तज्ज्ञ बन, गिर्हाईके भरपूर!
प्रश्न : ताई, सोशल मीडियावर झटपट प्रसिद्ध कसे व्हावे?
उत्तर : लाडक्या भावा, ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी’ हा मूलमंत्र कायम लक्षात ठेवावा. सध्या लोकांना आपली संस्कृती, धर्म, रुढी परंपरा याबद्दल प्रचंड अभिमान वाटायला लागलेला आहे. या प्रचंड अभिमानी लोकांना खरेतर यातले काहीही माहिती नसते हे लक्षात घे. त्यामुळे सध्या अशा लोकांना लक्ष्य करून आरामात यशाचे शिखर चढणे शक्य आहे. संस्कृती तज्ज्ञ, पुराणाचा अभ्यासक, अंक आणि अक्षर तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ अशा विविध भूमिकांना फक्त धर्म आणि संस्कृतीची जोड दिली की तुझ्यामागे भक्तांची गर्दी झालीच म्हणून समज.
संस्कृती तज्ज्ञ : आपल्या देशाला भारत नाव कसे पडले इथपासून सुरुवात करून आपली संस्कृती ही जगातली सर्वात जुनी संस्कृती कशी आहे. आर्य, अनार्य, तक्षशीला आणि तिथली ग्रंथसंपदा, मगधाचा वंश, पाषाण काल, हडप्पा मधील पाणीव्यवस्था, मोहेंजोदडोमधील कुंभार काम आणि अनोखी मातीची भांडी अशा विषयावर हे ताणून पोस्ट पाडत राहायच्या. यूट्यूब, विविध ब्लॉग यावर यासंदर्भात खंडीभर माहिती पडून आहे. ही माहिती मोठ्या प्रमाणात इंग्रजीत उपलब्ध आहे. ती ट्रान्सलेट कर आणि तिला मराठी शब्दांचा साज चढव. गंमत म्हणजे, शक्यतो एकाही भक्ताने ती वाचलेली नसते. त्यामुळे असे लिहीत गेलास, की वासरात लंगडी… या न्यायाने तू सत्कारमूर्ती होणार यात शंका नाही. मगध, चाणक्य यांचा वापर करून झाला, की मग अध्येमध्ये रांगोळी मागची संस्कृती आणि विज्ञानाचा गूढ अर्थ, घराबाहेर लिंबूमिरची टांगण्यामागचे शास्त्रीय कारण, मंदिरातील स्त्रियांचा प्रवेश अशा सद्यकालीन विषयावर देखील ज्ञानतुषार शिंपडत राहावेत.
पुराणाचा अभ्यासक : या क्षेत्रात तर प्रचंड संधी आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत आणि त्या प्रत्येक धर्मात अनेक सुरस पौराणिक कथा आहेत. त्यातल्या काही एकमेकांशी अगदी मिळत्या जुळत्या आहेत. या क्षेत्रात लोकांना प्रचंड रस आहे आणि ज्ञान शून्य किंवा अगदी मर्यादित आहे. आजकालच्या पिढीला तर रामाला मिशा होत्या की नाही याचे देखील कुतूहल आहे. ’वेद अपौरुषेय आहेत, म्हणजे नेमके काय’, ‘त्रिजटा’ ही अशोक वाटिकेत सीतेवर पहारा करण्यासाठी नेमलेली होती इथपर्यंत माहिती काही लोकांना असते. मात्र त्रिजटा ही बिभीषणाची मुलगी होती हे सांगितले की लोकांना आश्चर्य वाटते. काही पुराणग्रंथात ’हनुमानाला मकरध्वज नावाचा एक मुलगा होता’ किंवा ’काही पौराणिक कथांनुसार सूर्यदेवतेची मुलगी सूवर्चला हिचे हनुमानाशी लग्न लावून देण्यात आले होते’ असे तुम्ही सांगायला लागलात, की लोक चाट पडतात. लगोलग गूगल करून खात्री करून घेतात. ही माहिती आपल्यापर्यंत कधी का पोहोचली नाही याचे आश्चर्य करतात.
एकदा का आपले गारुड पसरले, की मग हळूच महाभारताला हात घालायचा. गर्दी वाढायला लागली की ’ब्रह्मास्त्र आणि ब्रह्मशीर्ष अस्त्रातील फरक’, ’चक्रव्यूहाची रचना’, ’ब्रह्मास्त्राचे परिणाम आणि अण्वस्त्राने होणारे परिणाम यातले साम्य’ अशा विषयांना हात घालायला सुरुवात करायची. यासाठी तुला इंटरनेटवर थोडे वाचन करावे लागेल. पण पुराणाच्या थोड्या ज्ञानावर देखील आपल्याकडे ज्ञानगंगा असल्याचा आव आणणे सोपे असते.
अंक तज्ज्ञ : ’अंक’ हा मानवाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. त्यात आजकाल ’अंकशास्त्र’ नावाचे खूळ लोकांच्या डोक्यात वेगाने शिरायला लागलेले आहे. लोकांच्या जन्मतारखेतले आकडे, त्यांच्या मोबाइल नंबरमधले आकडे, त्यांच्या फ्लॅटचा नंबर, मजल्याचा नंबर इथपासून ते त्यांचा जन्म किती वाजता झाला, ते एकूण अपत्यांपैकी कितव्या नंबरचे अशा असंख्य गोष्टीत ’अंक’ हा घटक सामावलेला असतो. तुम्हाला फक्त यातले अमके अंक शुभ आहेत आणि अमके अशुभ आहेत अशा पुड्या सोडत बसायचे आहे. मोबाइल नंबरमध्ये अशुभ अंक असल्याने दहा दहा वर्ष वापरात असलेला नंबर बदलणारे आणि बदललेला नंबर बँक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर ठिकाणी जोडण्यासाठी वणवण फिरणारे लोक जोवर जगात आहेत, तोवर या क्षेत्राला मरण नाही हे लक्षात ठेव.
‘६६६ आकडा हा अशुभ कसा आहे, त्याला इतर काही धर्मात देखील अशुभ कसे मानतात’, ७ या आकड्याने घात कसा होतो, ११ आकडा आयुष्यात संकटे कशी आणतो’ यावर अगदी समरसून लिखाण करायचे. जेव्हा शनीने सातव्या घरात प्रवेश केला तेव्हा अमक्या तमक्या राजाला किंवा ऋषींना कसा त्रास भोगावा लागला, फलाण्या नावाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ११ नंबरची खोली कशी नाही, मालकाने १० नंतरच्या खोलीला थेट १२ नंबर कसा दिला आहे याच्या सुरस कहाण्या तुझ्या लोकप्रियतेला हातभार लावतीलच, पण तुझ्या ज्ञानाचा प्रकाश देखील पसरवतील.
आकड्यांशी खेळून यशाचे आणि आर्थिक अशी दोन्ही शिखरे गाठता आली तर ठीक, नाहीतर मग शुभ अशुभ अक्षरांना देखील हात घालायचा. स्पेलिंग बदलायला लाव, ‘आय’च्या जागी दोन ‘ईई’ करायला सांग, ‘एल्ब्aेप्’च्या ऐवजी ‘एल्ब्aेप्’ करायचा उपाय सुचवा, आधी नाव मग आडनाव लावू नका. आधी आडनाव लावा आणि मग नाव लावा’ अशा साध्या सोप्या बाललीलांनी या क्षेत्रात सोशल मीडियावर जम बसवता येतो. यासाठी पूर्वी मीडियातील थोर-थोर लोकांनी पसरवलेल्या एकता कपूर, तुषार कपूर यांच्या कथा पुन्हा रेटत राहायचे, अमका तमका चित्रपट नाव बदलल्याने कसा सुपरहिट झाला, न बदलल्याने कसा आपटला, स्पेलिंगमध्ये बदल करताच अमका तमका खेळाडू कसा यशस्वी झाला हे सांगत राहायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उद्योग सुरू करण्यापूर्वी स्वत:च्या नावाची मोडतोड करणे अत्यावश्यक आहे.
आहार तज्ज्ञ : या विषयातले सर्वांना सगळे कळत असते. पण तरी नवे ऐकायची इच्छा असते. हे लोक आपले महत्त्वाचे लक्ष्य आहेत हे लक्षात घे. हे लोक आहार या विषयावर जिथे कुठे हे काही मिळेल, ते अधाश्यासारखे वाचत, ऐकत असतात. अत्यंत अपडेट असतात, त्यामुळे थातूर मातूर ज्ञानाला हे फसणे अवघड. अशावेळी त्यांच्या ज्ञानावर हल्ला करायचा. ‘If you can’t convince them, confuse them.’ एखाद्या गाजलेल्या आहारतज्ज्ञाने ‘रोज सकाळी उठल्यावर पाणी पिणे अयोग्य आहे’ असे सांगितले की आपण लगेच ’सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करावे, तर रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे’ असे ठासून सांगायचे. कोणी ’तूप कमी करा’ असा सल्ला दिला की, आपण लगेच ’तुपाचे आहारातील महत्त्व’ यावर नागगोळीसारखे लांबलचक लिखाण करावे. तांबे, तूप यांचे महत्त्व पटवून द्यायला विविध वेद, पुराणकालीन खाद्यपद्धती, तुपाचा विविध श्लोकातील उल्लेख, तांबे या धातूचे महत्त्व आणि आरोग्यशास्त्रातील त्याची उपयुक्तता हे सगळे तुमच्या मदतीला ठेवत राहायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘हे खाऊ नका’ किंवा ‘ते टाळा’ असले सल्ले चुकून देखील द्यायचे नाहीत. लोकांना त्यांची सध्याची जी जीवनशैली आहे तीच कशी योग्य आहे हे सांगणारा माणूस आवडतो. ‘वडा पाव, बर्गर खायचाय? बिनधास्त खा… फक्त अगदी हलक्या हाताने पावाला बाहेरून थोडे तूप लावा’, ‘पिझ्झा खाताय? मनमुराद खा. फक्त रात्री झोपताना गरम पाण्यात थोडे मध घालून प्या आणि ओवा चघळा’ असे साधे सोपे आणि कोणतेही अहित न करणारे सल्ले देत राहा. तुम्हाला आरोग्य आणि आहारशास्त्रातले किती ज्ञान आहे हे लोक तुम्हाला वंदन करायला लागल्यावर तुम्हाला स्वत:ला जाणवेल.
– सर्वज्ञ सोमी ताई
हा नाद सोड सोड…
प्रश्न : सोमी ताई, मला रील क्वीन बनायचे आहे. मी काय करू?
उत्तर : माझ्या स्वप्नाळू बहिणी, सर्वात आधी म्हणजे ’डिजिटल डिटॉक्स’ कर. हे काय आहे ते माहिती नसेल तर गुगल कर, त्याची माहिती मिळव. डिजिटल डिटॉक्सच्या फावल्या
काळात माता अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासारख्या थोर आणी देवतुल्य मातांची चरित्रे वाच, त्यांचा अभ्यास कर. एकदा का हा वाचनाचा प्रवास सुरू झाला, की मग तो पुढे आनंदीबाई जोशी, मार्गारेट थॅचर, कल्पना चावला, पी. टी. उषा, अवनी चतुर्वेदी असा वाढवत ने. मधल्या काळात तुला पुन्हा हाच प्रश्न पडला, तर नक्की माझ्याकडे ये, मी संपूर्ण मार्गदर्शन करेन.
– रीअल क्वीन सोमीताई
कशासाठी उतरावे तंबू ठोकून?
प्रश्न : डिअर सोमी, मला एक ग्रुप चालू करायचा आहे. जिथे लोकांना जगभरातील ताज्या घडामोडी कळतील, आजूबाजूच्या समस्यांची जाण होईल. म्हणजे खरे तर समाजाला जाग येण्यासाठी काही करायचे आहे.
प्रामाणिक उत्तर : का?
तांत्रिक उत्तर : न्यूज अॅतपचे नोटिफिकेशन चालू ठेवले, तर सेकंदा सेकंदाला जगभरातील सर्व क्षेत्रातील घडामोडींची माहिती समोर येत असते. सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या सोसायटीच्या जोडीने आपल्या शहरात घडलेली देखील प्रत्येक घडामोड व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. सर्व काही इतके सुलभ आणि अधिकृत उपलब्ध होत असताना लोकांनी तुझ्या पेजवर का यावे?
मनातले उत्तर : सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवण्याची स्वप्ने बघणार्या लोकांबद्दल मला नितांत आदर आहे… जिथे जिथे हे लोक दिसतात, तिथे तिथे मी त्यांना ब्लॉक करते. या लोकांना पाहिले की मला नाना पाटेकरांचा क्रांतिवीर आठवतो. त्यातला तो सुप्रसिद्ध संवाद आठवतो, ’जो लोग गीता रामायण कुरान पढ़के नहीं जागे…’ खरे तर समाज झोपलेला आहे असे वाटणार्यांची स्वत:ची झोप पूर्ण झालेली नसते आणि त्यामुळे त्यांना असे भास होत असतात. निदान सोशल मीडियावर वावरणारा समाज झोपलेला आहे, मूर्ख आहे, पिचलेला आहे ही अंधश्रद्धा आहे. सोशल मीडिया हा मुळात भावनाशील आणि नाजूक हृदयाच्या लोकांसाठी बंद ठेवायला हवा आहे. इथे वावरणारा बहुतांश समाज दोन भागात विभागला गेला आहे. एकतर भोळे सावज किंवा मग दबा धरून बसलेले जनावर. या सावजांना कसलीही जाणीव नसली, तरी शिकार्यांना आजूबाजूला घडणार्या प्रत्येक गोष्टीची, होणार्या प्रत्येक हालचालींची जाणीव आहे. एकदा कमकुवत व्यक्ती टप्प्यात आली, की ताबडतोब ती व्यक्ती आणि तिचे लिखाण याची कशी शिकार होते ते बघा.
या शिकार्यांना तुमच्या ज्ञानाची काही गरज नाही आणि हेतूची पर्वा त्याहून नाही. सावजांना तुमचा काही उपयोग नाही. मग हा ग्रुप तुम्हाला चालू कोणासाठी करायचा आहे? का काही जणांना मोठे मोठे विचार मांडत असे ग्रुप चालू करायची आणि मग रोज नवा शिकारीचा खेळ बघत बसण्याची हौस आहे, तशी तुम्हाला देखील आहे? असे काही नसेल आणि तुम्हाला खरंच काही सद्हेतूने लोकांमध्ये जागृती करायची असेल तर इतर चांगला मार्ग शोधा. बहरलेल्या वृक्षाला देखील क्षणात वठवतील असे नाठाळ इथली प्रत्येव्ाâ जागा व्यापून बसले आहेत. हान, आता तुमच्यात महानाठाळ होण्याची आणि झुंडशाहीला, अंधविचारांना सामोरे जाण्याची हिंमत असेल, तर मग इथे एखाद्या कोपर्यात तुम्ही तुमच्या ज्ञानयज्ञाची सुरुवात नक्की करू शकता. मात्र हताश न होता कार्य सिद्धीस नेण्याचा खंबीरपणा अंगी हवा. एकदा का इरादा पक्का केलात आणि पहिले पाऊल उचललेत की मग, ’मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल मगर…’ हा अनुभव दूर नसेल.
– ठकास ठक सोमी