(बसमध्ये दोन सहप्रवासी. दोघे दिसायला सारखे, पण विचारांनी वेगळे)
प्रवासी एक : राम, राम! कुठले तुम्ही?
प्रवासी दोन : जय श्रीराम! आम्ही पिराची कोमलवाडीचे! आणि तुम्ही?
प्रवासी एक : मी जमालपूरचा! म्हसोबाचं आहे बगा…!
प्रवासी दोन : ह्या रस्त्याने पुढे डावीकडे आत?
प्रवासी एक : हां, बरोबर! मग इकडं कुठं?
प्रवासी दोन : पोथीचं पारायण चालुय आश्रमात.
प्रवासी एक : मग एकटेच चालला? घरचं कुणी? बायको-बियको?
प्रवासी दोन : श्री गुरुचरित्र पोथीचं वाचन आहे, पंतांनी सांगितलंय, महिलांची सावलीसुद्धा चालत नाही त्यात म्हणून. विटाळ वगैरे!
प्रवासी एक : बायकोचा विटाळ? आम्हाला तर बायकोशिवाय दिस निघायचा नाही. घरची कारभारीण ती!
प्रवासी दोन : आमच्या धर्मात नाही चालत.
प्रवासी एक : असंल बाबा! आमचं मात्र दर्शनाला जा, नाहीतर कुठं बी देवकार्याला जा. बायको असतेच.
(प्रवासी दोन लागलीच थोडा सरकून बसतो.)
प्रवासी दोन : कमाल आहे, तुमच्यात रजस्वला स्त्रियांना प्रार्थनास्थळात प्रवेश देतात?
प्रवासी एक : हा बाबा, काही प्रॉब्लेम नाही. सगळी सृष्टी बायांमुळे तगली, जगली अन् वाढलीय. त्यांचा कसला विटाळ?
प्रवासी दोन : तुमच्या धर्मात चालत असेल. आमच्या धर्मात मूर्तीला महिलांनी स्पर्श केलेला चालत नाही.
प्रवासी एक : बापरे!
प्रवासी दोन : एवढंच काय? पूर्ण कपड्यांतल्या महिलांनाच मंदिरात प्रवेश मिळतो.
प्रवासी एक : तसं अख्ख्या भारतात कुठं कोण नागड्यानं फिरू शकतंय? त्यात बायांना एवढी मोकळीक फक्त लेण्यांच्या नक्षीकामातच! हा लै झालं तर हाफ चड्डीत कुणी येत असंल तर आमच्यात तर काही अडचण नाही. देव ज्याचा त्याचा आहे. कुणी कसा पुजावा हा वैयक्तिक प्रश्न. नागड्यानं पूजा नाहीतर पार नाक झाकून पूजा!
प्रवासी दोन : वाटलंच मला! तुमच्या धर्मात चालत असेल म्हणून. तसं आमच्या धर्मस्थळांवर आम्ही अलीकडे मांसबंदी केलीय. गावात कडक कायदा.
प्रवासी एक : आमच्या देवाला निवद दाखवायचा म्हणलं तरी बोकड-कोंबडं कापावा लागतं. तेव्हा डायरेक रफिक खाटकाला बोलवून त्याच्या हातूनच…
प्रवासी दोन : आम्ही सरळ सांगितलंय, मुसलमानांनी देवाच्या दारात अगरबत्त्या काय वा धूप काय… ढुंकून पाहायला यायचं नाही. त्यांनी त्यांच्या मशिदी पाहायच्या.
प्रवासी एक : आमच्याकडं आमचे मुसलमान मित्र येत्या ब्वॉ! जत्रा-बित्रा, कारणं, गोंधळ असं सगळ्यात. आणि आम्ही बी जातो की उरूस-संदल अशा ठिकाणी. मी मशिदीत बी जातो. ते अत्तराचा घमघमाट भारी रहातो तिथं!
प्रवासी दोन : तुमचा धर्म तुम्हाला शुद्ध ठेवावा वाटत नाही का?
प्रवासी एक : माणसानं पाण्यासारखं राहावं निर्मळ. कालच गुरुद्वारात गेलो, लंगरमधी सेवा दिली. जेवण केलं, तृप्त! तसं डोंगराकडच्या चर्चमधी गेलं का अशी शांतता रहाते की बस! भारी वाटतं! तुम्ही कधी विहारात गेलाय का हो?
प्रवासी दोन : छे! छे!!! आम्हाला आमचा धर्म का बाटवून घ्यायचाय का? ज्यांनी त्यांनी आपापली प्रार्थनास्थळं बघावी. आणि तुम्ही तुमच्या इतरधर्मीय मित्रांना सोबत घेऊन फिरता, भीती नाही वाटत?
प्रवासी एक : कसली?
प्रवासी दोन : हे अलीकडे जिहादचे वेगवेगळे प्रकार चालू आहेत, कुणी तुम्हाला फसवून धर्म बदलायला भाग पाडलं तर? पंत म्हणतात मुसलमानांपासून सावध राहायला पाहिजे.
प्रवासी एक : (मोठ्याने हसतो.) मोगलाईत गावात मुसलमान आले, बाटवून म्हणा नाहीतर बाहेरून म्हणा. तवापासून ते गावात रहातात. एवढ्या वर्षांत त्यांना मलाच बाटवावं का वाटंल?
प्रवासी दोन : तुम्हाला नाही पटणार! आमचे पंत म्हणतात, त्यांना भारताला इस्लामी राष्ट्र करायचंय. मी तर बायकोला, मुलीला आणि बहिणीला गीतेची शपथ दिलीय, त्यांच्या लव्ह-जिहादच्या जाळ्यात फसायचं नाही म्हणून.
प्रवासी एक : एवढ्यानं होतंय होय?
प्रवासी दोन : मग?
प्रवासी एक : एक शपथ वडिलांना द्या की! आजकाल कुरुलकरसारखे म्हातारे हनी ट्रॅप मधी फसताय, ते सांगितलं नाही का पंतांनी?
प्रवासी दोन : मी म्हंटलं ना, तुम्हाला नाही कळायचा जिहादचा धोका! आम्ही मात्र ग्रामसभेत ठरावच केलाय, टिळा-टिकली लावलेल्यांच्याच दुकानातून खरेदी करावी म्हणून…
प्रवासी एक : पण गावोगावी तर अगरबत्त्या-धूप, अत्तर वगैरे सुगंधी गोष्टी हमखास मुसलमानांच्या दुकानातच मिळतात की?
प्रवासी दोन : तुम्ही मुसलमान आहात का हो?
प्रवासी एक : नाही! का हो?
प्रवासी दोन : मग तुमचा धर्म कुठला?
प्रवासी एक : हिंदू! आणि तुमचा?
प्रवासी दोन : कट्टर हिंदू!!!
प्रवासी एक : हे कट्टर काय प्रकार आहे?
प्रवासी दोन : आम्हाला आमच्या धर्माची चाड आहे, तो आम्हाला शुद्ध राखायचा आहे… पंत म्हणतात…
प्रवासी एक : तुमची आणि तुमच्या या पंतांची भाषा ऐकल्यावर तर मला तुम्ही डिट्टो कट्टर मुसलमानच वाटून राहिले ना भाऊ… फक्त कपडे बदलले, भाषा बदलली… कट्टरता तीच. तुम्हाला आणि तुमच्या पंतांना हिंदू धर्माचंच धर्मांतर करायचं आहे का?