उषा बाळकृष्ण मराठे, अगदी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील साधीसुधी मुलगी. ही पुढील जीवनात मराठी, हिंदी आणि इतर भाषांतील चित्रपटात एक अग्रगण्य अभिनेत्री होईल असं भविष्य कुणीही वर्तवलं असतं, तर लोकांनी ती व्यक्ती काहीच्या काहीच बोलते आहे, असंच म्हटलं असतं. इतकंच काय, प्रत्यक्ष उषाला जरी कुणी हे सांगितलं असतं, तरी तिनेही या गोष्टी हसूनच दुर्लक्षित केल्या असत्या. कारण स्वत: तिलाच नाटक, सिनेमा या गोष्टीविषयी मुळातच प्रेम नव्हतं. तिचा कल अभ्यासात अधिक होता. पण विधात्यानेच तिच्या भाळी ‘तू नामवंत अभिनेत्रीच होणार आहेस’ हे लिहूनच ठेवलेले असेल, तर त्यापुढे कोणाचे काय चालणार? पण घडलं ते उत्तमच घडलं. आम्हा सर्व रसिकांना उषा मराठे उर्फ उषा किरण यांचे अभिनय दर्शन चार-पाच दशकाहूनही अधिक काळ रुपेरी पडद्यावर घडलं.
उषा मराठे यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी वसईत झाला. पाच बहिणींपैकी ही दुसर्या क्रमांकाची मुलगी. पिता बाळकृष्ण विष्णू मराठे आणि माता राधाबाई बाळकृष्ण मराठे. उषाची मोठी बहीण लीला मराठे. बाळकृष्ण विष्णू उर्फ बापूसाहेब मराठे यांना नाटक सिनेमाची आवड होती. आपल्या मुलींनी रंगमंचावर काम करावं आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारून नाव कमवावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी उषाला आणि तिच्या मोठ्या बहिणीला कथक नृत्य शिकण्यासाठी प्रवृत्त केलं. केवळ वडिलांची इच्छा म्हणूनच उषाने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी नृत्याचे पैंजण पायी बांधले. वडिलांनी उषाला नाटककार, दिग्दर्शक मो ग. रांगणेकर यांच्या कंपनीत नाटकात काम करण्यासाठी पाठवलं. `आशीर्वाद’ या नाटकात तिला छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर `कुबेर’ या चित्रपटातही मो. ग. रांगणेकरांनी उषाला छोटीशी भूमिका दिली आणि तिला रुपेरी पडद्यावर येण्याची संधी प्राप्त झाली. त्यानंतर पुढील काळात उषा मराठे यांनी पन्नासहून अधिक मराठी, हिंदी, गुजराथी अशा विविध भाषांमधील चित्रपटामधून कामे करून यशस्वी कारकीर्द सिद्ध केली.
जागतिक प्रख्यात नृत्य दिग्दर्शक उदय शंकर यांच्या नृत्यशाळेत त्यांनी विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेतला आणि नृत्यकलेची आराधना सुरू केला. उदय शंकर यांनी १९४८मध्ये स्वत:ची चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या `कल्पना’ या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रारंभ केला याचे चित्रीकरण चेन्नई येथे सुरू झाले. नृत्याच्या वर्गातील विद्यार्थिनी उषा मराठे हिचे कलागुण हेरून त्यांनी तिला या चित्रपटात काम करण्यासाठी आपणहून पाचारण केलं. काही भागाचे चित्रीकरणही झालं. पण कुठं माशी शिंकली कोण जाणे. त्यांचे आणि उषाचे मतभेद झाले आणि त्यांनी तिला पुढील चित्रीकरणातून वगळलं. उषा मराठे पुन्हा मुंबईत परत आल्या. पण `कल्पना’ या चित्रपटात त्यांनी दिलेले शॉट्स तसेच ठेवले गेले आणि म्हणूनच `कल्पना’ या हिंदी चित्रपटामधूनच उषा मराठे यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं असं म्हणण्यास हरकत नाही. पण या चित्रपटामधून पदार्पणाव्यतिरिक्त काहीही लाभ झाला नाही.
उषा मराठे यांचे वडील कलाप्रेमी, धाडसी आणि चाकोरीबद्ध नोकरी न करण्याच्या वृत्तीचे होते. त्यांनी धाडसी निर्णय घेऊन नोकरी सोडली आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आपल्या कन्येला नाव मिळावं, तिच्या अभिनयाला संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी स्वत:च चित्रपटनिर्मिती करण्याचा बेत केला, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला. संसाराची आर्थिक स्थिती बिकट होत चालली. योग्य वयात लग्न करावे, संसाराला आर्थिक हातभार लागावा, यासाठी उषाला चित्रपटांमधून भूमिका करणे गरजेचं वाटू लागलं. त्यासाठी तिनं मराठीबरोबर इंग्रजी, हिंदी, बंगाली, तेलगू, गुजराथी इत्यादी विविध भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान ‘सीतास्वयंवर’ (१९४८) मराठी या चित्रपटात तिला छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर आलेल्या `मायाबाजार’ (१९४९) या मराठी चित्रपटात त्यांना छोटीशी पण महत्त्वाची भूमिका मिळाली. श्रीकृष्णाच्या (शाहू मोडक) पत्नीची, रुक्मिणीची ही व्यक्तिरेखा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात त्यांचेवर एक अप्रतिम गीत चित्रित झाले.
विझले रत्नदीप नगरात
आता जागे व्हा यदूनाथ।।
अंधारातून प्रकाश निवळे
हलके हलके पूर्वी उजळे
दवबिंदूचे मोती झाले
पर्णांच्या तबकात
आता जागे व्हा यदुनाथ।।
उषा मराठे खर्या अर्थाने रुपेरी पडद्यावर उजळल्या!
या गीताची जन्मकथाही विलक्षण आहे. ग. दि. माडगुळकर आणि त्यांचे समवेत असलली मंडळी रात्रभर नाईट शूटिंग करून पुण्याच्या प्रभात रस्त्यावरून पेंगुळलेल्या अवस्थेत घरी परतत होती. नुकताच सूर्योदय होऊ पहात होता आणि रस्त्यावरचे म्युनिसिपाल्टीचे दिवे विझत होते आणि कवीरायांची प्रतिभा जागृत झाली. मुखातून शब्द उमटले,
जागी झाली सुवर्णनगरी
अरुणासह ये उषा सुंदरी
सोन्याची नव प्रभा पसरली
सोन्याच्या दारात
आता जागे व्हा यदुनाथ।।
असे काही विलक्षण सुखद योगायोग असतात. कुणाची भाग्यरेषा कधी, कशी उमटेल हे सांगता येत नाही. उषा मराठे यांच्याबाबतही ‘सोन्याची नव प्रभा उमटली’ असेच म्हणावे लागेल.
उषा मराठे यांनी आपली दृष्टी केवळ मराठीपुरतीच मर्यादित ठेवली नव्हती. `कल्पना’च्या वेळचा कडू घोट गिळून त्या हिंदीकडे वळण्याचा प्रयत्न करीत होत्या आणि तशी संधी त्यांना चालून आली. अमिया चक्रवर्ती यांनी तिला आपल्या `गौना’ (१९५०) या चित्रटासाठी प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले. त्यानंतर त्यांनीच तिला त्यांच्या नवीन चित्रपटात शशिकलाच्या आईच्या भूमिकेसाठी पाचारण केले. त्यावेळी उषा मराठे यांचे वय होतं केवळ बावीस वर्षे! पण घर चालविण्यासाठी पैशाची अत्यंत निकड होती. मिळालेल्या पैशातून तिनं आपल्या बहिणीचे लग्न लावून दिलं. पण या चित्रपटाने तिचं नशीब फळफळलं आणि तिच्याकडे एकामागून एक असे हिंदी, मराठी, गुजराथी चित्रपट येऊ लागले. ‘श्रीकृष्ण दर्शन’ (१९५०) या चित्रपटानंतर तिने आपलं नवीन नामकरण केलं. `उषा मराठे’च्या आता `उषा किरण’ झाल्या. आज त्यांचे हजारो चाहते आणि चित्रपटसृष्टी त्यांना उषा किरण या नावानेच ओळखते.
उषा किरण यांचा `पतिता’ (१९५३) हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटात त्यांनी देव आनंदबरोबर काम केलं आहे. त्याबरोबर `दुष्मन’ आणि `बादबान’ हेही चित्रपट यशस्वी ठरले. उषा किरण यांना `बादबान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी १९५४ साली उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला.
कलावंतांची `कला’ बघावी, त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये. मिठाई खावी मिठाईचा कारखाना बघू नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. पण काही कलाकार त्याला अपवाद असतात. उषा किरण यांची `प्रेमकहाणी’ अशीच विलक्षण आहे. ती सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण नाजूक क्षणी त्यांनी घेतलेला ठाम निर्णय. उषा किरण आणि अमिया चक्रवर्ती यांचे संबंध केवळ कलाकार म्हणून राहिले नाहीत. तर त्यांच्यात प्रेमभावाचे रेशीम धागे गुंफले गेले. अमिया चक्रवर्ती उषा किरण यांच्यापेक्षा आठ-दहा वर्षांनी मोठे, शिवाय विवाहित. पत्नीला घटस्फोट देऊन ते उषा किरणबरोबर लग्नबंधनात अडकण्यास तयार झाले. हे वृत्त कर्णोपकर्णी अमिया चक्रवर्ती यांच्या पत्नीच्या कानावर गेले. त्यांनी उषा किरण यांची भेट घेतली आणि आपण आनंदाने माझे पतीबरोबर विवाह करा, सुखानं संसार करा, मी आपल्या मार्गातून स्वखुषीने दूर होते, असे सांगितले. हे त्यांचे बोलणं कानी पडताच उषा किरण चमकल्या. एका स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करून मी माझा संसार उभा करू? छे छे, हे अन्यायकारक आहे. एका स्त्रीनेच दुसर्या स्त्रीवर अन्याय करायचा. अत्यंत वाईट आहे हे! उषा किरण यांनी अमिया चक्रवर्ती यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय रहित केला. काही काळानंतर त्यांचा विवाह सायन हॉस्पिटलचे डीन डॉ. मनोहर खरे यांच्याशी झाला.
कोणताही आडपडदा न ठेवता घडलेली सत्यकथा उषा किरण यांनी त्यांना सांगितली आणि हे सर्व वृत्त जाणूनही डॉ. खरे यांनी त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. अमिया चक्रवर्ती यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी त्यांनी उषा किरण यांना मज्जाव केला नाही. ही सारीच कहाणी `जगावेगळी’ म्हणून येथे लिहिली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व मातब्बर कलाकारांबरोबर भूमिका करण्याचं भाग्य उषा किरण यांना लाभलं. याचं कारण त्या तितक्याच ताकदीच्या, तयारीच्या आणि पराकोटीचे प्रयत्न करण्याच्या मनोवृत्तीच्या होत्या. नवीन शिकण्याची ओढ, आणि त्यासाठी वाचन, मनन, चिंतन, अवलोकन, निरीक्षण आणि प्रत्यक्ष भूमिकेतून त्याचे सादरीकरण असे अनेक गुण त्यांच्या ठायी एकवटलेले होते. `चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे’ हे बोल उषा किरण यांच्याविषयी अगदी यथार्थ आहेत. `पतिता’ मध्ये (१९५३) देव आनंद, `दाग’मध्ये (१९५२) दिलीपकुमार, ‘काबुलीवाला’ मध्ये (१९६१) बलराज सहानी, ‘नजराना’मध्ये (१९६१) राज कपूर त्यानंतर किशोरकुमार, अशोककुमार, राजेंद्रकुमार, राजेश खन्ना, धमेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासमवेत त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयसामर्थ्यावर खंबीरपणे यशस्वी कारकीर्द करणार्या ज्या स्त्री कलाकार आहेत त्यात उषा किरण यांचे नाव घेतलं गेलंच पाहिजे. त्यांच्या हिंदी भाषेतील यशस्वी कारकीर्दीविषयी सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी वेगळ्या स्वतंत्र लिखाणाची आवश्यकता आहे.
हिंदी सिनेमासृष्टीत पैसा, प्रसिद्धी जरी प्रचंड मिळत असली तरी उषा किरण यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही तितक्याच तन्मयतेनं योगदान दिलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत `कुबेर’ या चित्रपटातून त्यांची कारकीर्द सुरू झाली होती. पुढील काळात त्यांनी ‘सीता स्वयंवर’, ‘मायाबाजार’, ‘वासुदेव बळवंत’, ‘मर्द मराठा’, ‘पुनवेची रात’, ‘बाळा जो जो रे’, ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’, ‘शिकलेली बायको’, ‘कन्यादान’, ‘दूधभात’, ‘माझा राम’, ‘चाळीतले शेजारी’, ‘कांचनगंगा’, ‘पोटातील मुलगी’, ‘गरिबाघरची लेक’, ‘सप्तपदी’, ‘सूनबाई’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आणि रसिक प्रेक्षकांनी त्या आवडीनं स्वीकारल्या. उषा किरण यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकाच टाईपच्या साचेबंद भूमिका केल्या नाहीत. पौराणिक, सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक चित्रपटामधून त्यांनी ज्या विविध छटांच्या विविध ढगांच्या, विविध वयाच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आणि म्हणूनच त्या उत्कृष्ट अभिनेत्री या पदावर पोहचल्या.
सुरुवातीच्या उमेदवारच्या काळात ‘ही कोण काकूबाई आणलीय धरून या कामासाठी’ असं काही कुत्सित स्वभावाची माणस्ां त्यांच्याविषयी टिंगलटवाळीच्या शब्दात बोलायची. त्यांच्या या जहरी टीकेकडे अजिबात लक्ष न देता आणि मिळालेल्या भूमिकेचे आपण सोनंच करायचं या इर्षेने त्या आपल्या भूमिका वठवतच राहिल्या. टीकाकारांची तोडं आपोआपच बंद झाली. त्यांच्या विविध स्वरुपांच्या भूमिकाची मनावर आजही छाप आहे. `मायाबाजार’मधील रुक्मिणी, ‘जशास तसे’मधील डोंबारीण, ‘पुनवेची रात’मधील तमासगिरीण, ‘बाळा जो जो रे’मधील सात्विक, सोज्वळ, सहनशील स्त्री, ‘शिकलेली बायको’मधील सुशिक्षित स्त्री, ‘कन्यादान’मधील विधवा, ‘पोस्टातील मुलगी’मधील आपल्या परिवारासाठी नकळत गुन्ह्यात सापडलेली कुमारिका… किती किती प्रकारच्या या वैविध्यपूर्ण भूमिका!
‘गुणी गुणं वेती’ (गुणी माणूसच दुसर्याच्या गुणांची कदर करू शकतो) या वचनाप्रमाणे उषा किरण यांच्यासाठी लेखक, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक हे चित्रपटमाध्यमाची उत्तम जाण असणारेही एक से एक असामी त्याकाळी चित्रपटक्षेत्राशी संबंधित होत्या. त्यामुळेच उत्तम टीम तयार होऊन तयार झालेले चित्रपट गुणात्मक आणि रंजनात्मक असे निर्माण झाले. उषा किरण यांचे बोलके डोळे, देहबोली, सहज सुंदर हालचाली, स्वाभाविक स्वरूपाचा अभिनय आणि भूमिकेत समरस होण्याची क्षमता या आणि अशा दुर्मिळ गुणामुळेच चित्रपटसृष्टीत त्या आपला स्वतंत्र ठसा उमटवू शकल्या.
`जशात तसे’मधील डोंबारीण दोरीवर हेलकावे घेणारी, ‘चिंचा आल्यात पाडाला’, ‘हात नगं लावूस माझ्या झाडाला’, ‘मोठं मोठं डोळं तुझं’, ‘हरि तुझी कमळी चतुराई’ आणि अखेर सुडाने पेटलेली आणि हुकूमाची राणी ‘माझी हो, राया मी डाव जिंकला’ असं म्हणत एकाक्षणी समोरच्या खलनायकावर सुरा उगारणारी, अखेर ‘रानपाखरा दो दिवसांची दुनियेची संगत, आज इथे तर उद्या तिथं’ असे मुक्तपणे आपला जथा घेऊन दुसर्या मुक्कामावर निघालेली डोंबारीण! उषा किरण यांनी या भूमिकेत आपला प्राण ओतला आहे.
`बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे’ अशी अंगाई गात आपल्या बाळाला गाई गाई करायला सांगणारी वत्सला माता, ‘हले हले डुले हले डुले, पाण्यावरी नाव पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव’ असं प्रेमगीत गात नौकाविहार करणारी अल्लड कॉलेजकुमारी किती वेगवेगळे अविष्कार! ‘ते माझे घर, ते माझे घर, जगावेगळे असेल सुंदर असं गात संसाराची सुखस्वप्ने रंगविणारी कुमारिका, ‘आली हासत पहिली रात’ असं म्हणणारी प्रणयोत्सुक नवविवाहिता (शिकलेली बायको) आणि ‘कोकिळ कुहू कुहू बोले’ असं गाणारी ‘कन्यादान’मधली नवविवाहिता… किती किती वेगवेगळ्या कथानकांचे चित्रपट आणि किती किती विविधरंगी भूमिका…
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटातील उषा किरण यांच्या भूमिकेत असलेली ‘देखो आया है कैसा जमाना’, ‘क्या जाने उल्फत’, ‘किसीने अपना बनाके मुझको’’ अशी कित्येक गीते रसिकांच्या ओठावर आजही आहेत. अशी ही गुणी अभिनेत्री! सदैव चिरयौवना!
उषा किरण यांनी १९५४ मध्ये डॉ. खरे यांच्याशी विवाह केल्यानंतर काही वर्षे म्हणजे ६०-६१पर्यंत चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा त्या या क्षेत्राकडे वळल्या आणि अनेकानेक हिंदी मराठी चित्रपटात उत्तम भूमिका करून पुनरागमन यशस्वी करून दाखविले. त्यानंतर चित्रपटसृष्टीमधून अखेर अत्यंत समाधानाने त्यांनी निवृत्ती स्वीकारली आणि समाजकार्याला वाहून घेतले. त्यातील आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांना १९९६-९७मध्ये मुंबई नगरीची लोकपाल (शेरीफ) होण्याची संधी त्यांना मिळाली. `कन्यादान’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळालाच होता. `उष:काल’ हे आत्मकथनपर पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे. त्यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघंही कलाक्षेत्राशी निगडित आहेत आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहेत.
मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. उषा किरण यांना कर्करोगाने गाठलं आणि त्यातच त्यांचे ९ मार्च २००० रोजी नाशिक येथे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले. कलाजीवन आणि संसार यांचा सुरेख मेळ उषा किरण यांनी साधला. प्रारंभी आवड नसूनही त्यांनी वडिलांच्या आग्रहामुळं प्रपंचाला आर्थिक मदत मिळावी या हेतूनं या बेभरवशाच्या कलाजीवनाचा मार्ग स्वीकारला आणि एकदा तो स्वीकारल्यानंतर आपल्या तपश्चर्येने तो ‘यशस्वी तुझा कलामार्गी प्रवास’ करून दाखविला. उषा मराठे ते उषा किरण असा दीर्घ प्रवास. त्या प्रवाशाने त्या रसिकप्रिय अभिनेत्री सिद्ध झाल्याच, पण पुढील अनेक पिढ्यांच्या हृदयसिंहासनावर अभिनय सामर्थ्यामुळे विराजमान झाल्या याचा प्रत्येक कलासाधकाला आनंद, अभिमान आणि आदर्श वाटला पाहिजे.