गुंतवणूकयोग्य योजना (साधने) अनेक आहेत. या योजनांचे किंवा साधनांचे सुरक्षितता (सेफ्टी) ह्या एका निकषावर ढोबळमानाने दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल; पहिल्या प्रकारच्या योजना ज्यात परताव्याची म्हणजे गुंतवणुकीवरील उत्पन्नाची (रिर्टनची) हमी (गॅरंटी) असते व आपले भांडवलही परत मिळण्याची हमी असते अशा योजना. सेफ्टी म्हणजे इथे मुदतीअंती मुद्दल व व्याज किंवा इतर लाभ देय झाल्यावर मिळण्याची हमी. म्हणजे सेफ्टीचा अर्थ जोखीम नसणे हा होतो.
– – –
गुंतवणुकीची सर्वसाधारणपणे सुरुवात कशी होते, तसेच एकूणच आर्थिक विषयाबाबत उदासीनता दिसते हे आपण मागच्या लेखात बघितलं. मात्र आताची पिढी स्मार्ट आहे आणि त्यातील काहीजण तरी नियोजनपूर्वक गुंतवणूक करतात, सुरुवातीपासूनच म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. उत्पन्नातून जो पैसा खर्च होत नाही तो बचत खात्यामध्ये जमा होत राहतो. आपल्या फायद्यासाठी त्या पैशाची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. बचत खात्यातील रकमेवर वार्षिक फक्त तीन टक्के इतकेच व्याज मिळते, याउलट इतर काही योजनांमधून त्यापेक्षा जास्त व्याज किंवा उत्पन्न मिळू शकते. बचत खात्यात पैसा लोळत ठेवून आपण स्वतःचे नुकसान करत असतो. समजा एक लाख रुपये बचत खात्यात एका वर्षासाठी पडून आहेत तर त्यावर आपल्याला व्याज मिळेल ३००० रुपये. हेच जर बँकेच्या मुदत ठेवीत ठेवले असते तर आता मे २०२२मधील ५.६० टक्के व्याजदराने त्यावर ५६०० रुपये व्याज मिळाले असते. म्हणजेच बचत खात्यात पैसे ठेवून आपण स्वतःचे २६०० रुपये नुकसान करतो. यापेक्षाही चांगले उत्पन्न देणार्या इतर काही योजना आहेत, त्यांचा विचार केला तर आपलं नुकसान आणखी जास्त होतं.
आपण गुंतवणूक का करायची? त्यात आपलाच जास्त आर्थिक फायदा आहे हे एक सुस्पष्ट कारण आहे. पण ते एकमेव कारण नाही. अनेक कारणांनी नियोजनपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक झालेले आहे. पूर्वीसारखे एकदा नोकरीला लागला की निवृत्त होईपर्यंत नोकरी जाण्याची धास्ती नाही ही स्थिती आता राहिलेली नाही. सरकारी नोकर्या फार कमी आहेत. खाजगी कंपन्यांमधील नोकरीत आता जन्मभर टिकून राहण्याची हमी नाही. कधी व्हीआरएस येईल, कधी कंपनी बंद पडेल सांगता येत नाही. कधी स्वत:लाच नोकरी सोडायची असते. अशा वेळा आल्या तर त्यासाठी तरतूद हवी म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कधी स्वतःच्या पुढील शिक्षणासाठी तरतूद करणे आवश्यक असते आणि एकदा लग्न होऊन संसार सुरू झाला की घर घेणे, मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंबातील माणसांच्या आजारपणासाठी तरतूद, निवृत्तीनंतरचे नियोजन, अशा अनेक कारणांनी गुंतवणूक करणे आवश्यक असते. शिवाय मिळवत्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला, तर तरतूद म्हणूनसुद्धा सोय करून ठेवणे आवश्यक असते.
गुंतवणूकयोग्य व आर्थिक निकषांवर मान्य असलेल्या साधनांविषयी आपण बोलत आहोत, त्यामुळे आधी फ्रॉड स्कीम्सपासून दूर राहायचे बघू. निव्वळ फसव्या योजनांमधील एक प्रकार म्हणजे साखळी पद्धतीने गुंतवणूक करा, तुम्हाला लाभ मिळेल सांगितले जाते. ह्या पॉन्झी स्कीम नावाने ओळखल्या जातात, ह्यात पैसे बुडतात. शेरेगर नावाची एक फसवी योजना ह्या प्रकारातील होती. वृक्ष लागवड (ट्री प्लॅन्टेशन) स्कीम्स हे आर्थिक निकषांवर न टिकणार्या योजनेचे एक उदाहरण. पूर्वी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून लोकांचे पैसे हमखास बुडालेले आहेत. इतरही काही योजना (स्कीम) ह्या फ्रॉड (अफरातफर) योजना असतात. त्यात गुंतवलेले पैसे बुडण्याचीच शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ दोन-चार वर्षातच पैसे दुप्पट करण्याची हमी देणारी एखादी योजना. बँक जर एका वर्षासाठी मुदत ठेवीवर सहा टक्के व्याज देत असेल व कोणी मुदतठेवीवर १५ टक्के व्याजाची हमी देत असेल तर तिथेही धोका आहे. बाकी सावकारी व्याज, पठाणी व्याज किंवा बिल्डर जास्त व्याज देऊन पैसे घेतात ते प्रकार आपल्यासाठी नाहीत हे पक्के समजावे. बँका मुदतठेवीवर निश्चित दराने व्याज देण्याची हमी देतात. शेअर मार्केट व इक्विटी म्युचुअल फंडांमधील गुंतवणुकीत मात्र अशी हमी नसते. त्यातील गुंतवणुकीतून कमी कालावधीत अगदी २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त परतावा मिळू शकतो, पण अत्यंत महत्वाची बाब लक्षात घ्या, त्याची हमी नसते. उलट नुकसानही होऊ शकते. म्हणूनच शेअर मार्केट किंवा म्युचुअल फंडामधील गुंतवणुकीतून निश्चित उत्पन्नाची कोणी हमी देत असेल तर ते विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत.
गुंतवणूकयोग्य योजना (साधने) अनेक आहेत. या योजनांचे किंवा साधनांचे सुरक्षितता (सेफ्टी) ह्या एका निकषावर ढोबळमानाने दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल; पहिल्या प्रकारच्या योजना ज्यात परताव्याची म्हणजे गुंतवणुकीवरील उत्पन्नाची (रिटर्नची) हमी (गॅरंटी) असते व आपले भांडवलही परत मिळण्याची हमी असते अशा योजना. सेफ्टी म्हणजे इथे मुदतीअंती मुद्दल व व्याज किंवा इतर लाभ देय झाल्यावर मिळण्याची हमी. म्हणजे सेफ्टीचा अर्थ जोखीम नसणे हा होतो. बँकातील मुदतठेवी, आरबीआय बॉन्ड्स, पोस्ट ऑफिसच्या योजना, पीपीएफ ही याची काही उदाहरणे. यात परतावा (रिटर्न) किती मिळणार ते निश्चित असते, तसेच मुद्दलही परत मिळण्याची हमी असते.
याउलट दुसर्या प्रकारच्या योजनांमध्ये पैसे गुंतवले तर त्यावर किती उत्पन्न मिळेल याची हमी नसते आणि जे पैसे गुंतवलेले असतात, त्याबाबतीतही काही जोखीम असते किंवा हमी नसते असे म्हणूया. शेअरमार्केट व इक्विटी म्युचुअल फंडातील गुंतवणूक या प्रकारात येते. हमी नसूनही ह्या गुंतवणूकयोग्य व आर्थिक निकषांवर खर्या उतरणार्या योजना आहेत इतकेच सध्या लक्षात ठेवू, पण हमी नसताना यात गुंतवणूक का करायची? कारण त्यापासून जास्त लाभ मिळण्याची शक्यता असते. दीर्घ कालावधीत या गुंतवणुकीतून बँकांमधील मुदत ठेवीपेक्षा जास्त लाभ मिळालेला आहे. संपत्ती निर्मिती करण्यासाठी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक झालेले आहे. इक्विटी म्युचुअल फंडातील गुंतवणुकीतून किती लाभ झाला त्याची काही उदाहरणे नंतर बघू. सुरक्षितता (सेफ्टी) ह्याबरोबरच आणखी दोन प्राथमिक निकष आहेत; रोकडसुलभता (लिक्विडिटी) व परतावा म्हणजे गुंतवणूकीवरील उत्पन्न (रिटर्न). या दोन्हीचा अर्थ बघू.
रोकडसुलभता (लिक्विडीटी) म्हणजे ऐनवेळेस पैशाची गरज असेल तर गुंतवणुकीतून बाहेर पडून पैसे लगेच हातात येऊ शकतात का? बँकेत मुदत ठेवीत पैसे आहेत, आकस्मिक कारणाने मुदतीआधीच गरज भासली तर आपण काढून आणू शकतो, थोडीशी पेनल्टी द्यावी लागते इतकेच. शेअर मार्केटमधील व म्युचुअल फंडातील गुंतवणूकही आपण विकून त्यातून बाहरे पडू शकतो आणि एक ते तीन दिवसात पैसे बँकेत जमा होऊ शकतात. फक्त त्या वेळेस नेमके मार्केट खाली असेल तर ते नुकसान सोसण्याची तयारी हवी. त्यामुळे ज्या पैशाची तातडीने गरज भासणार नाही तोच शेअर मार्केट व म्युचुअल फंडात गुंतवावा असे सांगितले जाते. समजा आपण फ्लॅट/प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले तर ती विकून तात्काळ पैसे हातात येऊ शकत नाहीत. तसेच पीपीएफमध्ये पैसे गुंतवले असतील तर पाच वर्षांनंतरच ते खाते प्रीम्यॅचुअर बंद करता येतो, तेही वैद्यकीय व शिक्षण या कारणांसाठीच व अंशत: पैसे पाहिजे असतील तर सात वर्षानंतर ते मिळू शकतात. विम्यात गुंतवले असतील तर त्यातही रोकडसुलभता नाही. पण रोकडसुलभता या मुद्द्याचा इतका बाऊ करण्याचे कारण नाही. खरोखर आपण काळजी करतो तितकी आणीबाणीची परिस्थिती येण्याची शक्यता कमी असते. दुसरे असे की अशा परिस्थितीसाठी एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवली की इतर रक्कम गुंतवायला आपण मोकळे असतो.
परतावा म्हणजे गुंतवणुकीवरील उत्पन्न (रिटर्न), अर्थातच आपल्याला जास्तीत जास्त परतावा हवा असतो. धोका न घेता जर तो मिळाला तर आणखीच छान. पण काही योजनांवर हमीबद्ध परतावा असतो, काही गुंतवणुकीवर हमी नसते. बँक मुदतठेवीवर किती रिटर्न मिळेल याची हमी असते. शेअर मार्केटमधील व म्युचुअल फंडातील गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळतील याची हमी नसते. त्यात रिस्क असते पण रिटर्न जास्त मिळू शकते. जोखीम काहीच नाही तर परतावाही कमी व परतावा जास्त तर जोखीम जास्त असे सूत्र सांगता येईल. हे अर्थातच फ्रॉड योजनांना लागू नाही. तिथे फक्त जोखीम असते. हे तीन निकष एकदा लक्षात आले की एखाद्या योजनेत गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय आपण स्वत:च घेऊ शकतो. आता माहिती घेताना जोखीम नसलेल्या साधनांपासून सुरवात करू.
(क्रमश:)