एका नव्यानेच तयार झालेल्या अलिबागच्या आठवणींविषयीच्या फेसबुक ग्रुपवर सध्या अनेक जुन्या आठवणी निघत आहेत. विविध व्यक्ती किंवा सुप्रसिद्ध खाण्याचे पदार्थ व दुकानं असं बरंच काही. मनात जपणारे आपल्यासारखेच अनेकजण आहेत ही भावनाच फार सुखावणारी आहे. मन:चक्षुंसमोर अक्षरशः तरळून गेलं जुनं अलिबाग!!
आमच्या शाळेच्या वाटेवर हलवायाची दोन दुकानं होती, फार काही मोठी किंवा झकपक तर अजिबातच नाही. काचेच्या आडव्या कपाटात रांगेत मांडलेले पेढे, बर्फी, बत्तासे वगैरे मोजकेच पदार्थ असत. मागे मोठं कपाट असायचं, तिथे फरसाणाचे काही प्रकार आणि कोरडी किंवा जास्त टिकणारी मिठाई असायची. उदा. सुतरफेणी, म्हैसूरपाक व हा बदाम हलवा!! गडद लाल, हिरव्या व पिवळ्या रंगांचा हा पारदर्शक पदार्थ चिकट असतो, ह्या भ्रमापोटी तेव्हा फारसा कधी खाल्ल्याचं आठवत नाही. कराची किंवा मुंबई हलवा आमच्या स्थानिक भाषेत गोंद्या (गोंद म्हणजे डिंक) हलवा म्हणूनही प्रसिद्ध होता! आम्ही थोडे मोठे झाल्यावर मामाला दिवाळीत मिळणार्या मिठाईच्या डब्यांमध्ये हमखास असणारा हा हलवा खाल्ला आणि काही प्रमाणात तो आवडूही लागला. आजकाल तर हल्दीरामचे बदाम हलव्याचे डबे किराणाच्या दुकानातही उपलब्ध असतात!
टाळेबंदीच्या काळात बनवून पाहिला आम्ही. या घरच्या हलव्याची चव फारच मस्त जमलेली. मूळ पाककृती गव्हाच्या चिकापासून हलवा बनविण्याची असली तरी आजकाल सर्रास कॉर्नफ्लोअरचा बनवतात हा बदाम हलवा. एक वाटी कॉर्नफ्लोअर चार वाट्या पाण्यात गुठळ्या न होऊ देता कालवायचे. दुसरीकडे अडीच वाट्या साखरेचा, साखर बुडेल एवढ्या पाण्यात, एकतारी पाक करायचा. या तयार पाकात मंद आचेवर कॉर्नफ्लोअरचे मिश्रण मिसळायचे आणि दुसर्या हाताने ते पटापट पाकात कालवायचे. सगळे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते लगेच. मग त्यात आवडीनुसार रंग किंवा केशर व वेलदोड्याची पूड तसेच अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा. याने गोड चवही मोडते आणि साखरेचे स्फटिकीकरण होत नाही. मग त्यात साधारण पाच-सहा चहाचे चमचे तूप हळुहळू मिसळायचे. आधी सगळे तूप जिरते मग कडेने सुटायला लागते आणि हलवा पारदर्शक होऊ लागतो. तूप सुटायला सुरुवात झाली की हलव्यात सोललेल्या बदामाचे व काजूचे तुकडे मिसळायचे आणि तूप लावलेल्या थाळीत हलवा पसरून थापायचा. थोडे कोमट झाले की वड्या कापायच्या! एवढा मस्त लागतो ना हा ताजा बदाम हलवा की साठवणुकीला फारसा शिल्लकच राहात नाही!!
खाण्याच्या पदार्थांमध्ये, विशेषत: मिठाईमध्ये या हलव्याचे ठळक जाणवणारे वेगळेपण म्हणजे त्याची पारदर्शकता आणि निर्मळता! कोणत्या वडीत किती सुकामेवा आहे हे बाहेरूनच समजते. आत काय भरलंय याचा थांगपत्ता लागू न देणार्या बाकी पदार्थांच्या रांगेत म्हणूनच हा हलवा मला उजवा वाटतो!!
माणसा माणसांची तुलना करताना पोटात एक, तर ओठांवर दुसरं असे वागणार्यांपेक्षा आत-बाहेर एक वागणारी माणसं खचितच जास्त समाधानी असतात. मन-मुख एक असायला कृपा तर लागतेच, पण थोडे धाडसही लागते, स्वत:च्या हेतूवर संपूर्ण विश्वास लागतो. शब्द किंवा कृती जरी बाकीच्यांना फारशी पटणारी नसली, तरी त्या शुद्ध हेतूच्या बळावरच प्रगती साधते. अंतरंगाची पारदर्शकता, निर्मळता माणसाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. आतबाहेर एकच असल्याने मनाचा गोंधळ कमी होतो आणि नकळत एकाग्रता साधते. केलेले प्रत्येक काम सहाजिकच जास्त चांगले होते. एक असत्य लपवायला शंभर असत्यांचा आसरा घ्यावा लागतो, असं म्हणतात. मात्र सत्याचा वाली परमेश्वर असतो!
आध्यात्मिक वाटचालीत सत्यनिष्ठा ही जशी प्राथमिक पायरी आहे, तशीच मनाची निर्मळताही अत्यावश्यकच ठरते. पेल्यात स्वच्छ पाणी भरले जायला तो आधी रिकामा व स्वच्छ असावा लागतो. त्यातली असेल नसेल ती घाण आधी काढणं जरूरी ठरतं. मनाला जर सकारात्मकतेची, प्रभुनामाची गोडी लावायची असेल, तर मनातली सगळी किल्मिषं , सगळ्या शंकांना बाजूला सारून आधी ते निर्मळ बनविणे क्रमप्राप्त ठरते. मनाच्या निर्मळतेबरोबर आपोआप समाधान तर लाभतेच, पण स्मरणशक्तीलाही चालना मिळते.
मनाच्या बालकासम निर्मळतेचा विषय निघाला की श्री रामकृष्णांचे एक अंतरंग शिष्य लाटू महाराज म्हणजेच स्वामी अद्भुतानंदांची आठवण येतेच. लौकिकार्थाने कोणतंही फारसं शिक्षण नसलेला हा मेंढपाळाचा मुलगा भवसागर तरला तो या निर्मळतेच्या जोरावरच, अर्थात भगवंताच्या कृपादृष्टीला पर्याय नाहीच! अंतरंगीची ही निर्मळता किंवा पारदर्शकता माणसाला आनंदधामी पोहोचायला सहाय्यभूत तर ठरतेच, पण त्या वाटचालीत माणसाचे व्यक्तिमत्व झळाळून टाकते, नाही का? अगदी त्या काचेच्या पेटीत ठेवलेल्या नि उन्हाने चमकणार्या बदाम हलव्यासारखेच!!