पावसामुळे कधीतरी झालेली पंचाईत विचारली तर मला वाटतं कुठलाही मुंबईकर या प्रश्नावर एकच उत्तर देईल ते म्हणजे २६ जुलैचा पाऊस… तो आपण सगळ्यांनीच अनुभवलेला आहे. त्या पावसामध्ये मी पुण्याहून मुंबईला यायला निघालो होतो. २६ जुलैचा पाऊस आपण मुंबईचाच म्हणत असलो तरी तो जवळपास घाटापर्यंत म्हणजे लोणावळा आणि कामशेतपर्यंत इतक्या जोरात पडत राहिला होता की कामशेत ते लोणावळा हा जो सगळा रस्त्याचा भाग होता तिथे सगळं पाण्याखाली गेलं होतं आणि फक्त रस्ता दिसत होता. अनेक किलोमीटरपर्यंत फक्त हेच दृष्य दिसत होतं. त्यावेळी मला कधी नव्हे ती पावसाची भीती वाटली… आयुष्यात पहिल्यांदाच. कारण इतका अविरत पाऊस मी कधीच बघितला नव्हता.
तेव्हा पुढेही जाता येत नव्हतं आणि मागेही परतता येत नव्हतं अशी परिस्थिती होती. आता आपलं काय होणार हा मोठा प्रश्न तेव्हा पडला होता. इथेच राहावं लागतंय का? गाडी बुडाली तर काय करायचं? हे सगळे प्रश्न डोक्यात आले होते. कारण माझ्याबरोबर तेव्हा दोन छोटी मुलं होती. मग आमच्या नशिबाने त्या एक्सप्रेस वेवरून गाडी वळवायला आम्हाला एक जागा मिळाली आणि आम्ही परत सुखरूप पुण्याला येऊन पोहोचलो. त्यामुळे तो एक भयाण पाऊस मी विसरणं कधीच शक्य नाही.
बाकी म्हणायचं तर पाऊस मला नेहमीच आणि खूपच हवाहवासा वाटतो. उन्हाळा सुरू झाल्यावर मला पावसाची आठवण यायला लागते. त्यावेळी चातक पक्षाने वाट बघावी तशी मी त्या पावसाची वाट बघतो. आधीचा पाऊस आणि आता पाऊस यात फरक करायचा झाला तर प्रत्येक पावसागणिक आठवणी जास्तीत जास्त दाटत जातात. त्या आणखी गडद होत जातात.
पावसाळा हा आठवणींचाच मोसम आहे. नॉस्टॅल्जियाचा ऋतू आहे. पावसाचं आगमन झालं की मी न चुकता दर पावसाळ्यात रूपारेल महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन शांतपणे दोन कप चहा पितो. गेल्या अनेक वर्षांचा माझा हा रिवाज आहे. या वातावरणात खूप आठवणी दाटून येतात. विशेषत: कॉलेजच्या दिवसातल्या… चहाच्या एकेका घोटाबरोबर, पावसाचे शिंतोडे अंगावर उडत असताना, त्यावेळच्या काळाचा पट माझ्या डोळ्यांसमोरून सरकत जातो. जसा काय तो कालच घडलेला आहे.
एका अर्थाने मला पावसाळा शुभ वाटण्याचं कारणही तेच आहे की, माझं आयुष्य इतकं चांगलं गेलं… त्या सगळ्या आठवणी त्या पावसाच्या निमित्ताने पुन्हा दाटून येतात. मला ते एक प्रकारचं स्मरणच असल्यासारखं वाटतं की आपल्या गेलेल्या चांगल्या आयुष्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. त्या कृतज्ञतेची आठवण करून देण्यासाठी पाऊस येतो हे मला फार शुभ वाटतं.
पाऊस पाहून मला खूप गाणी आठवतात. ‘बाई या पावसानं’ या नावाने मी एकेकाळी पावसाळी गीतांचा कार्यक्रमच करायचो. मी स्वत:च पावसाची इतकी गाणी केलेली आहेत की मी माझं पहिलं केलेलं गाणंही पावसाचंच होतं. तेही पावसाळ्यात बसून मी रूपारेल महाविद्यालयाच्या कॅन्टीनच्या पायर्यांवरच त्याची चाल केली होती. ते गाणं होतं, ‘पाऊस कधीचा पडतो… झाडांची हलती पाने… हलकेच जाग मज आली… दु:खाच्या मंद स्वराने…’
– कौशल इनामदार
ज्येष्ठ संगीतकार