देशातला पहिला आणि उभ्या जगातला दुसरा अभिनेता, ज्याने आपल्या रंगभूमीवरल्या कारकिर्दीत दहा हजार प्रयोगांचा विक्रम पार केलाय, तो म्हणजे प्रशांत दामले! मराठी रंगभूमीवरला विनोदाचा बादशहा अशी ओळख त्याने ‘टुरटुर’पासून निर्माण केली आणि आता ‘सारखं काहीतरी होतंय!’ हे नवं कोरं नाटक हाऊसफुल्ल गर्दीत रसिकांना भरपेट हसवत तर आहेच, पण ते विचार करायलाही भाग पाडतेय…
‘प्रशांतचं नाटक’ एवढेच दोन शब्द बुकिंगवर पुरेसे ‘वसूल’ असतात, कारण त्याच्यावर प्रेम करणार्या एका पिढीच्या रसिकांनी ‘त्याचं नाटक आहे’ म्हणूनच आजवर नाटकाला गर्दी केलीय. त्यात भर म्हणजे ३६ वर्षापूर्वी ‘ब्रह्मचारी’ नाटकातली त्याची वर्षा उसगांवकरसोबतची जोडी या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रगटली आहे. तेव्हा कॉलेजात असलेला रसिक आता निवृत्तीला पोहोचला आहे आणि त्याच्या पसंतीचा शिक्का या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येतोय. हे भाग्य दुर्मिळ म्हणावं लागेल! या नाटकात केशव करमरकराचा मुखवटा परिधान करून चॉकलेट हिरो प्रशांत सज्ज झालाय. आजारी माणसाच्या गेटअपमध्ये ‘सारखं काहीतरी होतंय!’ असं त्याचं पालुपद सुरू आहे. त्याची पत्नी दिवंगत झालीय. तरुण मुलगी रूपल सोबत आहे. तिची परदेशात तीन वर्षांचं शिक्षण घेण्याची पूर्वतयारी सुरू झालीय. ‘एकमेव सोबत असणारी लाडाची मुलगी लंडनमुक्कामी जाणार आणि आपण एकाकी पडणार. काही बरंवाईट झालं तर…’ असा विचार केशव करतोय. ऑफिसातून निवृत्ती घेतलेला केशव मानसिकदृष्ट्या काहीसा थकलाय. त्याला एकाकीपणाच्या भयाने ग्रासलंय. त्यातूनच एकेका विनोदाची फवारणी होतेय.
कॉलेजातील मित्रांशी केशवचा संपर्क होतो. तो जाणीवपूर्वक इला कानविंदे या कॉलेजात त्याच्यासोबत नाटकात काम केलेल्या मैत्रिणीशी संपर्क साधतो. एवढेच नव्हे, तर तो चक्क तिच्या घरी पोहोचतो. ‘नाटकात नाटक’ रचण्याचा बेत ठरतो. इला ही घटस्फोटिता. तिचा श्रीमंत नवरा लग्नापुरता सोबत होता. आता एक आगाऊ ऐतिहासिक नाटकवेडा नोकर तिच्यासोबत आहे. त्या नोकराला तिने विक्रांत हे तिच्याच नवर्यातचे नाव दिलंय. त्या नवर्याला नावाने का होईना नोकर बनवलंय हे तिचं समाधान. इलाच्या घरी बेत ठरतो. नाट्य रचलं जातं आणि प्रत्यक्ष नाटकात नाटक सुरू होतं.
‘डॉक्टर कांचन भागवत’ या भूमिकेत शिरून इला तपासणी करण्यासाठी केशवच्या घरात पोहचते. मुलगी रूपलचं लंडनचं जाणं कसं रद्द करता येईल, त्या दृष्टीने एकेक प्रश्न पुढे उभे करण्यात येतात. आजार भयानक झालाय. गंभीर बनलाय. आता तर चोवीस तास रुग्णासोबत कुणाला तरी राहावे लागणार आहे, असेही डॉक्टर बनलेली इला सांगते. पण ते तिच्यावरच उलटते. ‘आमच्याच घरात राहून ट्रीटमेंट करा’ असा आग्रह रूपल धरते आणि या नाटकातल्या नाटकाला शेवटची कलाटणी मिळते. त्यातून समज-गैरसमज, फसवा-फसवी, साद-प्रतिसाद याभोवतीचा दे धम्माल प्रसंगक्रम आकाराला येतो. जो कधी हसवतो तर कधी रडवतोही!
प्रशांत आणि वर्षा हेच दोघे नाटकातले कलाकार असणार आहेत, हे डोळ्यापुढे पक्के ठेवूनच नाटककार, दिग्दर्शक संकर्षण कर्हाडे याने संहितेची जमवाजवी केलीय. दोघांचे ‘प्लस पॉईंट’ पुरेपूर लक्षात घेऊन प्रसंगाची गुंफण झालीय. प्रशांतचं गाणं यात आलंय, त्याची विनोदाची उत्तम जाण तसेच प्रसंगी हृदयस्पर्शी स्वगतातली हुकूमत- या सार्यांचे भान एकूणच त्याच्या केशव करमरकर या व्यक्तिरेखात ठळकपणे दिसतं.
वर्षा उसगांवकर एकेकाळची ग्लॅमरस अभिनेत्री. आज मालिकेत ‘सासू’च्या भूमिकेत चमकत असली, तरी तिचा चाहता वर्ग ‘ब्रह्मचारी’ नाटकातील तिच्या भूमिकेवर आजही भरभरून बोलतो. ते नाटक या जोडगोळीच्या कारकीर्दीतला एक महत्त्वाचा टप्पाच ठरलं आहे. जुन्या, दर्दी रसिकांपुढे या दोघांच्या आठवणींना उजळा मिळतो आणि नव्या रसिकांनाही त्यांच्यातल्या ‘ट्युनिंग’मधली जादू नजरेत भरते. प्रशांतचं देखणेपण आणि कायम प्रसन्नता, अभिनयातली निरागसता तर वर्षाचं सौंदर्य आणि अभिनयातली सहजता यामुळे त्यांनी कायम प्रेक्षकांवर अधिराज्य केलंय. डॉ. काशिनाथ घाणेकरानंतर प्रशांतकडे अढळ ‘हाऊसफुल्ल हिरो’ पद चालून आलंय, हेच खरे!
पाच पात्रांभोवती नाट्य उभं केलंय. दोघांव्यतिरिक्त घरकाम करणारी अम्मा ही टिपिकल असून ‘बोलबच्चन’ आहे. काहीदा घरातला तिचा वापर अतिरेकी ठरतो. या भूमिकेत पौर्णिमा केंडे-अहिरे या फिट्ट शोभून दिसतात. रूपल आजच्या महत्वाकांक्षी पिढीचे प्रतिनिधीत्व करते. सिद्धी घैसास हिने ती संयमाने उभी केलीय. इलाचा नोकर विक्रांत (राजसिंह देशमुख) याचा ऐतिहासिक नाट्यातील वावर हशे वसूल करतो. विनोदनिर्मितीच्या अनेक ‘नाटकी’ जागा त्याला मिळाल्या आहेत. प्रशांत आणि वर्षा यांच्यासारख्या तयारीच्या दिग्गज रंगकर्मीसोबत ही कलाकारांची टीम कुठेही कमी पडत नाही. सगळे मिळून दोन घटका मस्त करमणूक करतात. काहीदा हसता-हसता पुरेवाट होते! हुकमी हशा घेण्याचा त्यांचा आत्मविश्वास मानावाच लागेल.
नाट्यातल्या मोलकरणीला एवढं डोक्यावर घेतलं जातं की ती मालकिणीप्रमाणे वर्तन करते. आधी खरोखरच आजारी वाटणारा नंतर आजारपणाचं नाटक करतो. अशा काही शंका-कुशंका आणि काही निसटते दुवे आहेत, पण गुंतवून ठेवणार्या , बंदिस्त अशा या ‘वन मॅन शो’ पुढे त्या नाटक संपताना त्या पुरत्या संपलेल्या असतात. हेलावून सोडणारं केशवचं एक स्वगत. ज्यातून प्रशांतचं परिपूर्ण अभिनेता म्हणून दर्शन होते. हसून-हसवून थकविणारा हा रंगकर्मी रडवूनही घायाळ करू शकतो, याचा अनुभव पुन्हा मिळतो. जो या नाटकाच्या शेवटच्या प्रसंगातील उत्कर्षबिंदू ठरतो. केशव एकाकी. जगापासून दूर. दुःख-वेदना यांची अनामिक जखम भळभळतेय. तिची सल व्यक्त करण्याची संधी न मिळाल्याने ओसाड जगात वावरतोय… याबद्दलचा संवाद शोकात्म नाट्याकडे घेऊन जाणारा. ज्यातून मनाचा वेध नेमकेपणानं घेण्यात आलाय. हा प्रसंग हे नाट्य एका उंचीवर घेऊन जाते.
कल्पक नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी केशवच्या घरातला पॉश दिवाणखाना किचनसह उभारलाय. त्यातील जिने, दरवाजे, रंगसंगती चांगली जुळलीय. केशवच्या दिवंगत पत्नीचे मध्यभागीचे छायाचित्र बदलते ठेवले आहे. हे वेगळेपण मिश्कीलता आणणारे. अबोल फोटोही खुदकन हसवितो. दुसरा सेट हा गर्भश्रीमंत इलाच्या बंगल्याचा. तो एका प्रसंगापुरता असला तरी प्रिâज, सोफा, कपाट, चित्र याने सजविला आहे. भडक आकृतीबद्ध रंगरंगोटी चांगली वातावरणनिर्मिती करते. दोन्ही घरातल्या श्रीमंती थाटात कुठेही तडजोड केलेली नाही. निर्माताही प्रशांतच आहे! नाट्यनिर्मितीत व्यावसायिकता व प्रामाणिकता जपली आहे.
संगीत आणि प्रशांत यांचं घट्ट नातं आजवर अनेक नाटकाच्या निमित्ताने दिसलंय. अशोक पत्की यांचं संगीत हे नाटकात अनुरूपच. प्रशांतचा उपजत चांगला आवाज असल्याने दोन गाणी ताल धरायला भाग पाडतात. ‘ब्रह्मचारी’ नाटकातील गाण्यांपासूनची दोघांची ‘युती’ आहे. शास्त्रीय गाण्यांची पार्श्वभूमी नसतानाही प्रशांतचं नाटकात एखादं तरी गाणं असावं, अशी रसिकांची अपेक्षा असते, ती यात पूर्ण झालीय. किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना चांगली. अन्य तांत्रिक बाजू उत्तम. संकर्षण कर्हाडे याचे हे पहिलेच दिग्दर्शन हीदेखील नोंद घेण्याजोगी घटना. रसिकांची अपेक्षापूर्ती ही कशी होईल यावर एकूणच लक्ष केंद्रित करण्यात आलय. सुपरस्टार अनुभवी जोडजोळीला चांगले ‘प्रेझेंट’ केलय. अर्थात हे दोघे आजही उत्साही आणि तरूण वाटतात. या पहिल्या दिग्दर्शनानंतर संकर्षणकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आधी सूत्रसंचालक, निवेदक, नाटककार, अभिनेता आणि आता दिग्दर्शन असा चौफेर प्रवास झाल्याने या जबाबदारीत पडद्यामागे त्याने बाजी मारलीय.
एका घरातलं दोघांचं पण पूर्ण फसलेलं ‘नाटकातलं नाटक’ यात जरी असलं तरीही मस्त जमलेला नाट्यप्रयोग बघितल्याचे शंभर टक्के समाधान रसिकांना मिळते. आयुष्याकडे आत्मकेंद्रित नजरेतून न बघता आजच्या सुपरफास्ट युगात पुढल्या पिढीचे भवितव्य साकार होण्यासाठी प्रसंगी पालकांनी मन खंबीर ठेवण्याची तयारी केली पाहिजे, ही काळाची गरज आहे. बदलांना घाबरणे, मागेपुढे बघणे हा भेकडपणाच. बदलत्या काळात बिनधास्त सामोरं जाण्याचा, कणखरतेनं जगण्याचा एक वेगळा अन्वयार्थ यातील विषय-आशयातून मिळतो. आणि हे सारंकाही हसत-खेळत! कारण शेवटी मराठी रसिकांना रंगभूमीकडे वळविणार्या प्रशांत दामलेचं हे नाटक आहे!
सारखं काहीतरी होतंय!
लेखक/दिग्दर्शक – संकर्षण कर्हाडे
संगीत – अशोक पत्की
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
प्रकाश – किशोर इंगळे
कथासूत्र – निखिल माधव खैरे
सूत्रधार – अजय कासुर्डे
निर्मिती – प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन, गौरी थिएटर्स