त्या बंद खोलीत चार माणसं होती, मात्र फक्त भिंतीवरच्या घड्याळाची टिक टिक तेवढी ऐकायला येत होती. तसे ते चारही जण प्रचंड उत्साही, सतत दंगा करणारे, पण आज प्रत्येकाच्या चेहर्यावर तणाव जाणवत होता. तब्बल दोन वर्षांनी ते एकमेकांना भेटत होते, पण त्याचा आनंद साजरा करण्याचा उत्साह देखील त्यांच्यात जाणवत नव्हता.
‘राकेश, तू कसा काय आलास?’ दाढी खाजवत अब्बासने विचारले आणि आपल्याच विचारात दंग असलेले इतर तिघे विलक्षण दचकले.
‘माझ्या मुलीचा फोटो मला पाठवण्यात आला होता. फोटोसोबत एक बंदुकीची गोळी. मी क्षणात काय ते समजलो. फोटोबरोबर एक चिठ्ठी होती आणि त्यात मला संध्याकाळी सहा वाजता इथे येण्याचा हुकूम होता. तुझे काय?’
‘सेम! अम्मीचा फोटो, बंदुकीची गोळी आणि हुकुमाची चिठ्ठी.’
‘मला दहा लाखाची रक्कम कबूल झालीये,’ हसन म्हणाला.
‘आणि मला पंधरा,’ शांतपणे राजन म्हणाला.
‘पण नक्की काम काय आहे? आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी आता हे सगळे सोडले आहे,’ थरथरत्या आवाजात राकेश म्हणाला. त्या चारजणांच्या टोळीतला सर्वात मोठा क्रूरकर्मा म्हणून हा राकेश एकेकाळी ओळखला जायचा, हे कोणाला खरे वाटले नसते अशी त्याची आजची अवस्था होती.
पुन्हा एकदा खोलीत तणाव पसरला आणि सगळे आपापल्या विचारात दंग झाले. तेवढ्यात राकेशच्या खुर्चीखालून एकदम मोबाइलची रिंग वाजायला लागली आणि सगळे पुन्हा एकदा दचकले. राजेशने त्याच्या खुर्चीखालचा टेपने चिकटवलेला मोबाइल काढला आणि ‘प्रायव्हेट नंबर’ लिहून आलेला कॉल रिसीव्ह केला.
‘फोन स्पीकरवर टाक,’ पलीकडून एका बाईचा आवाज आला आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला.
‘राकेश, हसन, अब्बास आणि राजन. एकेकाळी मुंबईत गाजलेल्या ‘सोनेरी टोळी’चे कर्ताधर्ता होतात तुम्ही. पण चिमणजी वेलजीच्या सराफी पेढीवरच्या दरोड्यात तुम्हाला अटक झाली आणि निर्दोष सुटल्यावर तुम्ही जणू नाहीसेच झालात,’ पलीकडची स्त्री शांत स्वरात म्हणाली आणि चौघे एकदम भूतकाळात शिरले.
तीन वर्षापूर्वी त्यांनी व्यवस्थित प्लॅन करून चिमणजीच्या सराफी पेढीवर दरोडा घातला होता. पण नेमका त्याच दिवशी चिमणजीने बराचसा माल दुसर्या पेढीवर हालवला होता. त्यामुळे थोडीफार कॅश आणि थोडे दागिने एवढेच त्यांच्या हाताला लागले. त्यात अजून दुर्दैव म्हणजे दुकानात विसरलेला मोबाइल घ्यायला चिमणजी मागचे दार उघडून आत शिरला आणि त्याने चौघांना बघितले. त्यावेळी झालेल्या झटापटीत चिमणजी मारला गेला आणि चौघे पळाले. पुढे संशयावरून अटक झालेल्यांमध्ये ते देखील होते. पण चोरी आणि खून ही त्यांची पद्धत नसल्याने पोलीस देखील गोंधळले होते. शेवटी दोन वर्षांनी संशयाच्या आधारे त्यांची मुक्तता झाली आणि चौघांनी चार मार्ग धरले ते परत न भेटण्यासाठी. आज पुन्हा एकदा ते एकत्र आले होते, खरे तर त्यांना एकत्र आणण्यात आले होते.
‘तू कोण आहेस?’ अब्बासने धाडस दाखवत विचारले.
‘अरे जा रे करायला, मी काय कोल्हापूरमध्ये ठेवलेली तुझी बाई वाटले का रे,’ त्या स्त्रीने संतापाने विचारले आणि अब्बास एकदम गोरामोरा झाला.
‘आम्हाला इथे का बोलावण्यात आलंय,’ राजनने नम्रपणे विचारले.
‘तीन वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेले काम तुम्हाला पूर्ण करायचे आहे.’
‘कोणते काम?’
‘चिमणजी वेलजीची फर्म पूर्णपणे लुबाडण्याचे,’ पलीकडून शांत स्वरात उत्तर आले आणि चौघेही दचकले.
‘काय?’ चौघेही एकत्रच किंचाळले.
‘पण आम्हीच का?’
‘कारण चिमणजीच्या दुकानाचा कानाकोपरा तुमच्या परिचयाचा आहे. तुम्ही त्यावेळी केलेला अभ्यास यावेळी देखील आपल्याला उपयोगी पडणार आहे.’
‘आणि आम्ही हे नाकारले तर?’
‘तर अब्बास, चिमणजीच्या खुनाचा भक्कम पुरावा माझ्याकडे आहे. तुम्ही इथून बाहेर पडण्यापूर्वी पोलीस इथे पोहोचतील, याची काळजी मी नक्की घेईन.’
चौघेही चांगलेच विचारात पडले. बोलणार्या स्त्रीच्या आवाजात जबरदस्त आत्मविश्वास जाणवत होता.
‘पण हे सगळे करणार कसे? त्यासाठी पुन्हा सगळे प्लॅनिंग करावे लागेल,’ राजनने विचारले.
‘नको, तुमचे मागचे प्लॅनिंग फारच सुंदर होते…’ कुत्सिपणे हसत ती स्त्री म्हणाली, ‘यावेळी प्लॅन माझा असेल आणि अमलात तुम्ही आणाल.’
‘पण या सगळ्यातून तुला काय मिळणार?
‘सूड! चिमणजीच्या पोराचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य बघायचे आहे मला.’
‘का? त्याने असे काय केले आहे?’
‘त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही! मुकाट फक्त सांगितलेले काम करायचे!’
‘पण नक्की प्लॅन आहे तरी काय?’
‘इथून बाहेर पडलात की दरवाज्यात एक पाकीट तुम्हाला मिळेल. त्यात एक लाख रुपये आहेत. आपापल्या घरी जा आणि एक महिन्यासाठी तुम्ही बाहेर जाणार असल्याचे कळवा. त्यांची व्यवस्था लावा आणि दोन दिवसांनी म्हणजे, सात तारखेला याच वेळी इथे हजर व्हा! आणि चुकूनही दगा देण्याचा विचार जरी मनात आला तरी…’ फोन कट झाला आणि चौघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिले.
‘च्यायला! एका बाईची ही हिंमत!’ अब्बास संतापाने थरथरत होता. मात्र अम्मीचा फोटो आठवला आणि तो क्षणात गार पडला.
‘अब्बास, ही बाई कोणी साधीसुधी वाटत नाही. आपले एक चुकीचे पाऊल आपल्याला पुन्हा कायमसाठी तुरुंगात घेऊन जाईल. सध्या ती म्हणतीये तसे करू, पुढे काही ना काही युक्ती आपल्याला सुचेलच,’ राजनची सूचना सर्वांना पटली आणि ते बाहेर पडले. फोनवर सांगितल्याप्रमाणे दारातच एक पाकीट त्यांची वाट बघत पडलेले होते.
– – –
संध्याकाळचे सहा वाजत आले आणि एक एक करत चौघेही पुन्हा त्या एका खोलीच्या घरात हजर झाले. घराचे दार मागच्या वेळेप्रमाणेच उघडे होते आणि आत चार खुर्च्या. त्यांनी आज सावधपणे सर्व घर तपासले. घरात एका माणसाला पुरतील अशाच वस्तू फक्त होत्या आणि एका खुर्चीखाली चिकटवलेला मोबाइल.
‘राजन तू काही माहिती काढलीस?’ राजेशने दबक्या आवाजात विचारले.
‘हे घर कोणा लखन पांडेने भाड्याने घेतलेले आहे आणि गेले पंधरा दिवस तो चोरीच्या गुन्ह्यात आत आहे. बाई भलती चतुर आणि कावेबाज आहे हे नक्की,’ राजनची माहिती संपली आणि फोन खणखणला.
‘चिमणजीच्या दुकानाची रचना आजही तशीच आहे जशी पूर्वी होती. चिमणजीच्या मूर्ख मुलाला धन्यवाद. चिमणजीच्या फर्मच्या मागे नुकत्याच एका भय्याने काही छोट्या खोल्या भाड्याने दिल्या आहेत. त्यातील एक खोली इतरांपासून दूर आणि चिमणजी फर्मच्या मागच्या भिंतीजवळ आहे, तिथे तुमची राहण्याची व्यवस्था केली आहे. इतर खोल्यांच्या बाजूला एक लोखंडाचे दुकान आहे, जिथे आठवड्यातून पाच दिवस रात्री माल उतरवला आणि चढवला जातो. रात्री सात ते नऊमध्ये हे काम चालते. या आवाजाचा फायदा घेऊन तुम्हाला त्या दोन तासात तुमच्या खोलीतून चिमणजीच्या दुकानाच्या आतापर्यंत एक भुयार खोदायचे आहे. खोदकामाचे साहित्य खोलीत ठेवलेले आहे. या घराच्या डाव्या कोपर्यात एक काड्यापेटी आहे, तिच्यात तुमच्या रूमची किल्ली ठेवलेली आहे. वेळच्या वेळी तुमच्याशी संपर्क साधला जाईल. आणि हो राजन, तुला काही माहिती हवी असेल तर थेट मला विचार. माझ्यामागे माझी माहिती काढायचा प्रयत्न करशील तर…’ पलीकडून अर्धवट वाक्य बोलून फोन ठेवला गेला आणि चौघेही चांगलेच हादरले.
– – –
आज त्यांना इथे राहायला येऊन बरोबर सतरा दिवस झाले होते. भुयाराचे काम जोमाने सुरू होते. अशातच सकाळी अब्बासला मॅडमचा फोन आला आणि सगळे एकत्र जमले.
‘काम कुठपर्यंत आले आहे?’
‘आज उद्यात काम पूर्ण होईल.’
‘रविवारी दुकान पूर्णवेळ बंद असणार आहे. आपल्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शनिवारी दुकानात शिरून सर्व माल लुटायचा आणि दुसरा दिवस उजाडायच्या आत तुम्ही आपापल्या घराकडे रवाना व्हायचे. कोणाला थोडा देखील संशय यायला नको आहे!’
‘आणि तुमचा हिस्सा?’
‘त्याची काळजी तुम्ही करू नका. थोड्या वेळात तुम्हाला कुरिअरने एक पार्सल मिळेल. त्यातली वस्तू फक्त परत येताना चिमणजीच्या काउंटरवर ठेवून या,’ वाक्य संपले आणि फोन शांत झाला. थोड्याच वेळात कुरिअरने पार्सल आले आणि त्यांनी ते उत्सुकतेने उघडले. आतमध्ये एक रिव्हॉल्व्हर शांतपणे पहुडले होते. चौघांनी आळीपाळीने ते हाताळून पाहिले. ते चक्क लोडेड होते. त्याचा तो थंडगार स्पर्श अंगावर काटा आणत होता.
– – –
शनिवारी रात्री आठच्या सुमारास राजन भुयारात चित्कारला आणि काम फत्ते झाल्याचे इतर तिघांनी ओळखले. वरचा माल, फरशा भसाभसा खाली कोसळल्या आणि काही मिनिटात बोगद्याचे तोंड मोठे करत चौघेही आत शिरले. अर्ध्या तासात त्यांनी हाताला लागतील ते सगळे दागिने गोळा केले. पण चिमणजीच्या पोराने सेफ मात्र नवी घेतलेली दिसत होती, ती मजबूत एक पुरुषी उंचीची सेफ पहारीच्या घावाला सुद्धा दाद देत नव्हती. शेवटी तिचा नाद सोडत चौघांनी खांद्यावरची पोती उचलली आणि परतीची वाट धरली.
‘अब्बास..’ राजनची हाक आली तसा अब्बास दचकला. मग पुन्हा मागे वळला आणि खिशातली बंदूक त्याने काऊंटरवर ठेवली. चौघेही पुन्हा भुयारात शिरले आणि त्याचवेळी सेफचा दरवाजा हळूहळू उघडायला लागला…
खांद्यावरचे ओझे खाली टाकत चौघांनी फरशीवर बसकण मारली आणि निवांत श्वास घेतला. वाटले नव्हते इतक्या सफाईने काम पार पडले होते. सुकलेला घसा ओला करण्यासाठी अब्बास माठाकडे वळला आणि त्याचवेळी दबक्या पावलांनी मागून भुयारातून आलेल्या काळ्या सावलीच्या हातातील बंदुकीचा चाप दोनवेळा ओढला गेला आणि आल्या त्याच वेगाने ती सावली पुन्हा मागे पळाली. नक्की काय घडले आहे ते समजायलाच अब्बासला काही क्षण लागले. त्याने मागे वळून पाहिले तर राकेश आणि हसन दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि राजन सुन्नपणे भुयाराच्या दिशेने पाहत होता. दोघांना भानावर येण्यासाठी बाहेरून येणारा सायरनचा आवाज पुरेसा होता. पण आता उशीर झाला होता. ते भानावर येऊन सावरेपर्यंत पोलीस दरवाजा तोडून आत दाखल झाले होते.
– – –
‘तुम्हाला आश्चर्य वाटेल किशनजी, आपापसातल्या भांडणात मारले गेलेले दोघे आणि हे पकडलेले दोघे अशा चौघांनाही मागच्यावेळी तुमच्या दुकानात चोरी झाली तेव्हाही संशयित म्हणून अटक करण्यात आली होती,’ इन्स्पेक्टरने माहिती दिली आणि त्याच्या समोर बसलेला तरूण आश्चर्याने दोघांकडे पाहत राहिला.
‘यांच्यातला कोणी ओळखीचा वाटतो का तुम्हाला,’ इन्स्पेक्टरने मेलेल्या हसन आणि राकेशचे फोटो किशनला दाखवले.
‘नाही.. या चौघांपैकी कोणालाच ओळखत नाही मी. कधी पाहिल्याचे देखील आठवत नाही.’
‘ठीक आहे, आमचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाला की, तुम्हाला कळवतोच.’
‘काही बोलले का हे?’
‘मूर्खासारखी माहिती देत आहेत. कोणा बाईने कामगिरी दिली, काळ्या सावलीने भुयारातून गोळी चालवली, आम्हाला कामगिरी दिली होती असल्या काय काय कथा रचत आहेत. चार दांडू पडले की होतील सरळ. दरोडा आणि खून अशा गुन्ह्यात आत जाणार आहेत ह्या वेळेला, ते पण पुराव्यासकट!’ दोघांकडे बघत रागारागाने इन्स्पेक्टर ओरडला आणि त्याचा निरोप घेत किशन बाहेर पडला.
किशन गाडीत बसला आणि शांतपणे त्याने मागच्या सीटवर डोके टेकवले. आज त्याचा सूड पूर्ण झाला होता…