शंकराचार्यांच्या कर्मकांडी परंपरेला धक्का देण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर जवळच्याच पाटगाव इथे छात्र जगद्गुरू पीठ सुरू केलं. पण या निर्णयाला प्रबोधनकार आणि भास्करराव जाधव यांच्यासारख्या सत्यशोधकांनी विरोध केला.
– – –
पाक्षिक प्रबोधनच्या दुसर्याच अंकात `अंबाबाईचा नायटा` हे स्फुट छापून आल्यामुळे गदारोळ माजणं स्वाभाविक होतं. पण ही सुरुवात होती. पुढच्याच अंकात प्रबोधनकारांनी `शिवराया प्रणिपात कराया ब्रिटानिया आली` या अग्रलेखात छत्रपती शिवरायांची थोरवी अभिमानाने गातानाच भिक्षुकांच्या माणूसघाण्या वृत्तीचा आणि त्या वृत्तीच्या इतिहासलेखनाला ओरबाडून काढलं. त्यापुढे १६ डिसेंबर १९२१च्या अंकात `मानसिक दास्याविरुद्ध बण्ड` ही अग्रलेखांची मालिक सुरू केली. पुढच्या काही महिन्यात या मालिकेतले पाच लेख प्रसिद्ध झालेले दिसतात. प्रबोधनकारांच्या आयुष्यातही या मालिकेने पुढे क्रांती घडवली. पण त्याआधी या मालिकेतल्या तिसर्या लेखांकात प्रबोधनकारांनी छत्रपती शाहू महाराजांच्या आणखी एका निर्णयाविषयी नाराजी नोंदवली. तो निर्णय होता, शंकराचार्यांना पर्याय म्हणून छत्रीय जगद्गुरूचं पीठ सुरू करण्याचा.
प्रबोधनकारांनी `मानसिक दास्याविरुद्ध बण्ड` या लेखमालेत अगदी मुद्देसूद आणि सविस्तर मांडणी केली आहे. मन म्हणजेच माणूस. म्हणून शारीरिक गुलामीपेक्षा मानसिक गुलामगिरी जास्त घातक. भिक्षुकशाही ही गुलामगिरी धर्माच्या नावाने लादते. त्यामुळे आपण या जोखडातून बाहेर पडायला हवं. त्यासाठी प्रश्न विचारायला शिकायला हवं. व्यक्तिपूजा नाकारायला हवी. हे सांगताना प्रबोधनकारांनी उदाहरणादाखल छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या छात्रजगद्गुरू पीठालाही सोडलं नाही. त्यांनी केलेली टीका अशी,
`…याचा दाखला म्हणजे मराठे बांधवांनी निर्माण केलेल्या क्षात्र जगद्गुरूची गादी हा होय. ब्राह्मण जगद्गुरूचे दास्य नको म्हणून छात्रजगद्गुरूचे पीठ निर्माण करणे, म्हणजे जुन्या गुलामगिरीच्या त्रासांतून मुक्त होण्यासाठी नव्या गुलामगिरीचे जोखड पत्करण्यासारखेच आहे. समाजोन्नतीसाठी किंवा धर्मोन्नतीसाठी शंकराचार्यांचा एक मठच पाहिजे, त्यावर कोणीतरी एक मठपतीच पाहिजे, ही कल्पना मुळी मानसिक दास्याची स्पष्ट स्पष्ट निशाणी आहे. गुलामगिरीचा नायनाट गुलामगिरीने होत नसतो. शिवाय, वर्णाश्रमवादी ब्राह्मण जगद्गुरूच्या मानसिक दास्यप्रवर्तक भिक्षुकशाहीला जमीनदोस्त करण्यासाठी थेट तसल्याच तत्त्वांवर उभारलेल्या क्षात्रजगद्गुरूच्या मठाला निर्माण करणे म्हणजे जोखडासाठीच देवाने आपल्याला मान दिली आहे, ही कल्पना दृढमूल झालेल्या बैलाला नार्या तेल्याच्या घाण्याला रामराम ठोकून पिर्या तेल्याच्या गोंडस घाण्याला स्वतःस जुंपून घेण्यासारखे आहे. मठ आला की मठाधिपती आले. मठाधिपती आले की सांप्रदाय सुरू झाला. सांप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायी गुलामगिरी ठेवलेलीच. अर्थात क्षात्रजगद्गुरूच्या मठाचा अनाठायी खाटटोप करणारे आज जरी या नवीन परिस्थितीत काही समाधान मानीत असतील, तरी निदान व्यक्तिप्रामाण्याची मुर्वत राखण्यासाठी त्यांना कालवशात एका नवीन स्वरूपाच्या भिक्षुकशाहीच्या गुलामगिरीत बिनतोड जखडून पडल्याशिवाय गत्यंतरच उरणार नाही. आज घटकेस त्यांना ब्राह्मणी ग्रन्थप्रामाण्य मान्य नसले तरी क्षात्र ग्रन्थप्रामाण्याचा रामरगाडा भविष्यकाळी त्यांना टाळताच येणे शक्य नाही, हे त्यांनी पूर्ण लक्षात ठेवावे.`
हे वाचल्यानंतर कोल्हापूर परिसरातल्या मराठा समाजातल्या वाचकांमध्ये खळबळ माजली. ठाकरे आता आपले उरले नाहीत, अशी भाषा काही मराठा पत्रकारांनी केली. पण क्षात्र म्हणजे मराठे असं शाहू महाराजांनी घोषित केलेलं असल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतच मराठा–मराठेतर अशी फूट पडू शकते, याची भीती प्रबोधनकारांसारख्या जाणकारांना होती. टीकेचं हे वर्म लक्षात न घेतल्यामुळे त्यांच्याविरोधात लिहिणार्यांची गडबड झाली. मुळात अशा प्रकारच्या धार्मिक मठ आणि पीठांवरचे उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार छत्रपतींना असल्याचा पुरावा प्रबोधनकारांनीच शाहू महाराजांना दिला होता, हे टीकाकारांना माहीत नव्हतं.
एका बैठकीत महाराजांनी प्रबोधनकारांना प्रश्न विचारला होता की छत्रपतींना धर्मपीठावरील पीठाधिकारी नेमण्याचा अधिकार असतो का? त्यावर प्रबोधनकारांनी रावबहाद्दर वाडांच्या बाडातला पुरावा दिला होता. रामदास स्वामींचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या गादीवर कुणी बसावं, यासाठी शिष्यांमध्ये भांडणंच नाही, तर मारामारी आणि दंगल झाली. अनेकांची डोकी फुटली. सातार्याच्या थोरल्या शाहू महाराजांपर्यंत हे प्रकरण जाताच त्यांनी स्वतः सज्जनगडावर जाऊन चौकशी केली आणि कल्याणस्वामींच्या एका वंशजाला मठाधिपती बनवलं. वंशज तयार व्हावा यासाठी छत्रपतींनी स्वतःच्या अधिकारात लग्न न करण्याची अट काढून टाकली. तेव्हा त्यांनी लेखी हुकूमही काढला की आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत.
प्रबोधनकारांमुळे शाहू महाराजांना प्रत्यक्ष ऐतिहासिक संदर्भ मिळाला होता. पण महाराजांनी त्याआधीच करवीर पीठाच्या शंकराचार्यपदावर डॉ. कुर्तकोटींसारखा उच्चविद्याविभूषित विद्वानाची नेमणूक केली होती. पण त्यांनी आपले वर्णवर्चस्ववादी रंग दाखवताच त्यांची हकालपट्टीही केली होती. यातून धडा घेत महाराजांनी नवंच शंकराचार्य पीठ घडवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आजवर शंकराचार्यांच्या पीठाला असं आव्हान कधीच दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे खंडेराव बागलांसारख्या सत्यशोधक पत्रकाराने या कृतीला ब्राह्मणशाहीविरुद्धची प्रोटेस्टंट क्रांती म्हटलं होतं. पण त्यातल्या उणिवा दाखवण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं होतं. तसं करणारे प्रबोधनकार एकटे नव्हते. अशाच भास्करराव जाधवांचा प्रसंग प्रबोधनकारांनीच वर्णन केला आहे.
भास्करराव हे शाहू महाराजांचे सुरुवातीपासूनचे सहकारी. पुढे मुंबई इलाख्याचे पहिले शिक्षणमंत्री आणि पहिल्या दोन गोलमेज परिषदांमधील भारतीयांचे एक प्रतिनिधी म्हणून गाजलेल्या भास्कररावांनी महाराजांच्या दरबारात अनेक महत्त्वाच्या पदांवर कामं केली. दीर्घकाळ महानगरपालिकेचा कारभार सांभाळल्यामुळे त्यांना कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार असं म्हटलं जातं. ते महाराजांचे अत्यंत विश्वासू होते. तरीही त्यांनी महाराजांच्या दरबारात त्यांचा एक हुकूम नाकारला होता. त्याचीच गोष्ट प्रबोधनकारांनी सांगितली आहे.
छात्र जगद्गुरू म्हणून सदाशिव लक्ष्मण पाटील-बेनाडीकर यांचा पट्टाभिषेक झाला. तो विधी पार पडल्यानंतर खुद्द शाहू महाराजांनी नव्या जगद्गुरूला कंबर वाकवून तीनदा मुजरा केला. इतकंच नाही, तर दरबारातल्या इतरांनाही तसा मुजरा करण्याचे आदेश दिले. सगळ्यांनी तसं केलं. अपवाद फक्त भास्कररावांचा. ते महाराजांच्या लक्षात येताच त्यांनी भास्कररावांना मुजरा करण्याचे आदेश दिले. पण त्यांनी महाराजांना शांतपणे उत्तर दिलं, `महाराज, आपण छत्रपती म्हणून एक सोडून शंभरदा मी आपले मस्तक आपल्यापुढे अगत्य वाकवीन. पण एक प्रामाणिक सत्यशोधक आणि महात्मा जोतिराव फुलेंचा इमानी शागीर्द या नात्याने जगद्गुरू, त्याचे पीठ या संस्थाच मला अमान्य आहेत. सबब मुजरा करण्याचे मला काही कारण नाही.` त्यावर महाराजांनी भास्कररावांना दरबारातून बाहेर काढलं. पण दरबार आटोपताच स्वतः भास्कररावांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले आणि नि:स्पृहपणासाठी त्यांची पाठ थोपटली.
याच विषयावर असाच नि:स्पृहपणा प्रबोधनकारांनीही दाखवला. `मानसिक दास्याविरुद्ध बण्ड` या लेखात छात्रजगद्गुरू पीठावर टीका केल्यानंतर महाराजांबरोबर मुंबईत झालेल्या पहिल्या बैठकीत प्रबोधनकारांनी स्पष्टच सांगितलं, `महाराज, हा क्षात्रपीठाचा उपद्व्याप अखेर ब्राह्मणेतरी संघटनेला भोवल्याशिवाय राहणार नाही. तशातच आपण क्षात्र म्हणजे फक्त जातीय मराठे, हा खुलासा केल्यामुळे तर अफाट मराठेतर बहुजन समाजाच्या विश्वासाला आपण जबरदस्त धक्का दिलात. त्यांना किंवा कोणालाही धर्मपीठाची, जुन्या अगर नव्या, गरज नाही. त्यांना धर्मोद्धार नको. त्यांना कर्मोद्धार हवा. एकीकडे सत्यशोधक तत्त्वांची तळी उचलून धरायची आणि दुसरीकडे खास मराठा जातीयांसाठी क्षात्रगुरूचे नवीन धर्मपीठ उभे करायचे, या भानगडीचा आदि अंत आपणच जाणे.`
प्रबोधनकारांच्या या सडेतोड मतांवर दुसरा एखादा संस्थानिक रागावला असता. पण शाहू महाराज सोबतच्या लोकांच्या मतांचा सन्मान करणारे होते. त्यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे, `तू म्हणतोस ती डेंजर्स आहेत खरी. पण मी त्यांचा पुरता बंदोबस्त करणार आहे. सत्यशोधक समाजाच्या पाठोपाठ आर्यसमाज येऊन मला चिकटला आहे. काहीतरी तडजोड काढावी लागेल.` या उत्तरात सांगितला तसा बंदोबस्त शाहू महाराजांनी नक्कीच केला असता. पण त्यासाठीचा पुरेसा वेळ त्यांना काळाने दिला नाही.
या प्रसंगाच्या आधीचा महाराजांची संबंधित एक महत्त्वाचा प्रसंग प्रबोधनकारांनी वर्णन केलेला आहे. तो लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे. त्या काळात महाराष्ट्रात गाजणार्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातले शाहू महाराज आणि टिळक हे पुढारी होते. स्वतः प्रबोधनकारही टिळकांचे कट्टर टीकाकारच होते. पण त्यांनी सांगितलेला प्रसंग महाराजांची दिलदारी आणि टिळकांचा मोठेपणा अधोरेखित करतो. शिवाय इतर कुठेही नोंदवलेला नसल्यामुळे त्याचं महत्त्व अनमोल आहे. त्याला प्रबोधनकार साक्षीदार नसले तरी त्याचे साक्षीदार दिवाण सर रघुनाथराव सबनीस प्रबोधनकारांच्या जवळचे असल्यामुळे त्यांनी तो सांगितलेला असू शकतो. तो प्रबोधनकारांच्याच शब्दांत,
`लो. टिळक मुंबईच्या सरदारगृहात आसन्नमरण असताना दर तीन तासांनी त्यांच्या प्रकृतीचे मान कळावे म्हणून महाराजांनी पन्हाळा लॉजमधून ट्रंक कॉल करण्यासाठी एका खास इसमाची नेमणूक केली होती आणि २-३ दिवस आपले बाहेर जाण्याचे सारे बेत रद्द केले होते. सुमारे ११ वाजता महाराज जेवायला बसले होते. तोच टिळकांच्या मृत्यूची बातमी आली. येताच थाळा दूर लोटून महाराज आचवायला उठले आणि संस्थानातल्या सगळ्या कचेर्या ताबडतोब बंद करण्याचे हुकूम सोडण्याबद्दल दिवाणसाहेबांना खास निरोप गेला. दिवाणसाहेब येताच महाराज म्हणाले– मास्तर, मर्दानी माणूस गेला! आता कोणाशी आपण लढा देणार? त्याच्या मागे सगळा सारा पोरकटांचा बाजार.`