ख्रिस्मस कार्ड्स ही नाताळ सणाची जुनी परंपरा आहे. पण आताच्या ई-जमान्यात ती नामशेष झाली आहे. त्यामुळे मन्याचा शाळकरी मुलगा त्याच्याकडे नाताळ भेट म्हणून कार्डची मागणी करू लागला तेव्हा त्याला आश्चर्यच वाटले. नव्या पिढीचा हा प्रतिनिधी पित्याकडे भेटकार्ड मागतोय म्हणून मन्याचा उर भरून आला. नंतर मन्याला कळलं की तो खरेदीसाठी त्याच्या क्रेडिट कार्डची मागणी करत होता.
—-
मध्यरात्रीची मिस्सा (midnight mass) हा प्रार्थनाविधी नाताळ परंपरेचा अविभाज्य भाग होय. या सोहळ्यासाठी तरुणाई, विशेषत: युवती आणि तरुणतुर्क महिला नटूनथटून चर्चमध्ये येतात. त्यासाठी त्या दोन-तीन महिन्यापासून शिंप्याकडे येरझार्या घालीत असतात. साहजिकच या प्रार्थना सोहळ्याला फॅशन जत्रेचे रूप आले, तर नवल ते काय?’ माझा ड्रेस इतरांपेक्षा कसा उठून दिसेल या नादात आपण अंगावर चढवलेले ‘आऊटफिट’ किती ‘मिसफिट’बनलं आहे, यांचे काहीजणींना भान नसते. मग, देवदर्शनाला आलेल्या मन्यासारख्या तरूण पुरूषांना नक्की पाहायचं कुणाकडे हा संभ्रम पडतो.
—-
अशावेळी मन्याला हमखास त्या गरीब प्रोटेस्टंट धर्मगुरूची आठवण होते. त्या पाळकाची बायको खूप शौकीन असते व तिला वस्त्र-प्रावरणाचा खूप सोस असतो. एकदा ती नाताळची खरेदी करून घरी आली आणि कौतुकाने आपल्या नवर्याला महागडा फरकोट दाखवू लागली.
‘हा निव्वळ मोह आहे,’ ते पाळक पत्नीला सात्विक संथपणे म्हणाले, ‘तू त्या सैतानाला निर्धाराने सांगायला हवे होते : जा, हट, मागे हो!’
‘मी तसेच म्हटले, तर तो म्हणाला : तुला हा फरकोट मागूनसुद्धा छान दिसतो.’
—-
कोरोनावासात देवळे (आमच्या वसई धर्मप्रांतात चर्चला देऊळ असेच म्हटले जाते) बंद होती आणि भाविकांची भक्तीची भूक भागविण्यासाठी धर्मगुरू ऑनलाइन मिस्सा आयोजित करायचे. बायाबापडे घरात बसून टीव्ही किवा मोबाइलवर मिस्सा ऐकत. कित्येकदा काय होई? काही पुरोहितांना लांबलचक प्रवचन देण्याची सवय असते व त्यांच्या खूप वेळ बोलण्याने भाविक कंटाळत. एकदा मन्याच्या घरी भासिक (virtual) मिस्सा सुरू होती. त्या धर्मगुरूचे कंटाळवाणे सर्मन (प्रवचन) सुरू झाले. मन्याची अशिक्षित आई तिच्या नातवाला म्हणाली, ‘अरे पोरा, ते जरा फास्ट फॉरवर्ड कर बघू.’
—-
नाताळ सणासाठी घराची साफसफाई चालली होती, तेव्हा मन्याच्या लक्षात आले की कोरोनावासातील लॉकडाउनमध्ये एक गोष्ट आपण प्रकर्षाने शिकलो, ती म्हणजे : झाडू मारताना पुढे सरकायचे आणि पोछा मारताना मागे मागे सरकायचे.
—-
टाळेबंदी शिथिल होत गेली. देवळे उघडली आणि मर्यादित संख्येने शासकीय नियम पाळत भाविक मंदिरात येऊ लागले. दोन वर्षांनी मन्या चर्चमध्ये आला होता आणि ऐटीत पुढे जावून पवित्र वेदीजवळ पहिल्या रांगेत स्थानापन्न झाला. मिस्सबळी होत असताना त्यातील विविध प्रार्थनाचा भाग म्हणून भाविकांना कधी गुडघे टेकावे लागतात, कधी उभे राहावे लागते, कधी बसून राहावे लागते. एरवी भक्तमंडळी या क्रिया प्रतिक्षिप्तपणे करतात. मध्यंतरी मोठा गॅप गेल्याने मन्याचा गोंधळ झाला व खाली बसायचं तेव्हा मन्या उभा असलेला दिसायचा. इतर लोक गुडघे टेकून बसलेले असताना मन्या उभा असलेला दिसे. जरा मागे वळून पहिले की त्याला आपली चूक समजे किवा बाजूचा कुणीतरी खूण करी. तो सावध होई. पण त्याने बैठक बदलेपर्यंत इतरांची बैठक बदललेली असे. मग मन्याने मनाशी गाठ बांधली व यापुढे काही दिवस देवळात आलो की अगदी मागच्या रांगेत जागा घ्यायची.
—-
मन्या पवित्रभूमीची तीर्थयात्रा करून परतत होता. एयरपोर्टवर कस्टम अधिकार्याने त्याला हटकले, ‘या बॅगमध्ये काय आहे?’
‘जेरूसलेमचे पवित्र पाणी आहे!’
त्या अधिकार्याने मन्याच्या बागतील एक बाटली उघडली व वास घेतला. ‘तुम्ही तर खोटे बोलत आहात. याला तर व्हिस्कीचा वास येतोय.’
‘काय म्हणताय काय! प्रभू ख्रिस्ताने अजून एक चमत्कार केलेला दिसतोय,’ मन्या उद्गारला.
—-
एरवी मन्याला चर्चमध्ये होणार्या लांबलचक प्रार्थनेत फारसा रस नसायचा. पण बायकोपुढे त्याच काही चालत नसे. शिवाय ते बालपणीचे संस्कार होते आणि म्हातारे असले तरी म्हातारी (माय) आणि पाय (बाबा) यांचा नाही म्हटले तरी धाक होताच. मग, तो आणि गावातले काही मित्र मिस्साबळीची प्रार्थना सुरू असताना चर्चच्या बाहेर (out) कोपर्यात उभे (standing) राहून टंगळमंगळ करीत राहायचे.
आपला नवरा नियमित चर्चला प्रार्थनेसाठी जातो, याचे त्याच्या बायकोला कोण कौतुक? तीच संधी साधून मन्याही सांगायचा, ‘मी outstanding ख्रिश्चन आहे.’ बायकोला काही तो विनोद समजायचा नाही व मन्याचे आयते फावून जायचे.
—-
देवळात मन्यासमोर एक वृद्ध गृहस्थ उभा होता व तो अधून मधून आवाज करीत मागून गॅस सोडत होता. थोडा वेळ निरीक्षण केले तेव्हा मन्याच्या लक्षात आले की त्या म्हातार्याला खोकल्याची उबळ आली की तो पाद सोडायचा. खोकला लपविण्यासाठी केलेली ती उलटी युक्ती पाहून मन्याचे चांगलेच रंजन झाले.
—-
एकदा मन्या सहकुटुंब जेरूसालेमला तीर्थयात्रेला गेला होता तेव्हाची गोष्ट. येशू ख्रिस्त त्या सरोवरात मासेमारी करणार्या शिष्यांना भेटण्यासाठी पाण्यावरून चालला होता, अशी बायबलमध्ये कथा आहे. गालिली सरोवरावर बोटीने फेरी मारत असताना मन्याला तो किस्सा आठवला. पर्यटनासाठी आलेल्या एका अमेरिकन भाविकाने सरोवरात पर्यटकांना होडीतून फिरायला नेणार्या होडीवाल्याला विचारले, ’या समुद्रात एक फेरी मारण्यास किती पैसे घेशील?’
तो व्यावसायिक म्हणाला, ‘५० डॉलर्स’
‘इतके महाग?’ तो पर्यटक उद्गारला. ‘आता कळले, प्रभू ख्रिस्ताने तेव्हा पाण्यावरून चालत जायला का पसंत केले होते!’