देशाच्या संसदेमध्ये कधी नव्हे ती संविधानासारख्या पवित्र विषयावर चर्चा आयोजित करण्यात आलेली होती. या चर्चेचा शेवट घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने होईल, सर्वपक्षीय नेते या एका मुद्द्यावर सुरात सूर मिळवतील आणि आपल्या घटनाकारांनी जगातली एक उत्तम घटना लिहिली आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच जाण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा होती. पण झालं भलतंच.. देशवासीयांच्या या साध्या अपेक्षेला सार्थ ठरवतील ते राजकारणी कसले! या चर्चेचा शेवट संसदेमध्ये अगदी धक्काबुक्की आणि त्यातून थेट विरोधी पक्षनेत्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहोचला.
राहुल गांधी यांच्याबद्दल कोणाचे कितीही टोकाचे मतभेद असले तरी विरोधी पक्षातल्या खासदाराला ते धक्काबुक्की करून इस्पितळात दाखल करावं लागण्याइतकी मारहाण करण्याची गुंडगिरी करतील यावर कुठल्याही सामान्य माणसाचा विश्वास बसणं कठीण! पण तरी हे असंच घडलं आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपने केला. अर्थात त्याला पार्श्वभूमी होती अमित शाह यांच्या एका विधानाने उडवलेल्या वादावर पांघरून घालण्याची. संसदेमध्ये एक दिवस आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. ‘सध्या आंबेडकर आंबेडकर करणं ही एक फॅशन बनली आहे. इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग लाभला असता’ असं विधान त्यांनी केलं.
हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असल्याची टीका करत विरोधकांनी संसदेत रान पेटवलं. त्या विरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच अचानकपणे राहुल गांधी यांच्यावर हा अतिशय खळबळजनक आणि अविश्वसनीय आरोप करण्यात आला. राहुल यांच्या धक्क्याने सत्ताधारी पक्षाचे खासदार आयसीयुत पोहोचण्याएवढी गंभीर घटना खरोखरच घडली होती तर भाजपने त्याचे सीसीटीव्ही फुटेज काढून संपूर्ण देशाला दाखवायला हवे होते. राहुल यांच्या या कृत्याचा सर्व देशानेच निषेध केला असता. पण भाजपाची लबाडी अशी की या घटनेचा व्हिडिओ मात्र त्यांना शेवटपर्यंत देता आला नाही. कसे देतील? कारण मुळात ही घटना जशी ते भासवण्याचा प्रयत्न करत होते, तशी घडलीच नव्हती.
सर्वात आश्चर्य म्हणजे ओडिशातले जे प्रताप सारंगी नावाचे खासदार या घटनेवरून राहुल यांच्यावर आरोप करत होते तेच मुळात ओडिशामध्ये फादर स्टेन यांना त्यांच्या लहानग्या मुलासह जाळून मारण्याच्या मॉबलिंचिंगच्या हत्येतले आरोपी आहेत. या सगळ्या नाट्यामध्ये अजूनही काही अद्भुत घटना घडल्या. उदा. आयसीयूमधल्या पेशंटला कोणी बघायला गेल्यानंतर त्याचे व्यवस्थित व्हिडिओ चित्रीकरण करण्याची परवानगी मिळाली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ तातडीने माध्यमांकडे प्रसारित करण्यात आले. त्यातून सुरुवातीला साधी पट्टी डोक्याला लावलेल्या खासदारांच्या डोक्याभोवती भलं मोठं बँडेज कसं गुंडाळलं गेलं याचं हास्यस्फोटक मीम मटिरियल तमाम जनतेला मिळालं. लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्यावर या एका साध्या घटनेवरून कायद्यात असतील नसतील तेवढी सगळी कलमे लावण्यात आलेली आहेत. अमित शहा यांच्या विधानावर सुरू असलेल्या गदारोळाला बगल देण्यासाठी दिवसभर या बातमीची चर्चा अंकित माध्यमांमध्ये होत राहिली.
पण दुसर्याच दिवशी आयसीयूमध्ये दाखल असलेले जखमी खासदार नॉर्मल देखील झाले. आणि गंमत म्हणजे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगू लागले की त्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांना पुढे कुठे शिफ्ट करायचं याचा निर्णय ज्येष्ठ नेते घेतील.. म्हणजे एखाद्या पेशंटला कधी आणि कुठे शिफ्ट करायचं याचा निर्णय डॉक्टर नव्हे तर ज्येष्ठ नेते घेतात… याला नौटंकी म्हणायचं नाही तर काय?… ती तरी जरा बरी आणि अधिक विश्वासार्ह असते.
मुळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं विधान करून चांगलेच फसले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसनेच कसा इतिहासात अपमान केला आहे आणि आता काँग्रेसवाले मतपेटीसाठी त्यांच्या नावाचा जप करतात हा मुद्दा शाह यांना मांडायचा होता हे खरे. पण त्यात फॅशन हा शब्द येणं आणि इतक्या वेळा देवाचा जप केला असता तर असं म्हणणं, या दोन शब्दांनी प्रचंड अहंकार आणि शाह यांच्यात आंबेडकर या नावाविषयी असलेल्या तिरस्काराचं, असंवेदनशीलतेचं दर्शन घडवलं. त्यात आंबेडकरांच्या नावाचा जप करण्याऐवजी देवाचे नाव घेणे कसे चांगले असा देखील अर्थ काढण्यास जागा होतीच. त्यामुळेच या विधानाची मोडतोड झालेली आहे, केवळ ठराविक हिस्सा दाखवून काँग्रेस अपप्रचार करत आहे अशी कितीही टीका भाजपने केली तरी जे व्हायचं ते डॅमेज झालं. कारण जे एक वाक्य आहे ते स्पष्ट आहे आणि ते शंभर टक्के आक्षेपार्ह आहेच. त्यातही असे क्रॉप केलेले व्हिडिओ पसरवणे, त्यातला मूळ अर्थ लक्षात न घेता भलताच भाग व्हायरल करणे हा ज्यांचा मूळ धंदा आहे, त्यांनीच स्वतःवर मात्र ही वेळ आल्यावर ऊर बडवायला सुरुवात करणे हे गमतीशीरच.
अमित शाह यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बचावासाठी आले. काँग्रेसने आजवर बाबासाहेब आंबेडकरांचा कसा अपमान केला आहे, त्यांना दोन वेळा कसे निवडणुकीत पराभूत केले, नेहरू त्यांच्याविरोधात प्रचारासाठी कसे यायचे, त्यांना भारतरत्न हा सन्मान द्यायला कसा उशीर केला, अशी लांबलचक यादी त्यांनी सादर केली. खरंतर बाबासाहेब आंबेडकर यांना नेहरूंनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं होतं, कायदामंत्री केलेलं होतं. पण गेल्या काही वर्षांत या मुद्द्यावरून काँग्रेसला खलनायक ठरवण्यात येतं. पण एवढं सगळं केल्यानंतर ही लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्द्यावर दलित समाजाची नाराजी मात्र भाजपच्या विरोधातच जाते. कदाचित याचाच राग भाजपच्या मनात असावा आणि तोच अमित शाह यांच्या वाणीतून प्रकट झाला.
एरव्ही शाह यांनी संसदीय भाषणांची शैली लवकर आत्मसात केली याबद्दल त्यांचे पत्रकारांच्या वर्तुळात कौतुक होत असते. एखादं विधेयक संसदेत मांडताना ज्या स्पष्टतेने ते बोलतात, ती पाहता संसदेत मोदींपेक्षा देखील काकणभर सरसच त्यांची भाषणे होतात. यावेळी मात्र ते मर्यादा ओलांडल्यामुळे अडचणीत आले. या मुद्द्यावरून भाजप विरोधात विरोधकांची आक्रमक एकजूट दिसू लागली, विरोधक भाजपच्या जुन्या संघी मानसिकतेवरून आंबेडकरांचा वारंवार तुम्हीच कसा अपमान करता अशी टीका करू लागले. त्याविरोधात संसदेत आंदोलन करू लागले.. त्याच आंदोलनामध्ये अचानक हा धक्काबुक्कीचा थरारक ड्रामा घडला.
संसदेच्या आवारात आजवर हजारो आंदोलने इतिहासाने पाहिली आहेत. पण एकमेकांना संसदेत जाऊ न देण्यासाठी खासदार हमरीतुमरीवर येतात आणि त्यातून खासदारांमध्येच धक्काबुक्की होते हे मात्र देशाने पहिल्यांदाच पाहिले. साहजिक आहे की मुद्दा आंबेडकरांच्या अस्मितेचा… त्यामुळे दोन्ही बाजू आक्रमक. त्यातूनच हा भडका उडाला. त्यात या आंदोलनाचे नेतृत्व राहुल गांधी करतायत म्हटल्यानंतर जे काही घडेल त्याचं बिल त्यांच्याच नावावर फाडून मोकळं व्हायचं… त्या सामूहिक झटापटीत जरा कुठे धक्का लागला न लागला आणि भाजपला त्यात एक मोठी संधी दिसली.
आता खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांच्याच बचावासाठी उतरायचे म्हटल्यानंतर भाजपच्या सगळ्याच मंडळींनी आपली भूमिका हिरीरीने बजावली. राहुल गांधी कसे आज का गुंडाराज बनले आहेत हे सांगण्यात भाजपचे निशिकांत दुबे आघाडीवर होते. हेच दुबे संसदेमध्ये टपोरी भाषेत बोलण्यात आघाडीवर असतात. जे म्हणे जखमी झाले त्या ओडिशाच्या प्रताप सारंगी यांचा इतिहास आधी सांगितला आहेच. नंतर या सगळ्यावर कळस चढवला तो भाजपचे राज्यसभेचे खासदार रवी शंकर प्रसाद यांनी… राहुल गांधी यांच्या कथित धक्क्याने घायाळ झालेल्या आपल्या सहकार्याची भेट घेण्यासाठी अत्यंत कळकळीने ते आयसीयूमध्ये पोहोचले. आणि अभिनयाची पराकाष्ठा केली.
आपल्यावर शेकणारी बाब कशी उलटवून दाखवावी हे भाजपकडून शिकावे. त्यासाठी कुठल्या थराला जावे, किती मर्यादा ओलांडाव्यात, विरोधी पक्षनेत्यासारख्या घटनात्मक पदावरही किती बेछूट आरोप करावेत याची काडीचीही पर्वा नाही.
संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत या गौरवशाली वाटचालीनिमित्त संसदेत ही चर्चा आयोजित करण्यात आलेली होती. पण दुर्दैवाने या चर्चेचा शेवट इतका नाट्यमय पद्धतीने झाला. हे पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याला काय वाटले असेल याची कल्पनाच केलेली बरी. संविधानाचा खरा अपमान कोण करते आहे हे न कळणे इतकी देशातली जनता दूधखुळी नाही.