रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून काढून घेत असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली आणि या जन्मत:च अशक्त आणि कुपोषित असलेल्या बालकाचे आयुष्य संपुष्टात आले… ‘अशीही बनवाबनवी’ या एव्हरग्रीन सिनेमातील अशोक सराफ यांनी साकारलेल्या धनंजय मानेच्या शब्दांत सांगायचे तर ‘२००० रुपयांची नोट वारली…’ २०१६ साली, आपण काय विलक्षण मास्टरस्ट्रोक मारत आहोत, अशा थाटात नोटबंदी जाहीर करण्यासाठी आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता टीव्हीवर अवतरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० बैठकांसाठी परदेशात असताना ही घोषणा करण्यात आली. लोकांसमोर येऊन कशाचेही श्रेय घेण्याची पिपासा जडलेल्या मोदींच्या गैरहजेरीत ही घोषणा व्हावी, यातूनच नोटबंदीचे सणसणीत अपयश अधोरेखित होते. अर्थात भारतीय जनता पक्षाचे पगारी आणि बिनपगारी निबंधलेखक सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये तोही कसा मास्टरस्ट्रोक होता आणि हाही कसा मास्टरस्ट्रोक आहे, याचे हास्यस्फोटक निबंध प्रसवत आहेतच. या फुग्यांची हवा काढण्यासाठी या काही टाचण्या.
मुळात नोटबंदी ज्या काही कारणांसाठी केली होती असे नंतर पश्चातबुद्धी असल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने, वेळोवेळी रचून सांगितले गेले, त्यातले एकही कारण खरे नव्हते, त्यामुळे त्यातल्या एकाही उद्दिष्टाची पूर्तता झाली नाही. ना दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, ना देशाची अर्थव्यवस्था (एरवी झाली असती त्याहून अधिक गतीने) डिजिटल झाली, ना काळ्या पैशावर काही प्रहार झाला, ना बनावट नोटा बनणे थांबले. रिझर्व्ह बँकेकडे चलनातल्या जवळपास सर्व नोटा जमा झाल्या, तेव्हा भ्रष्टाचारी लोक नोटांच्या थप्प्यांच्या स्वरूपात काळा पैसा साठवतात, ही मध्यमवर्गीय भक्तगणांची बालिश फिल्मी समजूत धुळीला मिळायला हरकत नव्हती… पण, मग ते भक्त कसले! आताही ते २००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात काळा पैसा साठवलेल्यांचे धाबे दणाणणार, अशा दिवास्वप्नांत रममाण आहेत.
मुळात २००० रुपयांची नोट घाईघाईने आणण्याची वेळ आली ती नोटबंदीमुळे लोकांच्या हातात चलनच न उरल्यामुळे. जास्तीत जास्त मोठी नोट आणून चलनतुटवडा भरून काढण्यासाठी या चमत्कारिक रकमेची नोट बाजारात आणण्यात आली होती. एका अर्थनिरक्षर निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कुंठित होऊ नये, यासाठी ऐनवेळी करायला लागलेली ती केविलवाणी धावाधाव होती. त्याहून अधिक तिचे मोल नव्हते. शिवाय, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये काळा पैसा साठतो, असे मानले गेले होते, तर काळा पैसा २००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात साठवणे अधिक सोपे होणार नव्हते का? मग कसला काळा पैसेवाल्यांवर प्रहार नि कसले काय!
पण, इथे भक्तगणांची बुद्धी एकदम तेज चालू लागली. पत्रकारितेला कलंक असलेल्या काही दिवट्यांनी २००० रुपयांच्या नोटेत चिप आहे, ती काळा पैसा कुठे आहे, ते दाखवून देणार आहे, वगैरे गांजेकस बडबड सुरू केली. त्याचबरोबर कुजबूज आघाडीने आता सगळे काळा पैसा बाळगणारे लोक तो २००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात साठवतील आणि मग मोदीजी ही नोट पण एके रात्री येऊन चलनातून काढून घेतील, तेव्हा काळ्या पैशावर खरा मास्टरस्ट्रोक होईल, असे सांगत फिरू लागली. या ४० पैसे शब्द या दराने मोठमोठे पो घालणार्यांना जे समजते, ते काळा पैसा जमवणार्यांना समजत नसेल का? त्या बाबतीत तरी तुमच्यापेक्षा जास्त अक्कल असेल ना त्यांना? २००० रुपयांच्या नोटा लोकांनी नोटबंदीनंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच स्वीकारल्या आणि वापरल्या, कारण तेव्हा काहीच पर्याय नव्हता. जसजशी आर्थिक स्थिती पूर्वपदावर आली, तसतसे लोक या नोटा वापरेनासे झाले. अनेक दुकानांमध्ये, विक्रेत्यांकडे या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. एटीएममधून २०००ची नोट घ्यायची वेळ यायला नको म्हणून लोक १९००च्या पटीत पैसे काढायचे. या नोटा एटीएममधून मिळणे बंद झाले तेव्हाच त्यांचे भवितव्य अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांनाही कळले होते. मग रोखीने व्यवहार करणार्यांना (सोशल मीडियावरच्या फॉरवर्डे काकाकाकूंना रोखीत चालणारे सगळे व्यवसाय काळा पैसावाले वाटतात हा एक विनोद) ते कळले नसेल?
अभ्यासू नेते म्हणून (आपल्याच वर्तुळात) प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की आता २०००ची नोट ज्यांच्याकडे असेल, त्यांना तपशील द्यावे लागतील, रांगेत उभे राहावे लागेल (या पक्षाच्या मंडळींना इतरांना रांगेत उभे करण्याचा सोस काय आहे कळत नाही). अहो अभ्यासू महोदय, ५०० आणि १०००च्या नोटांवर तुम्ही सर्जिकल स्ट्राइक केला होता तेव्हा टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी कोणत्या रांगेत उभे होते? ते जाऊ द्या, तुमच्या किंवा कोणत्याही पक्षाचे किती नेते रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत होते? पंतप्रधानांच्या नव्वदीपार आईकडे (मुलाचे अपयश सावरून घेणारे फोटोसेशन करण्यासाठी) ५००-१०००च्या नोटा होत्या, पण त्यांच्या कर्तबगार पुत्राला त्या महिन्याचा सगळा पगार १०० रुपयांच्याच नोटांमध्ये दिला गेला होता काय? खुद्द तुम्ही कोणत्या रांगेत उभे राहिला होता?
२००० रुपयांच्या नोटा हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठीचा सापळा असू शकतो, या शंकेने जेवढे भ्रष्टाचारी घाबरले असतील, त्याहून कितीतरी अधिक पटींनी प्रामाणिक माणसे घाबरली होती आणि ही नोट बाळग्ातच नव्हती. रिझर्व्ह बँकेने त्यांचा मृत्यू जाहीर करण्याच्या आधीच त्यांचे जीवितकार्य संपले होते. त्यामुळे या नोटेच्या देहांतामुळे कोणालाही वाईट वाटले असण्याची शक्यताही नाही…
…आता त्या वारलेल्या नोटेच्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊ नका रे!