गेले तीन आठवडे ‘मार्मिक’मध्ये ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांची रसाळ, विचारप्रवर्तक कीर्तनं वाचली, खरंतर डोळ्यांनी ऐकली, गेल्या वेळी मुखपृष्ठावर विठुराया पाहिले, वारकर्यांच्या मनातलंच साकडं पाहिलं आणि माझ्या मनातल्या वारीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्याच इथे मांडतो आहे…
माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी… पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले… आषाढी एकादशीची वारी सुरू झाली की कधी दिवेघाटात तर कधी चांदोबाचा लिंब तर कधी सदाशिवनगर तर कधी अकलूज असे कुठे ना कुठे माऊलींना, तुकोबांना भेटण्यासाठी जात असे.
असाच तीन वर्षांपूर्वी देहूला गेलो. जगद्गुरू तुकोबारायांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार होती. देहूतील मित्र अशोकराव माझी वाटच पाहत होते. आम्ही तुकोबारायांच्या घरातील पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभे होतो. दर्शन झाले. अजून प्रस्थान सोहळ्यात वेळ होता. त्यामुळे देवळात विशेष गर्दी नव्हती. मी एका खांबाला टेकून बसलो. समोर विटेवर उभं असलेलं सावळं परब्रह्म- ज्याची सेवा खुद्द तुकोबारायांनी केलेली. मन भूतकाळात डोकावू लागलं. देहूला आषाढ मेघांनी घेरलं. तुकोबांचे वडील बोल्होबा आषाढी वारीची तयारी करू लागले. यावेळी छोटे तुकोबा पहिल्यांदा वारीला जाणार होते. बाराबंदी, पगडी, भगवी पताका घेऊन छोटा वारकरी सजला आणि पंढरपूरला वारीला जाण्यास सज्ज झाला पायी. सोबत वडील बोल्होबा, आणखी दोन चार वारकरी. पुढे त्यांना इतर वारकरी येऊन मिळू लागले. मुखी हरीनाम म्हणत त्यांनी देहू सोडला. पुढे वैष्णवांचा मेळा मोठा होऊ लागला. पुण्यनगरी ओलांडून सासवडी सोपानकाकांचे दर्शन घेऊन जेजुरीच्या भंडा-यात न्हाऊन वाल्ह्याच्या वाल्मीकींच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन नीरास्नानाचे पुण्य पदरात पाडून मंडळी वाखरीत पोहोचली. उद्या चंद्रभागेत स्नान आणि पांडुरंगाचे दर्शन.
तुकोबा रावळात शिरले. गरुडपारापाशी उभे राहून टाचा उंचावून हरिमुख पाहू लागले. गर्दी सरली. बोल्होबा, तुकोबा पांडुरंगासमोर उभे ठाकले. बोल्होबांनी बुक्क्याची दोन बोटं तुक्याच्या मस्तकावर रेखली. तुक्याच्या वाटचालीचे कष्ट नष्ट झाले. तो ते सावळं रूप भान हरपून पाहू लागला. पांडुरंगाचे आशीर्वाद मिळाले. छोटा तुक्या भविष्यातील जगद्गुरू तुकाराम महाराज होण्यास सिद्ध झाला…
…तुकोबा निघाले, मंदिरात एकच गलका झाला. मी भानावर आलो. पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. दुतर्फा बायाबापड्यांची गर्दी, मुखी हरीनाम, पालखीवर फुलांचा वर्षाव आणि तुकोबा पहिल्या विसाव्यासाठी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यासमोर विसावले… अल्ला देवे… अल्ला दिलावे… अल्ला दवा… अल्ला खिलावे… अल्ला बिगर नाहिं कोये… अल्ला करे सो ही होये… आरती झाली आणि तुकोबा पुण्यनगरीकडे मार्गस्थ झाले.
मीही पालखीची भक्ती शक्तीपर्यंत सोबत केली. तुकोबांचे बालमित्र संत जगनाडे तेली आणि तुकोबांचे शिष्य अनगडशहा बाबा अशा अवघी एकात्मतेची आनंदवारी. ती पुण्याकडे निघाली मी माघारी फिरलो. अंतर्बाह्य सुखावून आनंदून. परतीच्या प्रवासात ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष कानावर येत होता. सोपानदेव चौधरींचे शब्द कानी उमटत होते…
आली कुठुनशी कानी टाळ मृदुंगाची धून…
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून…
भूल नयनांची सारे मूक वाचा ये रंगात…
माझा देह झाला देहू तुक्याच्या अभंगात…