इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जवळपास दीडशे वर्षे अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी, राजे महाराजांनी आत्मबलिदान केले. सर्वसामान्य जनता हजारोंच्या संख्येने बळी गेली. स्वातंत्र्यसैनिकांनी शस्त्राला शस्त्रानेच उत्तर उत्तर द्यायची पराकाष्ठा केली, पण इंग्रजांचे बळ व कूटनीती सरस ठरत गेली. अर्थात या मंडळींनी इंग्रज सरकारला जेरीस नक्कीच आणले होते. यावर महात्मा गांधीजींनी रक्तपात टाळण्यासाठी अहिंसक मार्गाचा उपाय शोधून काढला. ते शस्त्र बंदूक, तलवारीपेक्षा जास्त धारदार निघाले. ते शस्त्र होते उपोषण आणि सत्याग्रह. गांधीजींची ही लढाई खूपच यशस्वी होत गेली. इंग्रजांकडे हजारो सैनिक होते, तर गांधीजींकडे लाखात भारतीय सर्वधर्मीय सामान्य जनता होती. मिठाचा सत्याग्रह, दांडीयात्रा यांसारख्या शस्त्रहीन आंदोलनांमध्ये लाखोंच्या संख्येने भारतीय जनतेचा सहभाग होता. किडकिडीत, काळी सावळी देहयष्टी लाभलेले गांधी इंग्रजांना आकाशाएवढे उंच भासू लागले. पण इंग्रजांनी जातीजातींत विष पेरायची संधी घेतली. भारत-पाक फाळणी करून हजारो सर्वसामान्यांच्या कत्तली घडवून आणल्या, पण निश्चल गांधीजींपुढे त्यांना मान तुकवून स्वातंत्र्य द्यावेच लागले. यावर डेव्हिल लो या ब्रिटिश व्यंगचित्रकाराने इंग्रजांना सणसणीत मुस्कटात लगावली. बाळासाहेब ठाकरे व आर. के. लक्ष्मण ज्या व्यक्तीला गुरु मानत, त्या डेव्हिड लो याने दुसर्या महायुद्धकाळात हिटलर, चर्चिल, स्टॅलिन यांना सळो की पळो करून सोडले होते. दुसरे चिरंजीव होते चार्ली चॅपलीन. यांनी हिटलरला तर ‘ग्रेट डिक्टेटर’ या सिनेमात भरपूर मुस्काटले होते… एक शब्दही न उच्चारता, नि:शस्त्रपणे. लाखोंची कत्तल करणारा हा नराधम डिक्टेटर या दोघांपुढे हतबुद्ध झाला. त्याच्या ‘हिट लिस्ट’वर डेव्हिड लोचे नाव प्रथम क्रमांकावर होते, इतका त्याचा क्रोध अनावर होता. इंग्रजांसाठी गांधीजींचे उपोषण, डेव्हिड लो यांच्या रेषा, आणि चार्ली चॅपलीनचा अभिनय ही अस्त्रे शस्त्रांपेक्षाही धारदार ठरली.
मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपली नेतेमंडळी गांधीजींचे उपोषण खेळण्यातल्या बंदुकीसारखे वापरू लागली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सत्तेच्या वारुवर घट्ट मांड ठोकली. अनेक दिग्गज नेते आले आणि गेले, सत्ता फिरून फिरून त्यांच्याकडेच येत गेली. अनेक उच्चविद्याविभूषित नेतेमंडळी, स्वातंत्र्यासाठी खरा तुरुंगवास भोगणारी मंडळी विरोधी पक्षांतही होती. पण, काँग्रेसकडे त्यांची तगडी फौज होती. पंतप्रधान पं. नेहरू, राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, लाल बहादूर शास्त्री आदी केंद्रात तर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, मधुकरराव चौधरी, वसंत दादा पाटील, मोरारजी देसाई, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी. तर विरोधी पक्षीय म्हणून नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, मधु लिमये, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस, कॉम्रेड डांगे आदींची फळी होती. हे सर्व विरोधी नेते अभ्यासू, बुद्धिमान संयमित, सभ्यपणाने वावरणारे होते. समस्या मांडत होते, सभागृहाची प्रतिष्ठा जाणत होते. लाक्षणिक संप, उपोषणे, मोर्चे ही त्यांची हत्यार होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये हीच मंडळी व महाराष्ट्रातली सामान्य जनता मोठ्या ताकतीने मैदानात उतरली होती. त्यात आचार्य अत्रे अग्रभागी होते. त्यांनी मोरारजींना सळो की पळो करून सोडले. मोरारजीसारख्या हेकट मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकरवी मोर्चावर गोळ्या डागल्या. १०५ लोक शहीद झाले. दिल्लीत संयुक्त महाराष्ट्र समितीने प्रचंड मोठा मोर्चा घडवून आणला. मोरारजींनी माघार घेतली व मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्राचा कलश इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात आणला होता.
नंतरच्या काळात संप व मोर्चे होत राहिले, मात्र उपोषण हा प्रकार बराच मागे पडला. कारण उपोषण करणारे बरेचदा भंपकच असत. प्रत्येक फलक आमरण उपोषणाचा असे व चार-पाच दिवसांत ते गुंडाळले जाई. कधी तडजोड होई, तर कधी उपोषणकर्ते संशयाचे धनी होत. काहींचे वजन वाढल्याचेही अनुभवास येई. त्यामुळे आमच्यासारख्या व्यंगचित्रकारांची चंगळ होई. ही पाहा सामाजिक समस्येवरील कलाटणीचित्रे… काही वर्षांपूर्वी कोल्ड्रिंक्स मानव जीवितास विषसमान आहेत, असा प्रचंड प्रचार सुरू झाला होता. पिकांवर शिंपडल्यास कीड मरते, असेही बोलले जायचे. चित्र असे, एकाने उपोषण सोडण्यासाठी नटीचा हट्ट धरला. नटीने हट्ट पुरा केला, पण कसा तो पाहा. एकाने उपोषणकर्त्यापुढेच भेळपुरीचा ठेला लावलाय… मीडिया नसेल तर उपोषण करण्यात काय अर्थ असेही सुनावण्यात आले… भुकेल्या उपोषणकर्त्यापुढे हिरोईनला जाण्यास बंदी करावी लागली, कारण भूक कोणतीही असू शकते. एकाची तरुण बायको म्हणते, ‘तुम्ही उपोषणाला गेलात की माझी मात्र अकारण उपासमार!’
एका विषयावर किती विविध अंगांनी विचार करता येतो त्याचे हे उदाहरण.
आधीच हौस त्यात पाऊस. परिणामी उपोषण या विषयाने मान टाकली. राज्यकर्तेही त्या विषयास फार मान देत नसत. किंवा दुर्लक्ष करत. मधला बराचसा काळ अंडरवर्ल्ड सामर्थ्य वाढल्याचा होता. खून, मारामार्या, बॉम्बस्फोट, यांचं उदंड पीक आलं. सत्तापालटाचे प्रकार वाढू लागले. असंतोष वाढू लागला. विरोधकांनी सरकारविरुद्ध कंबर कसून ते एकत्र आले. त्यातच इंदिराजींनी पंतप्रधान असताना इमर्जन्सी लावली. देश ढवळून निघाला. इंदिराजींची जुलमी राजवटीला लयास गेली, त्या पराभूत झाल्या. विरोधी पार्टीचे सरकार आले.
तो गोंधळ गेली २५-३० वर्ष अद्यापही चालूच आहे. भ्रष्टाचार तर कल्पनेबाहेर वाढत गेला. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे नावाच्या वामनमूर्तीचा उदय झाला. अडगळीत पडलेले उपोषणाचे शिवधनुष्य अण्णांनी पेललं. छोटी मोठी भ्रष्टाचार प्रकरणं, शेतकरी समस्या, आदी सामाजिक समस्यांवर बरीच उपोषणे त्यांनी केली. मात्र लोकपाल आयोगावर २०११ साली ते दिल्लीत आमरण उपोषणास बसले. एकहाती अण्णांच्या मागे सर्व देश उभा राहिला, ही एक अभूतपूर्व व इतिहासात नोंद करणारी गोष्ट ठरली. लोकपाल बिलाचा त्यांनी आग्रह धरला. पण या आंदोलनाचा प्रभाव अल्पकाळ टिकला. मधली पाच सात वर्षं सरकार त्यांना झुलवीत राहिले. आमरण उपोषणाचा प्रभाव हळूहळू कमी होत राहिला हे सत्य आहे. गांधीजी ते अण्णा हजारे हा एवढाच उपोषणाचा तूर्त तरी प्रवास वाटतो.
आताशा त्याची जागा विराट आणि भव्य मोर्चांनी घेतली आहे. मात्र शक्तिप्रदर्शनाशिवाय त्यातून विशेष काही हाती लागले नाही. पुढे पुढे चाललेल्या काळाच्या ओघात अशा अनेक गोष्टी मागे पडतात तर कालपरत्वे नव्याने निर्माण होत राहतात.