राजा विक्रम झपाझप पावले टाकत आपल्या महालाकडे निघाला. ‘काय दलिंद्री लागलीय मागे, सुखाने दोन घास खाऊ देत नाही’, असे काहीसे पुटपुटत आणि दाढी खाजवत महालाच्या प्रवेशद्वाराशी आला. गडगडाटी हास्य करत व राजाला खिजवत वेताळ राजाच्या खांद्यावर बसून राजास टकामका न्याहाळू लागला.
‘कोण?’ राजा उद्गारला.
‘इतक्यात विसरलास राजा, मी वेताळ.’ वेताळ ऊर बडवीत उत्तरला.
‘विसरेन कसा? माझ्या आयुष्यात दोन दोन वेताळ आले आहेत म्हणून विचारलं की नंबर एकचा वेताळ की नंबर दोनचा?’
‘म्हणजे?’ दुसरा वेताळ अजून कोण?’
‘एक तू, मी आल्यामुळे तुझ्या पदासमोर उप लागले आणि दुसरा…!’
‘दुसरा कोण?’ वेताळ कानामागे डोकं आणतं विचारले.
‘अरे वेताळा, तोच ज्याच्यामुळे मला अधूनमधून अंडरग्राऊंड व्हायची वेळ येते.’
‘कोण राजा? नीट सविस्तर सांग, नाहीतर तुझा डोक्याची शंभर शकलं होतील.’
‘ऑलरेडी झाली आहेत एक नंबर वेताळा!’
‘म्हणजे कसे? काय केले सांग बरं?’
‘आपले दैवत महाराज यांच्याबद्दल ‘जुने पुराणे’ असे बिरूद लावायची काय गरज होती बरं. आधीच डोक्याला कमी ताप नाही, त्यात ‘तात्यांचे’ असं वागणं’!
‘राजा, तात्या की वेताळ, एक काही तरी ठरव बुवा.’
‘तात्या वेताळ म्हणा! असे काहीतरी बरळतात आणि मग आपल्याला मिडिया शोधत फिरतो.’
‘शांत हो राजा, वय झाले आहे त्यांचे.’ वेताळ समजावणीच्या सुरात.
‘वेताळा, महाराजांचा एवढा अपमान तर मिर्जाराजे जयसिंग यांनी पण केला नव्हता, कसे काय हिंमत होते बरं यांची.’
‘राजा, तुला असं नाही वाटत आज आपण परंपरेच्या विरूद्ध वागतो आहे.’
‘कसे काय वेताळा?’
‘राजा, प्रश्न मी विचारायची परंपरा आहे आणि आज प्रश्न तू विचारतो आहेस,’ वेताळ नर्व्हस होत म्हणाला.
‘वेताळा, आता प्रश्न जनता जनार्दन विचारणार आहे, मी नाही.’
‘शांत हो राजा,’ वेताळ खजील होतं.
‘वेताळा, आज महाराज असते तर टकमक टोकावरून…!’ राजा विक्रम क्रोधित होत म्हणाला.
‘राजा! आता झाले ते झाले, पुढे काय करायचे ते सांग?’
‘वेताळा, आता पुढे जनताच काय करायचे ते करेल, गोष्टी आपल्या हाताबाहेर चालल्या आहेत. तेव्हा सावध राहा वेताळा.’
‘अरे देवा! हा चाललो मी आता, नको ती कटकट .’
‘कुठे निघालास वेताळा?’
‘नागपुरले! मी बी तर अंडरग्राऊंड होतो ना बाप्पा. मलेच कावून जांगडगुत्ता. हा मी निघालो न…!’
असे किंचाळत वेताळ एक सूर मारून विमानतळाच्या दिशेने नागपूरचे विमान पकडायला जाऊ लागतो.
राजा दाढी खाजवत महालाची बेल दाबतो व दार उघडायची वाट पाहत बसतो.