त्या दिवशी त्या विकीला देखील काय दुर्बुद्धी झाली ते देव जाणे, ‘या अमृतमहोत्सवा’ पदातील शब्द बदलून त्याने चक्क ‘या नवनवलसप्तसालउत्सवा’ हे शब्द घुसडले. इथे रावसाहेब पेटले.
त्या भंपक गाण्यातील शब्दाशब्दावर रावसाहेबांच्या ज्या शिव्या जात होत्या, त्या सोशल मीडियावर टाकल्या असत्या तर तो नट अंगावरचे कपडे फाडून रस्त्यावर धावला असता.
रावसाहेब पुढे झाले आणि त्यांनी विकीची गचांडी धरली.
‘तुमचं बाप लिहिलं होतं काय हे असलं पद? ते मूळ शब्द बदलायचं काम काय हो तुमचं?’
विकीची बोबडी वळून त्याचा पायजमा आर्द्र झाला होता.
‘अहो, ते मोठं मोठं हजारो स्वातंत्र्यसैनिक देशासाठी लढलं ते तुम्हाला आणि त्या नटव्या नटीला तुमच्या बरोबरीचं वाटलं काय?’ ‘पण आम्ही नव्यानं इतिहास लिहूच नव्हे काय?’ विकी रडक्या आवाजात पुटपुटला.
‘लिहा की हो. सेतू माधवराव पगडी, दत्तो वामन पोतदार, यदुनाथ सरकार, रामचंद्र गुहा, रोमिला थापर, बिपन चंद्र त्यांनी इतिहास लिहिलं नाही काय? पण आमच्या बापाचं टाप होतं काय त्यांना प्रश्न विचारायचं? त्यांचं अधिकार होतं हो. तुमचं ज्ञान म्हणजे व्हॉट्सअप विद्यापीठातलं फॉरवर्ड की हो. जरा अभ्यासपूर्वक इतिहासाचं फक्त एक पान तुम्ही लिहा आणि फाटतंय का नाही ते सांगा. आरं पागल माणसा, कोण तरी चांगलं लायब्ररीचं मेंबरशिप घे, वाचन कर आणि मग मत बनव की. उगंच उंटाच्या ह्याचा मुका घेतो म्हटलं– गरज काय हो? उगंच या उतारवयात न्हाई ते हुंबपणा कशाला?’