‘भाऊबळी’ सिनेमा हे जयंत पवार या मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाच्या कथाकारानं त्याच्याच कथेचं केलेलं माध्यमांतर. जयंतला कथा लिहिण्यासाठी परकायाप्रवेश वगैरे जे खोटं बोललं जातं ते करण्याची गरज कधी भासली नाही. त्यानं जी कथा, जे नाटक लिहिलं, ते तो जगला होता. बी. रघुनाथनंतर थेट भाऊ पाध्ये, बाबूराव बागूल, अण्णाभाऊ साठे, जयंत पवार यांच्या कथा हे एसीमध्ये बसून नाही, तर त्या वस्तीत राहून केलेलं जगण्याचं चित्रण होतं. अशा कथेवर जेव्हा जयंतसारखा स्वतःच्या प्रेमात नसलेला कथाकार पटकथा-संवाद लिहितो तेव्हा ती कलाकृती ऊंची कशी गाठते हे पाहायचे असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा.
कथा साधी आहे. दोन वर्गाचा संघर्ष. जिजामाता नगर झोपडपट्टीत राहणारा बळी सिध्देश सोसायटीत दूध टाकत असतो. एक दिवस तो महिन्याचे बिल देऊ जातो, तर सोसायटीतील मंत्रालयात काम करणार्या भाऊ आवळस्करची पत्नी म्हणते हे दोन महिन्याचं बिल का दिलंस तू? मागच्या महिन्याचे पैसे दिले तुला. तो नाकारतो आणि मग हळू हळू एका बाजूला सोसायटी आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी असा संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष छान विनोदी पध्दतीने हाताळला आहे. संपूर्ण चित्रपटभर आपण जागोजागी जेन्युईन विनोदावर (पीजे वा भाषिक कोलांट्या वा आंगिक गुलाट्या नसलेला) हसत राहतो, पण चित्रपटगृहातून बाहेर पडताना लक्षात येतं की चार्ली चॅप्लीन त्याच्या चित्रपटात हसवत हसवत एक कारुण्यवेदना तुमच्या नसांत सोडून देतो, तसं जयंत पवारने तुम्हाला हसवता हसवता वर्गसंघर्षाचं भयानक वास्तव तुमच्यात सोडलं आहे. त्याचसोबत समाजातील मूर्ख कंगोरे खरवडून दाखवले आहेत. उदाहरणार्थ वाद झाल्यावर भाऊ आवळस्कर बळीनं दिलेला त्याच्या महाराजाचा प्रसाद त्याच्या तोंडावर फेकून मारतो. महाराज म्हणजे साक्षात दत्ताचा अवतार. त्या रात्री ते दत्तावतारात बळीसमोर प्रकट होतात म्हणतात सूड घे. इथे जयंत फक्त विनोद करीत नाही तर तुमच्या लक्षात आणून देतो की तुमचे देवही माफ करायला नाही तर सूड घ्यायला सांगतात (महाभारत रामायण इ.).
चित्रपटात तिसरी एक व्यक्ती आपल्या सरकारी व्यवस्थेचं प्रतीक आहे. इन्स्पेक्टर मारोतराव (हृषिकेश जोशी) नेहमी गरिबांना दोषी मानतो आणि पांढरपेशांना मदत करतो. पण पांढरपेशांनाही ही व्यवस्था कशी ओळखून असते, त्यांनाही तुच्छ वागणूक देते हे छान खोचकपणे दाखवलं आहे. हा इन्स्पेक्टर भाऊ आवळस्करचा साडू असतो. भाऊला त्याचा तिटकारा (जसा पांढरपेशांना व्यवस्थेचा तिटकारा), पण गरजेपोटी तो मदतीसाठी मोरोतरावकडे जातो आणि मारोतराव त्याला प्रत्येकवेळी ‘साडभाव’ हाक मारतो ती ऐकण्यासारखी. हृषिकेश जोशीनं तो शब्द असा अफलातून उच्चारला आहे की त्यातून दुसरंच काही मनात जाणवतं.
या चित्रपटात मला सगळ्यात जास्त आवडलेली जमेची बाजू म्हणजे या चित्रपटातील संवाद. बळीचा मुलगा शिकलेला पण राडा झाल्यावर तो उपलब्ध नसल्याचे कळल्यावर बळी म्हणतो, या शिकलेल्या लोकांचं असंच असतं कामाच्या येळेला सापडनार नाय. तर भाऊ त्याच्या साहेबांना म्हणतो ही वस्ती जोवर नाहीशी होत नाही तोवर देशाचं काही खरं नाही. जयंतच्या प्रत्येक कथेत अदृश्यात जयंत असतोच, तसा तो याही चित्रपटात आहे. रिटायर्ड जज भांडारकर एकदा भाऊ आवळस्कराना म्हणतो हे असं कवायती वगैरे करुन भीती पसरवण्यानं वातावरण बिघडत चाललंय, आतलं आणि बाहेरचंही. तुम्ही माफ करुन टाका. जाहीरपणे एकमकांना मिठी मारा. राजन भिसेंनी या भूमिकेतलं सटायर दाखवत छान हसवलं आहे. संपूर्ण चित्रपटभर उच्चवर्गीय श्रीमंत कुठेच नाही, कारण कोणत्याही संघर्षात तो वर्ग अदृश्य असतो. जोवर तोशीस लागत नाही, तोवर देश धर्म आणि माणूस मेला तरी हा वर्ग दृश्यमान होत नाही. तसंच या चित्रपटात होतं.
किशोर कदम आणि मनोज जोशी या गुणी अभिनेत्याविषयी बोलावं तितकं कमीच. प्रत्येक प्रसंगात मनोज जोशीनी मध्यमवर्गीयांचं अंगात धमक नसताना आवेशानं भांडणं दाखवलं, ते अप्रतिमच. किशोरनं समाजाच्या खिजगणतित नसलेला अगतिक बळीचा राग त्वेष दाखवताना कमाल केली आहे. एक प्रसंग लक्षात राहण्याजोगा. संतापलेला बळी भाऊच्या घरी जाऊन राडा करतो, तोडफोड करत एक फिशटँक फोडतो. पण त्यातला एक मासा जमिनीवर ऑक्सिजनविना तडफडताना पाहून शांत होतो. त्याला ती वेदना समजते. तो त्या माशाला उचलून पाण्यात सोडतो आणि जातो. दिग्दर्शक समीर पाटील यांनी ही चित्रभाषा अप्रतिम सादर केली आहे. सिनमाच्या पहिल्या फ्रेमपासून सिनेमा सामाजिक व्यवस्था आणि मध्यमवर्गीय मानसिकता तसेच झोपडपट्टीत राहणार्या लोकांची मखलाशी टिपत पकड घेतो ती सुटत नाही. यातील प्रत्येक पात्रवैशिष्ट्य दिग्दर्शकाने विचार करुन रंगवलं आहे अगदी वेशभूषेसह. विजय केंकरे एकदा कम्युनिस्ट मेनिफेस्टो वाचताना दिसतात आणि त्यांच्या मागे वा बाजूला पडद्याच्या फ्रेमच्या कोपर्यात लोकमान्य टिळकांचा पुतळा दिसतो. अशा केंकरेना जेव्हा आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे म्हणून जेव्हा फोन येतो तेव्हा ते म्हणतात आता दोन तीन लेख लिहून द्यायचे आहेत. त्यामुळे जमणार नाही, पण पत्रक बित्रक काढायचं असेल तर सांगा.
निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर यांचे कौतुक अभिनंदन आणि आभार. मराठीत एक अप्रतिम उपहास चित्रपट दिल्याबद्दल. असे वेगळा विचार देणार्या कलाकृती तन्मयतेने साकारण्यात त्यांचा हातखंडा आहे. भाऊबळी हा चित्रपट मराठी माणसाला पुन्हा थिएटरमध्ये खेचून आणेल हे निश्चित.