नदी जसे आपले सागराला भेटण्याचे इप्सित साध्य करण्यासाठी खडक-कपारी, डोंगरदर्यातून अवखळ उड्या मारीत ऊन पावसाची तमा न बाळगता अनेक मैलांचा प्रवास अखंड आत्मविश्वासाने करून सागराला भेटते, त्याप्रमाणे किंवा ‘तू क्षत्रिय नाहीस, मी तुला धनुर्विद्या शिकवू शकत नाही’ असे गुरू द्रोणाचार्य यांनी बजावताच जिद्द व आत्मविश्वासाने भरलेला एकलव्य द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून त्यांच्यासमोर परिश्रमपूर्वक, झोकून देऊन धनुर्विद्येचा सराव करून कालांतराने मोठा धनुर्धर बनून गुरूसमोर उभा राहतो; तद्वतच पक्के विचार, जिद्द आणि समर्पणाची वृत्ती या गुणांच्या बळावर एका व्यंगचित्रकाराने आपले ईप्सित साध्य केले.
राहण्याचे ठिकाण चंद्रपूर, मागासलेले, सुखसुविधांचा अभाव, मुंबईपासून शेकडो मैल दूर… अशा ठिकाणी राहून मुंबईस्थित प्रमुख वर्तमानपत्रात आपली व्यंगचित्रे प्रसिद्ध व्हावीत अशी दुर्दम्य इच्छा. लोकसत्ता दैनिकाशी पत्रव्यवहार. प्रत्येकवेळी नकारघंटा. शेवटचा प्रयत्न म्हणून मुंबईला तडक लोकसत्ता कार्यालय गाठले. ‘चंद्रपूरसारख्या दूरस्थ ठिकाणी तुम्ही राहात असल्याने रोजच्या ‘एक कॉलमी’ व्यंगचित्राला शिळेपणा येणार, इच्छा असूनही आपली विनंती मान्य करू शकत नाही’ असे लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी यांनी सांगितले तरी या जिद्दी तरुणाने आपले म्हणणे मागे घेतले नाही. शेवटी नाईलाज म्हणून संपादकांनी त्यांना होकार दिला. ‘पण खात्रीने सांगतो की तुम्हाला ते शक्य होणार नाही’ अशी ताकीदही दिली. त्या तरुणाने दररोज चित्रे द्यायला सुरुवात केली. मुंबईला जाणार्या रेल्वेगाडीच्या ओळखीच्या रेल्वेगार्डमार्फत ती मुंबईला पाठवायची, दुसर्या दिवशी तो ती लोकसत्ता कार्यालयात पोहोचवायचा आणि ४-५ दिवसांनी ती छापून यायची. राजकीय व्यंगचित्र लगोलग प्रसिद्ध होणे गरजेचे असल्याने ते चितारणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नित्यनेमाने दीर्घायुषी सामाजिक विषयांवरची व्यंगचित्रे चितारण्याचा सपाटा लावला. ‘ऐकावं ते नवलच’ या लोकसत्ताच्या सदरातून २० वर्षे दररोज त्यांची व्यंगचित्रे छापून येत होती. या व्यंगचित्रकाराचे नाव आहे मनोहर सप्रे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या खेड्यात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अकोल्याच्या सीताबाई कला महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. पदवी घेतल्यानंतर अकोला व अमरावती येथे नाईलाज म्हणून प्राध्यापकी पत्करली. असा हा प्रवास करून ते चंद्रपूरला स्थायिक झाले. तेथील जनता महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेक्चरला त्यांचा विषय नसलेली मुलेही गर्दी करतात, वर्गात जागा नसली तर बाहेर उभं राहून त्यांचं लेक्चर ऐकतात म्हणून प्राचार्यांनी यांचं कौतुक करण्याऐवजी कानउघाडणी केली. तात्काळ पुढचा मागचा विचार न करता सप्रे यांनी तडक त्या नोकरीवर पाणी सोडले. राज्यशास्त्र विषयात एम.ए. पदवी धारण करून ते जीवनातील विसंगती शोधू लागले. त्यातूनच त्यांची व्यंगचित्रकला आकार घेऊ लागली.
चित्रकलेचे औपचारिक शिक्षण त्यांच्याकडे नव्हते. तरीही जी काही ओबडधोबड चित्रकला येत होती, त्यामधून निर्माण झालेली व्यंगचित्रे ते अनेक प्रकाशकांकडे पाठवून देऊ लागले. परंतु वायुवेगाने ती परत यायला लागली. ते निराश झाले. अचानक नागपूरच्या नावाजलेल्या ‘उद्यम’ मासिकाचे संपादक वडेगावकर यांचे ‘भेटायला या’ म्हणून पत्र आले. संपादकाचे पत्र येणे त्याकाळी सोन्याहून पिवळे होते. वृत्तपत्रीय व्यंगचित्रे कशी रेखाटावीत, त्याचा आकार, रेषा बारीक न काढता ठळक का काढाव्यात, छापल्यावर त्या रेषा परिणामकारक कशा होतात याचे ज्ञान वडेगावकरांनी त्यांना दिले. एकाअर्थी वडेगावकर हेच सप्रेंचे चित्रकलेचे शिक्षक! त्यांचे चित्रासंबंधीचे ज्ञान सप्रेंना लाभदायक ठरले. त्यांचे पहिले व्यंगचित्र वाचकप्रिय ‘स्त्री’ मासिकात प्रसिद्ध झाले. वसंत सरवटे, शि. द. फडणीस व बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रकला क्षेत्रातला बहराचा काळ होता तो. तरीही त्या त्रिकुटामध्ये बसण्याची जागा त्यांनी निर्माण केली, जिद्दीने.
‘मार्मिक’च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘मार्मिक’साठी व्यंगचित्रकार म्हणून काही दिवस कामही केले. डावी विचारसरणी आणि चळवळ्या स्वभाव असल्याने कामगार चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. त्याची परिणीती लोकसभेची निवडणूक लढवण्यात झाली.
सप्रेंची ‘मनोहारी’ व्यंगचित्रे पाहताना ती फारच सोपी वाटतात. परंतु त्यांच्या ओघवत्या व उत्स्फूर्त रेषांच्या डौलाची प्रतिकृती साकारताना ‘हे आपलं काम नाही’ अशी क्षणभर जाणीव होते. सलग रेषा न रेखाटता तुटक रेषांचा ते वापर करतात. चित्रामध्ये रंगाचा एखाददुसरा पॅच वापरतात. व्यंगचित्र हा समाजाचा आरसा असतो, याचा अनुभव त्यांच्या व्यंगचित्रांतून सातत्याने जाणवतो. चित्रातील व्यक्तींच्या अॅनाटोमीचा वापर स्वत:ला भावेल तसा करतात. कधी हाताची तीन बोटे तर कधी चार, परंतु व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजमधून व पेहरावामधून त्या व्यक्तीची ओळख सहज होते. कमीतकमी बारकावे ही त्यांच्या चित्रांची खासियत. त्यांचे प्रत्येक चित्र वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. ‘राजकारणात घराणेशाहीचा सुळसुळाट प्रमाणाबाहेर वाढला आहे’ हे ‘काय म्हणताहेत आमचे भावी आमदार?’ या बाजूच्या व्यंगचित्रातून दाखवत त्यांनी राजकारण्यांना सहज चिमटा काढला आहे, याची प्रचिती आपसूकच येते. ‘दवाखाना’ या व्यंगचित्रामधून डॉक्टर हे देव न राहता रुग्णाला शरीराच्या अनावश्यक टेस्ट करायला लावून कसे बाजारू वृत्तीच्या आहारी गेले आहेत याचे बोलके उदाहरण दाखवले आहे.
प्राध्यापकाची नोकरी अचानक सोडल्याने पोटापाण्याची भ्रांत निर्माण झाली. सप्रे हाडाचे कलावंत, सर्जनशील असल्याने टाकावू वस्तूंना सुंदर, कल्पक आकार देण्याची कला त्यांनी शोधली. मुलांबरोबर जंगलामध्ये फिरत असता वाटेच्या बाजूला टाकावू लाकडाचा ओंडका त्यांना दिसला. त्यांच्या तीक्ष्ण नजरेला त्या लाकडामध्ये सुंदर कलाकृती दिसली. म्हणून त्यांनी ते लाकूड घरी आणले. त्यामधून त्यांनी अतिशय मेहनतीने ‘आई आणि मुला’चे कल्पक शिल्प साकारले. अनेकांनी या शिल्पाचे कौतुक केले. एका कलेच्या पुजार्याने ते शिल्प १०० रुपयांना विकत घेतले. ते त्यांचे पहिले शिल्प. त्यानंतर त्यांनी अनेक काष्ठशिल्पे तयार केली आणि विकलीही.
काष्ठशिल्पातून त्यांनी निर्जीव लाकडांना जीवन देण्याची कला अंदाजे ४० वर्षे जोपासली. अनेकांच्या दिवाणखान्यांची शोभा सप्रेंच्या काष्ठशिल्पांनी उजळून निघाली आहेत. ती तयार करण्यासाठी त्यांनी दोन सुतार प्रशिक्षित केले. परदेशातूनही त्यांच्या काष्ठशिल्पांना मागणी वाढू लागली. फ्रान्समधून काष्ठशिल्पांचे प्रदर्शन करण्यासाठी निमंत्रण आले. तसेच अमेरिकन लोकांनीही त्यांच्या काष्ठशिल्पांची तोंडभरून स्तुती केली.
या काष्ठशिल्पातून प्राणी, पक्षी इत्यादी आकार घेऊ लागले. तद्वतच मानवी स्वभावाचे विविध पैलूही त्यांनी साकारले. बांबूपासून अनेक कलात्मक वस्तू बनवल्या. त्या वस्तूंनी अनेकांची घरे सजली. त्यांची घरगुती ‘आर्ट गॅलरी’ त्यांच्या कलासाधनेची साक्ष देते. या गॅलरीला पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. पु.ल. यांची या गॅलरीबद्दलची प्रतिक्रिया पत्राच्या स्वरूपात ‘पु. ल. एक साठवण’ या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
चंद्रपूरच्या जंगलातील आदिवासी मुलांना कलाशिक्षण देऊन पोट भरण्याची त्यांनी तजवीज करून दिली. त्यांच्या कलाकृतींना फ्रान्समधल्या प्रदर्शनात मानाचे स्थान दिले. व्यंगचित्रकार असूनही उत्कृष्ट डिझायनर व काष्ठशिल्पकार अशी त्यांची व्यावसायिक ख्याती होती. कविता हा सप्रे यांना भावणारा व आवडीचा विषय, त्यामुळे त्यांच्या अनेक पत्रांमध्ये त्या सहज फेर धरतात. सप्रे उत्तम वक्ता तर होतेच, शिवाय अनेक महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ म्हणूनही त्यांना बोलावले जायचे. केवळ कला आणि साहित्य यामध्येच गुरफटून न राहता सामाजिक कार्य, दारुबंदी, वनसंवर्धन आणि पर्यावरण यामध्येही त्यांना विशेष रुची होती. चंद्रपूरला दारुबंदीच्या समितीमध्ये डॉ. अभय बंग, डॉ. विकास आमटे व माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून मनोहर सप्रेही सामील झाले. बांबू संवर्धनासाठी त्यांनी विशेष महत्त्वाचे काम केले. त्याची दखल घेऊन वनराई फाऊंडेशनने त्यांना सन २०१९मध्ये ‘स्व. उत्तमराव पाटील स्मृती संवर्धन’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या चतुरस्त्र कार्याची दखल घेऊन त्यांना ‘चंद्रपूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना ‘कर्मवीर’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले. त्यांच्या निवडक काष्ठशिल्पांचे व व्यंगचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन चंद्रपूरच्या अभयारण्यात पेंच येथे एका रिसॉर्टमध्ये आयोजित केलेले आहे.
मनोहर सप्रे यांनी वर्तमानपत्रांसाठी लिहिलेल्या स्फुटलेखांच्या संग्रहाचे ‘मनमौजी’ हे नाव त्यांच्या स्वभावाशी जुळणारे. तर ‘व्यंगार्थी’, ‘हसा की!’ हे त्यांच्या निवडक व्यंगचित्रांचे संग्रह वाचकांनी डोक्यावर घेतले. ज्या पत्रांतून भिन्न व्यक्तिमत्वाच्या मान्यवरांना त्यांनी कला व व्यवहार या विषयावर अतिशय प्रांजळपणे आपले विचार मांडले, ती पत्रे संग्रहित करून ‘सांजी’, ‘रुद्राक्षी’ आणि ‘दहीवर’ हे संग्रह प्रकाशित केले. लोकांनी त्यांचे स्वागत केले. सप्रे म्हणतात, अनेकांनी पोचपावती दिली, परंतु ह. रा. महाजनी यांनी २९ जून १९६३ रोजी लिहिलेले पत्र ‘आपली कार्टून्स वेळेवर पोहोचतात’ अशी दिलखुलास दिलेली पोचपावती त्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी वाटते.
‘सॅम्पे’ हा फ्रेंच व्यंगचित्रकार सप्रे यांचा अतिशय आवडीचा व्यंगचित्रकार. पण त्याची त्यांनी कधीही कॉपी केली नाही.
सप्रेंशी भेट झाली की ते किलकिले डोळे करून अतिशय दिलखुलास, कोणाचीही भीडभाड न ठेवता एखाद्या तत्त्ववेत्त्याप्रमाणे विचार मांडायचे. त्यांचे वाचन चौफेर असल्याने त्यांच्या विचारांत प्रगल्भता होती. त्यांचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटे. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. परंतु मराठी व्यंगचित्रकारांच्या दुनियेत त्यांच्या कला व साहित्यिक विद्वत्तेचा गुणगौरव झाला नाही. त्यांनाही त्याची खंत होती हे मलाही दिसून आले. कदाचित अन्यायकारक प्रस्थापित व्यवस्थेशी जुळवून न घेण्याच्या वृत्तीमुळे असेलही. इंग्रजी वर्तमानपत्रात आर. के. लक्ष्मण यांच्यानंतर काही व्यंगचित्रकार नावारूपास आले. परंतु मराठीमध्ये तसे काही घडले नाही याबद्दल त्यांना खंत होती. व्यंगचित्रकलेचे महत्त्व सांगताना ते म्हणत, ‘हिशोबाबाबत ऑडिटरची जी भूमिका आणि जे महत्त्व तेच नेमके वृत्तपत्रीय व्यंगचित्रकारांचे असते. ते न्यायालयीन निर्णयासारखे समीक्षण करते.’
मनोहर सप्रे यांचा प्रवास खड्डेमय रस्त्यातून झाला तरीही त्यांची सुविद्य पत्नी त्यांच्याबरोबर त्याच खड्ड्यातून चालत राहिली. ताठ मानेने… त्यांना दोन मुले असून ती आपापल्या व्यवसायात यशस्वीपणे उभे आहेत. मोठ्या सूनबाई नावाजलेल्या लँडस्केप डिझायनर आहेत.
– प्रभाकर वाईरकर