(स्नेहभोजनाच्या कुठल्याशा कोपर्यातून पदार्थांचा घमघमाट सुटलेला, हरेक जण आवडत्या पदार्थाजवळ उभारून हवं तितकं मिळवण्याच्या प्रयत्नात. अपवाद काहींचा. ती माणसं केवळ साहेब नि उपरावांच्या चेहर्यासमोर उमेदवार्या दाखवण्यासाठी लाचारपणे माश्यांसारखे घोंघावत फिरतायत. खाणार्यांत तीन गट पडलेले. एक साहेबांच्या सहकार्यांचा, त्या अडाण्यांना काय नि कसं खावं? हे न कळाल्याने इतर अतिथी काय करतायत ते बघत त्यांची कॉपी करत अडखळत भोजन करताना. दुसरे उपरावांच्या गोटातले, सगळ्यांना पदार्थ मिळायला हवेत, म्हणून जपून नि मोजकं घेऊन काही अतिरिक्त उरेल का, याचा अदमास घेताना. तिसरे उपदादांच्या टोळक्यातले, जे जितकं मिळालंय ते चापून-चोपून खाणारे आणि चौथ्या गटातले केवळ आमंत्रण आहे, पण असून फायदा नाही, नसून खोळंबा नाही, असे! त्यातले दोघे पदार्थ काही शोधत समोरासमोर येतात.)
आमंत्रित १ : (उगाच हसत) का हो, मेन्यूमध्ये पुरणपोळी समाविष्ट नाहीय का?
आमंत्रित २ : (निराशेने) मला तर कोंबडीवडे देखील आढळले नाहीत.
आमंत्रित १ : (बर्फीचे तुकडे अलगद उचलत) मला तर आधीच शंका आलेली, असंच काही घडेल म्हणून…
आमंत्रित २ : का?
आमंत्रित १ : साहेबांनी कालच सांगितलेलं ना, ते बुद्धिबळ खेळतायत म्हणून…
आमंत्रित २ : भोजनात बुद्धिबळाचा काय संबंध?
आमंत्रित १ : आहे तर…!! साहेबांनी भोजनाचं आमंत्रण तर दिलंय सर्वांना, पण कुणाकुणाचे आवडते पदार्थ मुद्दाम मेन्यूत ठेवले नाहीत. कळली आयडिया?
आमंत्रित २ : हो, अच्छा! म्हणजे पुरणपोळी न ठेऊन उपरावांची भूक मारली तर… पण उपदादा का आले नसतील?
आमंत्रित १ : त्यांच्या कानावर मुद्दाम बातमी सोडली गेली की त्यांना शेपू खाण्याचा सार्वत्रिक आग्रह होऊ शकतो, म्हणून बहुतेक भ्याले ते!
आमंत्रित २ : व्वा! म्हणजे साहेब हेच खरे महाराष्ट्राचे चाणक्य आहेत तर…?
आमंत्रित १ : अर्थात!!
आमंत्रित २ : मग त्यांना अधून मधून ते चार-चार दिवसांचं आजारपण कसं येतं हो?
आमंत्रित १ : अहो, साहेब दिवसाचे २६ तास, आठवड्याचे नऊ दिवस काम करतात. त्यामुळे दमणूक होत असेल. मग केला विश्राम तर बिघडलं कुठे?
आमंत्रित २ : भीती वाटते हो! कधी साहेब बंदूक घेऊन विश्राम ना करोत याचा!
आमंत्रित १ : (विषय बदलत) पण तुम्ही नागपूरहून कसे आलात हो?
आमंत्रित २ : रोडने हो!
आमंत्रित १ : बाकी काही म्हणा, रस्ते अभिनेत्रींच्या गालासारखे गुळगुळीत केलेत साहेबांनी!
आमंत्रित २ : जरा असंसदीय भाषा होईल ही! पण नवयुवतीच्या गालासारखे म्हणा!
आमंत्रित १ : म्हणजे…?
आमंत्रित २ : जरा ग्रिप घेतलीय असं वाटलं की पुढल्या क्षणाला अचानक घसरण होऊ शकते, इतके धोकादायक झालेत रस्ते!
आमंत्रित १ : आमच्या नशिबी मात्र नवयुवती नाहीच. असली तर बत्तीस दात पडलेल्या बोळक्याची ज्वानी! अखंड खड्डे!
आमंत्रित २ : विकासपुरुषांच्या कारकीर्दीत कुठला रस्ता म्हणायचा हा?
आमंत्रित १ : कोकण रस्ता!
आमंत्रित २ : (विषय बदलत) आज मेन्यू बघून टोमॅटो आणि कांदे बर्याच दिवसांनी एकत्रित चाखण्याचा योग आलाय नाही का…
आमंत्रित १ : ती एक चैनच झालीय हल्ली. पण ह्या दोन वस्तूंचे भाव सरकारने नियंत्रणात आणायला हवेत लवकर!
आमंत्रित २ : हो ना! एकवेळ पेट्रोल दोनशेच्या पार गेलं वा गॅस सिलेंडर १५००च्या वर गेलं तरी चालेल, पण भाज्या स्वस्तच मिळायला हव्यात!
आमंत्रित १ : (विषय बदलत) हे अधाश्यासारखे खाणारे कोण आहेत हो?
आमंत्रित २ : साहेबांचे नवे सहकारी!
आमंत्रित १ : आडव्या हाताने कसले खाताय हो ते?
आमंत्रित २ : आधीच्या ठिकाणी त्यांच्या अश्याच खाण्याला भिऊन साहेब ‘आमचं भागत नाही’ म्हणत बाहेर पडलेले!
आमंत्रित १ : साहेबांनी त्यांना आत का घेतलंय मग?
आमंत्रित २ : ते फार निर्लज्ज आणि धीट आहेत. भरलेलं ताट दिसलं की ते न विचारता लगेच भोवती पाट घेऊन बसतात. आता इथंही ते साहेबांना विचारून आलेच नाहीत, उपरावांच्या कृपेनं आत घुसलेत ते!
आमंत्रित १ : साहेबांसारखा धोकेबाज, नाठाळ माणूस देखील फार भिऊन बघतोय हो यांच्याकडे!
आमंत्रित २ : ‘यांना भिऊ नका, हेही आपल्यासारखेच आहेत’ हे दाखवण्यासाठीच हे स्नेहभोजन ठेवलेलं म्हणे!
आमंत्रित १ : म्हणजे लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यासारखं…
आमंत्रित २ : इथं थोडं वेगळंय! लग्न एकीशी झालं, नंतर तिनं एकटीला करमत नाही, म्हणून मैत्रिणीला सवत बनवायला भाग पाडलं नि आता तिच्यासह पहिलीशी आमचा संसार सुखाचा आहे, हे दाखवण्यासाठी हे रिसेप्शन!!