चिंतोजीरावांकडे पाहुणे आलेत. बर्याच दिवसांनी कुणी सांगून भेटायला येतंय, हे कळाल्याने चिंतोजीराव हातातलं काम टाकून फाट्यापर्यंत स्वागताला जाऊन पाहुण्यांना घेऊन घरापर्यंत आलेत. येताना मुगल काळातील अमृततुल्य विकास माहात्म्य वदणार्या सडकेनं पाहुण्यांचा पार्श्वभाग जरा हुळहुळा झालाय. त्यामुळे आल्या आल्या पाठतुटक्या प्लास्टिक खुर्चीचं मिळालेलं दिव्य आसन नाकारून त्यांनी काही काळ उभं राहणं पसंद केलं.
‘रस्ते जरा…’ पाहुण्यांनी अखेर विषयाला हात घातलाच!
‘खूप छान! आमचे नाना आधीच्या रस्त्यांनी गाढ निद्रेत असणार्या राघोपंतांना मृत समजून स्मशानात जाळून आले होते! झोपलेल्याला जळून राख होईपर्यंत मेल्याची खात्री पटली नाही आणि जाळणार्याला अलार्म वाजेपर्यंत! नंतर नानांनाच राघोपंतांच्या वामकुक्षीचा शोध लागला आणि त्यांना आपल्या कुकर्माचा पश्चाताप झाला. पण आता? मेलेल्या दहा बॉड्या ह्या रस्त्यानं जित्या होऊन चालत पायी घरी आल्यात. सिझेरियनचा सल्ला मिळालेल्या बाया आठव्या महिन्यातच मोकळ्या झाल्यात. इतकंच काय? नाणं-बिणं, अंगठ्या गिळलेल्या पोरांना ह्या रस्त्यानं नेलं तर तोंडातून वस्तू बाहेर येतात. केवळ…’ चिंतोजीराव रस्त्याच्या चित्तरकथा सांगतांना हरकून जातात.
‘पण निदान वरनं डांबर ओतलं तर…’ पाहुणे चाचरतात.
‘वतायला आम्ही उकळतं शिसंबी ओतू. पण फायनल डिसीजन नानांचाच असतो. कसं? नाना म्हणतील तसं!’ चिंतोजीराव फायनल बात बोलतात.
पाहुणे चिंतोजीरावांच्या बिनतोड उत्तरानं मटकन् खुर्चीत बसतात. तवर इमलाबाई गडूभर पाणी घेऊन येतात. पाहुणे घटाघटा पिऊन घेतात. मागून इमलाबाई उकडलेल्या रानभाज्या घेऊन येतात, सोबत अर्धवट भाजलेल्या भाकर्या असतात. मागून चिंगी ताट-वाट्या घेऊन येते. इमलाबाई झटदिशी ताटं ठेऊन पदार्थ वाढतात. चिंतोजीराव पाहुण्यांचं बखोट धरून जेवायला बसवतात. पाहुणे अनिच्छेनं का होईना, ताटावर बसतात, पण पहिलाच मिळमिळीत, तोटरा बसवणारा घास गळ्यात गेल्यावर ते वरून अर्धा लिटर पाणी नरड्यात ओतून अन्ननलिका मोकळी करतात.
‘यात काहीच चव का नाही? तिखट, गोड काही…?’ पाहुणे न राहवून शंका व्यक्त करतात.
‘त्याचं काय आहे? बुवांच्या बैठकीला आम्हाला बुवांनी सांगितलं आहे. अस्सल भारतीय पक्वान्नं खावीत म्हणून. मग आम्ही त्यांनी त्यांच्या पुस्तिकेत छापल्याप्रमाणं स्वयंपाक करतो आणि तो इतका चविष्ट होतो की बैठकांत बुवा माझ्या हातच्या पदार्थांचंच कौतुक करतात…’ इमलाबाई बुवापुराणात हरकून जातात.
‘पण थोडंबहुत तिखट-गोड…?’ पाहुण्यांची शंका पूर्ण होऊच दिली जात नाही.
‘नाही, नाही! मिरच्या ह्या परदेशी उगमाच्या आहेत नि साखरेचा शोध सुद्धा परदेशात लागल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे नाना म्हणाले, पूर्ण स्वदेशी अवलंबित असताना परदेशी पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले पाहिजे. आपलं व्यक्तव्य कसं आयुर्वेदाला धरून आहे आणि आरोग्यास उपायकारक आहे यावर बुवांनी त्यांच्या ‘खा खा खाणारे’ पुस्तिकेत सविस्तर सप्रमाण काही लिहिलं आहे,’ चिंतोजीराव इमलाबाईचा पक्ष धरतात.
कपाळाला हात मारत पाहुणे हातावर उदक सोडतात. तटकन उठून खुर्चीवर बसतात.
‘का हो, भावजी? आमचं अन्न इतकं का कडू होतं? इतक्यात का तर्हं दिलीत?’ इमलाबाई लाडीकपणे विचारतात.
‘कडू? कडू तरी हवं की? सूनबाई नाही बनवत का काही?’ पाहुणे विषय बदलतात.
‘इश्श! इतक्यात सूनबाई?’ इमलाबाई काहीच्या काही लाजतात पण संबंधित वाक्यावर लाजणं गैरलागू आहे कळल्यावर सावरत बोलतात, ‘इतक्यात कसं हो? आमच्या चिण्याला गोरक्षेच्या कामातून वेळच मिळत नाही हो! पण नानांच्या दहा-दहा अपत्याचं टार्गेट त्यानं मनावर घेतलं आहे.’
‘मग यंदा बुंदी आहे तर…?’ पाहुणे खुश होऊन विचारतात.
‘बुंदी वगैरे परदेशी पदार्थ नाहीच मिळणार हो लग्नात! पण केव्हा होईल ते नाना ठरवतील हो. त्यांनी मुलगी पसंद केली की चिण्या माळ डोळे झाकून घालील. अगदी नाना म्हणतील तसं आणि नाना ठरवतील तेव्हा होईल,’ इमलाबाई कवतिकाने माहिती पुरवतात.
ह्या विषयात बी नाना नावाच्या पात्राने जोरदार एन्ट्री मारल्याचं बघून पाहुणे थंड घेतात. पण तोच धाब्याच्या घराची माती फळीच्या कुह्यलेल्या भागातून अभिषेकाच्या धारेसारखी पाव्हण्याच्या शिरावर पडते. पाव्हणा डोकं झटकीत बाजूला होतो.
‘अय्या, ही फळी पण उधईने खाल्ली अन् काय? आता रात्री आबांना बाहेर अंगणात वळकटी अंथरावी लागेल ना?’ चिंगी विशेष उत्साहाने इमलाबाईंना विचारते.
‘तसंही बुवांनी त्यांना व्रत दिलेलं होतंच! चंद्रप्रकाशात नामस्मरणाचं! ते या निमित्ताने नियंता पूर्ण करून घेतोय हो!’ इमलाबाई भक्तिभावाने हात जोडतात.
‘पण इथे तर बिबट्याप्रवण क्षेत्र घोषित केले आहे ना? येताना नाल्याच्या वळणावर पिंजरा दिसला हो मला? अश्यात बाहेर अंथरूण टाकणं, धोकादायक होईल. ह्या धोकादायक घरात राहण्या ऐवजी तुम्ही आवास योजनेत घरकुल का मिळवत नाही?’ पाहुणा अतिरिक्त मेंदू वापरतो.
‘केला होता हो अर्ज! पण कर्मचारी भविष्यचंगळ निधीत हातभार लावण्यासाठी आगाऊ रक्कम नव्हती. त्यामुळे प्रकरण रखडलंय…’ चिंतोजीराव मौन सोडतात.
‘मग नाना…’ पाहुण्याला एक दगड भिरकवण्याची संधी मिळते.
‘हो, नानांनी आश्वासन दिलंय, दुसर्यांदा खुर्ची मिळताच सगळी प्रकरणं मार्गी लावू म्हणून! पण ऐन दिवाळसणात बहिणींना ओवाळणी देऊन त्यांचं बजेट कोलमडलंय. त्यामुळे ‘जरा थांबा’चा निरोप धाडलाय त्यांनी! आमचे नाना करतील ते योग्यच हो!’ चिंतोजीराव जरा फणकार्यानेच बोलतात.तोवर चिंगी पाण्यासाठी हंडे वगैरे बाहेर काढते. ती चिण्याला फोन लावते. ते बघून पाव्हण्याला पुन्हा मळमळतं.
‘का हो, नळाला पाणी येत नाही का?’ पाहुण्याचा खोचक सवाल.
‘यायचं हो! घर घर तोटी योजनेत फुकट तोट्या वाटल्या नानांनी! पण गावच्या टाकीतच नाही पाणी तर नानांचे मित्र काय ‘ओतून’ भरतील का?’ चिंतोजीराव चिंतेने सांगतात.
‘चिंगे, चेहरा झाकून जा हो, पाणी आणायला!’ इमलाबाई विशेष आठवणीने हंडे बाहेर काढणार्या लेकीला सांगतात.
‘हे बुवांच्या संस्कार शिबिरात सांगितलं असेल ना?’ पाव्हणे रिकाम्या हंड्यात खडा टाकतात.
‘हो, बुवा म्हणाले मुली-महिलांच्या उघड्या शरीराने पुरुष लगेच उद्युक्त होतात. म्हणून स्त्रियांनी नाकापासून पायाच्या नखापर्यंत शरीर झाकून घेत जावं!’ चिंगी पाहुण्यांना संस्कार शिबिरातल्या साडेतिसर्या धड्यातील दुसरी ओळ ऐकवते.
‘अरे वा! मग ते बुरखे फाडून त्यांना परधर्मातील स्त्रिया उघड्या का पहायच्या आहेत? त्यांनाही ‘झाकल्या घरी सुखी रहा!’ म्हणावं की?’ पाव्हण्याला नसते प्रश्नं सुचतात.
‘अहो ते स्त्रीस्वातंत्र्याचा आणि स्त्रीउद्धाराचा कार्यक्रम राबवतात. आपल्या धर्मात तो छानपैकी झालाय ना? म्हणून ते पलीकडल्या धर्मात राबवतात. त्याअंतर्गत ते उद्या सातासमुद्रापार पाश्चात्य देशांत बिंदी लावून स्त्रीमुक्तीचा उद्घोष करणार आहेत…’ चिंतोजीराव बोलता बोलता स्त्रीवादी बनतात.
‘नाना…?’ पाव्हण्यांना पुन्हा उमाळा येतोच.
‘हो, हो! नानांच्याच पुढाकाराने हे कार्यक्रम होतात हो! शेवट संबंध पंचक्रोशीत नाना म्हणतील तसंच होतं हो! नाना हेच आमचे आराध्य! त्यांच्या शब्दाबाहेर कुणी नाही.’ चिंतोजीराव ठामपणे बोलतात.
तोच बाहेर हंडे घेऊन गेलेली चिंगी रडत आत येते. तश्या इमलाबाई घाईने पुढे सरकतात. पाव्हणे आणि चिंतोजीराव तिच्याकडे बघू लागतात.
‘काय झालं चिंगे?’ इमलाबाई लेकीला काळजीने विचारतात.
‘नानांचा पंटर… त्यानं हात मुरगळला..!’ चिंगी ढसाढसा रडू लागते.
‘आणि चिण्या..?’ काळजीने चिंतोजीराव सवाल करतात.
‘त्याला पंटरची गुंड टोळकी हाणतायत बाहेर…’ चिंगी रडता रडता बोलते.
‘पण का?’ पाव्हणा न राहवून विचारतो.
‘त्यानं हे घर… वस्ती पाडायला विरोध केला म्हणून..!’ चिंगी रडवेल्या आवाजात सांगते.
‘अरे पण ही घरं, ही जागा पंचायतीची! आम्ही जायचं कुठं?’ चिंतोजीराव डोक्याला हात लावतात.
‘त्यांनी ग्रामसभेच्या ठरावाचे पेपर दाखवलेत..!’ चिंगी फुंदताना बोलते.
‘म्हणजे झालंय की! नाना म्हणेल तसं! आवास योजनेत घर देणारा नाना आहे ते घर पाडून जागा बळकावू पहातोय. मुलींसाठी संस्कार वर्ग घेणारी ही बेणी मुलींच्या अंगावर, अब्रूवर हात टाकतायत. बेरोजगार तरुणांना गोरक्षक बनवून देशोधडीला लावताना त्यांचं भविष्य नासवण्याचा प्रयत्न होतोय. थोडक्यात तुम्ही उजाड होताय, चिंतोजीराव!’ पाव्हणे कळकळीने काही सांगू बघतात.
‘मग आम्ही करावं काय?’ चिंतोजीराव चिंताग्रस्त चेहर्याने विचारतात.
‘तुम्ही करावं काय? हा देश प्रजासत्ताक आहे, तो काय २६ जानेवारीला तिरंगी झेंडे फडकवण्यासाठी की प्लास्टिकचे बिल्ले मिरवण्यासाठी? ह्या देशात जितकं नाना, भाऊ, तात्या, मामा यांच्या आवाजाला, मताला महत्त्व आहे. तेवढंच तुमच्याही आवाजाला आणि मताला आहे. फक्त तुम्ही तुमचे आवाज विसरलात. मताधिकार योग्य प्रकारे वापरणं विसरलात. ही भूमी कुणा एकट्या दादा-भाईची नसून ती तुमच्यासारख्या सामान्यांची आहे. इथल्या राष्ट्रीय संपत्तीचे दादा-भाऊ-नाना-तात्या यांच्याबरोबरीने तुम्हीही मालक आहात. इथे निर्णय, कायदे एकमताने नव्हे बहुमतानेच व्हायला हवेत. त्यातही अल्पमतातील मतांचा देखील सन्मान आणि विचार त्यात झालाच पाहिजे. हीच तर लोकशाही आहे. आणि यासाठीच तर आपण प्रजातंत्र स्वीकारलंय ना? मग चला एकतेची वज्रमूठ करून अश्या लोकशाहीतील नवसामंतांची सत्ता उखडू! येताय ना?’ पाहुणे शेवटचं आणि महत्त्वाचं काही विचारतात.