बावला खून प्रकरणाविषयीच्या ‘द टेम्प्ट्रेस’ या पुस्तकाने बदनामी झाली म्हणून द बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक बी.जी. हॉर्निमन यांनी प्रबोधनकारांच्या विरुद्ध खटला दाखल केला. त्यात झालेल्या तडजोडीनुसार प्रबोधनकारांनी माफी मागून विषय संपवला. पण श्रीहरीच्या चरणी नावाच्या लेखात आपली भूमिका सविस्तर मांडलीच.
– – –
बहुजनांची बाजू घेतात म्हणून ब्राह्मणद्वेष्टा ठरवल्या गेलेल्या प्रबोधनकारांना ‘बॉम्बे क्रॉनिकल’ अब्रुनुकसानीच्या खटल्यात पहिली मदत केली ती देवधर नावाच्या ब्राह्मण प्रबोधनभक्ताने. यात आश्चर्य असलं, तरी सत्याची चाड असणारे सर्वच जातींमध्ये असतात, हे स्पष्टच आहे. प्रबोधनकार अशा ब्राह्मणांवर टीका करत नव्हतेच. त्यांच्या तोफेच्या निशाण्यावर होते ते बहुजनांना फसवून स्वत:चं वर्चस्व निर्माण करण्यासाठी निर्ढावलेले जातनिष्ठ ब्राह्मण. देवधरांसारख्या मित्रांच्या बळावरच प्रबोधनकार हा खटला चालवत होते.
प्रबोधनच्या मार्च १९२६च्या अंकात एक चौकट प्रसिद्ध झाली आहे. त्याचा मथळा आहे, श्री. ठाकरे यांच्यावर अब्रुनुकसानीची फिर्याद. त्यापुढे या केसची माहिती दिली आहे ती अशी, मुंबईच्या ‘बॉम्बे क्रॉनिकल’चे संपादक मी. बेंजामिन गाय हॉर्निमन यांनी श्री. ठाकरे कृत टेम्प्ट्रेस नामक इंग्रजी पुस्तकातल्या पृष्ठ २७ ते ४१ पानांवरील काही वाक्यांमुळे आपली बेअब्रू झाली, अशी फिर्याद मुंबईच्या ४थ्या प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात ता. १९-२-२६ रोजी दाखल केली. ता. १०-३-२६ खटला उभा राहिला. आरोपीतर्पेâ ता. २५-३-२६पर्यंत मुदत मागितली, ती मिळाली.
या खटल्यात प्रबोधनकार बर्यापैकी गुरफटलेले असावेत, कारण एप्रिल १९२६च्या अंकात आणखी एक चौकट अंकाच्या शेवटी दिलेली आहे. ती अशी, व्यवस्थापकाचा खुलासा. श्री. ठाकरे हे त्यांच्या खटल्याकरिता मुंबईस निघून गेल्यामुळे या अंकातील संपादकीय मजकूर वेळेवर छापावयास मिळाला नाही. सबब हा अंक २६ पृष्ठांचा काढणे भाग पडले आहे. पुढील म्हणजे चालू वर्षाचा शेवटचा अंक अधिक पृष्ठांचा काढून या अंकाच्या पृष्ठांची भरपाई अवश्य केली जाईल.
खटल्याच्या पहिल्याच दिवशी प्राथमिक कामकाज झालं. प्रबोधनकारांची बाजू घेणार्या बॅरिस्टरने एकाच तोंड उघडलं. तेही फक्त युवर वर्शिप हा शब्द बोलण्यासाठी. त्यासाठी त्याला तब्बल शंभर रुपये फी द्यावी लागली. त्या दिवशी पुढची तारीख पडली. पुढच्या तारखेला मॅजिस्ट्रेटने झाला झगडा मिटवण्यासाठी स्वत:च पुढाकार घेतला आणि प्रबोधनकारांनी माफी मागण्याच्या आश्वासनाने हा खटला थांबला. त्याचं वर्णन प्रबोधनकारांच्या शब्दांत वाचणं मनोरंजक आहे. `माझी जीवनगाथा`मधली ही नोंद अशी,
मॅजिस्ट्रेट साहेबांनी दोघा भांडकुदळ कोंबड्यांना नि त्यांच्या वकिलांना चेंबरात बोलावले. चेंबरात दोन्ही बाजूंनी मेंबरं जमा झाली. मॅजिस्ट्रेट बोलू लागले, हे १९२६ साल म्हणजे अब्रुचे भरमसाट पिकाचे साल आहेसे वाटते. याच कोर्टात एकंदर सहा अब्रुचे खटले आहेत. दोन साध्यासुध्या असामींनी एकमेकांवर बेअब्रूच्या फिर्यादी केल्या तर त्यात आश्चर्य नाही. पण रोजच्या रोज कोणा ना कोणाची अब्रूच घेण्याचा धंदा करणार्या दोन वृत्तपत्रकारांनी, याने माझी अब्रू घेतली हो, म्हणून कोर्टकचेर्या कराव्या, हा देखावा मोठा चमत्कारिक म्हणा, मनोरंजन म्हणा, पण आहे खरा तसा. आणि खटल्यात व्हायचे काय? तर ह्याने त्यांची घाणेरडी खरकटी बोर्डाच्या फलाटावर धुवायची नि त्याने यांची, हेच ना? (मला नि हॉर्निमनला उद्देशून) तुमचा धंदा काय? किक अँड अपालगाईज, बस्स एवढाच. लाथ मारावी, क्षमा मागावी. पुन्हा तेच करावे. आहे काय त्यात एवढे? परस्परांत समझोता करा. झाले. मी क्षमा मागावी, ती २-३ वर्तमानपत्रांत छापावी, यावर तडजोड झाली नि हॉर्निमनची अब्रू सनलाइट सोपसारखी स्वच्छ धुवून निघाली.`
यानंतरही प्रबोधनमध्ये होळकर प्रकरणावर लिहून येतच होतं. पण चौथ्या वर्षाच्या बाराव्या अंकात म्हणजे मे १९२५च्या अंकात प्रबोधनकारांनी श्रीहरीच्या चरणी नावाचा लेख लिहून या प्रकरणावर आपल्या बाजूने पडदा पाडला. या लेखात त्यांनी बावला खून प्रकरणाविषयीची आपली भूमिका आणि त्याची पार्श्वभूमी नीट उलगडून सांगितली, ती मुळातून वाचावी अशी आहे. म्हणून या लेखातले काही परिच्छेद पुढे दिले आहेत,
सातारच्या दुर्दैवी प्रतापसिंह छत्रपतीच्या उच्चाटनाचा समग्र इतिहास गेली दहा वर्षे आम्ही अभ्यासित आहोत. या अभ्यासामुळे आमची काही काही विशिष्ट मते सिद्धांतरूप बनली आहेत आणि चालू घडीच्या प्रत्येक गोष्टीत जुनाच इतिहास आपली पुनरावृत्ती किती बिनचूक ठोकताळ्याने घडवीत असतो, हे कौतुकाने आजमाऊन पाहण्याचे आम्हाला जवळ जवळ एक व्यसनच लागले आहे म्हटले तरी चालेल. काळाबरोबर माणसाच्या कल्पना कितीही बदलल्या, तरी संस्कृती जुनेच नाटक हुबेहूब वठवून दाखविते. हिंदी संस्थानिकांच्या राज्यसंन्यासाविषयी या दृष्टीने विचार करण्याचा प्रबोधनाचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हे.
वेळी ज्योतिषशास्त्राचे ठोकताळे चुकतील, पण इतिहासशास्त्राचे चुकणार नाहीत. महाराष्ट्रातल्या यच्चावत भट-भटेतर समाजांची कुंडली महाराष्ट्रेतिहासांत उमटलेली आहे आणि कोणी कितीही बदलत्या रंगढंगाचे थेर करू लागला तरी अखेर तो मूळ वळणावर गेलाच पाहिजे, हा सनातन सिद्धांत आहे. किंचित स्पष्ट सांगायचे तर हा रक्ताचा प्रश्न आहे. ठाकर्यांनी होळकरांची बाजू कां उचलली? त्यांनी नाही उचलायची तर काय भटांनी उचलायची? एकजात भटी पत्रांनी होळकर प्रकरणाच्या पराचा कावळा करून इंदोरास सातारा कां उमटविला? का म्हणजे, भटांनी आजपर्यंत हीच कामे केली व करीत आहेत. यापेक्षा निराळे विशेष काही करण्याचे माहात्म्य त्यांच्या रक्तातच नाही. क्षत्रिय मराठे पत्रकार व पुढारी प्रथम अगदी स्वस्थ का बसले आणि सारी दिल्ली गडगडल्यावर एकदम डुरकण्या का फोडू लागले? त्यांची हीच सनातन प्रवृत्ति, ता म्हणताच ताकभात ओळखण्याइतका दूरदृष्टीचा पोच जर मराठ्यांच्या अवसानांत असता, तर छत्रपति पेशव्यांचे गुलाम कधीच नसते… आजपर्यंत हे असेच होत आले आहे. ज्या ज्या वेळी भटेतरांनी भटी कारस्थाने हाणून पाडली, त्या त्या वेळी `मराठा धडावर कायस्थी डोके असा बिनतोड संयोगच इतिहासांत दिसून येईल.`
कायस्थ प्रभूंचा देशी स्वराज्यांचा अभिमान आजच ठार मेलेला नाही, निदान प्रबोधनकाराचा तरी मेलेला नाही. अशा स्थितीत वृत्तपत्रकार नात्याने इतिहासाची साक्ष डोळ्यापुढे ठेऊन, होळकरांच्या अफाट निंदकसेनेला तोंड देण्यासाठी आम्ही एकटेच कायस्थ लेखक पुढे सरसावलो आणि सर्वशक्तिमान प्रतिस्पर्ध्यांच्या उघड गुप्त शरवर्षावांनी घायाळ होऊन पडलो तर त्यात नवल ते काय आणि दु:ख तरी कशाचे? भटांनी आपल्या रक्ताचा गुणधर्म गाजविला आणि आम्हीही आमच्या जातीच्या लोकविश्रृत परंपरेला पारखे न होता, रक्ताची आठवण ठेऊन इंदोरच्या स्वराज्याची वकिली केली. असली कामे भाडोत्री तडफेने होत नसतात, त्याला रक्ताचा जिव्हाळा आणि परंपरेचा अभिमान लागतो.
ज्यांनी धनुर्धारीच्या जोडीनेच `प्र सहीने बडोदावत्सलांत अनेक लेख लिहून होळकरांच्या निंदकांना जबरदस्त शह दिला ते आमचे मातुल पितामह कै. राजारामपंत गडकरी आज जिवंत असते, तर वृद्धावस्थेच्या आत्यंतिक क्षीणतेत सुद्धां ते निष्क्रिय बसले नसते. हे सर्व जन कालवश झाले, पण मी तर मेलो नाही ना? १९८६ साली कोमल विद्यार्थी दशेत प्र`चे सारे लेख लिहिण्याचे भाग्य ज्या याच लेखणीला लाभले, ती लेखणी तर मेली नाही ना? या व असल्या विचारांनीच आमच्या वर्तमान इंदोरविषयक लेखांचा पार्श्वभाग तयार केला.
दक्षिणा हबकल्याशिवाय मंत्रच म्हणावयाचा नाही, हीच ज्या भटी पिंडाची ब्रम्हगांठ, त्यांनी अवघ्या महाराष्ट्रांत एकट्या प्रबोधनकाराने होळकरांची बाजू उचलून धरलेली पहातांच, हजारो रुपयांच्या थैल्यांच्या काल्पनिक वासाने त्यांची घ्राणेंद्रियें कोंदाटून कां जाऊं नयेत? वृत्तपत्रीं शक्तींच्या जोडीनेच पुणेरी गटारयंत्र ही एक भटांची व भटाळलेल्यांची महाशक्ती आहे. या दुजोड शक्तींच्या जोरावर भटलोक आज वाटेल ते बरें वाईट कर्म चुटकी सरसे करू शकतात. राज्य इंग्रजांचे असो, नाहींतर जर्मन जपान्यांचे असो, भट जोपर्यंत या दोन शक्तींचे उपासक आहेत, तोपर्यंत ते वाटेल ती सृष्टी घडवतील व घडलेली बिघडवतील.
तूप असेल तरच खरकटे चाटण्याची ज्या भटी पत्रांची प्रवृत्ति, त्यांची या खुलाशाने थोडीच शंकानिवृत्ती होणार? शंभर वर्षांपूर्वी भटी कटवाल्यांच्या चिथावणीनेच बनिया कुंफणीने मटकावलेल्या सातारा छत्रपतीच्या तक्ताच्या पुनर्घटनेसाठी आम्ही अलीकडे जो अरण्यरुदनाचा कंठशोष चालविला आहे, त्याच्यासाठी सातारकर भोसल्यांकडून आम्हांला किती हजारांचे तोडे आले? का, सातार्याची स्वतंत्र शिवनगरी बनलीच तर आम्हाला तेथली दिवाणगिरी उकळायची आहे? परंतु असल्या स्पष्ट विधानांनी भटांचे समाधान कधीच होणे शक्य नाही. त्यांची मनांतली आढी त्रिभुवन जळले तरी जायची नाही. त्यांचे तेवढे खरे. ते म्हणतील ती पूर्वदिशा, लिहितील तो वेद, बोलतील ती स्मृति, करतील ते कारण आणि बांधतील ते तोरण! असल्या शिरजोर भटांच्या कारस्थानांत आमच्यासारखा एकहाती एकमुखी काम करणारा स्वतंत्रमतवादी हाफटला धोपटला गेला, तर त्यात हितशत्रूंना हासण्यासारखे आणि मित्रांना वाईट वाटण्यासारखे आहे तरी काय? भटांच्या कोल्हेकुईत आणि गटारयंत्रांत जो सापडला तो चिरडलाच पाहिजे हीच इतिहासाची साक्ष आहे. मग तो प्रतापसिंह छत्रपति असो, शिवाजीराव होळकर असो नाहीतर तुकोजीराव होळकर असो, त्यांचें उच्चाटन झालेच पाहिजे. भटांचा शाप हा असा महापराक्रमी आहे, मग तो भट जहाल असो नाहीतर मवाळ असो, देशी काळा पगडबंद अथवा परदेशी गोरा टोपडा असो. तुकोजीराव होळकरांवर गोरी भटी पत्रे जेव्हा एकजात आरडाओरडा करू लागली, तेव्हांच आम्ही भाकीत करून बसलो की इंदोरास सातारा निर्माण होणार! भाकीत ठरले तरी प्रयत्नाला पारखे होणे माणुसकीला तरी शोभत नाही. असले प्रयत्न आधी दाम मग काम असल्या भटी पिंडाच्या वकिलीने होतच नसतात. त्याला रक्ताची तिडीक लागते. अपयशाची पर्वा नाही, तेजोभंगाची दरकार नाही, हानीचा खेद नाही, असली इमानी वृत्ती लागते. आजपर्यंत देशी रियासतीसाठी झगडून मेलेल्या कायस्थांना काय असा सुखाचा शब्द आणि डबोल्याचे घबाड लाभलेले आहे. तर आम्ही त्याची अपेक्षा करावी?… लाभाची यशाची लोकप्रियता किंवा भटी मेहेरबानीची तिळमात्र पर्वा न करतां वृत्तपत्रकार नात्याने आम्ही आपले कर्तव्य चोख बजावले आहे, ते श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी अर्पण असो.
इंदोरी खजिना गुप्तपणे पचविण्याचा आमच्यावर आरोप करणार्या कारस्थान्यांनी वास्तविक असा विचार करायला पाहिजे होता काr असल्या गडगंज गंगाजळांत आकंठ बुडालेला प्रबोधनकार क्रौन फोलीयोचे एक मोडके तोडके ट्रेडल व टायपांच्या ५-६ केसी घेऊन आपल्या मासिकाची दोनदोन पाने छापीत का बसला? अजूनही त्याला सावकारांचे व क्रेडिट सोसायट्यांचे हप्ते का भरावे लागतात? परंतु बाजारगप्पांवरच पोट भरण्याचे ज्यांना व्यसन आणि कोणीकडून तरी आम्हाला रसातळाला नेण्याचा ज्याचा निश्चय, त्यांची समजूत घालणे निदान आमच्या ताकदीबाहेर आहे… यापेक्षा वर्तमानकाळी आम्ही अधिक काही लिहिण्यांत आता अर्थच नाही. काळ हा अनंत आहे. पृथिवी विस्तीर्ण आहे. येईल, असाही काळ येईल की त्या वेळी या इंदोर प्रकरणांतला हिंदु लोकांचा देशद्रोह सातारा प्रकरणाप्रमाणेच जगाच्या नजरेस येऊन, महाराष्ट्राला पश्चात्तापाचे प्रायश्चित्त करावे लागेल. ओम शांति: शांति: शांति: