आपल्याकडे चांगले पैसे असावेत, मोठा व्यवसाय उभा करून ते मिळवावेत, अशी स्वप्ने अनेकजण पाहत असतात. कोणत्याही गोष्टीचे स्वप्न पाहणे ही गोष्ट चांगली असली तरी कोणतीही शहानिशा न करता त्याचा पाठलाग करत त्यामध्ये वाहवत जाणे आणि स्वत:ची फसवणूक करणे हा प्रकार धोकादायक ठरणारा असतो. पण संपत्ती पैसा मिळवण्याच्या मोहाने झपाटलेली मंडळी ते मिळवण्यासाठी पुढचा मागचा विचार न करता पैशांची गुंतवणूक करण्याचा निर्णय डोळे झाकून घेत जातात आणि स्वत:ची सहजपणे फसवणूक करून घेतात. कानपूरमध्ये काम करणार्या चेतनच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता.
एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये चेतन मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम करत होता. अनेक कंपन्यांबरोबर त्याचा नियमितपणे संपर्क असायचा. त्यामुळे ईमेल, सोशल मीडिया याचा वापर तो चांगल्या प्रकारे करायचा. पाच वर्षांपासून त्याचे प्रमोशन झाले नव्हते, त्यामुळे `आपण नोकरीमधून बाहेर पडावे आणि स्वत:चा व्यवसाय करावा, असे विचार त्याच्या मनात येत असत. आपले नेटवर्क चांगले आहे, त्यामुळे त्याचा उपयोग करून आपण नवीन उद्योग सहजपणे उभा करू शकू, असा विश्वास त्याला वाटत होता. मनाशी पक्के करून आपण कोणता व्यवसाय सुरू करू शकतो, याचा शोध घेण्यास त्याने सुरुवात केली. स्पेन, जॉर्डन या ठिकाणी भारतात तयार होणार्या हर्बल तेलाला चांगली मागणी आहे, तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा आहे का? तुम्ही तो करू शकता आणि दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता, असा मेसेज असणारा मेल चेतनला आला. नवा व्यवसाय करण्याच्या शोधात असतानाच आलेल्या मेलमुळे त्याला भलताच आनंद झाला. मेलमध्ये स्पेनमधल्या एका कंपनीचे नाव नमूद करण्यात आले होते, त्याच्या खाली त्या कंपनीचा व्यवस्थापक जॉन मिलेट याचे नाव, ई मेल आणि फोन नंबर देण्यात आला होता.
चेतनने त्या मेलवर संपर्क साधला. मी हे तेल तुम्हाला पाठवल्यास मला किती नफा मिळेल, भारतात ते कुठे मिळते, हा व्यवसाय करण्यास मी इच्छुक आहे, अशा आशयाचा मेल मिलेट यांना त्याने पाठवला. त्यावर विविध दुर्मीळ औषधी वनस्पती वापरून तयार केलेले हे तेल इथे एक कोटी रुपये लिटर दराने विकले जाते, असे उत्तर आले आणि त्यात देहराडूनमध्ये युओ नावाचे एक उत्पादक आहेत, त्यांच्याकडे ते तेल ५० लाख रुपये लिटर दराने मिळते, असेही सांगण्यात आले. म्हणजे या व्यवसायात मिळणारा फायदा थेट १०० टक्के होता. मिलेटने चेतनला भारतातील त्यांच्या प्रतिनिधीचा तपशील पाठवला. चेतनने त्या नंबरवर फोन करून या हर्बल तेलाची चौकशी केली. पलीकडे कोणी सुरेश कुमार होता, तो म्हणाला, सर, तुम्ही वेळेत फोन केला आहे. आखातामधील एका देशातल्या हॉस्पिटलला ते तेल हवे आहे, तुम्ही त्याचा पुरवठा केला तर तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. तुम्हाला त्या हॉस्पिटलचा मेल देतो, तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क साधा, ऑर्डर मिळवा. तुम्हाला तेल देण्याचे काम मी करतो, माझे ऑफिस दिल्लीत आहे, असे सांगून सुरेशकुमारने फोन ठेवला.
चेतन भलताच खूष झाला. सुरेशकुमारने दिलेल्या मेलवर चेतनने तेलाची ऑर्डर मिळवण्यासाठी मेल पाठवला. त्यानंतर अवघ्या एका तासात आपल्याला एक लिटर तेल हवे आहे, आमची ऑर्डर पक्की आहे, अशा आशयाचा मेल चेतनला पाठवण्यात आला. दरम्यान, जॉन मिलेटनेही त्याला मेल पाठवून आखातामधील एका हॉस्पिटलला तेल हवे आहे, ती ऑर्डर तू पूर्ण कर, असा मेल चेतनला पाठवला. त्यामुळे आपल्याला मिळालेली ऑर्डर खरी आहे, अशी चेतनची खात्री झाली. त्याने लगेच सुरेशकुमारला फोन करून एक लिटर तेलाची ऑर्डर दिली. सुरेशकुमार त्याला म्हणाला, सर, या हर्बल तेलाचा सध्याचा एक लिटरचा दर ६८ लाख रुपये लिटर इतका आहे. विदेशात त्याची विक्री एक कोटी ७५ लाख रुपयांना होत आहे. तुमची ऑर्डर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला ५० लाख रुपये द्यावे लागतील. आणि हो, तुमचे तेल दोन कोटी रुपये लिटर दरानेही जाऊ शकते, फक्त ती हॉस्पिटल्स कोणती याची माहिती हवी असेल तर तुम्हाला दिल्लीमध्ये पवनकुमार नावाची व्यक्ती माहिती देऊ शकते. फक्त तुम्हाला त्याला कमिशन म्हणून काही रक्कम द्यावी लागेल. चालेल?’
लाखो रुपयांचा नफा डोळ्यांसमोर नाचत असलेल्या चेतनने सुरेशकुमारकडून पवनकुमारचा नंबर मिळवून त्याला फोन केला. पवनकडे आखातामधील हॉस्पिटलची माहिती मागितली. तो म्हणाला, सर, तुम्ही पाच लाख रुपये मी सांगतो त्या खात्यावर ती रक्कम भरा, मी लगेच तुम्हाला लिस्ट पाठवतो. चेतनने पवनकुमारने पाठवलेल्या खात्यामध्ये पाच लाख रुपये भरले. त्यानंतर अर्ध्या तासात त्याला मेलवर आखातामधील त्या दोन हॉस्पिटलची नावे आली, चेतनने त्यांना मेल पाठवून भारतात तयार होणार्या हर्बल तेलाचा मी पुरवठादार आहे, असे सांगून तुम्हाला काही तेल हवे आहे का? अशी विचारणा त्यांच्याकडे केली होती. त्यांनी देखील लगेच आम्हाला दोन लिटर तेलाची आवश्यकता आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला चार कोटी रुपये देऊ, फक्त तेल आम्हाला लवकर मिळेल असे नियोजन तुम्हाला करावे लागेल, असे उत्तर दिले. आपल्याला येणार्या तेलाच्या ऑर्डर वाढत आहेत असा विचार करून चेतन खूष झाला होता. आपण लवकरच करोडपती होणार असा विचार करून त्याने नोकरीचा राजीनामा दिला.
सुरेशकुमारने सांगितल्यानुसार ५० लाख रुपयांची रक्कम अॅडव्हान्स भरल्यावर एका आठवड्यात तेल मिळणार होते, राहिलेली रक्कम तेव्हाच त्याला द्यायची होती. मात्र, आता चेतनला तीन लिटर तेलाची ऑर्डर मिळाली असल्याने सुरेशकुमारने ९० लाख रुपये मागितले होते. चेतनने कंपनीतल्या अमित नावाच्या मित्राला या व्यवसायाची कल्पना दिली. तू काही रक्कम गुंतवलीस तर तुलाही चांगला फायदा मिळेल, तू देखील करोडपती बनशील, तुला नोकरी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असं त्याला पटवलं. अमित भाळला आणि त्याने ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. आठवडाभरात इकडून तिकडून त्याने ती रक्कम जमा केली आणि चेतनने सुरेशकुमारला एक कोटी रुपयांचा अॅडव्हान्स पाठवला.
एक आठवड्याने तेल तयार झाले का? याची विचारणा करण्यासाठी चेतनने सुरेशकुमारला फोन केला, तेव्हा काही तातडीचे काम आल्यामुळे अजून तेल तयार केले नसल्याचे सांगून पुढच्या दोन दिवसांत ते काम पूर्ण करतो, असे सांगून त्याने फोन ठेवला. दोन दिवसांनी चेतनने पुन्हा सुरेशकुमारला फोन करून तेल तयार झाले का? अशी विचारणा केली. त्यावर पुन्हा एकदा ‘नाही’ असे उत्तर त्याला मिळाले. त्यावर भडकलेल्या चेतनने सुरेशकुमारला कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले. तुला शक्य नसेल तर मी दिलेले पैसे परत कर, असं त्याने सांगितल्यावर सुरेशकुमारने पाच दिवसांत तुम्हाला तीन लिटर तेल तयार करून देतो असे सांगितले. तुम्ही डिलिव्हरी घेण्यासाठी दिल्लीचे तिकीट बुक केलेत तरी चालेल, असेही सांगितले.
आठवड्याअखेरीस चेतन आणि अमित दोघेजण तेलाची डिलिव्हरी घेण्यासाठी दिल्लीतल्या पत्त्यावर जाऊन पोहचले, तेव्हा तिथे कोणी विशाल भेटला. सुरेश कुमार मुंबईला गेले आहेत असे त्याने सांगितल्यावर चेतनने सुरेशकुमारला फोन केला, तेव्हा मला तातडीने मुंबईला यावे लागले आहे, तुम्ही इकडे या माझा इथे दोन दिवस मुक्काम आहे, असे सुरेशकुमारने त्याला सांगितले.
चेतन ज्या ठिकाणी गेला होता, ते दुकान अवघ्या १० बाय ८ इतक्या जागेत होते. त्यामुळे चेतनच्या मनात या सगळ्या प्रकाराबद्दल संशयाची सुई आली होती. पण दुसरीकडे सुरेशकुमार चेतनबरोबर कायम फोनद्वारे संपर्कात असल्यामुळे आपल्याला तेल मिळणार आहे, असा भोळा विश्वास त्याच्या मनात होता. आपल्याकडे ऑर्डर खूप वाढल्या आहेत, त्यामुळे तेल द्यायला वेळ लागत असल्याचे सुरेशकुमारने चेतनला कळवले होते.
सुरेशकुमार कसा दिसतो, हे चेतनला माहित नव्हते. य दोघांमध्ये सुरू असणारे संभाषण फोनद्वारे आणि ई मेलच्या माध्यमातून सुरू होते. दरम्यान, आखातामधील त्या हॉस्पिटलने चेतनला ई मेल पाठवून तुम्ही तेल कधी पाठवणार आहात, आम्हाला त्याची तातडीने आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यानंतर मिलेटने मेल करून चेतनला ऑर्डर लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. तेव्हा चेतनने काही मुदतवाढ मिळू शकते का? अशी विचारणा मिलेट याच्याकडे केली, त्यावर तुझी ऑर्डर पक्की आहे, फक्त तू ती लवकर पूर्ण कर, आता या विषयावर पुन्हा चर्चा करू नकोस, असे मिलेटने त्याला कळवले. हॉस्पिटल आणि मिलेट या दोघांनी त्याला पुन्हा या विषयावर चर्चा न करता काम पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. चेतन सुरेशकुमारच्या संपर्कात होता, पण काही केल्या त्याला ते तेल मिळत नव्हते.
दरम्यान, चेतनला त्याचा जुना मित्र सुधाकर भेटला. दोन वर्षांपूर्वी त्याने कोकणातील काजूवर प्रक्रिया करून ते आप्रिâकेत विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. पण तो प्रकार पूर्ण फसवणुकीचा होता, त्यामध्ये देखील चार कोटी रुपयांचा नफा मिळणार असल्याच्या अमिषाला सुधाकर बळी पडला होता. चेतनने त्याला आपल्याशी घडलेला प्रकार सांगितला तेव्हा, सुधाकरने तुझी एक कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याचे त्याला सांगितले.
सुधाकरने चेतनच्या डोळ्यात अंजन घालून त्याला वेळीच जागे केले. दरम्यान, सुरेशकुमारने चेतनला फोन करून तुमची
ऑर्डर पूर्ण करायची असेल तर ५० लाख रुपये लगेच द्या, तरच हे काम पूर्ण होईल असे सांगितले. तोवर चेतनने तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा पोलिसांनी त्याला हा सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे असे सांगून त्याची नोंद करण्याचा सल्ला दिला. चेतनकडे या सगळ्या प्रकारामध्ये व्यवहार करताना कागदपत्रे नव्हती, ई मेल, फोन याच्यावर विश्वास ठेवून तो या सगळ्या प्रकारामध्ये गुंतला होता. यामध्ये चेतनने ज्या ई मेलवर संपर्क साधला होता, ती सर्व खाती नायजेरियामधून चालवण्यात येत असल्याचे समोर आले होते.
सुरेशकुमार नावाची व्यक्ती ज्या फोनवरून चेतनशी बोलत होती, तो मोबाइल नंबर झारखंडमधील एका शेतकर्याच्या नावावर होता. तो फोन वापरणारा व्यक्ती भलताच होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन बंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. चेतनने ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले होते, ती खाती नोयडामधल्या एका बँकेतली होती. चेतन याने ज्या ई मेलवर संपर्क साधला होता, ज्या मोबाइलवर त्याचे बोलणे व्हायचे, बँक खाते, आयपी अॅड्रेस या चारही गोष्टींचा काहीच ताळमेळ लागत नव्हता. या सगळ्या प्रकारामध्ये नायजेरियन टोळीने चेतनची फसवणूक केली होती. व्यवसाय करण्याच्या नादात चेतन चांगली नोकरी आणि त्याच्या जोडीला एक कोटी रुपये घालवून बसला. अर्धवट ज्ञान आणि पैशाच्या मोहातून हा सगळा प्रकार घडला होता.
हे लक्षात ठेवा
– आपल्याला आलेला ई मेल खरा आहे का, याची कायम खात्री करा. त्यासाठी फुल हेडरची तपासणी करा. ई मेलवर देण्यात आलेल्या माहितीवर विश्वास ठेवून कोणतेही धाडसी पाऊल उचलू नका.
– व्यवसायाच्या संदर्भात कोणता निर्णय घ्यायचा असेल तर त्याची कागदपत्रे, लिखापढी याची शहानिशा करा. आपण मेलवर समोरच्या व्यक्तीबरोबर बोलत आहोत, ती खरी आहे का, याची खात्री करून नंतरच पुढचे व्यवहार करा.
– व्यवसायाच्या बाबतीत सर्व कायदेशीर तपासणी केल्यानंतरच पुढचे निर्णय घ्या, म्हणजे फसवणूक होणार नाही.