कोकणात अनेकजण कोळंबी शेती करतात हे माहीत होतं, पण कुणाला खेकडा शेती करताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे या शेतीची माहिती गुगलवर शोधायला सुरुवात केली. माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे खेकड्यांचा जीवनक्रम समजून घेणे सोपे गेले. हा विषय इंटरेस्टिंग वाटला, तेव्हा हाच व्यवसाय करायचा निर्णय घेतला. मी नोकरी करायची सोडून व्यवसाय करतोय म्हणून घरचे थोडे नाराज होते, पण मी खेकडे एक्स्पोर्ट करणार आहे हे सांगितल्यावर, आपला मुलगा काहीतरी भारी करतोय असा समज होऊन त्यांचा विरोध मावळला.
– – –
धंद्यात जेव्हा एकसुरीपणा येतो, प्रगती खुंटते तेव्हा धंद्यात कात टाकली पाहिजे असं म्हणतात. उदाहरणार्थ खेकडा… तो आपल्या आयुष्यात सहा ते सात वेळा कात टाकतो (मोल्टींग). शंभर ग्रॅमचा खेकडा जेव्हा त्याच्या क्षमतेनुसार खाद्य खाऊन पोट भरतो तेव्हा त्याला स्वतःची वाढ करण्याकरिता जुनं शरीर (शेल) सोडावं लागतं. ते सोडल्यावर तो दोनशे ग्रॅमचा होतो, काही महिन्यांनी तोच खेकडा कवच सोडून पाचशे ग्रॅमचा होतो… खेकडा नेहमी अमावस्येच्या अंधार्या रात्री कात टाकतो आणि पौर्णिमेपर्यंत खाद्य खाऊन अंगाने धष्टपुष्ट होतो, म्हणूनच पौर्णिमेच्या पिठुर चांदण्यात मिळणारा खेकडा जिभेला आणि पोटाला तृप्त करतो…
…अलिबागमध्ये ‘खेकड्याची शेती‘ करणारा दर्शन पाटील जेव्हा ही इंटरेस्टिंग माहिती सांगत होता, तेव्हा माझ्या मांसाहारी मनात चिंबोरी कालवणाच्या आठवणी ताज्या झाल्या. हा दर्शन मला कुठे भेटला याचीही एक मजेशीर गोष्ट आहे. याच लेखमालेतून ज्यांचा काही दिवसांपूर्वी मराठी वाचकांना परिचय करून दिला ते ‘फ्लॅगमॅन‘ म्हणून ओळखले जाणारे तरुण उद्योजक चेतन नलावडे यांच्या मस्जिद बंदर येथील दुकानाला काही दिवसांपूर्वी भेट दिली असता, त्यांच्याकडे विविध प्रकारचे दोरखंड घ्यायला एक मराठी तरुण आला. ग्राहकाने वस्तू मागितली आणि तुम्ही उचलून दिली तर तुम्ही फक्त दुकानदार आहात; पण जर तुम्ही उद्योजक असाल तर आलेला ग्राहक काय व्यवसाय करतो, काय बांधायला दोर घेऊन चालला आहे, त्या कामात अजून कोणते मटेरियल लागेल, ज्यातून आपल्याला नवीन बिझनेस मिळू शकतो, असे प्रश्न त्याला विचाराल. नेमके हेच प्रश्न चेतन दर्शनला विचारत होता. दर्शनने सांगितलेली माहिती ऐकून मला हा विषय आपल्या लेखमालेसाठी अगदी योग्य वाटला.
मी थेट मुद्द्याला हात घालत त्याला विचारलं, ‘तू हा व्यवसाय कधी सुरू केलास आणि तुला सुरुवातीला अडचणी आल्या?‘ त्यावर दर्शन म्हणाला, ‘फेब्रुवारी २०१६ला आम्ही चार पार्टनर्सनी मिळून ‘डीएसएन एक्झिम’ या नावाने कंपनी सुरू केली. अलिबागमधील धाकटे शाहपूर या माझ्या गावी मी एका मित्राची दोन एकर जमीन वर्षभरासाठी लीजवर घेतली. अन्नधान्याच्या शेतीसाठी जसं बी बियाणं लागतं तसं या मडक्रॅबच्या शेतीसाठी क्रॅब सीड्स म्हणजे एक सेंटिमीटर ते तीन सेंटिमीटर लांबीची खेकड्याची पिल्लं लागतात. हे सीड्स भारतात फक्त चेन्नई हॅचरीमधे उपलब्ध आहेत. इथे कमीत कमी दोन हजार पिल्लांची ऑर्डर द्यावी लागते. सीड्सची मागणी जास्त असल्याने पूर्वनोंदणी करावी लागते. मी देखील पहिली ऑर्डर फेब्रुवारी २०१६ला नोंदविली. जूनमध्ये सीड्स हातात येईपर्यंत एक एकर जागेत क्रॅब शेतीसाठी तलाव (पॉन्ड) बनवला, जमिनीला कुंपण घातलं आणि उर्वरित एक एकर जागेत प्लॅन बी म्हणून जिताडा आणि कटला या माशांची शेती सुरू केली, जेणेकरून खेकडा वाढवताना काही अडचणी आल्याच तर मत्सव्यवसायातून नुकसान भरून निघेल.
चेन्नई ते अलिबाग हा ट्रान्सपोर्टचा खर्च धरून आम्हाला एक क्रॅब सीड् तेव्हा पंचवीस रुपयांना विकत मिळाला होता. तयार केलेल्या कृत्रिम तलावात सीड्स सोडले. पहिल्याच महिन्यात एक मोठी अडचण निर्माण झाली, खेकड्यांना खाद्य म्हणून खराब झालेली मासळी दिली जाते, पण पावसाळ्यात आपल्याकडे मासेमारी बंद असते. व्यवसाय सुरू करताना ही बाब आमच्या लक्षात आली नाही. अशा परिस्थितीत त्यांना खाद्य काय घालायचं यासाठी चेन्नई हॅचरीकडे संपर्क साधला. माशांचा प्रश्न सुटेपर्यंत चिकन फीडिंग करू शकता हे त्यांनी सांगितलं. तात्पुरता प्रश्न सुटला, पण यात आर्थिक अडचण अशी होती की फिश खाद्यासाठी आम्ही पंधरा रुपये प्रति किलो मोजत होतो, पण चिकन खाद्यासाठी मात्र आम्हाला पस्तीस रुपये प्रति किलो मोजावे लागले. मच्छीशेतीच्या व्यवसायातून मिळणार्या उत्पन्नातून आम्ही खेकडा शेतीचा खर्च भागवत होतो.
दर महिन्याला खेकड्याची वाढ योग्य प्रमाणात होते आहे का, यावर लक्ष ठेवावं लागतं. खेकडा वाढीला साधारण आठ ते नऊ महिने लागतात, धान्याच्या शेतात जसे संपूर्ण वाढ झालेल्या पिकांच्या कापणीचा म्हणजेच हार्वेस्टिंगचा हंगाम असतो, तसेच खेकडा शेतीच्या क्षेत्रात देखील खेकड्यांची संपूर्ण वाढ झाली की पॉन्ड कोरडा करून त्यातून खेकडे बाहेर काढले जातात, त्याला हार्वेस्टिंग म्हणतात. यावेळी खेकड्यांची आकार आणि वजनानुसार वर्गवारी केली जाते. जून २०१६मध्ये आणलेली क्रॅबची पिल्ले जानेवारीत २०१७मध्ये मोठी होऊन विक्रीयोग्य वजन आणि आकाराचे खेकडे बनली आहेत हे लक्षात आलं. फेब्रुवारी महिन्यात आम्ही हार्वेस्टिंग करायला सुरुवात केली. दोन हजार खेकडे पॉन्डमध्ये सोडले होते, त्यातून आम्हाला ६० टक्के सर्वायवल रेटप्रमाणे बाराशे खेकडे मिळाले. या व्यवसायाचं सर्व गणित वजनावर चालतं. खेकडा मोठा असेल तर त्याला मिळणारा दरही जास्त असतो. म्हणूनच नफा मिळविण्यासाठी एका खेकड्याचे वजन कमीत कमी सातशे ग्रॅमच्या पुढे यायला हवं. पण आम्ही वाढविलेले खेकडे अर्धा किलो ते एक किलो असे मिक्स वजनाचे होते. यातही पन्नास टक्के खेकडे लहान होते. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात समोर अपयश दिसू लागलं.
हे असं का घडलं असेल हे विचारण्यासाठी आम्ही पुन्हा चेन्नई हॅचरीकडे संपर्क साधला, ‘आमच्याकडून काही चुका झाल्या का, खाद्य टाकण्यात काही प्रॉब्लेम झाला असेल का,‘ असं विचारल्यावर, त्यांचं उत्तर आलं की, ‘तुम्हाला दिल्या गेलेल्या सीड्स चेन्नईच्या वातावरणात वाढवलेल्या आहेत, कदाचित त्यांना कोकणातील जमीन आणि हवामान मानवलं नसेल.‘
अपयशाने खचून न जाता, गुंतवलेले पैसे परत मिळविण्यासाठी तयार असलेल्या बाराशे खेकड्यांची (साडे सातशे किलो) लवकरात लवकर विक्री करणे आवश्यक होते. आधी ठरवलं होतं त्याप्रमाणे एक्सपोर्टसंबंधी माहिती घेतली तेव्हा कळलं की जर खेकडे एक्स्पोर्ट करायचे असतील तर एकावेळी कमीत कमी दोनशे किलो खेकडे पाठवावे लागतात आणि पाठवण्याआधी दर महिन्याला १६०० किलो खेकडे पुरवण्याचा करार करावा लागतो. खेकड्यांची संख्या इतकी कमी भरल्यावर आम्हाला ते एक्स्पोर्ट करणं शक्यच नव्हतं, त्यामुळे आम्ही जवळच्या होलसेल विक्रेत्याचा शोध घेऊ लागलो.
याच प्रयत्नात असताना, मोहा कोळीवाड्यात आम्हाला होलसेल खेकडेविक्री करणारा सागर कोळी हा मुलगा भेटला. त्याने आमच्या खेकड्यांचा दर फायनल करून मागणीनुसार तीन आठवड्यातच आमचे सर्व खेकडे विकत घेतले. खेकडे विकल्यावर आम्ही सुरुवातीला गुंतवलेले पैसे मिळाले, पण नफा मात्र मिळाला नाही. सर्व हिशेब केल्यावर आम्ही तिघांनी मैत्रीत कोणतीही कटुता येणार नाही याची काळजी घेत, सामोपचाराने आपली या व्यवसायातील भागीदारी इथेच थांबवू या, असा निर्णय घेतला. मला मात्र याच व्यवसायात कात टाकून मोठं व्हायचं होतं.‘
दर्शनने पहिलं अपयश पचवून हा व्यवसाय कसा पुढे चालवला, याबद्दल उत्सुकता होतीच पण त्याआधी त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, तो या व्यवसायात कसा आला, हे जाणून घ्यायचं होतं. दर्शन म्हणाला, ‘खरं तर एव्हिएशनमध्ये करिअर करावं हे माझं स्वप्न होतं. बारावीच्या मार्कांवर ‘एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग’साठी कॉलेजमध्ये
अॅडमिशन देखील मिळालं. पण कॉलेजची आठ लाख रुपये फी भरण्यासाठी बाबांनी बँकेत लोनसाठी केलेला अर्ज नाकारला गेला. आयुष्यात पाहिलेलं पहिलं स्वप्न तुटताना पाहून खूप वाईट वाटलं, तेव्हा कवी हरिवंशराय बच्चन यांची कविता आठवली, ‘मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा…’ आणि आज मागे वळून पाहताना, ते स्वप्न खरं नाही झालं, हे बरं झालं असं वाटतंय. बीएमएस कोर्ससाठी एमजीएम कळंबोली कॉलेजला प्रवेश घेतला. बीएमएसच्या शेवटच्या वर्षाला असताना कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू होते, आपण बिझनेस मॅनेजमेंट शिकलोय मग नोकरी का करायची? असा प्रश्न मला पडला आणि तिथूनच नोकरी करायची नाही हा माइंडसेट तयार झाला. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंटरेस्टिंग वाटत होतं. याबद्द्ल सखोल ज्ञान घेण्यासाठी मी एक्स्पोर्ट इम्पोर्ट मॅनेजमेंटचा सर्टिफाइड कोर्स आणि डिप्लोमा पूर्ण केला. डिप्लोमा पूर्ण झाल्यावर, मी आणि माझा कॉलेज मित्र आनंद सोनावणे कोणता व्यवसाय करावा याबद्दल रोज चर्चा करायचो. दोन महिने अनेक व्यवसायांची माहिती घेतली. मी एक्सपोर्ट इम्पोर्टची थिअरी शिकलो होतो आता प्रॅक्टिकल करून पाहावं या विचारानं काहीतरी एक्सपोर्ट करायचं ठरवलं. आंबे, काजू, कडधान्यं, साखर इथपासून ते कपडे, फर्निचरपर्यंत विविध वस्तूंचा अभ्यास केला. पण या सर्व वस्तू घाऊक प्रमाणात निर्यात होतात, यासाठी मोठं भांडवल लागतं जे आमच्याकडे नव्हतं आणि या वस्तू कमी क्वांटिटीमध्ये पाठवताना प्रॉफिट फार कमी आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून ठरवलं की ज्यात जास्त प्रॉफिट असेल आणि ज्याची निर्मिती आपण स्वत: करू शकू असाच प्रॉडक्ट आपण एक्स्पोर्ट करायचा.
निरीक्षणातून असं कळलं की, आपल्या देशातून खेकडे मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट होत असून, यात प्रॉफिट मार्जिन देखील जास्त आहे. कोकणात अनेकजण कोळंबी शेती करतात हे माहीत होतं, पण कुणाला खेकडा शेती करताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे या शेतीची माहिती गुगलवर शोधायला सुरुवात केली. माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे खेकड्यांचा जीवनक्रम आणि क्रॅब कल्चर समजून घेणे सोपे गेले. हा विषय इंटरेस्टिंग वाटत होता आणि हे आपल्याला जमू शकतं असा विश्वास वाटला, तेव्हा हाच व्यवसाय करायचा निर्णय घेतला. मी नोकरी करायची सोडून व्यवसाय करतोय म्हणून घरचे थोडे नाराज होते, पण मी खेकडे एक्स्पोर्ट करणार आहे हे सांगितल्यावर, आपला मुलगा काहीतरी भारी करतोय असा समज होऊन त्यांचा विरोध मावळला.
मी आणि आनंदने मिळून उभारलेले भांडवल कमी पडत होते, तेव्हा योगेश कचरे आणि निकेश पाटील हे दोन मित्र पार्टनर म्हणून पुढे आले. मी प्रॉडक्शन आणि आनंदने मार्केटिंग पाहावं अशी आमच्या कामाची वाटणी झाली. कोणत्याही सागरी प्रजातींची निर्यात करताना (एमपीईडीए) मरीन प्रॉडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलमेंट अथॉरिटी या सरकारी संस्थेची मान्यता घ्यावी लागते. या संस्थेचं सहा दिवसांचं ट्रेनिंग घेताना राजीव गांधी सेंटर फॉर अॅक्वाकल्चर (आरजीसीए) चेन्नई, येथून खेकड्याची बीजं म्हणजे पिल्लं कशी मागवावी, ती वाढवताना काय खबरदारी घ्यावी, याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही चौघांनी मिळून व्यवसाय सुरू केला, पण त्याला फारसं यश लाभलं नाही आणि आम्ही या भागीदारीतून वेगळे झालो.
घरची व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना, आर्थिक पाठबळ नसताना मी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं अपयश पुन्हा येणं मला परवडणारं नव्हतं. पुढे हाच व्यवसाय करणार असू तर त्याची दुसरी बाजू समजून घ्यायला हवी या हेतूने, आमच्या आजूबाजूच्या मुरुड, बेलापूर, मोहा, कोळीवाड्यात जावून कोळी, खारवी बांधवांची भेट घेऊन त्यांच्याकडून पारंपरिक खेकडे पकडण्याचा, त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय कसा आहे हे जाणून घेतलं. रोज नवीन माहिती मिळत होती.
सॉफ्ट क्रॅब आणि हार्ड क्रॅब असे खेकड्यांचे दोन प्रकार असतात. सॉफ्ट क्रॅब कट केला तर त्यात फारसं मांस नसतं त्यामुळे तो कमी किमतीत विकला जातो. हार्ड क्रॅब म्हणजे योग्य प्रमाणात खाद्य खाऊन पूर्ण वाढ झालेला खेकडा, ज्यात अधिक मांस भरलेलं असतं. एक्स्पोर्ट करताना किंवा हॉटेलला खेकडा विकताना त्याच्या एकूण वजनाच्या ७० ते ८० टक्के मांस हवं असा नियम आहे. म्हणूनच हार्ड क्रॅब जास्त किमतीला विकले जातात. कोळी बांधवांंना मिळणार्या खेकड्यांपैकी किती टक्के हार्ड आणि किती टक्के सॉफ्ट क्रॅब असतात हा रेश्यो समजून घेतला. जून ते ऑगस्ट महिन्यात रेश्यो ५०-५० टक्के इतका असतो तर ऑक्टोबरनंतर हार्ड क्रॅब मिळतो. पण पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात कमी संख्येने खेकडे मिळतात. त्यामुळेच थंडीत खेकड्यांना मागणी अधिक आणि पुरवठा कमी असतो. या माहितीचा व्यवसायात कसा उपयोग करून घेता येईल याचा अंदाज बांधला आणि मी होलसेल खेकडेविक्री करणार्या सागर कोळीला पुन्हा जाऊन भेटलो. सागर खेकड्यांची वर्गवारी करून पंचतारांकित हॉटेल आणि लोकल मार्वेâटला सप्लाय करतो. त्याचा व्यवसाय समजून घेत मी त्याला एक बिझनेस प्रपोजल दिलं, ‘मी तुझ्याकडून सॉफ्ट क्रॅब नेऊन त्यांचे पालनपोषण करून ते हार्ड क्रॅब झाल्यावर ते तुला देईन,‘ असं सांगितलं.‘ चेन्नईहून सीड्स आणून त्यांना नऊ महिने पोसून मोठे करण्यापेक्षा अर्धी वाढ झालेल्या सॉफ्ट क्रॅबना फीडिंग करून हार्ड क्रॅब बनवणं सोपं होतं आणि यात सर्वायवल रेट देखील चांगला मिळणार होता. या प्रपोजलमधे आम्हा दोघांचाही फायदा होता.
खेकडा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात आधी समुद्राच्या खाडीलगतची (बॅकवॉटर) जमीन शोधावी लागते, कारण, खेकडा शेती फक्त खार्या पाण्यातच होऊ शकते. त्या शेतजमिनीवर ट्रॅक्टरने दोन ते अडीच फूट मातीचा उपसा करून कडेने पाच फूट उंचीचा बांध घातला जातो. यातून पाच फूट खोलीचा तलाव बनतो, त्यात साडेतीन फूट पाणी सोडतात. या पाण्यात खेकड्याची पिल्लं सोडून त्यांना वाढवतात. याला ओपन कल्चर म्हणतात आणि मी जो व्यवसाय करतो त्याला बॉक्स कल्चर किंवा क्रॅब फॅटनिंग असं म्हटलं जातं. एका प्लास्टिक पॉलिमर बॉक्समध्ये एक खेकडा ठेवून तो बॉक्स पीव्हीसी पाइपवर पॉन्डमधे तरंगता ठेवला जातो. या बॉक्सना चारही बाजूंना लहान आकाराची छिद्रे पाडली जातात. जेणेकरून बॉक्समध्ये हवा खेळती राहील, पॉन्डमध्ये तरंगताना खेकड्याला पाणी मिळेल आणि त्याला खाद्य टाकता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान आकाराच्या छिद्रांमुळे खेकड्याला पळून जाता येणार नाही. प्रत्येक खेकड्याच्या वजनानुसार त्याचा तीस, चाळीस, पन्नास दिवसांचा फीडिंग पीरियड असतो. खाद्य खाऊन खेकडे धष्टपुष्ट (हार्ड) झाले की ते विक्रीला पाठविले जातात. या पद्धतीने साधारण एक ते दोन महिन्यांत खेकडे विक्रीसाठी तयार होतात.
सागरकडून सॉफ्ट क्रॅब आणून फॅटनिंग सुरू केलं, दोन महिन्यांनी खेकडे विक्रीयोग्य तयार झाले, सागरला देऊनही बरेच खेकडे शिल्लक होते. होलसेल भावात खेकडे विकताना मार्जिन कमी ठेवावं लागतं, हेच खेकडे डायरेक्ट कस्टमरला विकले तर जास्त नफा मिळेल आणि आपला ब्रँडही तयार होईल असा विचार मनात सुरू होता. नेटसर्फिंग करताना बँक्वेट्स आणि पार्टीसाठी खेकडे विकणारी ऑस्ट्रेलियन ‘ऑनलाइन क्रॅब स्टोअर‘ची वेबसाइट पाहिली. असं काही आपण करू शकतो का, या विचाराने मार्वेâटिंगमध्ये हुशार असलेला मित्र आनंद याला पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट केलं. त्याच्याशी चर्चा करून ‘डीएसएन एक्झिम ऑनलाइन फिश स्टोअर’ सुरू केलं. आमचे पॅम्प्लेट, बॅनर घेऊन आम्ही नवी मुंबईतील हाऊसिंग सोसायटींच्या पदाधिकार्यांना भेटलो. त्यांनी देखील मराठी तरुण मुलं काहीतरी वेगळा व्यवसाय करत आहेत या कारणाने आम्हाला सपोर्ट केला. ग्राहक त्यांच्या ऑर्डर्स संध्याकाळी सात वाजेपर्यंत नोंदवतील आणि त्यांना दुसर्या दिवशी सकाळी डिलिव्हरी मिळेल, अशी व्यवस्था होती. ‘खेकडे आपल्या दारात‘ ही कल्पना लोकांना फारच आवडली.
सुरुवातीला आम्ही फक्त क्रॅब विकायचो. पण काही दिवसांनी रिपीट ऑर्डर्स कमी झाल्या. याच्या कारणांचा शोध घेतल्यावर लक्षात आलं की, मांसाहारी माणूस प्रत्येक ‘खाण्याच्या वाराला‘ फक्त खेकडा खाऊ शकत नाही, त्यामुळे जर या व्यवसायात टिकायचं असेल तर इतर मासेही आपल्याला वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावे लागतील. म्हणून आता खेकड्यांसोबत अलिबाग फिश मार्वेâटमधील मासे होलसेल दरात आणून ते कटिंग, पॅकिंग करून विक्री करायला सुरुवात केली. पण आमचा अंदाज चुकला, खरेदी करताना आम्ही संपूर्ण मासा विकत घ्यायचो, पण माशांच डोकं आणि शेपटी कटिंग करून साफ केल्यावर त्याच्या वजनात घट व्हायची. हे धंद्याचं गणित सुरुवातीला विक्री दर ठरवताना लक्षात आलं नाही, त्यामुळे मासेविक्रीत तोटा होऊ लागला. लगेच दर वाढवले असते तर मोठ्या कष्टाने मिळविलेले ग्राहक दुरावण्याची भीती होती. सुरुवातीला थोडा तोटा सहन करून ग्राहक बांधूया अशी आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवली, परंतु सहा महिने वाट पाहून देखील प्रॉफिट होत नाही हे लक्षात आल्यावर आनंदने काम थांब्विण्याचा निर्णय घेतला. प्रॉडक्शन, पॅकिंग, मार्वेâटिंग, डिलिव्हरी असं सगळं एकहाती सांभाळणं मलाही शक्य नव्हतं. त्यामुळे खेकड्यासारखंच पुन्हा एकदा मोल्टींग करून खेकडे आणि माशांच्या डिलिव्हरीचा व्यवसाय थांबवून यापुढे फक्त क्रॅब फॅटनिंगमध्ये संपूर्ण लक्ष घालायचं असं मी ठरवलं.
या काळात माझा सागरसोबतचा व्यवसाय सुरूच होता. अजून मोठी मजल मारण्यासाठी होलसेल व्यापारी, किरकोळ व्यापारी या मार्गाने जाण्यापेक्षा या व्यवसायातील सर्वात मोठा व्यापारी कोण आहे याचा शोध सुरू होता. योगायोगाने पंचतारांकित हॉटेलात मासे आणि खेकडे पुरवठा करणार्या ‘गीते फिशारिज’चे मालक संकेत गीते यांची भेट झाली. तेदेखील थंडीच्या दिवसात मुबलक हार्ड क्रॅब सप्लाय करणार्या व्यक्तीच्या शोधात होते. दोघांचा फायदा होईल असा दर निश्चित करून आम्ही करार केला. अनेक मच्छिमार सॉफ्ट क्रॅब विकायला माझ्याकडे येऊ लागले. खरेदीदार आणि विक्रेते हे दोघेही माझ्याकडे असल्यामुळे मला फक्त प्रॉडक्शनवर लक्ष देता आलं.
खेकडे एक्स्पोर्ट करायचं हे माझं स्वप्न होतं. त्यासाठी लायसन्स काढलं. पॉन्डमधून काढलेला खेकडा होलसेलरकडे जातो, तिथून पॅकिंग होऊन तो चेन्नईला पाठविण्यात येतो.
चेन्नईला एक्स्पोर्ट पॅकिंग करून खेकडा सिंगापूरला रवाना केला जातो. ट्रान्सपोर्टसाठी बॉक्समध्ये पॅकिंग करताना खेकड्याने स्वतःला किंवा दुसर्या खेकड्याला इजा करू नये यासाठी त्यांच्या नांग्या बांधलेल्या असतात. या सर्व प्रवासात अन्नाशिवाय खेकडा कमीत कमी सहा दिवस (शेल्फ लाइफ) जगला पाहिजे. तसेच त्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तो कापल्यावर त्यात ७० ते ८० टक्के मांस मिळायला हवं असा नियम आहे. खेकड्यात मांस आहे की नाही हे समजण्यासाठी त्याला पॉन्डमधून
बाहेर काढल्यावर त्याचे काही पॉइंट्स दाबून ग्रेडिंग केली जातं. हे करायला अनेक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव लागतो. मी या व्यवसायात नवखा असलो तरीही खेकड्याबद्दल सर्व काही मला शिकून घ्यायचं होतं. त्यासाठी कोकणातील अनेक जुन्या जाणत्या मच्छिमारांना भेटलो, चेन्नईलाही काही दिवस जाऊन राहिलो. आता नियमित सरावाने मलाही ग्रेडिंग करणं जमू लागलं आहे.
व्यवसायात जेव्हा चढउतार आले तेव्हा माझी आई आणि भावोजी संतोष पाटील हे नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. तसेच पहिला खेकडा पॉन्डमध्ये सोडला त्या दिवसापासून माझ्या सोबत असणारे माझे टीम मेंबर दिलदार पाटील आणि अतुल म्हात्रे यांच्या सपोर्टशिवाय मी इथपर्यंत पोहचलो नसतो. गेल्या काही वर्षांत मी करत असलेलं काम, मला मिळालेलं यश पाहून अनेक जणांनी माझ्या चारपट पैसे गुंतवून या व्यवसायाची कॉपी करून पाहिली, परंतु अपुर्या नॉलेजने त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. कोणी तरुण मुलगा माहिती विचारायला आला, तर मी मार्गदर्शन करायला नेहमीच पुढे असतो. तुम्ही आधी संपूर्ण माहिती घ्या, पुरेसा अनुभव घ्या आणि मगच या व्यवसायात पदार्पण करा. फक्त एखाद्याला यश मिळालं म्हणून तुम्ही या व्यवसायात उडी मारणार असाल तर हा व्यवसाय तेवढा सोपा नाही. हेच माझं तरुण पिढीला सांगणं असतं.‘
पहिल्या वर्षी दर्शनने एक एकर जागेत सुरू केलेला व्यवसाय, दुसर्या वर्षी दोन एकर जागेत स्थिरावला. एकट्याने मेहनत करून होणारी धंद्यातील उलाढाल फार वेगवान नव्हती, त्यामुळे गुंतवणूक करणार्या योग्य व्यक्तीच्या तो शोधात होता. चौथ्या वर्षी त्याच्याकडे अनेक इन्व्हेस्टर्स येऊ लागले. एके दिवशी मुंबईत मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारे अर्चना आणि पारिजात परळकर हे दांपत्य दर्शनची खेकड्यांची शेती पाहायला आले.एका मराठी मुलाने उभारलेला हा व्यवसाय पाहून त्यांनी यापुढील गुंतवणूक करायची ऑफर दिली. या ऑफरचा स्वीकार करून दर्शनने, आज सहा एकर जमिनीवर सहा
पॉन्ड बांधले आहेत. आणि क्रॅब एक्स्पोर्ट या त्याच्या स्वप्नाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला आहे.
एका पातेल्यात चार खेकडे ठेवले तरीही एकही खेकडा त्यातून बाहेर जात नाही, कारण एक खेकडा बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला तर दुसरा खेकडा त्याचे पाय ओढतो. याचंच उदाहरण देऊन, मराठी माणूस कसा धंद्यात एकमेकांना मदत करत नाहीत किंवा एकमेकांचे पाय ओढून समोरच्याला पुढे जाण्य्ाापासून कसे अटकाव करतात, हे आपण ऐकलेलं आहे. पण याच खेकड्यांच्या दुनियेत एकमेकांना मदत करत व्यवसाय करणारी दर्शन, सागर, संकेत, पारिजात अशी मराठी माणसं पहिली की या जुन्या नकारात्मक विचाराला मराठी बाणा दाखवणारी पिढी जन्माला आली आहे याची खात्री पटते.