माझे आईवडील नोकरी करायचे. मी पण नोकरदार. आमच्या घरात व्यवसाय करणारे कोणीच नाही. पण मी धाडस करून ते करायचे ठरवले तेव्हा आई-वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. बायकोने देखील हातभार लावण्याचे निश्चित केलं. त्यामुळे या व्यवसायात मी उडी मारू शकलो. व्यवसाय उभा करत असताना चांगली माणसे भेटत गेली. मित्रांनी देखील मदतीचा हात दिला, त्यामुळे आतापर्यंत चांगले काम करू शकलो आहे.
– – –
संध्याकाळी सात वाजण्याची वेळ होती, मोबाईलवर एक फोन आला, हॅलो, कपिल आहेत का, मी पराग बोलतोय सहकारनगरमधून, फोन यासाठी केला की परवाच्या दिवशी माझ्या मित्राने तुमच्या हिंजवडीमधल्या मार्टमधून मोमो घेतले होते, त्याची टेस्ट खूपच भन्नाट होती, आज आम्ही खास वेळ काढून तिथे मोमो खाण्यासाठी जाणार आहोत, आम्हाला त्याच चवीचे आणि तसेच मोमो मिळतील ना, मोमो संपले म्हणून परत फिरावे लागू नये, म्हणून तुम्हाला हा फोन केलाय. आम्ही एक तासाभरात पोहचू तिथे, तुम्ही फक्त आमची ऑर्डर सांगून ठेवा… समोरून बोलणारा तो तरुण माझ्या मोमोंबद्दल भरभरून बोलत होता… आपल्या आयुष्यात कधीतरी असं काहीतरी घडेल, आपण असे अनोख्या चवीचे मोमो खवय्यांना देऊ, असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. कुणाच्या नशिबाची दारे, कुठे आणि कशी उघडणार आहेत, याचा अंदाज बर्याचदा येत नाही. काहीजण नवा व्यवसाय हौस म्हणून किंवा काही जण वेळ जावा म्हणून करतात. काहींना नशीब चांगली साथ देते, त्यामुळे त्यांनी मनात पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येण्यास सुरुवात होते, माझ्या बाबतीतही असंच काहीसं झालं. जानेवारी २०२०मध्ये एका कॉलेजमध्ये निव्वळ हौस म्हणून सुरु केलेला मोमोचा व्यवसाय आता मोमो मार्ट म्हणून नावारूपाला आला आहे. वेळ घालवण्यासाठी सुरू हा व्यवसाय करत असताना ठेवलेली चिकाटी, आत्मविश्वास, पदार्थाचा उत्तम दर्जा या त्रिसूत्रीमुळेच मला या व्यवसायात यश मिळालं आहे.
ग्राफिक डिझायनर, नोकरी आणि घर…
पुण्यात रास्ता पेठेतल्या एस. व्ही युनियन शाळेमधून शिक्षण पूर्ण झाल्यावर एका खासगी संस्थेमधून ग्राफिक डिझायनरचा डिप्लोमा करण्याचे ठरवले. ते सुरु असताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून कला शाखेचे शिक्षण सुरु केले. मला चित्रकलेची सुरुवातीपासून चांगली आवड होती. लॅन्डस्केप, ऑइल पेन्टिंगची चित्रे तयार करण्यात माझा चांगला हात होता. तेव्हा चित्रं काढायचो, त्यांची प्रदर्शने भरवायचो, त्यातून थोडे फार अर्थाजन व्हायचे.
शिक्षण सुरू असतानाच एका खासगी कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी मिळाली. ही कंपनी मगरपट्टा सिटी परिसरामध्ये होती. नोकरी सुरु झाल्यानंतर काही महिन्यात तिथे शिफ्टमध्ये काम सुरु झाले होते. कधी दुपारची तर कधी रात्रीची शिफ्ट. त्यामुळे मी पुरता हैराण होऊन गेलो होतो. प्रवासातही बराच वेळ खर्च होत असे. ती नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घरापासून जवळच्याच कंपनीत कार्टूनिस्ट म्हणून नोकरी सुरू केली. ते काम मस्त होते. त्यात आनंद मिळायचा, त्यात चांगला रमलो असतानाच, एका नावाजलेल्या कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनरची संधी चालून आली. तिथे पगारपाणी देखील चांगले होते, त्यामुळे पटकन ती नोकरी जॉईन केली, २००७पर्यंत तिथे नोकरी केली. महिना ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत पगार हातात पडायचा. त्यात घर चालायचे, अध्येमध्ये चित्रप्रदर्शने व्हायची, त्यातून थोडे पैसे मिळायचे.
सगळे उत्तम चालले होते. पण २०१७ साली मनात विचार यायला लागला की आपण जे काम करत आहोत, त्यात काय नावीन्य आहे, काही एक्सायटिंग नाही. रूटीनमध्ये अडकलो आहोत. शेवटी यातून बाहेर पडायचे आणि नवीन काहीतरी करायचे, या विचाराने उचल खाल्ली. घरच्या मंडळींशी चर्चा करून नोकरी सोडायचा निर्णय घेतला.
वर्षभर रिलॅक्स होतो… नोकरी सोडल्यानंतर वर्षभर काही न करता रिलॅक्स होतो. कधी पेन्टिंग करायची, घरात वेळ द्यायचा. मित्रांमध्ये जायचे, अशी दिनचर्या सुरु होती. दरम्यान, नील पब्लिसिटी नावाने जाहिरात कंपनी सुरु करून जाहिरातीचा एक स्क्रीन नवी पेठेत बसवला आणि नव्या व्यवसायाचा प्रारंभ केला. त्यावर जाहिराती टाकू लागलो. पहिलाच व्यवसाय असल्यामुळे त्याचे प्रमोशन चांगले केले, त्यातून चांगले पैसे मिळत होते. या व्यवसायात कामाचा ताण कमी होता आणि वेळेची उपलब्धी देखील होती. त्यामुळे दुसरा एखादा व्यवसाय का सुरु करू नये, अशा विचार मनात आला.
फूडच्या व्यवसायात काही करावे, म्हणून त्यादृष्टीने संशोधन सुरु केले. यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहणे, त्यामधून काही नवीन सापडते का याचा शोध घेणे सुरु होते. आताचा जमाना हा फास्ट फूडचा आहे, दिल्लीच्या खाऊ गल्लीमध्ये काय मिळते, त्यामधले काही देता येऊ शकते का, हल्लीच्या तरुण मंडळींना आवडेल, अशा पदार्थाचा व्यवसाय सुरु करावा, या उद्देशाने मोमो विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्याची सुरुवात कुठे करायची, हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. तेव्हा, एका कॉलेजच्या आवारात मला मोमोची विक्री करण्यासाठी पाच बाय पाचची जागा मिळाली. झालं जागेचा प्रश्न सुटला, आता मोमोविक्रीचा व्यवसाय सुरु झाला. पाच बाय पाचच्या त्या जागेत एक स्टूल ठेवला. मोमो गरम करण्यासाठी पाच किलोचा गॅस, हाताखाली कोणी माणूस नाही. रोज सकाळी मोमो तयार करायचे, दुचाकीवर आवश्यक भांडी, मोमो घेऊन तिथे जायचे. जागा स्वच्छ करायची. एका स्टूलवर मोमो विकायचे. कॉलेज संपले की भांडी आपणच स्वच्छ करायची, जागेवर झाडू मारायचा आणि घरी यायचे, अशी दिनचर्या सुरु झाली.
तेव्हा ३० ते ३५ रुपये प्लेट या दराने मोमोची विक्री करायची, मुले पण त्या मोमोचा मनसोक्त आनंद घ्यायची. धंदा देखील चांगला व्हायचा. सगळे सुरळीत सुरु असताना अचानक कोरोना आला आणि सगळे क्षणात बंद पडले. मोमोचा व्यवसाय बंद झाला. आता काय करायचे, असा सवाल डोक्यात घोळू लागला.
फुलस्टॉपच आला हा. जवळपास दीडेक वर्षांचा. नंतर कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन हळूहळू उठू लागला, निर्बंध देखील शिथिल होऊ लागले होते, त्यामुळे मोमोच्या व्यवसायासाठी मी फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड या भागात भाड्याने जागा मिळते का, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, मनासारखी जागा मिळेना, त्यामुळे मनात थोडीशी नाराजी आली होती. मोमोचे आऊटलेट सुरु होईल का, ही चिंता सतावत होती. या काळात संग्राम पाटील, निलेश पासलकर, सावन ओसवाल हे मित्र माझ्या कायम संपर्कात असायचे. मला मोमो मार्ट सुरु करायचे आहे, पण त्यासाठी जागा मिळत नसल्याची कैफियत मी त्यांना सांगितली. त्यांनी मार्गदर्शन केले आणि मला हिंजवडीमध्ये मोमोच्या आऊटलेटसाठी सहा बाय सहाची जागा मिळाली. मग काय २३ डिसेंबर २०२१ रोजी तिथे मोमोचे आउटलेट सुरु झाले. आऊटलेट सेट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वेळप्रसंगीr पत्नी तिथे दिवसेदिवस थांबायची. सकाळी ११ वाजता घर सोडले की घरी यायला रात्रीचा एक वाजायचा. मोमोच्या आऊटलेटची सुरवात दमदार झाली होती. तिथे येणार्या मंडळींना शाकाहारी, मांसाहारी चविष्टचे मोमो उपलब्ध करून देत होतो, खवय्ये मंडळी देखील त्याच्या प्रेमात पडली होती. स्टीम मोमोच्या बरोबरच फ्राय मोमो, कुरकुरे, अंगारा, तंदूर असे विविध प्रकारचे मोमो तिथे उपलब्ध करून देत गेलो. त्या आऊटलेटला चांगला प्रतिसाद मिळत होता. म्हणून आपण आणिक एक आऊटलेट सुरु करावे असा विचार करून १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सहा बाय सहा या जागेत बाणेरमध्ये मोमोचे आउटलेट सुरु केले. तिथेही अल्पावधीतच हे मोमो प्रसिद्ध झाले.
मोमोची चवच न्यारी
मोमो हा पदार्थ अनेकजणांना पसंत पडतो. त्यामुळे या पदार्थाचे भविष्य उज्वल आहे. चिकनचे मोमो अनेकांना खूप आवडतात. चिकन तंदूर, चिकन कुरकुरे या दोन प्रकारच्या मोमोना खवैये मंडळी सर्वाधिक पसंती देतात. त्यामुळे तशाच प्रकारचे इनोव्हेशन करायचे आहे. मोमो मार्टच्या मोमोची चव घ्यायला पुण्याच्या कानाकोपर्यामधून लोक येत असतात, हे अगदी आवर्जून सांगावेसे वाटते. कारण आमचे मोमो हँडमेड आहेत. पुण्यातून तुमच्याकडे मोमो खायला यायचे म्हटले, तर १०० रुपयांचे पेट्रोल खर्च होते, त्यामुळे पुण्यात एखादे आऊटलेट सुरु करा अशी मागणी अनेकदा येत असते.
तो अनुभव आजही ताजा…
मोमोचा व्यवसाय सुरु केला तेव्हा, मी आपण तिथे कामासाठी मुलगा ठेवूयात असा विचार करत होतो. पण पत्नी म्हणाली, मुलगा ठेवला तर त्याला रोजचे पैसे द्यावे लागणार. त्यापेक्षा तू एकटा हा व्यवसाय का करत नाहीस? बायकोच्या त्या वाक्याचा विचार करत असताना मला, एक प्रसंग आठवला, मी आणि माझे कुटुंब एकदा मुंबईला गेलो होतो. तेव्हा, दुपारच्या जेवणासाठी आम्ही एका हॉटेलात गेलो. आम्ही ऑर्डर दिली, तेव्हा त्या हॉटेलचे मालक तिथे फिरत होते. आमच्या बाजूच्या टेबलावर बसलेल्या मंडळींना त्यांनी स्वतः जाऊन पाणी सर्व्ह केले होते. त्यांची ऑर्डर घेतली होती. एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक जर हे काम करत असेल तर आपण देखील हे काम कोणतीही लाज न बाळगता आपणच करायला हवे. असा विचार तेव्हा डोक्यात आला आणि मुलगा ठेवण्याचा विचार डोक्यातून कायमचा निघून गेला.
घरात व्यवसायाचे वातावरण नाही… पण
माझे आईवडील नोकरी करायचे. मी पण नोकरदार. आमच्या घरात व्यवसाय करणारे कोणीच नाही. पण मी धाडस करून ते करायचे ठरवले तेव्हा आई-वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. बायकोने देखील हातभार लावण्याचे निश्चित केलं. त्यामुळे या व्यवसायात मी उडी मारू शकलो. व्यवसाय उभा करत असताना चांगली माणसे भेटत गेली. मित्रांनी देखील मदतीचा हात दिला, त्यामुळे आतापर्यंत चांगले काम करू शकलो आहे.
भविष्यात आपला ग्राहक जपून ठेवायचा, त्याला उत्तम दर्जाचा, चांगल्या चवीचा पदार्थ खायला द्यायचा. पदार्थाच्या दर्जामध्ये
कॉम्प्रमाइझ करायचे नाही, हा निर्धार केला. नव्या चवीचे मोमो देण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहणार आहे.