गटाच्या नकली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ साहेब यांची अजितदादांनी जाम गोची करून टाकली, याचं वाईट वाटतं, असं मी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला म्हणताच तो माझ्यावर भुजबळांपेक्षा चौपट भडकला. मला म्हणाला, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दगाबाजी करून याच माणसाने सर्वप्रथम शिवसेनेत फोडाफोडी केली आणि शरद पवार मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवलं. आज त्याच भुजबळांना मंत्रिपदाने हुलकावणी देताच त्यांच्या अंगाचा भडका उडाला. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेनेशी केलेल्या दगाबाजीचे प्रायश्चित्त आणि पापाचं फळ त्यांना मिळालं. अपमान अपमान अपमान असं किंचाळत त्यांना अजितदादांवर तोंडसुख घेण्याची पाळी आली आणि महायुतीच्या नेत्यांनी त्यांना हातोहात गंडवलं. आता मंत्रिपद नाकारल्यामुळे ते फक्त अजितदादांच्या नावाने बोंबा मारत फिरतायत. का तर फडणवीसांची कृपादृष्टी राहावी म्हणून. ओबीसींचा अखिल भारतीय नेता म्हणून मिरवत होते. महायुतीच्या त्रिकुटाने त्यांना बेदखल केलं ते बरंच झालं, असं पोक्याने सांगताच मी त्याला त्यांचीही बाजू समजावून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी पिटाळला. तीच ही मुलाखत…
– नमस्कार भुजबळ साहेब, इथे नाशकात खूप थंडी आहे ना?
– माझ्या अंगाला हात लावून बघ, किती गरम झालोय मी.
– ताप आलाय का?
– ताप आला नाही, तर ताप झालाय त्या अजितदादांचा. माझं वयही लक्षात घेतलं नाही या माणसाने. मी पहिल्यापासूनच डोळ्यात खुपत होतो त्यांच्या. मला मंत्रिपद नाकारून माझा कधी नव्हे इतका पाणउतारा केलाय त्यांनी.
– पण फडणवीस, शिंदे हेही त्यांना सामील होते ना!
– मुळीच नाही. फडणवीस किती चांगले आहेत ते माहीत नाही तुला. शिंदेही चांगले आहेत.
– साफ खोटं. शिंदेंना तुम्हाला वगळल्याची खबर लागताच ते किती खूश झाले हे तुम्हाला माहीत नाही वाटतं. फक्त उड्या मारायच्याच बाकी होत्या. फडणवीसही अजितदादांच्या राष्ट्रवादीची यादी पाहून काय म्हणाले माहीताय?
– काय?
– म्हणाले, सुंठीवाचून खोकला गेला.
– माझा नाही तुझ्यावर विश्वास बसत.
– नाहीच बसणार. पण लक्षात ठेवा, त्यांची भलामण करण्यामागे तुमची असलेली मजबुरी लोक ओळखतात. ते जाऊं दे. मला सांगा असं काय घोडं मारलं होतं तुम्ही अजितदादांचं?
– मुळीच नाही. तरीही शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री असताना ते माझ्यावर जळत होते. मी त्यांच्या डोळ्यात खुपत होतो. ते आजपर्यंत सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून माझा पत्ता कट करण्यासाठी मला राज्यसभेचं गाजर दाखवतायत, हे न समजण्याइतका मी मूर्ख नाही. आता मी त्यांच्या मार्गातला स्पीडब्रेकर झालोय असं त्यांना वाटतंय.
– पण तुम्हाला या सार्याची कल्पना नव्हती?
– कशी असणार? मला त्या जरांगे-पाटलांच्या तोफेच्या तोंडी देऊन हे तिघे मजा बघत बसले. यांचा काय प्लान होता हे आत्ता लक्षात येतंय. म्हणजे झालो तर मी बदनाम. या लोकांनी त्या जरांगे-पाटलांशी काय संधान बांधलं असेल ते हळूहळू समजू लागलंय. म्हणजे मेलास तर तू मर… आम्ही सेफ. बळी दिलाय त्यांनी माझा. तरी मी माझ्या हिमतीवर आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आलोच ना! मला यांच्या मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे मी अडगळीत पडेन व जरांगे-पाटीलही खूश होतील, असा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा कट त्यांनी केला आणि मला अपमानास्पद वागणूक देऊन माझी अवहेलना केली. त्या बाळा नांदगावकरने मला ज्यावेळी माझगावला पाडला तेव्हाही मी आत्ताएवढा हतबल झालो नव्हतो.
– पण मानलं पाहिजे दादांना. मुळमुळीत नाहीत ते. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. दादागिरी शोभून दिसते त्यांना.
– हा कसला दादा. यांचे घोटाळे बाहेर काढले तर बोलती बंद होईल त्यांची. म्हणून तर भाजपच्या वळचणीला येऊन बसलेत ते.
– तुम्ही पण शरद पवार साहेबांच्या अस्सल राष्ट्रवादीला सोडून अजित पवारांच्या नकली राष्ट्रवादीत कशासाठी आला होता? ईडीच्या भीतीनेच ना? तेव्हा तुम्हाला अजितदादांचं नेतृत्त्व आवडलं होतं आणि आता केवळ मंत्रीपद दिलं नाही म्हणून ते वैरी झाले?
– प्रश्न वैरी बनण्याचा नाही तर माझ्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा आहे. या दादांपेक्षा शरद पवार साहेब कितीतरी पटीने चांगले. इथे पक्षातली तीन टकली सामूहिक निर्णय घेतात आणि तो इतरांवर लादतात.
– शरद पवारांबद्दल एवढं चांगलं बोलताय? तेलगी प्रकरणात तुम्हाला जेलची हवा खावी लागली ती कुणामुळे ते आठवतंय ना?
– तो विषय आता नको. मला आता मंत्रिपद नाकारून दादांनी माझा नव्हे तर मला भरघोस मतांनी निवडून देऊन मला मंत्रिपद मिळण्याची स्वप्नं पाहणार्या माझ्या लाखो मतदारांचा घोर अपमान केलाय. मला माझ्यासाठी मंत्रिपद नकोय तर माझ्या या मतदात्यांसाठी द्या ही माझी भूमिका आहे. त्यांना आता मी काय उत्तर देऊ? कसं तोंड दाखवू? मला अडीच वर्षे नको, फक्त त्यांच्या समाधानासाठी निदान दीड वर्ष तरी मंत्रिपद द्या.
– अजब मागणी आहे तुमची. तुमचाही शिंदे होत चाललाय असं दिसतंय.
– मुळीच नाही. मी शिंदेंसारखा डरपोक नाही. लढवय्या आहे. शब्दांचा पक्का आहे. फुकटचे घालीन लोटांगण करणार नाही. मला माझ्या मतदात्यांना न्याय द्यायचाय. हे अजितदादा मला खेळणं समजतात का? तरीही या सार्याचं दु:ख वाटतं. वेदना होतात. डोळ्यांतून अश्रू ओघळतात पोक्या. खिलौना जानकर मुझको तीनों ने तोड डाला है. मिनिस्टर होने का सपना उन्होंने फोड डाला है.
– टोक्या टोचणकर