□ विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडून अस्तित्त्वात नसलेल्या शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या नावाने निमंत्रण.
■ हे चुकून होत नाही… कारस्थानच आहे… सब मिले हुए है जी!
□ ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकामावर अखेर खुद्द नारायण राणे यांनीच हातोडा चालवला…
■ अरेच्चा, कसलंच बेकायदा बांधकाम नाही, म्हणत होते ना हे? मग पाडलंत ते काय? आणि मुलुंडचा कागदी हातोडा कुठल्या बिळात दडलाय?
□ बाळासाहेब ठाकरे स्मारकात व्यक्तिगत बैठका होता कामा नयेत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ कोविडकाळात आपले वेतन अधिकृत मुख्यमंत्री निधीत न देता पंतप्रधानांचे नाव वापरणार्या एका व्यक्तिगत स्वरूपाच्या, कसलीही पारदर्शकता नसलेल्या फंडात देणार्यांच्या पक्षाचा केवढा हा बाणेदारपणा!
□ ईडीच्या संचालकांना सलग तिसर्यांदा एका वर्षाची मुदतवाढ.
■ निवृत्तीनंतर बक्षिसी म्हणून कोणते पद द्यायचे ते अजून ठरले नसावे? शिवाय ते त्यांच्यावर सोपवलेली ‘कामगिरी’ चोख बजावत आहेत, हे न्यायालयाने मध्यंतरी स्पष्ट केलेच आहे.
□ शिवसेनाप्रमुखांच्या नावाने बाजार मांडू नका : उद्धव ठाकरे.
■ अस्मितेच्या दुकानदारांकडून ही काय अपेक्षा करताय उद्धवजी!
□ अदानी मुंबईतील दोन मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांच्या स्पर्धेत.
■ हेडिंग चुकले आहे बातमीचे. अदानी आहेत, म्हणजे स्पर्धा संपली, मक्तेदारीच होणार.
□ ४२० कोटी रुपयांचा कर चुकवल्याच्या प्रकरणात अनिल अंबानी यांना दिलासा कायम.
■ चुकवलेल्या कराचा आकडा मोठा बोलका आहे… आपण, ४२० रुपये थकवले तरी बँकांचे वसुली एजंट दारात येऊन बसतात. यांच्याकडे कसली जादूची कांडी आहे?
□ पुसद तालुक्यातल्या बान्सी गावात किशोरवयीन मुलांच्या मोबाइल वापरावर बंदी.
■ अशी बंदी ग्रामसभा घालू शकते का? तळमळ कितीही सच्ची असली तरी असली बंदी टिकत नसते. त्यापेक्षा मुलांना मोबाइलचा सकारात्मक आणि मर्यादित वापर शिकवा. घडला तर त्यातूनच बदल घडेल.
□ अमेझॉनकडून भारतात सर्वाधिक नोकरकपात.
■ सगळेच फुगे कसे फुटू लागले…
□ २०२४च्या निवडणुकीत सत्ता न मिळाल्यास ती माझी अखेरची निवडणूक असेल : चंद्राबाबू नायडू यांचे भावनिक आवाहन.
■ सत्ताकारणाच्या राजकारणात इतकी वर्षे सत्ता न मिळाल्यास तुमच्या पक्षासाठी ती शेवटचीच निवडणूक ठरणार आहे. ते वेगळं सांगायची काय गरज?
□ अमेरिकेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्ह्जमध्ये रिपब्लिकन पक्षाची सरशी, बायडेन यांची डोकेदुखी वाढणार.
■ अमेरिकनांचीही हौस अजून पुरती फिटलेली दिसत नाही.
□ शारीरिक, मानसिक हिंसेच्या आणि भीतीच्या वातावरणामुळे नाट्यकर्मींवर बंधनांमध्ये राहण्याची वेळ : दिग्दर्शक सुनील शानबाग यांची खंत.
■ नाट्यक्षेत्रच नव्हे, अभिव्यक्तीच्या अनेक क्षेत्रांवर अशी स्वघोषित बंदी लादून घेण्याची वेळ आली आहे… पण, त्यातून मार्ग काढावाच लागेल. नाहीतर हुकूमशहांपुढे शरणागतीच पत्करल्यासारखे होईल.
□ कळव्यातील बालविवाह रोखला.
■ हे चांगलेच झाले, पण मुंबईच्याच एका उपनगरात असा प्रकार होत असेल तर बाकी ठिकाणी काय परिस्थिती असेल?
□ घरगुती एलपीजी सिलिंडर लवकरच क्यूआर कोडसह.
■ आता त्याचे आणखी पन्नास शंभर रुपये किंमतीत जोडू नका म्हणजे झालं!
□ टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास, हेच या सरकारचे काम : आदित्य ठाकरे यांचा टोला.
■ टार्गेट असणार ना हो काही आदित्यजी? ते गाठायचे कसे?
□ जनजीवनावर परिणाम करून कुत्र्यांना संरक्षण नको : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.
■ दोनचार माणसं मेली तरी हरकत नाही, कुत्रे जगले पाहिजेत, अशा टोकाला पोहोचलेत ठिकठिकाणचे तथाकथित प्राणीप्रेमी… अरे, मनुष्यप्राण्यावर पण प्रेम करा थोडं!
□ शिवसेनेने चार जागांसाठी युती तोडली, फडणवीसांचा मोठा दावा.
■ हे फारच मजेशीर आहे हो देवेंद्रभाऊ? या वाक्याचा व्यत्यास भारतीय जनता पक्षाने चार जागांसाठी युती तुटू दिली, असा होतो, हे तुमच्या लक्षातच आलं नाही की काय?
□ शौचालयाबरोबर सेल्फी काढा, औरंगाबादेत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रशासनाचे आवाहन.
■ शौचालयाचा वापर केला जातोय का की नुसत्याच चार भिंती बांधून अडगळीची खोली केली आहे, हे कोण पाहणार? केवढी ती सेल्फीबाजीची हौस!
□ ५५० नागरिकांसाठी सरासरी एक पोलीस आणि एका आमदारामागे ३० पोलीस.
■ म्हणजे एक आमदार १६,५०० नागरिकांच्या बरोबरीचा आहे… सिंपल गणित!
□ डिजिटल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा सुधारित मसुदा जाहीर.
■ नागरिकांच्या व्यक्तिगत डेटाचा खुद्द सरकार गैरवापर करणार नाही, याची काही व्यवस्था असेल तरच या मसुद्याला काही अर्थ!