पूर्वीच्या काळी शून्यातून विश्व निर्माण करायला उभी हयात घालवायला लागायची, पण स्टार्टअप सुरू करणारी मुलं आज एका वर्षात शून्यातून विश्व निर्माण करताना दिसतात. यासाठी गरज असते ती नवीन कल्पनेची. लोकांच्या गरजा रोज बदलत आहेत त्याचा अभ्यास करून जर त्यावर उपाय शोधलात तर व्यवसायाच्या शर्यतीत जुने शूज क्लिन करून देखील जिंकता येतं, त्यासाठी नवीन शूज विकत घ्यायची गरज नसते हे संदीप गजाकस या मराठी तरुणाने सिद्ध केलं आहे.
– – –
नोकरीच्या इंटरव्ह्यूचा दिवस… तुमचे मार्क्स चांगले आहेत, तुम्ही छान बोलणारे आहात; आजच्या दिवसासाठी केलेला तुमचा पेहराव आकर्षक आहे, पण तुमचे शूज मळलेले असतील तर मुलाखत घेणार्याच्या चेहर्यावर नाराजीचे भाव उमटू शकतात. कपड्यांच्या बाबतीत आपण जितके सजग असतो, तितके पादत्राणांच्या बाबतीत नसतो. हेच ओळखून शूज लाँड्री ही अनोखी संकल्पना भारतात सुरू करून जगभर नेणार्या मुलाची ही गोष्ट आहे.
जगातील सर्वात जास्त शोध अमेरिकेत लागतात. दहापैकी आठ स्टार्टअप तिथेच तयार होतात. बाकी जग त्यांना कॉपी करतं. पण यालाही काही अपवाद असतात, संदीप गजाकस हे त्याच बोलकं उदाहरण. तो सांगतो, माझं बालपण मुंबईतील अंधेरीत गेलं. आम्ही तीन भाऊ. मी सात वर्षांचा असताना आई वारली. मी तिसरी ते आठवी पाचगणीला संजीवन विद्यालय या बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. शाळेत मी सर्व खेळांत पुढे असायचो. नॅशनल लेवलला फुटबॉल खेळलो आहे. बोर्डिंग स्कूलमध्ये स्वच्छता आणि डिसिप्लिन पाळलं जातं. मातीत, चिखलात खेळून आल्यावर आमचे कपडे आणि शूज खराब होणं स्वाभाविक होतं. खेळून आल्यावर शूज, सॉक्स धुवून, ते मेट्रनला दाखवून मगच डिनरला जायचं, असा नियम होता. त्यामुळे स्वच्छतेची सवय अंगवळणी पडत गेली. मी शाळेमध्ये एनसीसी (नेव्ही) घेतलं होतं. रायफल शूटिंगच्या वेळी सफेद युनिफॉर्मवर डाग पडायचे, ते स्वच्छ करणं हा मोठा टास्क असायचा. पण इतरांपेक्षा माझा युनिफॉर्म कसा छान दिसेल, याची काळजी घेणं मला आवडायचं. शिक्षक क्लासमधे माझ्या नीटनेटकेपणाचे कौतुक करायचे, तेव्हा जास्त आनंद व्हायचा. टापटीप राहण्याचा वारसा मला बाबांकडून मिळाले. ते एअर इंडियात केबिन क्रू होते. कडक इस्त्रीचा सफेद युनिफॉर्म आणि चेहर्याचं प्रतिबिंब दिसेल असे पॉलिश केलेले शूज असा त्यांचा कामावरचा पेहराव असायचा. बाबा युनिफॉर्मच्या बाबतीत फार ‘पजेसिव्ह’ होते. स्वतःच्या हाताने युनिफॉर्म धुवून एकही सुरकुती दिसणार नाही, अशी कडक इस्त्री करणे, शूजना चकचकीत पॉलिश करणे हे ते त्यांच्या कामाचा भाग समजत. त्यांना पाहून मीही त्याच दिशेने मार्गक्रमण करू लागलो. ‘एव्हरीथिंग शुड बी परफेक्ट’ या हव्यासातून स्वच्छतेची अति आवड (ओसीडी) निर्माण झाली.
घरात सगळ्यांना स्वतःची कामं स्वतः करण्यासोबतच कोणतीही वस्तू बिघडली तर त्या वस्तूंचे रिपेरिंग घरातच करून पाहायची आवड होती. परदेशातून येताना बाबा वेगवेगळी टूल्स घेऊन यायचे. शाळेच्या सुट्टीत त्या अवजारांनी मी नळदुरुस्ती, मिक्सर, प्रिâज उघडून दुरुस्त करणे यात माहीर झालो होतो. कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस, ती बिघडेल, अशी भीती बाबांनी कधीही घातली नाही. उलट ते म्हणायचे, ‘‘वस्तू खराब झाली तरी चालेल, तू प्रयत्न सोडू नकोस.‘‘
दहावी पास झाल्यावर मी विलेपार्ल्यातील मिठीबाई कॉलेजला प्रवेश घेतला. जुहू, बांद्रामधील उच्चभ्रू मुलं इथे शिकायला होती, म्हणून येथील वातावरण थोडं हाय फाय होतं. पण, शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झाल्यामुळे या कॉलेजमध्ये मी चटकन रुळलो. शाळेप्रमाणे कॉलेजमध्ये देखील सर्व स्पर्धांत मी भाग घ्यायचो आणि नंबर मिळवायचो. घरात इंग्रजी, हिंदी आणि मराठी गाणी ऐकली जात असत. पुढे वय वाढत गेलं तसं जॅझ, लॅटिन म्युझिक अशा जागतिक संगीताची आवड माझ्यात निर्माण झाली. या सांगीतिक विविधतेचा फायदा मला कॉलेजमधील फॅशन शो कोरिओग्राफ करताना झाला. अनेक इंटर कॉलेज स्पर्धा जिंकल्यावर, नॅशनल लेवलला फॅशन शो कोरिओग्राफरचं पहिलं पारितोषिक मिळालं, तेव्हा मला कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी फॅशन शो कोरिओग्राफ करायला मिळू लागले. त्या काळात एका इव्हेंटचे मला पंधरा ते वीस हजार रुपये मिळायचे. पण त्यात काही नावीन्य नसल्यानं मला हे करीयर मान्य नव्हतं. मी हे शो हौस म्हणूनच करायचो.
आमचा ग्रुप म्हणजे छान फॅशन आवडणारा, टिपटॉप राहणारा, फरक इतकाच की, मित्रांचे घरून निघताना घातलेले कपडे आणि शूज रस्त्यावरच्या धुळीने माखलेले असायचे. कारण नव्वदच्या दशकात मुंबईच्या रस्त्यांवर सरकारी कामांसाठी खड्डे खोदणं सुरूच असायचं. मुंबईच्या रस्त्यांसाठी त्यावेळी एक शेर म्हटला जायचा, ‘यहां खुदा है। वहां खुदा है। जहां खुदा नहीं, वहां कल खुदेगा।’ यामुळे मित्रांचे नवीन शूज काही दिवसांत म्हातारे व्हायचे, तर माझे शूज मात्र तरुण दिसायचे. माझ्या शूजबद्दल मित्रांना नेहमी आकर्षण असायचं. ते म्हणायचे, ‘तू रोज नवीन शूज आणतोस तरी कुठून?’ त्यावर मी सांगायचो, ‘बाबा रे, माझे शूज दोन वर्षे जुने आहेत!’ पण त्यांचा विश्वासच बसायचा नाही. मी शूज रोज आतून बाहेरून स्वच्छ करायचो, हे त्यांच्या आकर्षकतेचं कारण होतं.
एके दिवशी गम्मत झाली. पावसाळ्याचे दिवस होते, एका जवळच्या मित्राचे त्याच दिवशी विकत घेतलेले शूज चिखलाने माखले. घरी बाबा ओरडतील याची मित्राला चिंता वाटत होती. मी त्याचे शूज क्लीन करून दिले. चमकते शूज बघून तो सॉल्लिड खुश झाला आणि मला पावभाजी खिलवली. त्याचं पाहून इतरही काही मित्र मला शूज क्लीन करून देण्याची गळ घालायचे आणि त्या बदल्यात मला पार्टी द्यायचे. हे सर्व मैत्रीखात्यात सुरु होतं.
मी मित्रांचे घाण शूज पाहून म्हणायचो, ‘तुमच्यासारख्या रईसजाद्यांचे शूज धुवायला कुणीतरी शूज धुवायची कंपनी सुरू करायला हवी’. मला वाटतं तेव्हा गंमत म्हणून उच्चारलेल्या वाक्याने पुढे जाऊन मला माझ्या व्यवसायाची दिशा दाखवली.
कॉलेजच्या सुटीमधे मी जिवलग मित्र सिमरजीत सिंग यांच्या ऑफिसमध्ये जायचो. त्यांच्याकडे कॅरियर कंपनीच्या एअर कंडिशनरची डीलरशिप होती. तिथे मी विक्री, लोकांच्या घरी नवीन एसी फिट करणे, एसी लोडिंग, अनलोडिंग ही सगळी काम करायचो. कोणतंही काम करताना लाज वाटता कामा नये हे मी इथे शिकलो. कॉलेजात प्रत्येक जण आपापली स्वप्नं बोलून दाखवायचे, काहींना चांगली नोकरी हवी होती, तर काहींना फॉरेनला जायचं होतं; पण मी मात्र, जे आजवर कुणी केलं नाही, असं काहीतरी जगावेगळं काम मला करायचं आहे असं सांगायचो. म्हणजे नक्की काय हे सांगता यायचं नाही. बीएससी फिजिक्सच्या शेवटच्या वर्षाला असताना एनसीसीच्या सरांनी सांगितलं, सेफ्टी इंजीनियरिंगला गल्फमध्ये खूप डिमांड आहे. तू फायर इंजिनिअरिंगचा कोर्स कर. मी एनसीसीमध्ये बेस्ट कॅडेट आणि रायफल चॅम्पियन होतो, त्यामुळे फायर इंजिनियरिंगचा कोर्स विनासायास पार पडला. २००१मध्ये सेफ्टी फायर ऑफिसरच्या पदासाठी गल्फमध्ये नोकरीची संधी चालून आली. सुरुवातीला तीस हजार रुपये आणि दोन वर्षांनी वाढून एक लाख इतका पगार मिळणार होता. पण याच दरम्यान ९-११ ला अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला. आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे घरच्यांनी आता ही गल्फला जाण्याची वेळ नाही असं सांगून मला ती संधी सोडायला सांगितली. आपल्याला आवडेल असं जगावेगळं काय करावं याचा शोध पुन्हा सुरू झाला.
इकडे, मित्र शूज क्लीन करायला देतच होते, स्वच्छ करून चमकदार झालेले शूज बघून खुश होतच होते. त्यातूनच एक दिवस वाटलं, शूज क्लीन करून देण्याची सर्विस सुरू करावी का? मी ही कल्पना घरी बोलून दाखवल्यावर बाबांनी प्रखर विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं, तुझ्याकडे इतकं टॅलेंट असताना शूज धुवायचं करिअर निवडावंसं वाटतं हे दुर्दैवी आहे. ते म्हणाले, शूज लोक घरी धुतात, त्यामुळे तुझा हा धंदा चालणार नाही. आजवर नेहमी प्रोत्साहन देणार्या बाबांच्या विरोधाचे खरं कारण वेगळं होतं… भारतामध्ये पादत्राणे शिवणे, साफ करणे, या कामात जातीय व्यवस्था आहे, त्यामुळे या धंद्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. आपला मुलगा हे काम निवडतोय, याची त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती. त्यांचंही काही चुकीचं नव्हतं, कारण, आज मी हा धंदा सुरू करून वीस वर्षे झाली आहेत, पण आजही काही लोकांच्या मानसिकतेत फार बदल झाला नाही. आता लोकांच्या प्रतिक्रियांचा त्रास होत नाही, तेव्हा मात्र यायचा… माझी जगावेगळी आयडिया पहिल्या लढाईतच धाराशयी पडली होती. येईल तो पहिला जॉब घ्यायचा, असं खुन्नसने ठरवलं. एका मानलेल्या बहिणीने, माझं इंग्लिश चांगलं असल्याने कॉल सेंटरचा जॉब आणला.
इंटरव्यू द्यायला पवईला गेलो. तिथे सहा राऊंड होतील असं सांगितलं गेलं, पण माझं इंग्रजी बोलणं ऐकून त्यांनी पहिल्याच राऊंडमध्ये नेमणूकपत्र दिलं. एपी सेंटर टेक्नॉलॉजी ही आमची कंपनी अमेरिकेतील नागरिकांचे क्रेडिट कार्ड प्रोसेस करायची. सहा टाईम झोन असतात. त्यापैकी संध्याकाळी चार ते रात्री दोन आणि रात्री दोन ते सकाळी दहा अशी माझी शिफ्ट ड्युटी असायची. इथली मुलं वीस ते पंचवीस वयोगटातले होते. सुखवस्तू घरातल्या या मुलांसाठी पगारातून मिळणारे पैसे हे एक्स्ट्रा मनी असायचे. त्या पैशांत ते महागडे कपडे आणि शूज विकत घ्यायचे. पण इथेही मळलेले, माखलेले आणि घाण शूज मला दिसायचे. ओसीडी असल्यामुळे मी ते शूज मोजायचो. त्यांची संख्या दोनशे ते तीनशे इतकी असायची. हे शूज तातडीने स्वच्छ करायची गरज आहे असं मला वाटायचं. हळुहळू वाटायला लागलं की शूज धुवून आणि रिपेरिंग करून देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक माणूस कधी ना कधी शूज घालतो आणि ते खराबही होतात. त्यामुळे, हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो अशी खात्री वाटत होती.
याच काळात माझ्या नायकी एअर पॉड (पायाचा दाब येतो तशी शूजमधील हवा खेळती राहते) शूजचे सोल निघाले होते. ते एका ठिकाणी दुरुस्तीला दिले होते. त्यांच्याकडून शिलाई करताना बूट पंक्चर झाला आणि त्यातील हवा निघून गेली. ते शूज काहीच कामाचे राहिले नाहीत. एवढे महागडे शूज टाकून द्यावे लागणार, याचं खूप वाईट वाटलं. तेव्हाच ठरवलं की आपण व्यवसाय सुरू करू तेव्हा, आपल्या कामाची गुणवत्ता जागतिक स्तरावरील असावी आणि प्रत्येक ग्राहक आपल्या सर्व्हिसने समाधानी झाला पाहिजे.
कॉल सेंटरवर काम करतानाही माझ्या डोक्यात शू क्लिनिंग रेंगाळत असायचं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जग झपाट्याने बदलत होतं. पूर्वी घरोघरी असलेला ‘महिनाअखेर’ हा शब्द मध्यमवर्गीय घरातून हद्दपार होत होता. लोकांचे पगार वाढले होते, सीसीडी, मॅकडोनाल्ड, मॉल संस्कृती उदयाला येत होती. हातात एक्स्ट्रा पैसे असल्यामुळे खरेदी ही चैन न राहता, सवयीची होऊ लागली होती. पूर्वी ब्रॅण्डेड वस्तू विकत घ्यायला मुंबईच्या हिरा-पन्नामध्ये जावं लागायचं, आता जगातील ब्रँडेड शूजची दुकानं मुंबईत उघडायला सुरुवात झाली होती. माझा व्यवसाय सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे असं वाटून, तेरा महिने जॉब केल्यावर डिसेंबर २००२ला मी तो सोडला. आता खरी आव्हानं माझी वाट बघत होती.
जगातली पहिली शूज क्लीनिंग सर्व्हिस सुरू करायची ठरवलं, पण हा व्यवसाय आधी कुणीही केला नसल्याने त्याबद्दल माहिती आणि ज्ञान उपलब्ध नव्हतं. आतापर्यंत मी ओळखीच्या माणसांना सर्व्हिस देत होतो, पण व्यवसाय सुरू केल्यावर मला अमक्या शूजबद्दल माहीत नाही, हे काम येत नाही, असं सांगणं चुकीचं ठरलं असतं. धंदा सुरू करण्याआधी या कामातील एकूण एक गोष्ट मला माहित असली पाहिजे या उद्देशाने रिसर्च सुरू केला. मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून मार्वेâटमधील सर्व ब्रँडचे लेदर, स्पोर्ट्स, हायकिंग अशा विविध प्रकारचे जुने शूज मागून आणले आणि ते उघडून त्यात काय टेक्नॉलॉजी आहे, कोणते मटेरियल वापरलं गेलंय, याचा अभ्यास सुरू केला. माझा निर्धार पाहून घरच्यांचा विरोध थोडा मावळला होता. मोठा भाऊ प्रताप आणि वहिनी ज्योती यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास दाखवून मला पाठिंबा दिला. मित्रांच्या शूजवर अनेक प्रयोग केल्यावर शूज धुण्याची प्रोसेस मी लिहून काढली. एकसारखे दिसणारे हजारो नवीन शूज बनवणं सोपं आहे, पण वेगवेगळ्या कंपन्यांच्या विविध प्रकारच्या शूजचं रिपेरिंग करणं फार कठीण असतं. पादत्राण उघडल्याशिवाय तो किती खराब झाला आहे हे कळत नाही. त्याचा पार्ट बदलून तो चिटकवला जाईल, तेव्हा रिपेरिंगचा ‘व्रण’ त्यावर दिसणार नाहीत, तो नवीनच दिसेल अशी पद्धत मी शोधून काढली. या प्रॅक्टिकल नॉलेजसोबत नवीन शूज बनविण्याची प्रक्रिया कशी असते, त्यात काय मटेरियल वापरलं जातं, याची माहिती इंटरनेटवरून मिळवणं आवश्यक होतं. सायबर कॅफेत बसण्यापेक्षा माझ्या ऑफिसमधील कॉम्प्युटर वापरून तू रिसर्च कर, असं समरजित सिंग या मित्राने सांगितलं. तिथे मी रिसर्चसोबत नवीन धंद्याच्या मार्केटिंगसाठी व्यायामशाळा, शूजची दुकाने, जिमखाने यांना देण्यासाठी माहितीपत्रकं तयार केली. १९ जून २००२ या माझ्या वाढदिवशी मी शू क्लिनिंग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. ‘द शू लाँड्री’ हे सोपं, ठसठशीत ब्रँडनेम निवडलं.
अनेक मित्रांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना याबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यामुळे एकही माहितीपत्रक न वाटता मला पहिल्या दिवसापासून काम मिळायला लागलं. मला वाजवी किंमतीत उच्च दर्जाची सर्व्हिस द्यायची होती, म्हणूनच मी पिकअप, डिलिव्हरी आणि वॉशिंग ही सर्व्हिस फक्त ९९ रुपयांत देऊ केली. काम सुरू होऊन आठ दिवस झाले असतील. तिवारी नावाचे एकजण नवीन ब्रँडेड शूज घेऊन आले. त्यांच्या शूजवर तेलाचे डाग पडले होते, दुकानदाराने, हे आमच्या सर्व्हिसमधे येत नाही असं सांगून त्यांना परत पाठवलं होतं. मी शूज क्लीन करून दिल्यावर त्यांनी माझी शंभर व्हिजिटींग कार्ड्स नेली आणि बांद्रा लिंकिंग रोडवरच्या त्या दुकानात जाऊन सांगितलं की यापुढे शूजसंबंधित जी सर्व्हिस तुम्ही देऊ शकणार नाही, त्या ग्राहकांना या मुलाकडे पाठवा, हा चांगली सर्व्हिस देतो. याच आदिदास शूज दुकानदारासोबत माझा पहिला टायअप झाला. त्यांनी मला चार शूज रिपेरिंग करायला दिले. मी ते सर्व्हिसिंग करून त्यांना परत दिले, तेव्हा त्यांना शूजची शिलाई उसवली कुठून आणि घातली कुठून असा प्रश्न पडला. माझं काम आवडल्यावर त्यांच्या ओळखीने इतर सर्व ब्रँडच्या दुकानातून कामं यायला सुरुवात झाली.
हा व्यवसाय सुरू केल्यावर पंधरा दिवसांनी एशिअन एज (लंडन) या वृत्तपत्रात माझ्यावर लेख लिहून आला. टाइम्स ऑफ इंडियाने या नवीन कल्पनेचं कौतुक करत माझ्या व्यवसायावर अर्धे पान आर्टिकल लिहिलं. कालपर्यंत ज्या धंद्याला कमीपणाचं मानलं जायचं, तो धंदा जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मी कसा धंदा करतो, काय प्रोसेस वापरतो, हे जाणून घ्यायला अनेक तरुण माझ्या घरी येऊ लागले. खूप अभ्यास करून, मेहनत घेऊन मिळवलेली धंद्यातील गुपिते मला कोणाला सांगायची नव्हती. त्यामुळे कोणालाही कळू न देता सायनला वडिलोपार्जित जागेत मी सिक्रेटली शू सर्व्हिसिंग करायला लागलो.
माझे ग्राहक प्रामुख्याने कॉल सेंटरमधे काम करणारे तरुण होते. ही मुलं काम भारतात करत असली, तरी ते यूके, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या घड्याळावर चालायचे. मला त्या वेळेनुसार रात्री दोन असो की सकाळी सहा… दिवसातील कोणत्याही वेळी बाईकने जाऊन शूज पिकअप किंवा डिलिव्हरी करायला जावं लागायचं. सुरुवातीला सगळी कामं मी एकटा करायचो. पण व्यवसाय वाढायला लागल्यावर मी काही माणसांना कामावर घ्यायचं ठरवलं. जेव्हा कामगारांना इतर क्षेत्रात दोन-अडीच हजार रुपये पगार मिळत होता, तेव्हा मी माझ्या कामगारांना साडे चार हजार पगार देत होतो. शिकलेले तरुण ही नोकरी करायला तयार नव्हते. प्रयत्न करून काही कामगार मिळवले, पण, त्यांच्या घरच्यांनी दुसर्यांचे जोडे धुण्याचं काम हलकेपणाचे आहे, तू नोकरी सोड, असा दबाव आणला. पण हळूहळू बस्तान बसत होतं.
कामाच्या व्यापात कॉलेजमित्रांशी भेटीगाठी दुर्मिळ झाल्या होत्या, पदवी मिळाल्यावर सर्वच कामात व्यग्र होतो. पुन्हा एकत्र भेटून जुन्या आठवणी जागवण्यासाठी मिठीबाई कॉलेजच्या नवरात्र फेस्टिवलमध्ये मित्रांना भेटत होतो. याच कार्यक्रमात २००४ साली मला खुशबू ही मैत्रीण पुन्हा भेटली. ती शिक्षण क्षेत्रात काम करत होती. संगीत, निसर्गात भटकण्याची हौस, अशा अनेक आवडी निवडी जुळत गेल्या. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. मी काहीतरी जगावेगळं करतोय याविषयी तिला कौतुक होतं. पण माझ्या व्यवसाय स्वरूपामुळे आमच्या लग्नाला खूप विरोध झाला. माझं निर्व्यसनी असणं, एज्युकेटेड फॅमिली, घर, गाडी या माझ्या जमेच्या बाजू होत्या. लोकांचे शूज धुण्याचा व्यवसाय करतो, याव्यतिरिक्त माझ्यात खोट काढण्यासारखे काही नव्हतं. तरीही तब्बल पाच वर्षांनी आम्हाला खुशबूच्या घरून परवानगी मिळाली. २००९ साली आमचं लग्न झालं.
व्यवसाय वाढत होता. कामगार वाढवून मी पिकअप, डिलिव्हरीसाठी आठ बाईक विकत घेतल्या. शूज कोणीही धुऊन देऊ शकतो, मग मी असं वेगळं काय करतो, असा प्रश्न मला काही ग्राहक विचारतात, तेव्हा त्यांना मी माझी प्रोसेस उलगडून सांगतो. डोळ्यांना दिसत नाही त्याही गोष्टी आम्ही स्वच्छ करतो.
वॉशिंग, क्लीनिंग, डिओडरायझिंग हे तर करतोच, त्याशिवाय, डायबेटिस झालेल्या एखादा ग्राहकाला देखील आम्ही क्लीन केलेले शूज निर्धास्त वापरता यावेत याकरता ते स्टरलाइझ करून फार्मा ग्रेड डिसिन्फेक्टिंग करतो. शूज धुवायला आम्ही इतकं महाग सोल्यूशन वापरतो म्हणून आमचे सप्लायर आम्हाला हसतात. पण, मला स्वतःला जितकी स्वच्छता प्रिय आहे तीच मला ग्राहकांना देता यायला हवी. त्यासाठी जे बेस्ट मटेरियल आहे, तेच मी वापरणार. केवळ यामुळेच फक्त रिपेरिंगसाठी आम्ही नाही म्हणतो. आधी शूज धुतले जातील, मगच ते रिपेअर होतील.
लेदर शूज धुता येतात, हे कोणी सांगितलं, तर त्यावर विश्वास बसणं कठीण. पण आम्ही आमच्या कंपनीत हे करतो आणि आम्ही धुवून दिल्यावर लेदर शूज नवीन दिसतील, अशी खात्री देतो. मी स्वतः आजवर पंचेचाळीस हजार शूज धुतले आहेत आणि लाखभर शूज रिपेअर केले आहेत. याच मेहनतीच्या जोरावर मी जगातील कोणत्याही मटेरियलचा, टाईपचा जोडा रिपेअर आणि सर्व्हिसिंग करून देण्याची हमी देतो. हवेतील आर्द्रता, तापमान, हवेचा दाब याचा विचार करून, अनेक प्रयोगांअंती ही प्रोसेस डेव्हलप केली गेली आहे. या प्रोसेसचे पेटंट घेण्याचा विचार केला होता, पण त्यातून आमच्या काही सिक्रेट गोष्टी सगळ्यांना कळतील या भीतीपोटी मी त्या भानगडीत पडलो नाही.
२००२ ते २०१० सालापर्यंत आमच्याकडे प्रँâचायजीची नेहमी विचारणा होत होती. पण मी देतो त्या क्वालिटीची सर्व्हिस इतर लोक देऊ शकतील का याबाबत मला खात्री वाटत नव्हती. पण एका फोनने मला यावर निर्णय घ्यायला भाग पाडलं. एका ग्राहकाने फोन करून, तुम्ही माझ्या शूजची वाट लावली, अशी दूषणं द्यायला सुरुवात केली. मी अधिक माहिती घेतल्यावर कळलं, काही लोकांनी शू लॉन्ड्री या नावानं जाहिरातपत्रके वाटून काम सुरू केलं होतं. या प्रसंगानंतर मी फ्रँचायझी मॉडेलवर काम करायला सुरुवात केली. माझा मोठा भाऊ निशिकांत हा वकील आहे, त्याने फ्रँचाईझी कॉन्ट्रॅक्ट बनवायला मदत केली. भूतानमधील व्यसनमुक्त झालेल्या मुलांना रोजगार देण्यासाठी तेथील एनजीओला आम्ही पहिली फ्रँचाईझी दिली. आज आमच्या चौदा फ्रँचायझी आहेत. व्यवसायातील गोपनीयता बाळगणे, कंपनीने वाटून दिलेल्या विभागात अंतर्गत स्पर्धा करायची नाही, या अटीवर आम्ही फ्रँचायझी देतो. तसेच आमच्याकडे काम करणार्या कर्मचार्यांसोबत कामातील गोपनीयतेचा करार केलेला असतो. मी शूज धुताना पंधरा स्टेजेस आणि एकशे वीस स्टेप्स वापरतो. आमची फ्रँचायझी घेणार्या काही लोकांना हे मार्केटिंग गिमिक वाटायचं. पण ट्रेनिंगमध्ये त्यांनी ही प्रोसेस स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा त्यांचा विश्वास बसला. आज ज्या किमतीत एक पिझ्झा विकत मिळतो, त्यापेक्षा कमी पैशांत, अवघ्या चारशे पन्नास रुपयात आम्ही शूज पिकअप, वॉशिंग आणि डिलिव्हरीचे काम करतो. आज रस्त्यावर जी माणसं शूज रिपेरिंगचे काम करतात त्यांना फ्रँचाईझी व्यवसायात आणून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याचं माझं स्वप्न आहे. सामाजिक जाणीव म्हणून आम्ही खुश किड्स प्रोजेक्ट हा उपक्रम सुरू केला आहे. पालघर, वाडा येथील आदिवासी मुलांना दरवर्षी शालेय साहित्य वाटप करतो. गेल्या वर्षी माधवी गोनबरे या मराठी मुलीला तुर्कीए (तुर्कस्तान) देशात भरवल्या गेलेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही पुरस्कृत केले होते, तिने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. व्यवसायात सामाजिक जाणीव जपणं मला जास्त भावतं.
आज व्यवसायाला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत. माझ्या ग्राहकांची मुलं आज आमचे ग्राहक बनले आहेत, याचा मला अभिमान वाटतो. आजही माझा रिसर्च सुरू असतो. रोज नवीन टेक्नॉलॉजीचे शूज बाजारात येत आहेत. त्यांचा अभ्यास करावा लागतो. भारतात आणि भारताबाहेर झेप घेण्याची तयारी सुरू असताना कोविड आला. सर्व लोक घरात अडकले, आमच्या प्रमुख ग्राहकवर्ग वर्क फ्रॉम होममधे अडकला. यामुळे व्यवसाय ठप्प होऊन बरेच नुकसान झालं. आता व्यवसाय पुन्हा स्थिरस्थावर झाला आहे. देशातील व्यवसाय साता समुद्रापार न्यायचा आहे. त्या दृष्टीने आधी दिल्या गेलेल्या फ्रँचाईझी मॉडेलमधे काही बदल करून नव्यानं व्यवसायाची पुनर्बाधणी करायला घेतली आहे.
आजचं जग तरुणांचं आहे आणि जगात सर्वात जास्त तरुण भारतात आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे व्यावसायिक बनण्यासाठी वडिलोपार्जित पैशाची गरज नाही. पूर्वीच्या काळी शून्यातून विश्व निर्माण करायला उभी हयात घालवायला लागायची. पण स्टार्टअप सुरू करणारी मुलं आज एका वर्षात शून्यातून विश्व निर्माण करताना दिसतात. यासाठी गरज असते ती नवीन कल्पनेची. लोकांच्या गरजा रोज बदलत आहेत. त्याचा अभ्यास करून जर त्यावर उपाय शोधलात तर व्यवसायाच्या शर्यतीत जुने शूज क्लीन करून देखील जिंकता येतं, त्यासाठी नवीन शूज विकत घ्यायची गरज नसते, हे संदीप गजाकस या मराठी तरुणाने सिद्ध केलं आहे.