कालच वर्तमानपत्रात एक जुन्या आठवणी सांगणारा लेख वाचत होतो. साधारण पन्नास किंवा साठच्या दशकातील आठवणी फार सुबक मांडलेल्या लेखकानी. मुंबईच्या नातेवाईकांकडे उन्हाळ्यात जाणं वगैरे वर्णन करतांना आपोआपच गाडी त्यावेळच्या खाद्यसंस्कृतीकडे वळली. सहसा बाहेरचं आणून खाणं निषिद्ध असण्याच्या त्या काळात, लेखक व त्यांची भावंडे हट्ट करून पाच पैशाला मिळणारी कुल्फी खायचे. एक दिवस खेळून आल्यावर त्या गृहिणीने मुलांना घरी बनवलेली कुल्फी देऊन आश्चर्याचा धक्का दिला! हे गोड व थंडगार प्रकरण घरी पण बनविता येतं यावर मुळात विश्वास नसला तरी तो ठेवणं भाग पडलं व नंतर रोजच घरी कुल्फी बनू लागल्याची ती आठवण मलापण माझ्या लहानपणात घेऊन गेली.
हातगाडीवर वरून जाडसर कापड झाकलेल्या पत्र्याच्या डब्यात बर्फात असंख्य कुल्फ्या खोचलेल्या असायच्या. निमुळत्या होत गेलेल्या आयताकृती पत्र्याच्या कोनांमध्ये दूध व बांबूची काडी घातलेली कुल्फी मोठी व लहान दोन आकारांत मिळायची. स्वच्छतेचा बागुलबुवा नसलेल्या त्या काळात दुपारी कुल्फीच्या गाडीची घंटी वाजली की नकळत पाय बाहेर धावायचे! किंचित मिठाची चव उतरलेली ती गोडमिट्ट थंडगार कुल्फी स्वर्गसुख द्यायची हे नक्की. नंतरच्या काळात मग कुल्फी वजनावर मिळायला लागली, रात्री जेवणं वगैरे झाली की प्रफुल्ल स्टोअर्सच्या समोर भय्याच्या गाडीवर गर्दी व्हायची. पेट्रोमॅक्सच्या उजेडात, स्वच्छ पितळी तागड्यात तोलून पानावर मिळणारा कुल्फीचा काप म्हणजे निव्वळ परमानंद! साधी मलाई, आंबा, चिक्कू, पिस्ता, केशरपिस्ता वगैरे ठराविक स्वाद मिळायचे व सर्वात अप्रूप वाटायचं मिक्स कुल्फीचं! वजनावर एकत्र घेतलेली ती कुल्फी सर्वांनी वाटून खाल्ली की जास्ती गोड लागायची!
घरी फ्रीज आल्यावर सहाजिकच आमचे हात सळसळायचे घरी कुल्फी बनवायला! तसं अवघड नाही बरं कुल्फी बनवणं. दूध आटवून त्यात असेल तर खवा किंवा मिल्कमेड घालून दाटपणा वाढवायचा, आवडणार्या गोडीनुसार साखर व हवा तो स्वाद घालायचा. मिश्रण थंड झालं की फ्रीजरमध्ये साच्यांत किंवा घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवायचं. साधारण सहा-सात तासांनी कुल्फी जमलेली असते. फळांचे रस वगैरे टाकून आणखीन स्वाद वाढवता येतो किंवा मनसोक्त सुक्यामेव्याच्या वापरानी कुल्फी शाही बनवता येते. आपण सर्वांनीच वेगवेगळ्या ठिकाणी खाल्लेला व कधी ना कधी बनवलेला हा एक सर्वांचाच लाडका प्रकार!
चव तर भावतेच मनाला पण त्या जोडीला मला आवडते ती कुल्फीची खाणार्याला थंडावा देण्याची वृत्ती. फ्रीजमध्ये किंवा बर्फात राहून त्याचा थंडपणा अंगिकारून व स्वत:ला परिस्थितीनुरुप बदलून म्हणजे मूळच्या द्रवाला घट्ट करून घेऊन ही कुल्फी तो थंडावा दुसर्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच जन्मते जणू! अंगाची लाही लाही होत असताना जिभेवर पडण्यापूर्वीच नुसत्या कुल्फीच्या कल्पनेनीच जीव निवतो नाही का?
संसारतापात तापलेल्यांची तरी काही फार वेगळी नसते नं अवस्था? रामदास स्वामींनी मनाला पोहोचणार्या या संसारतापाच्या झळांना जाणले होते, म्हणूनच मनाच्या श्लोकांमध्ये सुरुवातीलाच ते सांगतात ‘मना सर्व लोकांसि रे निववावे’. हे निववणे म्हणजेच कुल्फीमुळे जसा घशाला थंडावा मिळतो नं, तसा आपल्या वागण्या बोलण्याने आजुबाजूच्यांना समाधान व शांतता देणे होय. बर्फाचा सहज सोसेल असा थंडावा जशी कुल्फी पुढे पोहोचवते, आपल्याला आध्यात्मिक वाटचालीत लाभलेली मन:शांती, समाधानी वृत्ती यथायोग्य देण्याचे काम अनेक अधिकारी व्यक्ती करतात बरं! म्हणूनच मग तो संतसंग हवाहवासा वाटतो व आपल्यालाही सुयोग्य दिशा देतो. मनांना गारवा देण्याच्या विषयात साक्षात करुणामूर्ती माताजी श्री सारदादेवींचा हात कोण हो धरू शकेल? पुत्रशोकाने व्याकूळ झालेल्या एका भक्तस्त्रीला माताजींनी रडून मन मोकळं तर करू दिलंच, पण नंतर स्वत:च्या हाताने तिची वेणीफणी करून तिला शांत केले. त्यांच्या केवळ दर्शनानीच मनातला क्षोभ नाहीसा होतो, तर मग त्या दैवी सहवासाची व स्पर्शाची काय कथा? तीच परंपरा अखंडित आजही पुढे सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येतोच की. श्री सारदा व श्री रामकृष्ण मठातील अनेक संन्यासी महाराज व माताजींच्या प्रेमळ सहवासाने, नुसत्या दर्शनाने, त्यांच्या उपदेशांनी व मुख्य म्हणजे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेनी कित्येक जळणारी मनं उजळली असतील याची गणतीच नाही. कालच्याच विविध नकारात्मक घटनांच्या पार्श्वभूमीवर आलेला राजेंद्र महाराजांचा नुसता मेसेजसुद्धा मनाला गारवा देऊन गेला माझ्या. जे आपल्याला मिळतेय ते पुढे देण्याची जबाबदारी नकळत वाढते नाही का वाढत्या वयाबरोबर, तुम्हाआम्हा सर्वांना कोणत्या ना कोणत्या रूपाने हा मनाला आधार लाभलेलाच असतो, घटका दोन घटका तरी त्या शीतल छायेत निवलेलं मन जर कायम तसंच शांत राहावं असं वाटत असेल नं, तर आपल्यालाही हा वसा पुढे चालविण्याखेरीज पर्याय नसतो. काय मिळालंय यापेक्षा माझ्या हातून काय घडलंय किंवा पुढे दिलं गेलंय हे पारडं जड झालं नं की नकळत तो थंडावा जास्ती टिकतो व गोडही लागतो. सर्वांमध्ये वाटून खाल्लेल्या कुल्फीसारखाच… थंडगार!!