तेवढ्यात मोठ्या आवाजाच्या शिर्सेकर बुवांनी प्रत्येक मजल्यावर जाऊन सणसणीत आवाज दिला, अरे चाळीत पूजा आणि धा वाजून गेले तरी कोणाच्याच भिंतीवर एकसुद्धा कॅलेंडर लागाक नाय- मगे शोभा येवची कशी? त्यांच्या आवाजाने सगळ्यांची लगबग झाली आणि प्रत्येकाने आपल्या खोलीच्या भिंतीबाहेर खिळा ठोकून घरातील छान चित्र असलेले कॅलेंडर लटकावले़ आता प्रत्येक मजल्यावर जिवंतपणा वाटू लागला. तरीही `त्या’ सहा जणांनी गालबोट लावलेच. त्यांनी आपल्या दारात बारमध्ये शोभतील अशी उत्तान स्त्रियांची कॅलेंडर्स लावली. त्यावरून पुन्हा तिन्ही मजल्यावर राडा झाला.
—-
चाळीत कोणतेही सार्वजनिक कार्य असले की त्यात तरुणांपेक्षा आणि मुलांपेक्षा पाच-सहा अतिउत्साही वयोवृद्धांचीच लुडबूड जास्त असायची. ज्यावेळी प्रथमच चाळीतर्फे सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेचा घाट घालण्यात आला तेव्हा चाळकमिटीने आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेपासूनच त्याचा पुरेपूर प्रत्यय आला. सभा कोणत्याही विषयावर विचारविनिमय करण्यासाठी बोलावली असली तरी क्षुल्लकशा मुद्यावरून वादावादी करत एकमेकांची असभ्य भाषेत शाब्दिक पूजा करण्याचीच चढाओढ लागत असे. त्यात तळमजल्यावरचे कुडमुडे मास्तर पहिल्या मजल्यावरचे नाना शिंगार्डे, दुसर्या मजल्यावरचे शांताराम भदे आणि नामदेव परब तसेच बारक्यामामा व गंगाराम जॉबर आघाडीवर असत. प्रश्न कोणताही असला तरी त्यावर चर्चा नव्हे, तर वाद हा घालायचाच व त्यातून रणकंदन पेटले की मजा बघायची, ही त्यांची नेहमीची पद्धत होती.
सभेत सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेचा विषय मांडण्यात आला तेव्हा नानांनी उभे राहून सर्वप्रथम त्याला विरोध केला. पूजा घालण्याची गरजच काय, इथपासून त्यांनी थेट मुळालाच हात घातला. हे जग सत्यावर चालत नसून असत्यावर चालते. जिकडे तिकडे असत्य, खोटारडेपणा, भ्रष्टाचार, लाचखोरी ठासून भरलेली असताना पूजा घालून हे प्रकार बंद होणार आहेत का? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. उगाच वर्गणीचा दुरुपयोग आणि वायफळ खर्च. सत्याचा उदोउदो करण्यापेक्षा चाळीतल्या खोटारड्यांची आणि नोकरीत पैसे खाणार्यांची यादी करून तिचा होम करा. वाटल्यास मी त्यांची नावं सांगतो. पण ही पुजेची थेरं मला मान्य नाहीत. पूजा कशी होते, हेच मी बघतो. काय हो शांताराम बापू!
पंच्याहत्तर वर्षाच्या शांताराम भदेंना शांताराम बापू अशी कोणी हाक मारली की त्यांच्या अंगात सिनेमाच्या डायरेक्टरसारखी शक्ती संचारायची. ते बोलतानाही सिनेमाच्या भाषेतच बोलायचे. नानांच्या पूजेच्या विरोधाला पाठिंबा देऊन ते म्हणाले, नानांचा हा विचार चाळीच्या विश्वात्मक महापटाचा विचार आहे. तुम्ही त्यांच्या अँगलने विचार केला तर तुम्हाला चाळीची एक वेगळी इमेज निर्माण होईल. लोक चाळीचं कौतुक करतील. पूजेसाठी पैसा खर्च करण्यापेक्षा आपण छोट्या बजेटचा एक महान चित्रपट चाळकर्यांच्या भूमिका असलेला काढू. मी जरी आयुष्यभर आरकेमध्ये क्लॅपर बॉय म्हणून काम करीत होतो, तरी मला सिनेमाच्या प्रत्येक अँगलची माहिती आहे. माझ्या पिकलेल्या झुबकेदार केसांपेक्षा माझा अनुभव अधिक क्लासिक आहे. तेव्हा बोला, पूजा की सिनेमा? पूजा की सिनेमा?
-ह्यो कसलो बापू, ह्यो तर कोंबडी कापू. घरात सदानकदा जुन्या दोस्तांवांगडा दारू आणि मटणाच्या पार्ट्या चालू असतत त्येंच्या… त्येचा काय ऐकू नका. पूजा व्होवकच व्हयी… केतकेकर मामांनी ठेवणीतला बॉम्ब फोडून बापूंचा आवाजच बंद केला.
त्यानंतर पूजा घालायची की नाही, यावर मतदान घेऊया अशी सूचना चाळकमिटीच्या सेक्रेटरींनी मांडली. त्यावर एकदा काय तो निर्णय घेऊनच टाका असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. शेवटी फक्त सहा विरुद्ध त्र्याण्णव चाळकर्यांनी पूजा करण्याच्या बाजूने दणदणीत कौल दिला. पूजेला विरोध करणार्या त्या सहाजणांची तोंडे काळीठिक्कर पडली. तरी मुळात स्वभावच विघ्नसंतोषी असल्यामुळे पुढच्या चर्चेतही काहीतरी खुसपटे काढण्याच्या तयारीनेच आले होते.
पूजा कुठल्या मजल्यावर घालायची यावरून आता वादाला सुरुवात झाली. चाळीला तळमजला सोडून वर दोन मजले होते. पहिली पूजा तळमजल्यावरच व्हायला हवी. वाटल्यास पुढच्या वर्षी पहिल्या आणि त्याच्या पुढच्या वर्षी पहिल्या आणि त्याच्या पुढल्या वर्षी दुसर्या मजल्यावर घ्या अशी सूचना तळमजल्यावरच्या शेट्ये मास्तरांनी मांडताच `त्या’ सहाजणांंनी कडाडून विरोध केला. पहिल्या मजल्यावरच्या नामदेवबाबांनी कोणत्याही गोष्टीचा तळ म्हणजे गोडाऊन अडगळीची जागा. तळागाळाच्या जागेत पूजा म्हणजे शुभकार्याला सजा, असे विचित्र गणित मांडताच तळमजल्यावरचे गंपू टेलरमामा त्यांच्यावर तुटून पडले. तळमजल्यावर तीस खोल्यात माणसेच राहतात, तुमच्यासारखी जनावरे राहत नाहीत. तुम्ही बैलघोड्याला जाऊन जनावरांच्या दवाखान्यात तपासून घ्या. तुमच्यापेक्षा जनावरे बरी. तुम्हाला चाळीच्या बाहेर दारू पिऊन चिखलात लोळायची सवय असली तरी तळमजल्यावरची माणसे सभ्य आणि स्वच्छता पाळणारी आहेत. उगाच वाटेल ती कारणे सांगून आमच्या मजल्याचा अपमान करू नका…
गंपू टेलरमामांचे जळजळीत शब्द कामावर पडताच नामदेवबाबा टरकले. ताबडतोब पहिल्या मजल्यावरच्या नाना शिंगार्डेंनी नामदेवबाबांची बाजू घेतली. नाना किंचाळतच म्हणाले, तळमजल्यावर उंदीर घुशींचा वावर गॅलरीत किती असतो हे माहीत आहे का? परवा चाळीत येताना एक घूस माझ्या पायाला चावणारच होती. तेवढ्यात चंपाकाकूंनी आरडाओरड करून तिला हाकललं. अशा उंदीर-घुशींच्या साम्राज्यात तुम्ही पूजेसारखे पवित्र कार्य करणार! आम्हाला हे मान्य नाही. तेवढ्यात कोणतरी बोलले, चंपाकाकूंना फार काळजी नामदेवबाबांची कधी रात्री बाहेरून आले तरी काळोखात हात धरून त्यांना जिन्यावरून वर सोडतात. त्यांनीच हा सल्ला दिला असेल बहुतेक. चंपाकाकूंचे नाव ऐकल्यावर नामदेवबाबांची बोलती बंद झाली, असे वाटत असतानाच ते ओरडून म्हणाले, पूजा घालायचीच असेल तर ती आमच्या पहिल्या मजल्यावरच घाला.
-पहिला मजला काय तुझ्या बापाचा हाय? नेहमी सरळसोट बोलणार्या सावंतांच्या पक्याने सणसणीत आवाज दिला.
-बाप कुणाचा काढतोस. अरे, तुझ्या बापाला पुरून उरलोय मी. तो पण असाचा भांडायचा. शेवटी त्याला पण घालवला ना मी. माका शिकवताय मेलो. शेवटी दुसर्या मजल्यावरचे गंगाराम पाटील जाबर उठले आणि म्हणाले, पहिल्या मजल्याला काय सोना लागलेला नाय, उलट दुसरा मजला हवेशीर हाय. बाजूला मोठी गॅलरी भी हाय. आमी तिथे आडोशाला कधी कधी पार्ट्या बी करताव. तुमी मधल्या गॅलरीत कोपर्यात पुजा बांधा. सगळा डेकोरेशनचा सामान मी मखरासकट बाजूच्या चाळीतल्या बाबू डोकर्याकडून फुकट आणतो. कोनच्या बी शुभकार्याची सुरुवात वरून झाली पायजेल म्हणून आमचा दुसरा मजलाच पुजेसाठी फिट करा.
गंगाराम जाबरच्या म्हणण्याला त्याचा मित्र बारक्यामामानेही पाठिंबा दिला. तरीही तळमजला आणि पहिल्या मजल्यावरच्या बहुतेक चाळकर्यांना दुसर्या मजल्यावर पूजा घालणे पसंत नव्हते. पूजेसाठी येणार्या आमच्या पाहुण्यांना बत्तीस-बत्तीस पायर्यांचे दोन जिने चढून वर यावे लागेल आणि आम्हालाही पूजेच्या कामासाठी सारखी वरखाली धडपड परवडणार नाही; अशी तक्रार खालच्या दोन मजल्यांनी केली.
शेवटी सेक्रेटरींनी निर्णय द्यावा असे ठरताच सेक्रेटरी गोपीनाथ रेडकर यांनी पूजा गच्चीवर होईल, असे जाहीर केले आणि मजल्यांच्या वादावर पडदा पडला. गच्चीवर छान मंडप घालू, उभ्या-आडव्या जागेत आकर्षक डेकोरेशन करू, स्टेज घालून बक्षीस समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम करू आणि सर्व चाळकर्यांना महाप्रसाद म्हणून भोजनही देऊ असे जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
पूजा गच्चीवर असली तरी प्रत्येक मजल्यावर दारात रांगोळी, कंदील, बाहेरच्या भिंतीवर छान कॅलेंडर अशी सजावट करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूजेसाठी सार्वजनिक सुटी असलेली तारीख जाहीर करण्यात आली आणि सारी चाळ उत्साहाने कामाला लागली.
पूजेचा दिवस उजाडला. चाळीत लाऊडस्पीकरचा आवाज दणाणू लागला. तळमजल्यावर प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे तोरण आणि बाजूला सनई-चौघडावाल्यांचे वादन सुरू झाले. पूजेसाठी नुकतेच लग्न झालेले जोडपे निवडण्यात आले होते. तेवढ्यात मोठ्या आवाजाच्या शिर्सेकर बुवांनी प्रत्येक मजल्यावर जाऊन सणसणीत आवाज दिला, अरे चाळीत पूजा आणि धा वाजून गेले तरी कोणाच्याच भिंतीवर एकसुद्धा कॅलेंडर लागाक नाय- मगे शोभा येवची कशी? त्यांच्या आवाजाने सगळ्यांची लगबग झाली आणि प्रत्येकाने आपल्या खोलीच्या भिंतीबाहेर खिळा ठोकून घरातील छान चित्र असलेले कॅलेंडर लटकावले़ आता प्रत्येक मजल्यावर जिवंतपणा वाटू लागला. तरीही `त्या’ सहाजणांनी गालबोट लावलेच. त्यांनी आपल्या दारात बारमध्ये शोभतील अशी उत्तान स्त्रियांची कॅलेंडर्स लावली. त्यावरून पुन्हा तिन्ही मजल्यावर राडा झाला. चाळीतल्या सगळ्या बायकांनी त्यांच्या दारावर जाऊन दम दिला. ही कॅलेंडर्स काढली नाहीत तर फाडून टाकू. तशी निमूटपणे ती काढली गेली. पहिली ठिणगी पडल्याने सारेच धास्तावले होते. तेवढ्यात शिर्सेकर बुवा घरातून धोतर नेसतच बाहेर आले. त्यांची आवडती शेजारीण शेवटच्या खोलीतील सुपेकरणीच्या दारापुढे जाऊन त्यांनी धोतराचा काचा मारला आणि तशाच उघड्याबंब अवस्थेत त्यांनी चाळकमिटीच्या कार्यकर्त्यांना आवाज दिला- अरं, गेले कुठे साले कार्यकर्ते? गच्चीवर पूजा असली म्हणून काय झाला, सगळ्यांनी गच्चीत जाऊन कसा चलात? प्रत्येक माळ्यावर पूजा असल्यासारखा वाटूक नको? अरे, गॅलरीत फिरान वातावरण तरी तयार करा. बायकांना आतापासून दारात रांगोळी काढूक बसवा. पायजे तर मी घरात जावन सांगतंय सगळ्यांका…
-या म्हातार्याची नजर तो कुठेही गेला तरी भिरभिरत असते ती बायकांवर. जिन्यावरून येता जाता चाळीतली लग्न झालेली बाई दिसली की तिच्या खांद्यावर हात ठेवून आपुलकीने हा तिची विचारपूस करणारच. वयस्कर म्हातारा म्हणून कोणतीही बाई पटकन काही बोलत नाही, पण याला जिन्यावर पाहिला की बायका खाली किंवा वर जायला धजावत नाहीत. तो स्वत:ला शास्त्रीय संगीत गायक समजतो आणि नेहमीच रिकाम्या असलेल्या झिलग्यांच्या खोलीत एक जुनाट तंबोरा घेऊन आजूबाजूला ऐकू जाईल, इतक्या मोठ्या आवाजात विलाप केल्यासारखे आलाप काढत असतो. पूजेला माझ्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवा, असा हेका त्यांनी सेक्रेटरीकडे धरला तेव्हा पूजेनंतर तुमच्या शास्त्रीय गायनाचा सेपरेट कार्यक्रम ठेवू, असे सांगून त्याची बोळवण करण्यात आली होती.
तेवढ्यात आमच्या चाळीचा नटसम्राट बाब्या पासलकर ढोसूनच धडपडत जिन्यावरून वर येत असल्याची खबर पोरांनी आणली या बाब्याला काही काळ वेळ समजतो की नाही? सुर्वेकाका कडाडले. त्याला पहिल्यांदा त्याच्या घरात नेऊन सोडा. काकांनी ऑर्डर दिली. काकांचे शब्द ऐकल्यावर बाब्याला कंठ फुटला. …मला सोडा.. नको मी कच्ची मारतो. बर्फ आणा मग ऑन द रॉक घेतो…
-बाब्या तू शुद्धीत नाहीस. तुला चढलीय. अरे, आज चाळीत पूजेचा कार्यक्रम आहे आणि तू सकाळीच भलतेच तीर्थप्राशन करून आलास? शरम वाटली पाहिजे तुला. गिरणीतल्या आंतरनाट्य गिरणी स्पर्धेत तीन-चार नाटकात अभिनयाची बक्षीसे मिळवलीस म्हणजे आकाशाला हात नाही पोचले तुझे.
-मला माफ करा, सुर्वेकाका खरं काय आणि खोटं काय? माझा मी जसा मला वाटतो आणि जसा तुम्हाला दिसतो, तो तरी खरा आहे का? डावीकडून पहाल तर म्हणाल, हाच तो राजबिंडा गुणी नायक, पण उजवीकडून पहाल तर म्हणाल हाच तो दुष्ट खलनायक. आणि नेमका समोरचा मध्य गाठून पहाल तर तुमची खात्रीचा पटेल की तुमच्यासमोर नाचतोय तो मजेदार रक्तबंबाळ विदूषक. यात खरं काय आणि खोटं काय? पाहा पाहा, राजरस्त्यावरून संतसज्जनांची पाच पाट काढून धिंड निघालीय धिंड, माडीमाडीत डोळे मोडीत सतीसावित्री पतिव्रता बसल्या आहेत प्रतिव्रता, ठग पेंढारी हत्तीवरून साखर वाटत चालले आहेत साखर आणि माझ्यासारखे विघ्नकर्ते विधानंदतर चौकाचौकात फासावर लटकलेत फासावर यात खरं काय आणि खोटं काय? खरं एकच आहे शंभू अजून माया मरत नाही. अजून पाश सुटत नाहीत, अजून नाळ तुटत नाही रे शंभूऽऽऽ
…सर्वांनी त्याचा न अडखळता म्हटलेला डायलॉग ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला. कोणीतरी म्हणाले, एकेकाळी रंगभूमी गाजवणारा हा चाळीतला माणूस आणि आज त्याची अवस्था पाहा. दारूसाठी कुठेही फिरत असतो… हे ऐकल्यावर बाब्यातला नट पिसाळला. त्याला पुन्हा चेव आला. आता मात्र त्याचा डायलॉग ऐकून घेण्याशिवाय कुणालाच दुसरा पर्याय नव्हता. तो सुरू झाला… पैसा, पैसा पैसा! आखिर क्या है ये पैसा? मोहोब्बत पैसे खरीद नहीं जाती पिताजी, दिल से खरीदी जाती है। आखिर डिंपल में बुरा ही क्या है? मैं जानता हूँ पिताजी आपको दहेज चाहिये, बोलो, कितना चाहिये? पाच हजार, दस हजार, बीस हजार, पचीस हजार… मैं देता हूँ आपको दहेज… बॉस पानी लाव. कॅमेरा-लाईट ऑफ.
-काय प्रकार आहे हा?
-इथे आता एका पिक्चरचे शूटिंग झाले. बाब्या रंगात आला ना की कधीही शूटिंग सुरू करतो. एका सिनेमात होता ना तो! पण आता त्याला त्याच्या घरी पोचवूया. शेवटी बाब्याची वरात काढून चौघांनी त्याला उचलून घरात नेला.
पूजेच्या कार्यात इतका रंग भरल्याने बाकीच्यांनाही हुरूप आला. तेवढ्यात भटजीबुवा आले. नशीब, तोपर्यंत बाब्याचे नाटक संपले होते. भटजी आल्याआल्याच म्हणाले, कसला तरी वास येतोय. ताबडतोब वासूकाकांनी हजरजबाबदारीपणा दाखवला. म्हणाले, आताच गोमूत्र शिंपून सगळी चाळ शुद्ध केलीय.
-हे बरीक बरे केले हो. पूजास्थळ कुठे आहे?
-गच्चीवर.
-मी वर जातो आणि तयारी करतो. तोपर्यंत तुम्ही प्रसादाचे सामान वर मोठ्या टोपात घेऊन या. शुद्ध तुपाच्या चार पिशव्या आणि दोन लिटर दूध लागेल. एक लिटर मला पिण्यासाठी गरम करायला ठेवा. बाकी तुळशीपत्रे आणि पूजेचे सामान तयार असेलच. मला आधी कपडे बदलायला खोली दाखवा.
-ती काय झिलग्यांची खोली. कोणीच बाईलमाणूस नाय तिथे. आंघोळ करायची असेल तर तीही करून घ्या मोरीत. टॉवेल हाय दोरीवर आतून कडी लावा.
थोड्या वेळाने भटजी पंचा नेसून मंत्र म्हणत बाहेर आले. म्हणाले, आपण प्रसाद याच खोलीत करुया. वर उघड्यावर नको. टोपासह सर्व सामान इथेच आणा. चारोळी, बदाम, मनुका आहेत ना?
-गुरुजी, कायसुद्धा कमी पडूचा नाय. प्रसाद मात्र भरपूर बनवा. पयलो माका टेस्ट करूक बशीभर देवा. उगाच नंतर लोकांनी नावा ठेवक नको. प्रसादाक.
– हो.हो. देऊ ना. कोणीतरी गच्चीवर जाऊन तुळशी मोजायला घ्या. हजार झाल्या पाहिजेत हो आणि त्या पूजेला बसणार्या जोडप्याची कोणातरी सवाष्ण बाईला ओटी भरायला सांगा आणि जेवणाचा नैवेद्यही तयार ठेवा. कोणीतरी ती गॅसची शेगडी पेटवा आणि तो सिलेंडर बाजूला ठेवा. शेगडीवर टोप ठेवा. मी सांगतो ते सामान टोपात सांगतो त्या क्रमाने ओता…
अशा तर्हेने प्रसादाची तयारी झाली आणि झिलग्यांच्या खोलीतले सगळे वर्हाड पूजेसाठी गच्चीवर गेले. मुलांनी छान मखर तयार केले होते. भटजींनी सत्यनारायणाच्या फोटोसह मखरात पूजा मांडली. पूजेचे जोडपेही आले. चाळीतली एकेक मंडळी गच्चीवर येऊ लागली. पूजेला बसलेल्या जोडप्याची गाठ बांधण्याचा कार्यक्रम चमेली वहिनींनी पार पाडला. त्यांना सर्वांनीच नाव घेण्याचा आग्रह करताच त्याच तयारीने आलेल्या वहिनींनी पटकन नाव घेतले.
लग्नाला चाळीस वर्ष झाली
तरी वागतात हिरोसारखे
नाव भुजंगराव जरी असले
प्रेम करतात अमिताभसारखे
सर्वांनी त्याच्या या उखाण्याला टाळ्या वाजवून दाद दिली. पूजेला सुरुवात झाली. भटजींना एक तासानंतर दुसर्या पूजेला जायचे होते त्यामुळे मंत्र म्हणत असताना त्यांना येणार्या मोबाईलवरून ते लवकरच येतो असे उत्तर देत होते. शेवटी भटजीकाकांनी पाऊण तासातच शॉर्टकट मारला. भरभर पोथी वाचली आणि बाकी सगळे विधी यथासांग पार पडल्यावर पूजेच्या जोडप्याची ग्ााठ सोडताना पुन्हा दोघांनाही उखाणा घेण्याचा आग्रह झाला. नेत्रा वहिनीने उखाणा घेतला.
समोरच्या चाळीत उभी असता
त्यांनी दिली लाईन
सुहासरावांचं नाव घेते
चाललं सगळं फाईन
ताबडतोब सुहासरावांनाही उखाणा घेण्याचा आग्रह झाला, सुहास म्हणाला,
जिच्यासाठी झाला होता जीव माझा वेडा
शेवटी मला मिळाला हा गोड गोड पेढा
नेत्रा माझ्या जीवनाचा स्वर्ग करील खरा
दोघे हाकू संसाराचा सुपरफास्ट गाडा
दोघांनी भटजींचे आशीर्वाद घेतले. नंतर पूजेस येणार्या चाळकर्यांना तीर्थप्रसाद वाटपास सुरुवात झाली. भोजनाच्या पंक्ती बसल्या. तेवढ्यात झिलग्यांच्या खोलीतून दुसर्या मोठ्या टोपातील प्रसाद टिफीन बॉक्समधून चार-पाच चाळकर्यांनी घरी नेल्याची खबर छोट्या मन्याने आणली. ताबडतोब गच्चीवरून सगळे झिलग्यांच्या खोलीत शिरले. तिथे मुले प्रसादाच्या पुड्या बांधत होती. आप्पा म्हणाले, तुम्ही जा सगळे गच्चीवर, मी पहारा करतो. प्रसाद चोरून नेतात म्हणजे काय? सगळे गेल्यावर आप्पा सटकले, मुलांना म्हणाले, तुम्हीही घ्या बशी बशी भरून. मी घरी जाऊन टिफीन बॉक्स घेऊन येतो. प्रसाद घेऊन जातो आणि मग तुमच्याबरोबर पहार्याला बसतो. मुले फिदी फिदी हसायला लागली.
अखेर सायंकाळी चार वाजता आजूबाजूच्या चाळीतील परिसरातील स्त्री-पुरुषांची तीर्थप्रसाद घेण्याची रांग लागली. रात्री पूजेनिमित्त घेण्यात येणार्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ विभागातील सर्वात मोठ्या बारचे मालक सायमन डिकोस्टाभाई यांच्या हस्ते होता. ते प्रत्येक ठिकाणी मोठी देणगी देतात या हेतूने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. आपल्या भाषणात त्यांनी सर्वांचा गॉड एकच असून मी सर्वधर्मसमभावाचे पालन करतो म्हणून इथे आलो, असे सांगून पुजेला एक लाखाची देणगी दिली. त्यामुळे पूजेचा सर्व खर्च भरून निघून पन्नास हजार शिल्लक राहणार होते. बक्षीस समारंभ पार पडल्यावर महिलांच्या भजनाचा कार्यक्रम बाबुराव कुरळेंनी मागवला होता. त्यांना वाटले होते की भजन करायला छान छान दिसणार्या तिशी चाळीशीच्या बायका येतील. म्हणून त्यांना गच्चीवर आणण्यासाठी ते स्वत: त्यांच्या स्वागताला चाळीच्या गेटवर गेले. पाहतात तो सगळ्या पासष्ट-सत्तरीच्या केस पिकलेल्या आजीबाई. त्यांची आयोजक मात्र किमान पन्नाशीची होती. कुरळेंनी मग वर येता येता तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
`तुम्ही स्वत: गाता?’
`नाही गं बाई. या सर्व बायकांना सांभाळून आणणं आणि घरी पोचवणं ही माझी नोकरीच आहे. त्याचे पैसे घेते मी, आणि त्यासाठी हे महिलांच्या भजनाचे कार्यक्रम आयोजित करते. घरी बसून या बायकांना वाती वळण्याशिवाय दुसरे काम नाही. म्हणून त्यांचा भजनी ग्रूप मी स्थापन केला. इथे जवळच्याच एका चाळीत या महिला राहतात. त्यामुळे तुमचे आमंत्रण आल्याबरोबर आम्ही स्वीकारले. सर्व महिला दोन जिने कसेबसे चढून गच्चीवर आल्या. एका पिशवीत पंधरा-वीस टाळ घेऊन आलेली एक मुलगी त्यांच्यासोबत होती. अखेर बायकांच्या भजनाला सुरुवात झाली. भजने देवाची पण चाली सगळ्या मॉडर्न गाण्याच्या. चाळीतल्या काही छत्रपती तरुणांनी तर नाचाचा ताल धरला त्या भजनावर. `झिंग झिंग झिंगाट’पासून `बघतोय रिक्षावाला’पर्यंत बहुतेक लोकप्रिय गाण्यांच्या तालावरील भजने ऐकून सगळ्या गच्चीलाच नृत्याची झिंग चढली. `आजीबाई वन्समोअर’च्या फार्माइशी होऊ लागल्या. अखेर रात्री बारा वाजता हा भजनांचा कार्यक्रम संपला तेव्हा मात्र लहान थोर तरूण, वृद्ध चाळीतील सर्व मंडळी खूष झाली. आजीबाईंचे कौतुक करण्यास ही गर्दी झाली होती. त्या सार्याजणी निघून गेल्यावर शिर्सेकर बुवांनी माईकवर आवाज दिला, आता माझ्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तरीही कोणी घरी जाऊ नये. पण पोटात कावळे ओरडत असताना या गानकावळ्याचे गाणे कोण ऐकेल, असे कोणीतरी दबक्या आवाजात म्हणाले आणि जिन्यावरून खाली जाणार्या गर्दीत मिसळले. फक्त शिर्सेकर बुवांच्या गायनाच्या फॅन सुपेकरीण बाई आणि चार-पाच टाळकी गच्चीवर राहिली. शिर्सेकर बुवांनी त्यांना साथ द्यायला तबला आणि डग्गावादकही आणले होते. सोबत त्यांची भरपूर भाता मारावा लागणारी पेटीही होती. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाताना डोळे अजिबात उघडे ठेवत नसत. डावा हात कानावर आणि उजवा हात हवेत फिरवत ते ताना घेत असत. आकांताची तान हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. जीव एकवटून त्यांनी ती आकांताची तान घेतली की प्रेक्षकांचे कानठळे बसत. मग समोर टाईमपास म्हणून बसलेली पोरे यथेच्छ टिंगल करत.
-कोणता राग गात असतील रे?
-बहुतेक `बोंबा’ राग असावा दक्षिण आप्रिâकेतला.
-आपण त्यांना फर्माइश करूया का `मधुबन में राधिका नाचे रे’ची
त्यापेक्षा त्या सुपेकरणीच्या आवडत्या गाण्याची कर.
-कुठल्या रे
-ह्यो ह्यो ह्यो पावना
सखूचा मेव्हना
माझ्याकडं बघून
हसतोय गं
काय तरी घोटाळा दिसतोय गं.
-अरे ही लावणी हाय. शास्त्रीय नाय.
-सुपेकरीण बाईची फर्माइश म्हटल्यावर ते काय बी करतील.
-अरे, पण त्यांनी नुसता `ह्यो’ लावला अर्धा तास आणि ताना घेवक राहिले तर पाव्हणा निघून जायल. ते बघ पब्लिक उठून जायला लागलं. बाकीचे जांभया, देत बसलेत. झिलग्यांच्या खोलीत प्रसादाच्या शिर्याचा नाश्ता करत बसलेल्या सेक्रेटरींना बोलावून आण. येईपर्यंत मी माइकची वायर कापतो आणि खालून्ा बटणही बंद करतो. मग गाऊंदे रात्रभर. मंग्याने आपले काम चोख केले. लाऊडस्पीकरचा आवाज बंद झाल्यावर बुवा गानसमाधीवून जागे झाले.
-कोणी साल्यांनी माइक बंद केला?
-बुवा. बंद नाही केला, आवाजाचं प्रेशर आल्याने तो बिघडला.’
-मी समेवर येईपर्यंत धीर नाही धरता आला त्याला!’
-तुमच्या स्वरयंत्रापेक्षा त्या विद्युत यंत्राची ताकद कमी पडली. बघा कशी मान टाकलीय त्याने.
-ठीक आहे. मला निदान हार घालून माझे आभार तरी माना.
-सुपेकर बाई, या पुढे या. गानमहर्षींना हार घालून, शाल आणि श्रीफळ म्हणजे नारळ द्या त्यांना.
-अय्या. मी कशाला?
-अहो आहेच कोण इथे आता. पांगले सगळे. सुपेकरबाईंनी सांगितल्याप्रमाणे केले. मात्र बुवांनी त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रतिक्रिया विचारली, तेव्हा त्या म्हणाल्या, मी तर ऐकून तृप्तीचा ढेकर दिला. तेवढ्यात कोणीतरी गुपचूप बोलले. त्याआधी झिलग्यांच्या खोलीत उरलेला भरपूर प्रसाद रगडून आल्या असतील. शेवटी पूजेच्या बाजूला पहारा करण्यासाठी पत्त्यांचा डाव टाकून चौघेजण बसले आणि सेक्रेटरी चौरंगावरील चिल्लर आणि नोटा उसकटून मोजण्यात मग्न झाले. पहिल्याच पूजेचे ऐतिहासिक कार्य आता शेवटच्या टप्प्यात येत चालले होते.