ठगपूर गाव. गावची भगव्या रंगात रंगलेली ‘तुमची शाळा’. पडक्या गेटमधून आत उड्या हाणत काही शेळ्या व्हरांड्यात ‘मेंमेंगीत’ गात हिंडताय. काही पुढले दोन्ही पाय झाडांच्या खोडाला उंच रोवून वर पानं ओरबडण्याचा प्रयत्न करताय. शेळी मालक गेटवर रील बघण्यात व्यग्र आहे. वर्ग भरलेले आहेत. विद्यार्थी वह्यांच्या पानांचे विमानं बनवून, पेंगलेल्या सर नावाच्या प्राण्यावर सोडतायत. पेंगलेला सर नरड्यातून शेकडो पाखरांचे आवाज काढून पक्षीशाळा भरवतोय. फळ्यावर वैâक दशकांपूर्वी लिहिलेलं काही राळेतून झडून खालच्या कडेला जमलंय. सरांच्या खुर्चीतील लाकूड पोखरणारी अळई सरांच्या घोरण्याला योग्य पार्श्वसंगीत देतेय. खिडकीपलीकडल्या रुईवर गुंजारव करणारा भुंगा तिला साथसंगत करतोय.
नुकताच शिक्षणाधिकारी झालेल्या चुलत भाचे जावयाला घेऊन तात्याराव धोत्रे शाळेसमोर येतात. चुलत भाचे जावई उन्हात सुकून कडक झालेल्या गोगलगाईसारखा कडक बाण्याचा भुलचुक्या नवशिक्या धांदरट भपकेबाज भासमार्या माणूस.
‘ही आमच्या गावची तुमची शाळा!’ तात्याराव धोत्रे शाळेकडे बोट दाखवतात.
‘नाव जरा विचित्र आहे नं?’ चु. भा. जा. उगाच हेल लावून विचारतो.
‘शाळा ही शाळेत येणार्या हरेक आगंतुकाला त्याची वाटावी म्हणून हे असं नाव आमच्या गावानं ठेवलं…’ तात्याराव माहिती देतात.
‘…तात्यारावांच्या सुचवण्यावरून. हे राहिलं बघा सांगायचं,’ मागून येणारा वामन गुडुलवार मध्येच बोलतो.
‘व्वा! व्वा! तात्याराव!! छान नाव सुचवलंत नं! पण हे आघतुक म्हणजे..?’ चु. भा. जा. चा यत्ता पहिलीचा प्रश्न!
‘गांजेकस गर्दुल्ले नाहीतर मटकेबाज बेवडे असं काही म्हणायचं असंल तात्यारावांना. बरोबर ना?’ वामन पुन्हा मध्येच तोंड घालतो.
‘अयऽऽऽ गप की! काही काय चव घालवतो, पाहुण्यापुढं?’ तात्याराव वामनवर खेकसतात.
‘काय तात्याराव? एवढं चिडताय होय? रातच्याला मग दुसरं असतंय कोण इथं?’ अगुचर वामन्या तोंडाची वाफ दवडतोच.
‘कोण असतं इथं?’ चु. भा. जा. उत्सुकतेने विचारतो.
‘राखणदार असतो ना? घरादारासहित!’ तात्याराव डोळ्याने वामन्याला धमकावत बाजू सावरू बघतात.
‘मग आता दिसत नाहीत ते अं?’ चु. भा. जा. चा उपप्रश्न.
‘आता कसे दिसतील? ते रात्रीची राखण करायला असतात ना? ते फक्त रात्रीच बाहेर पडतात,’ तात्याराव शंकेचं बीळ बुजवतात.
‘हे कोण?’ वामन्याचं आताशी लक्ष चु. भा. जा. कडे जातं.
‘हे आताच्या बॅचचे शिक्षणाधिकारी. पहिल्याच अटेम्प्टला पास आऊट झालेत. आपले भाचे जावई लागतात. आज घरी आले. म्हंटलं गावची शाळा दाखवू या. काय?’ तात्याराव चु. भा. जा. ची ओळख करून देतात.
‘हा दाखवा ना! तिथं झाडलोट करायला कुणी नाही. सगळ्या य्येत्येला मोजून दोन शिक्षक. तेबी हिवाळी-पानकळी उगवतात…’ वामन्या समस्यांचा पाढा वाचतो.
‘अय येड्या! गप्प की रे! का गावची इज्जत..?’ तात्याराव वामन्याला समजावू बघतात. पण हाय रे! तो चु. भा. जा. ला हात धरून खेचत वर्गात नेतो. मागोमाग पळत तात्याराव जातात. ते तिघे वर्गात येतात, तसा मुलांचा गलका बंद होतो. पण घोरणारा मास्तर नरड्यातले आवाज काढतच असतो.
‘हे बघा, हे असं शिकवणं चालुय इथं! तुम्ही आमच्याच गावात जॉईन व्हा! आणि पहिले यांना हाकला. वाटलं तर जिल्हाधिकार्याला मी पत्रं लिहितो,’ वामन्या तोफ डागतो. त्यानं चु. भा. जा. चं बिचकतो.
घामेघुम तात्याराव घाईने पुढं जात सरांना हलवतात.
‘कोणे रे? तुझ्या बापानं हे शिकीविलं का? तुझ्या मा—–!’ निद्राधीन सरांच्या अमृतवाणीतून दिव्य शब्द बाहेर पडतात. ते सहन न होऊन तात्याराव त्याला टपली लगावतात. तसा तो खडबडून जागा होतो. खुर्चीजवळ तात्यारावांना बघून दचकतो. दारातल्या दोघांना बघून भितो. घाईने टेबलावरचा खडू उचलत जणू शिकवणीच्या वेळचा लपंडाव संपवल्याचं भासवत उठून फळ्याकडे धावतो.
‘तल मुलांनो आपण कुठे होतो? उदारीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम, ह्या विषयावर. बरोबर की नाही?’ बोलता बोलता सर टेबलावरचं पुस्तक नाकापुढं धरत दोनचार पल्लेदार वाक्यं फेकतात.
‘तुझा ड्रम फोडला चारचौघात तुझा तर..! गणिताच्या पुस्तकात उधारी घालतो नाही होय?’ वामन्या थेट शिवीगाळ करण्यावर उतरतो.
‘तात्याराव वामनरावांना समजावा. इथं सार्या विषयांना आम्ही दोघंच शिक्षक आहोत. तेव्हा फ्लो फ्लोमध्ये बोललं जातं असं काही… त्यावरून लगेच..!’ सर तात्यारावांना गळ घालतात.
‘तुम्ही तात्यारावांना मध्ये का ओढताय? इथे हे त्यांचे भाचे जावई आलेत सोबत. ते शिक्षणाधिकारी आहेत. त्यांच्याशी बोला,’ वामन चु. भा. जा.च्या कानी लागतो, ‘खडसवा यांना जरा.’ वामनच्या गुगलीने एकाचवेळी चु. भा. जा. आणि सर दोघेही गचावतात. अवघडल्यासारखं हसत एकमेकांकडे बघतात.
‘नमस्कार!’ चु. भा. जा. औपचारिकता दाखवतो.
‘नमस्कार सर!’ सर चु. भा. जा. पुढे शक्य तितका वाकत मान देतो. ‘मुलांनो! सरांना एक साथ नमस्ते म्हणा!’ सरांच्या आदेशावर सगळी बच्चेकंपनी उभी राहत किंचित झुकत हात जोडून एकसुरात बोलते, ‘एक साथ नमस्ते!’ चु. भा. जा. त्यांना हातानेच बसण्याची खूण करत त्यांना बसायला लावतो. मुलं नमस्कार घालून पुन्हा बसतात.
‘छान शिकवलंत हं तुम्ही मुलांना!’ चु. भा. जा. सरांचं कौतुक करतो.
‘यात काय आलंय शिकवणं? इथं पोरांना पाढे येईनात. नमस्काराचं कसलं आलं कौतुक? इथं वेसण धरून नवख्या गोर्ह्याला पण मी सलामी दयायला लावतो. पुस्तकातले प्रश्नं विचारा जरा!’ वामन आवाज वाढवतो.
‘अरे वामन! आपल्या शाळेत दोनच शिक्षक आहेत हे! उगाच यांना काय त्रास देतोस तू? बिचारे रोज सकाळी मुलांकडून हनुमान चालिसा म्हणवून घेतात ना? आणखी काय हवंय आपल्याला?’ तात्याराव वामनला शांत करू बघतात.
‘अरे व्वा! तुम्ही मुलांकडून हनुमान चालिसा म्हणवून घेतात? व्वा! सुंदर हं! अश्याने आपली संस्कृती जपली जाते हो!’ चु. भा. जा. सरांचं कौतुक करतो.
‘अरे नको त्या गोष्टींचं कसलं कौतुक करताय? ओ, सर! तुमचा अनुभव किती वर्षांचा आहे? तुमचे स्पेशल विषय कोणते?’ वामन स्वतःचं शिक्षणाधिकारी बनतो.
‘माझा अनुभव दोन वर्षांचा. आणि गणित स्पेशल विषय!’ सर चाचरत माहिती देतो.
‘भरती कधीची? आणि नियुक्तीपत्रं कधी मिळालीत?’ वामन प्रश्नांची सरबत्ती करतो.
‘ते एवढं महत्त्वाचं असतं का? मी शिकवतो ना मुलांना सर्व विषय!’ सर अजीजीने बोलतो.
‘मी येऊ कां? आमची मिटिंग आहे एक इम्पॉर्टंट. तिथे जाणं मला गरजेचं आहे नं!’ चु. भा. जा. तिथून निसटायचा प्रयत्न करतो.
‘अहो थांबा! तुमच्या विभागाची कामं बघा जरा! सर, नियुक्ती पत्रं दाखवा पटकन! तुमच्यावर अॅक्शनच घ्यायला लावतो मी!’ वामन निर्धाराने बोलतो.
‘हे माझं नियुक्तीपत्र!’ सर अखेर बॅगेतून एक लेटर काढून दाखवतो.
‘हे तर २०१६चं आहे! पण तुम्ही रुजू दोन वर्षांपूर्वीच झाला. हे कसं?’ वामन सरांना कोंडीत पकडतो.
‘पूर्वी कोरोना होता नं?’ चु. भा. जा. फुटकळ कारण शोधतो.
‘हो, कोरोनाच होता तेव्हा! बरोबर आहे त्यांचं!’ तात्याराव त्यांच्यात सामील होतात.
‘काय नऊ वर्षे कोरोना होता? अहो, ही नियुक्तीपत्रं धादांत बनावट आहेत. ही बघा,’ वामन ती लेटर हातात घेऊन दाखवतो, ‘तुम्ही यावर काही कारवाई सुचवाल की नाही?’ वामन चु. भा. जा. ला प्रश्न विचारतो.
‘ते काय सुचवतील? त्यांनीच आम्हाला ही नियुक्तीपत्रं दिलीत. हात ओले केल्यावर!’ सर उद्विग्नतेने कबुली देतो.
‘म्हणजे भाचे जावई तुम्ही..?’ तात्याराव शंकेने चु. भा. जा. कडे बघतो.
‘अयरे भामट्या! म्हणजे तो एजंट तूच आहेस होय? नकली शिक्षणाधिकारी? कितीचे सौदे केलेत, मुलांच्या भविष्याचे?’ वामनचा आवाज धारदार बनतो.
‘म्हणजे ही सगळी बोगसगिरी चालुय तर? मी तुम्हा दोघांविरुद्ध कारवाईची मागणीच करतो थांबा!’ तात्याराव निर्णय घेतात.
‘कुणाकडे?’ वामन तात्यारावांना प्रश्न करतो.
‘सरकारकडे?’ तात्याराव उत्तर देतात.
‘ज्यांनी अडीच वर्षे बोगस सरकार हाकलं, त्या भामट्यांकडे? ते कारवाई करतील?’ वामन प्रतिप्रश्न करतो.
‘मग कोर्टात जाऊ या!’ तात्याराव पर्याय सुचवतात.
‘त्यांनीच अडीच वर्षे बोगस भामटे कारभारी म्हणून स्पॉन्सर केलेत. विसरलात का?’ वामन आठवण करून देतो.
‘मग आता?’ तात्याराव बुचकळ्यात पडतात.
‘आता काय आता? आपल्याकडे शिक्षक बोगस आहेत, शिक्षणाधिकारी बोगस आहेत. पोलीस बोगस आहेत. पुढारी बोगस आहेत. न्यायालय दसपट बोगस आहेत. त्याहून मीडिया! म्हणून तर आपल्या गावाचं नाव ठगपूर आहे ना?’ वामनचा रोकडा सवाल!