एके दिवशी अचानक रमाला भेटायला गेलेल्या सोहमला तिच्या घरात बॅरिस्टर खुराना आणि ती नको त्या अवस्थेत दिसली आणि भडक डोक्याचा सोहम अंतर्बाह्य पेटून उठला. काही वेळातच बॅरिस्टर खुराना बाहेर पडले आणि संतापलेला सोहम घरात शिरला आणि सरळ आपल्या रिव्हॉल्वरने तिच्यावर पाच गोळ्या झाडल्या. रमा जागीच ठार झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि सोहम भानावर आला. त्याने तिथून पळ काढला आणि सरळ बेंगलोरचा रस्ता धरला; मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.
– – –
एरवी फक्त सटर फटर गुन्हेगार, लहान सहान वकील आणि मख्ख चेहर्याने फिरणारे पोलीसवाले बघण्याची सवय असलेले ते कोर्ट देखील आज तिथली प्रचंड गर्दी पाहून दडपून गेले होते. एखादा मोठा मंत्री गावात आला की जशी तोबा झुंबड उडते तशी झुंबड आज कोर्टात उडाली होती. चहा विकणार्या अब्दुल्लापासून, धिंगाणा न्यूजच्या केसवाणीपर्यंत आणि नुकतेच कोणा वकिलाला असिस्ट करू लागलेल्या ज्युनिअर वकिलापासून ते मोकाशींसारख्या कायदेतज्ज्ञापर्यंत भले भले आसामी त्या गर्दीचा एक हिस्सा बनलेले होते. कोर्टाचे दोन फॅन देखील त्या गर्दीला पाहून जणू मान टाकून पडले होते. पण अशा भीषण उकाड्यात देखील एकही जण आपली जागा सोडायला तयार नव्हता. कारण त्याची रिकामी जागा हडपायला मागे तीन चार लोक तरी टपलेले होतेच. शेवटी दाराजवळची गर्दी जवळजवळ बाहेर ढकलतच कोर्टरूमची दारे बंद करून घेण्यात आली आणि बाहेरचे आवाज जरा शांत झाले.
’स्टेट वर्सेस सोहम खुराना’ केसच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होणार होती. खुनासारखा गंभीर आरोप असलेल्या सोहमविरुद्ध सरकारने चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. यशपाल वर्मा यांच्यासारखा तगडा वकील सरकारतर्फे लढायला उभा ठाकला होता; तर सोहमसाठी झुंजायला उभे होते बॅरिस्टर जगदीश खुराना… येस.. सोहम खुरानाचे वडील आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ’द जॅकल खुराना’… कायद्याच्या जगात खुरानांना ’जॅकल’ म्हणूनच ओळखले जायचे. कोणत्याही कायद्याचा कसा कीस पाडावा, कोणत्या केसला कधी आणि कसे वळण द्यावे ह्यात त्यांचा हात धरणारा सध्यातरी कोणी आसपास देखील नव्हता. ’धूर्त, कावेबाज’ अशा शब्दात त्यांचे सहकारी त्यांना ओळखायचे. पण हाच जॅकल आज एखाद्या खाटकाकडे आणलेल्या बकरीसारखा म्लानपणे खुर्चीत बसलेला होता. सगळी ऐट, रुबाब जणू ओसरून गेला होता.
न्यायाधीश येत असल्याची आरोळी आली आणि सगळे सावरून उभे राहिले. काही वेळातच उगाच कागद खालती वरती कर, पेन उघड बंद कर, असे पॉझेस घेत यशपाल वर्मा उभे राहिले आणि कोर्टात फक्त मलूलपणे फिरणार्या फॅनचा आवाज तेवढा घुमत राहिला.
‘युवर ऑनर… कायद्याचे रक्षण करण्यासाठी सतत सज्ज असलेल्या, त्यासाठी जिवाची बाजी लावणार्या माझ्या एका वकील मित्राच्या मुलाला आज गुन्हेगार म्हणून माझ्यासमोर उभे पाहून अत्यंत वाईट वाटते आहे. बॅरिस्टर खुरानांसारख्या प्रसिद्ध आणि कायद्याचे कायम पालन करणार्या व्यक्तीला काय यातना होत असतील ते मी समजू शकतो. पण गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगार असतो. मग उद्या तो माझा मुलगा का असेना, मला त्याला कायद्याच्या बंधनात अडकवावे लागणारच! एक वकील म्हणून ते माझे कर्तव्य आहे. शहरात घडलेला हा काही पहिला गुन्हा नाही; मात्र जेव्हा खुरानांसारख्या मातब्बर व्यक्तीचा मुलगा खुनासारखा क्रूर गुन्हा करतो, तेव्हा त्यामागे ’माझे कोण काय वाकडे करणार?’ अशी कायद्याला भीक न घालण्याची, न जुमानण्याची एक भावना असते, एक मस्ती असते ती कोणत्याही गुन्ह्यापेक्षा जास्ती घातक असते. समाजासाठी मोठा धोका असते. सोहम खुरानाने फक्त खुनाचा गुन्हा केलेला नाहीये, तर कायद्याला एक प्रकारे आव्हान दिले आहे.’
‘युवर ऑनर.. काही महिन्यांपूर्वीच एका केसच्या संदर्भात बॅरिस्टर खुराना आणि रमा मिरचंदानी ह्यांची ओळख झाली. रमा मिरचंदानी ह्यांच्या नुकत्याच निवर्तलेल्या नवर्याची प्रॉपर्टी त्यांना मिळवून देण्यात खुराना साहेबांनी त्यांची मोलाची मदत केली. ह्या मदतीच्या बदल्यात रमा मिरचंदांनी ह्यांनी खुराना साहेबांना त्यांची फी तर पुरेपूर दिलीच, पण जोडीला त्या आपले हृदय देखील खुराना साहेबांना देऊन बसल्या…’ वर्माने वाक्य पूर्ण केले आणि कोर्टात एकच हलकल्लोळ उडाला. बॅरिस्टर खुराना मात्र शांतपणे बसून होते. त्यांच्या चेहर्यावरची रेषा देखील हलली नाही.
कोर्टातला हलकल्लोळ जजसाहेबांनी शांत केला आणि वर्माने पुन्हा बोलायला सुरुवात केली, ‘युवर ऑनर, बॅरिस्टर खुरानांची पत्नी दहा वर्षापूर्वी वारली; त्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही. सोहम तेव्हा अवघ्या १४ वर्षाचा होता. इतक्या वर्षांनी अशी अचानक चालून आलेली प्रीती खुरानांना धुंदावून गेली. रमा मिरचंदानीसारखी ललना स्वत:हून त्यांच्या आयुष्यात चालत आली आणि त्यांचे आयुष्य बदलून गेले. मात्र रमा त्यांना वाटले होते त्यापेक्षा अधिक चलाख आणि धूर्त निघाली. तिने बॅरिस्टर खुरानांच्या जोडीला त्यांचा मुलगा सोहम याच्यावर देखील जाळे टाकायला सुरुवात केली. अत्यंत हुशारीने तिने आपले आणि बॅरिस्टर खुरानांचे संबंध सोहमपासून लपवून ठेवले. मात्र फार काळ ते लपून राहिले नाहीत. एके दिवशी अचानक रमाला भेटायला गेलेल्या सोहमला तिच्या घरात बॅरिस्टर खुराना आणि ती नको त्या अवस्थेत दिसली आणि भडक डोक्याचा सोहम अंतर्बाह्य पेटून उठला. काही वेळातच बॅरिस्टर खुराना बाहेर पडले आणि संतापलेला सोहम घरात शिरला. त्याने रमाला कोणती संधीच दिली नाही आणि सरळ आपल्या रिव्हॉल्वरने तिच्यावर पाच गोळ्या झाडल्या. रमा जागीच ठार झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि सोहम भानावर आला. रागाच्या भरात आपण काय करून बसलो हे त्याच्या लक्षात आले. त्याने तिथून पळ काढला आणि सरळ बेंगलोरचा रस्ता धरला; मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली. सोहमविरुद्धचे सर्व सबळ पुरावे मी योग्य वेळी कोर्टासमोर सादर करेन आणि त्याचा गुन्हा सिद्ध होईलच. दॅट्स ऑल मिलॉर्ड!’
वर्मा खाली बसला आणि शांतपणे आपला कोट सावरत बॅरिस्टर खुराना उभे राहिले.
‘युवर ऑनर.. गेली १८ वर्षे मी न्यायासाठी लढत आहे. अनेक गरजवंतांना, नाडलेल्यांना मी ह्याच न्यायदेवतेच्या साक्षीने न्याय मिळवून दिला आहे. माझा अशील ’निर्दोष’ आहे ही खात्री पटते, तेव्हाच मी त्या केसला हातात घेतो. आरोपीच्या पिंजर्यात उभा असलेला हा तरुण माझा मुलगा असला, तरी तो ’निर्दोष’ आहे ह्याची मला खात्री पटली, तेव्हाच त्याची केस मी हातात घेतली. सरकारी वकिलांनी रमा मिरचंदानी आणि त्यांचे चारित्र्य ह्याविषयी इथे जो उल्लेख केला, तो किती चुकीचा आहे आणि ह्या केसमधली सरकारी पक्षाला साधी एबीसीडी देखील अजून उमगलेली नाहीये हे मी लवकरच सिद्ध करेन. शक्य झाले तर आजच्या दिवसातच ही केस निकालात निघेल असा माझा अंदाज आहे. दॅट्स ऑल मिलॉर्ड!’ बॅरिस्टर खुराना शांतपणे म्हणाले आणि यशपाल वर्मांसकट प्रत्येकजण सुन्न अवस्थेत पोहोचला.
अरे काय वेडा आहे का हा बॅरिस्टर खुराना? अजून सुनावणी धड सुरू पण नाही झाली आणि हा थेट निकालाची भाषा बोलायला लागला आहे. शेवटी अस्वस्थ मनाला कसेतरी शांत करत वर्मा उठले आणि त्यांनी आपला पहिला साक्षीदार बोलावला.
‘नाम?’
‘केजर थापा साब…’
‘कहाँ काम करते हो?’
‘नीलकमल अपार्टमेंट, साईनगर में वॉचमन हूं.’
‘वो साहब को पेहचानते हो?’
‘हा और वो काले कोट वाले साहब को भी पेहचानता हूं. दोनो बाप बेटे हैं. रमा मॅडम के इधर आते जाते रहते हैं.’
‘जिस दिन खून हुआ, ये वहां आये थे?’
‘हां साब! सुबह को वो बडे साहेब आये थे और उनके थोडी देर बाद छोटे साहब आये. फिर छोटे साहब आके तुरंत निकल गये. बडे गुस्से में लग रहे थे वो. फिर जब बडे साहेब गये तो छोटे साहब फिर से वापस आ गये.’
वर्मांनी खूण केली आणि बॅरिस्टर खुराना थापासमोर उभे ठाकले.
‘थापा, सोहम साहब जब पहली बार आके तुरंत वापस चले गये तो तुम कहा थे?’
‘मैं अपने केबिन में था साहब.’
‘और सोहम साहब?’
‘वो तो अपने गाडी में थे.’
‘दरवाजे से तुम्हारा केबिन कितनी दूर है?’
‘आठ-दस फीट पर है साहेब.’
‘और इतनी दूर से तुम्हे सोहम साहब का गुस्सा दिखायी दिया?’
‘ऑ?’
‘दिखायी दिया?’
‘वो वो…’ थापा फक्त ’वो वो’ करत वर्मांकडे पाहात राहिला.
बॅरिस्टर खुरानांनी एकदा जजसाहेबांकडे हसून पाहिले आणि थापाला जायची खूण केली. अवघ्या दोन मिनिटांत त्यांनी वर्मांच्या पहिल्या साक्षीला सुरुंग लावला होता.
कपाळावरचा घाम पुसत वर्मांनी थेट इन्स्पेक्टर जयरामला कॉल दिला.
‘इन्स्पेक्टर जयराम, ह्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास तुम्ही केलात?’
‘येस सर!’
‘कोर्टाला त्याबद्दल सविस्तर माहिती द्या.’
‘सर, आम्हाला ११ मार्चला साधारण दुपारी तीनच्या सुमाराला नीलकमल अपार्टमेंटच्या वॉचमनचा फोन आला की, फ्लॅट नंबर १६, जो की मयत रमा ह्यांच्या मालकीचा आहे, तिथे त्यांचे प्रेत पडलेले आहे. आम्ही तातडीने तिथे धाव घेतली.
हॉलच्या मध्येच रमाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांचे शेजारी डॉक्टर वर्तक ह्यांनी आम्ही येण्यापूर्वीच त्यांची तपासणी केली होती. पाच गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. आमच्या मेडिकल एक्सपर्टने देखील सेम कॉल दिला. गुन्ह्याच्या जागेवर आम्हाला एक ’टुर्बो काल्सन’ कंपनीचे पिस्टल सापडले. त्यातून पाच गोळ्या झाडल्या गेलेल्या होत्या.’
‘त्या पिस्टलबद्दल अधिक काही माहिती मिळाली?’
‘येस! ते पिस्टल मिस्टर सोहम यांच्या मालकीचे आहे,’ जयरामच्या उत्तराने पुन्हा एकदा कोर्टाची शांतता भंग पावली.
‘त्यावर आरोपीचे ठसे मिळाले?’
‘हो अगदी स्पष्ट मिळाले. त्यानंतरच आम्ही शोध घेऊन पळून जात असलेल्या आरोपीला बेंगलोर हायवेवर अटक केली.’
उलट तपासणीसाठी बॅरिस्टर खुराना उभे राहिले आणि कोर्टातला प्रत्येक माणूस सावध बनला. ही साक्ष महत्त्वाची. ही जर खुरानांनी भेदली तर सरकारी पक्षाचे काही खरे नाही.
‘इन्स्पेक्टर जयराम, उत्तरे अतिशय छान आणि मुद्देसूद देता तुम्ही. काय सांगावे आणि काय टाळावे ह्याचा चांगला अभ्यास करून घेतलेला दिसतोय तुमच्याकडून…’ वर्मांकडे पाहात बॅरिस्टर खुराना म्हणाले आणि वर्मा संतापाने उभे राहिले. ते ’ऑब्जेक्शन’ घेणार त्याआधीच जजसाहेबांनी खुरानांना दटावले.
‘तर इन्स्पेक्टर जयराम, पिस्टलवर कोणाच्या हाताचे ठसे मिळाले म्हणालात?’
‘सोहम खुरानाच्या हाताचे ठसे मिळाले.’
’हम्म! मी प्रश्न जरा बदलून विचारतो. पिस्टलवर कोणाकोणाच्या हाताचे ठसे मिळाले?’ बॅरिस्टर खुरानांचा प्रश्न ऐकून आता जजसाहेब देखील उत्कंठेनं ऐकायला लागले.
‘इन्स्पेक्टर जयराम, मी काहीतरी विचारले..’
‘अं.. हाँ.. पिस्टलवर दोन लोकांचे ठसे सापडले. एक मिस्टर सोहम खुराना आणि दुसरे…’
‘दुसरे?’
‘रमा मिरचंदानी ह्यांचे…’ नजर चुकवत इन्स्पेक्टर जयराम म्हणाला आणि जजसाहेबांना पुन्हा एकदा हातोडा हातात घ्यावा लागला.
‘आरोपीला तुम्ही कधी आणि कुठे अटक केलीत?’
‘आम्ही साधारण साडेतीनच्या सुमाराला त्याला बेंगलोर हायवेवर अटक केली.’
‘तुम्ही सुपरमॅन आहात का?’
‘काय?’
‘मी विचारले तुम्ही सुपरमॅन आहात का?’
‘हा काय प्रश्न आहे जज साहेब?’ आता वर्मा देखील वैतागले.
‘मिस्टर खुराना हे नक्की काय आहे?’ जज साहेबांनी हसत हसत विचारले.
‘मिलॉर्ड, मला सांगा, तीन वाजता खुनाची बातमी मिळते. साधारण सव्वा तीनला पोलीस खुनाच्या ठिकाणी हजर होतात. पुढच्या पंधरा मिनिटात ते तपास पूर्ण करून, हाताचे ठसे कोणाचे आहेत हे शोधून काढून पळून जाणार्या आरोपीला अटक देखील करतात? हे फक्त सुपरमॅनलाच शक्य नाहीये का?’ बॅरिस्टर खुरानांनी तीक्ष्ण स्वरात विचारले आणि आता जजसाहेब देखील जयरामकडे संशयाने पाहायला लागले.
‘इन्स्पेक्टर जयराम.. काही बोलायचंय?’
‘सर, आम्हाला एक निनावी फोन आला होता की नीलकमल अपार्टमेंटमध्ये एका महिलेचा खून झाला आहे आणि तिचा खुनी ५६९० नंबरच्या गाडीतून बेंगलोर हायवेकडे पळाला आहे.’
‘तो फोन कोणी केला होता ह्याचा तपास तुम्ही केलात?’
‘नाही.’
‘इतकी परिपूर्ण माहिती असलेल्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न देखील खात्याने केला नाही?’
‘नाही.. पुरावेच इतके भक्कम मिळाले की…’
‘पुरावे? कोणते पुरावे? हे पिस्टल? थापाची साक्ष? का निनावी फोन? कशाच्या आधारावर पकडले तुम्ही सोहमला?’
जयराम नुसता चुळबुळ करत उभा राहिला.
‘युवर ऑनर, कोर्टाने परवानगी दिली, तर मी एक साक्षीदार बोलावू इच्छितो.’
कोर्टाची परवानगी घेत त्यांनी आपल्या साक्षीदाराला कॉल दिला.
‘तुमचे नाव आणि व्यवसाय?’
‘माझे नाव अल्बर्ट स्टान्स. मी मानसोपचारतज्ज्ञ असून, जगभरातील विविध ठिकाणी माझी व्याख्याने होत असतात. गुन्हेगारांची मानसिकता हा माझा अभ्यासाचा मुख्य विषय आहे.’
‘मिस्टर स्टान्स, ह्यापूर्वी तुम्ही कधी रागाच्या भरात केलेल्या खुनांचा अभ्यास केला आहे?’
‘पुष्कळ वेळा. अगदी जगभरातील अशा अनेक गुन्ह्यांचा अभ्यास केला आहे. अशा काही गुन्ह्यांची उकल करायला मी मुंबई पोलिसांना मदत देखील केली आहे.’
‘मिस्टर स्टान्स. एखादा तेवीस चोवीस वर्षाचा संतापाने पेटून उठलेला तरुण जर बंदूक हातात घेऊन ज्या व्यक्तीवर राग आहे, तिच्यावर चालून गेला; तर काय घडेल?’
‘तो क्षणार्धात आपले संपूर्ण पिस्टल समोरच्या व्यक्तीवर रिकामे करेल.’
‘गोळ्या साधारण कशा लागतील?’
‘छाती, पोट.. व्यक्ती बसली असेल तर डोक्याला देखील.’
‘युवर ऑनर, जगप्रसिद्ध अशा स्टान्स ह्यांचे मत विचारात घेतले, तर सोहमने रमा मिरचंदानी ह्यांच्यावर सहाच्या सहा गोळ्या झाडायला हव्या होत्या. एक त्याने शिल्लक का ठेवली असावी? आणि रमा मिरचंदानी ह्यांना लागलेल्या गोळ्या आपण पाहिल्यात, तर तीन गोळ्या थेट त्यांच्या हृदयात गेल्या आहेत आणि दोन डोक्यात. ह्याचा अर्थ अतिशय शांतपणे आणि व्यवस्थित नेम धरून ह्या गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत.
‘युवर ऑनर, ज्या प्रमुख मुद्द्यावर ही केस उभी राहिलेली आहे, त्याबद्दल आता मला काही बोलायचे आहे. सरकारी वकिलांनी रमा मिरचंदानी ह्यांचे आम्हा बापबेट्याशी काही एक संबंध होते; जे ह्या गुन्ह्याला कारणीभूत ठरले असे जे काही चित्र उभे केले आहे ते धादांत खोटे आहे. रमा मिरचंदानी ह्या माझ्या क्लायंट होत्या, पण त्यापलीकडे आमच्यात एक बहीण-भावाचे नाते देखील निर्माण होऊ लागले होते. रमाला तिच्या पतीची प्रॉपर्टी मिळाली पण ती सर्व त्याने करून ठेवलेल्या उधार्या फेडण्यात संपून गेली. एका साध्या अपार्टमेंटमध्ये ती जागा घेऊन राहायला लागली. सोहम देखील आत्यासारखी तिची काळजी घेत होता. पण काही दिवसांनी मला रमाच्या वागण्यात अचानक बदल जाणवायला लागला. तिचे कपडे, मेक-अपचे सामान ह्यात एक प्रकारचा उंचीपणा आला होता. कुठूनतरी तिच्या हातात अचानक पैसा खुळखुळायला लागला होता. मी माझ्या मार्गाने तपास केला आणि माझ्या लक्षात आले की, रमा नक्की कोणाला तरी ब्लॅकमेल करत होती…’
‘ऑब्जेक्शन युवर ऑनर. माझे वकील मित्र केस भलतीकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस तपासात अशी कोणतीही गोष्ट उघड झालेली नाही. सोहमला वाचवण्यासाठी बॅरिस्टर खुराना एक बनावट कथा रचून सांगत आहेत.’
‘माय लॉर्ड, मी खुलाशासाठी इन्स्पेक्टर जयरामला बोलावण्याची विनंती करतो.’
‘इन्स्पेक्टर जयराम, रमा मिरचंदानींच्या घरात काय काय वस्तू सापडल्या?’
‘एक लाख रुपये कॅश आणि काही दागिने.’
‘काही पत्र, फोटो?’
‘काही फोटो सापडले, पण ते अर्धे कापलेले होते. त्यात फक्त रमाबाई दिसत होत्या, दुसरी व्यक्ती नाही.’
‘आणि त्यात रमा मिरचंदानी कोणत्या अवस्थेत होत्या?’
‘त्या… म्हणजे… त्यातील काही फोटोंमध्ये त्यांच्या अंगावर अगदी कमी कपडे होते, तर काही फोटोंमध्ये बिलकुल नाही,’ जयरामच्या उत्तराने एका क्षणात कोर्टाचे रूपांतर गदारोळात झाले.
‘आणि हे फोटो महत्त्वाचे आहेत, त्यांचा गुन्ह्याशी काही संबंध आहे असे तुम्हाला वाटले देखील नाही? का ’बाप बेट्याचे एकाच बाईशी संबंध’ असल्याची कथा रचण्यात इतके गुंग झालात की तुम्हाला ह्याचे महत्त्वच लक्षात Dााले नाही? त्या फोटोंवर कोणाचे ठसे मिळाले?’
‘फक्त रमा मिरचंदानींचे ठसे त्यावर होते.’
जयरामने स्टँड सोडला आणि वर्मांनी दोन्ही हाताने डोके गच्च पकडले.
‘माय लॉर्ड, नीलकमलच्या एंट्री बुकप्रमाणे मी दुपारी दोन पंचवीस वाजता आलो आणि दोन बेचाळीसला बाहेर पडलो. सोहम आधी दोन एकतीसला आला, दोन चाळीसला लगेच बाहेर पडला आणि पुन्हा दोन पंचेचाळीसला आला आणि दोन पंचावन्नला बाहेर पडला. सरकारी पक्षाच्या मतानुसार दुसर्यांदा सोहम जेव्हा आला, तेव्हा त्याने रमाचा खून केला आणि तो पळाला. रमा खुद्द सोहमला ब्लॅकमेल करत होती असे जरी मानले, तरी अवघ्या दहा मिनिटात रमाचा खून करणे, तिच्या ताब्यात असलेले फोटो शोधून ते अर्धे कापणे आणि मग पळ काढणे हे सर्व कसे शक्य आहे? आणि मुळात फोटो घेऊन पळून जाण्याची संधी असताना कोण आरोपी खून करून निवांत फोटो कापत बसेल? मुख्य म्हणजे त्या फोटोंवर फक्त रमाचे ठसे मिळाले. अर्थात, आरोपी हा हातमोजे घालून आलेला होता हे नक्की. जर सोहमने खून केला असता, तर फोटोवर ठसे न ठेवण्याची काळजी घेणारा सोहम स्वत:च्या मालकीचे पिस्टल प्रेतापाशी टाकून जातो? मुळात ते पिस्टल मी रमाला सुरक्षेसाठी दिले होते; कारण पतीची इस्टेट तिला मिळताच, कर्जदारांच्या तिच्याकडे फेर्या वाढू लागल्या होत्या.’
‘मग सोहम नाही तर खुनी कोण आहे?’ वर्मांनी उद्वेगाने विचारले.
‘ते शोधणे पोलिसांचे काम आहे. माझा अशील गुन्हेगार नाही हे सिद्ध करणे येवढेच माझे काम आहे.’
—
‘चिअर्स माय बॉय!’
‘चिअर्स डॅड… शेवटपर्यंत धाकधूक होती पण…’
‘मी सांगितले ना, जोवर माझा अशील ’निर्दोष’ आहे ह्याची मला खात्री पटत नाही तोवर मी ती केस घेत नाही. मला पूर्ण खात्री होती की, तू हा खून केलेला नाहीस. शेवटी न्यायालयाला तुला निर्दोष सोडावेच लागले.’
‘वर्मांनी प्रयत्न मात्र जोरदार केले…’
‘नक्कीच! पण मी सतत सांगत होतो की, ह्या खुनामागे त्या व्यक्तीचा हात आहे ज्याला रमा ब्लॅकमेल करत होती. पण त्यांनी लक्षातच घेतले नाही.’
‘…आणि ती तुम्हाला ब्लॅकमेल करत होती, हे त्यांच्या कधी ध्यानीमनी देखील येणार नाही मिस्टर जॅकल!!!’ सोहमने वाक्य संपवले आणि बंगल्याचा हॉल हास्याने दुमदुमला…