घोडा हा अत्यंत देखणा प्राणी. हजारो वर्षांचा माणसाचा मित्र. माणसाचा पहिला मित्र कुत्रा असं म्हणतात. पण माणसाळवलेला घोडा हा उपयुक्त प्राणी. एका जागेवरून दुसर्या जागी प्रवास करण्याची गरज माणसाला जेव्हा निर्माण झाली, तेव्हा चपळ घोड्याकडे त्याचे लक्ष गेले असावे. तो लढाईसाठीही उपयुक्त आहे हे खूप नंतरचे. जेव्हा कोणत्याही स्वरूपाची वाहने नव्हती, तेव्हा पायदळ आणि घोडदळ एवढे दोनच शब्द सैन्यदलात प्रचलित होते. विशेष म्हणजे ऑलिंपिक दर्जाच्या स्पर्धेच्या खेळात माणसाशिवाय एकमेव प्राणी दाखल झाला तो म्हणजे घोडा. ईक्वेस्ट्रियन या नावाने घोडस्वारीच्या विविध स्पर्धा तिथे घेतल्या जातात.
जगात किती प्रकारचे घोडे आहेत याची गणतीच नाही. मात्र मराठमोळ्या तट्टूसारख्या चपळ घोड्यापासून धिप्पाड सहा फूट उंचीच्या अरबी घोड्यांपर्यंत विविध जातीचे घोडे भारतात सुद्धा पाहायला मिळतात. विशेषतः २६ जानेवारीच्या परेडसाठी भारताचे राष्ट्रपती जेव्हा येतात, त्यावेळेला त्यांचे वैयक्तिक दिमतीला असलेल्या गाडर््सचे घोडदळ भारतातील सारेच नागरिक अभिमानाने पहात राहातात.
आजच्या करिअर कथेमध्ये हा राजकारणातील घोडेबाजाराचा घोडा मधेच कसा काय घुसला आणि हे घोडे पुराण किती वेळ चालणार, असा प्रश्न वाचकांना कदाचित पडला असेल. तर आजचा आपला कथानायक घोड्यांच्या संगतीतच वाढला, लहानाचा मोठा झाला, एवढेच नाही तर घोड्यावर बसूनच त्याच्या करिअरचा प्रगतीचा वारू वेगाने दौडू लागला.
हा आहे समीर. त्याच्या वडिलांचा घोड्याचा पागा होता. उत्तम स्वरूपाचे घोडे पाळून लहान मुलांना, मोठ्यांना घोडस्वारीचे प्रशिक्षण ते देत असत. प्रशिक्षण घेणारा आणि प्रशिक्षण देणारा दोघेही पदरमोड करून ही हौस भागवत. हा उल्लेख अशासाठी की घोडस्वारीचे प्रशिक्षण घेणे ही बाब तशी महागडीच. रेस कोर्सवरचे घोडे वेगळे त्यांचे प्रशिक्षण वेगळे. त्यांच्या दिमतीला ठेवलेले साईस आणि त्यांच्या तब्येतीवर नजर ठेवून असलेले घोड्यांचे डॉक्टर हा सगळा कोट्यवधी रुपयांचा कारभार. पण समीरच्या वडिलांचा उद्योग रेसमधून काही मिळवणे असा नसून स्वत:ची हौस भागवणे व प्रशिक्षणातून मिळणार्या रकमेतून घोड्यांच्या देखभालीचा खर्च निभावणे असा थोडासा आतबट्ट्याचा म्हणावा लागेल. स्वतःचा व्यवसाय वेगळा, त्यासाठी देण्याचा वेळ वेगळा. मात्र घोड्यांसाठी वेळ काढणे हे पहाटे साडेचारपासून सुरू होत असे. दिवसभर पोटापाण्याचा व्यवसाय केल्यावर पुन्हा घोड्यांच्या देखभालीसाठी रात्रीच्या चारा पाण्यासाठी रोजच तासभर जात असे तो वेगळाच. शहराच्या हद्दीत घोडे पाळण्यास परवानगी नसल्यामुळे थोडे दूरवर घेतलेल्या एका छोट्या मोकळ्या प्लॉटवर या सार्या उद्योगाचा घाट मांडलेला होता.
समीरला एक मोठी बहीण. दोन्ही भावंडे लहानपणापासून वडिलांच्या बरोबर स्कूटरवरुन पावसापाण्यात, थंडीत, उन्हात हट्ट करून जात असत. कळत नव्हतं तेव्हा वडिलांच्या पुढे बसून घोड्याच्या दौडीला जाणे आणि कळायला लागल्यापासून लगाम हातात धरून छोटी रपेट करणे हा या दोघांचाही छंदच बनला होता. शाळा सुरू झाल्यावर मुलांनी शाळेकडे दुर्लक्ष करू नये म्हणून आईचा आटापिटा असे. त्याकरता तिचा ओरडा या तिघांना नेहमीच खावा लागे. दोघे अभ्यासामध्ये चांगली होती. पण घोड्यांच्या वेडापायी मुलांनी गुणांची सत्तरी जेमतेम कायम राखली होती.
दोन्ही मुले बारा आणि चौदा वर्षाची झाली असताना पुणे ते प्रतापगड घोड्यावरून जाण्याचा धाडसी कार्यक्रम वडिलांनी आखला. मुलांच्या दृष्टीने ते आकर्षण होते. वडिलांच्या दृष्टीने या मोहिमेसाठीचा पैसा उभा करणे हे एक मोठे आव्हानच होते. पण त्या आव्हानाला जोरदार पाठिंबा दिला एका रेसप्रेमींनी. स्वतःची एसी कंटेनर ट्रक गाडी त्यांनी यांच्या दिमतीला सोपवली. शिवाय प्रायोजकत्व पण घेतले. एसी कंटेनर गाडीमध्ये एकावेळी तीन घोडे उभे राहू शकत. घोड्यावरून जुन्या काळात प्रवास करत असताना एका दौडीचे टप्पे ठरलेले असत. एक तर त्यानंतर घोड्याला वा घोडेस्वाराला विश्रांती मिळे. तातडीचे असेल तर घोडा बदलून स्वार पुढे जात असे. या प्रवासाचे नियोजन असे केले की ही बहीणभावांची जोडी स्वार म्हणून कायम राहील आणि दमलेले घोडे कंटेनरमध्ये जातील, विश्रांती घेतील व टप्प्याटप्प्याने बदलले जातील. नियोजन झाले, तयारी झाली, मोठ्या दौडीसाठीची प्रॅक्टिस पण करायला सुरुवात झाली. दिवसाकाठी सहजपणे पन्नास किलोमीटरची रपेट करण्यात दोन्ही मुले तरबेज झाली होती.
प्रस्थानाचा दिवस उजाडला तोच मुळी कोसळत्या पावसातून. पुण्यात एवढा पाऊस तर वाटेतल्या महाबळेश्वरला किती असेल? पण नियोजन बदलणे तर काही शक्य नव्हते. मुलांना झेंडा दाखवून त्यांनी सोडले. पाहता पाहता वाई मागे पडली. आता पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. पसरणीच्या घाटात दौड करताना घोडे इतके तापले होते की त्यांच्या अंगावर पडणार्या पावसाच्या थेंबातून वाफा निघत होत्या. मुले भिजली नसली तरी थंडीने बर्यापैकी कुडकुडत होती.
पाहता पाहता महाबळेश्वर मागे पडले. उतारावर मजा येऊ लागली. दमदार पावसामुळे निसर्गसौंदर्य यात भरच घालत होते. आणि अखेर सायंकाळी प्रतापगडला सारी टीम पोचली. जाणकार मंडळी स्वागताला हजर तर होतीच, पण इतिहासप्रेमीसुद्धा कोसळत्या पावसात हे सगळे पाहण्यास जमले होते. पुणे ते प्रतापगड राजांनी प्रवास कसा केला असेल, अशा प्रकारच्या विविध आठवणी त्यावेळी निघाल्या. दुसर्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रात या जोडीच्या कामगिरीची बातमी फोटोसकट मोठ्या कौतुकाने छापली गेली. इतकी वर्षं पुण्यातील घोड्याच्या स्वारीचे प्रशिक्षण देणारे म्हणून प्रसिद्ध असलेले समीरचे वडील आता समीरचे बाबा म्हणून प्रसिद्ध झाले होते.
यथावकाश समीरचे व त्याच्या बहिणीचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. पदवी घेत असताना दोघांनीही एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्याचा फायदा घेऊन बहीण शॉर्ट सर्विस कमिशन घेऊन लष्करामध्ये दाखल झाली. समीरने वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालण्याचा वर्षभर पदवीनंतर प्रयत्न केला. पण त्यात मन रमत नाही म्हटल्यावर त्यानेही बहिणीचा मार्ग स्वीकारायचे ठरवले. त्याचीही निवड झाली. कठोर प्रशिक्षण सुरू झाले आणि एके दिवशी घोड्यावरून पडल्यामुळेच खांदा दुखावला व प्रशिक्षणातून त्याला बाहेर पडावे लागले. सगळ्यांनाच हा एक फार मोठा मानसिक धक्का होता. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उत्तम स्वरूपाचे उपचार मिळाल्यामुळे खांदा बरा झाला. पण त्या बॅचमधून प्रशिक्षणार्थी म्हणून त्याला बाहेर पडावे लागले.
समीर त्याचे आईवडील व कॅप्टन असलेली बहीण या प्रकाराने खूपच काळजीत पडले होते. पुन्हा वडिलांच्या व्यवसायात समीरला पडावे लागते का काय, हाही प्रश्न सार्यांच्या मनात होता. पण जिद्दीने व्यायाम पुन्हा सुरू करून हॉर्स रायडिंगची भरपूर प्रॅक्टिस करत समीरने जेमतेम सहा आठवड्यात पूर्ण फिटनेस गाठला. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर नवीन बॅचसोबत त्याची मुलाखत झाली व पुन्हा तो कोर्सला प्रशिक्षणासाठी म्हणून दाखल झाला.
गोल फिरून मूळ जागी
समीरच्या आयुष्यातला हा एक मोठाच आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणायला हरकत नाही. प्रशिक्षणात सगळ्यांनाच सगळी कौशल्ये आत्मसात करावी लागतात. पण समीरकडे असलेले घोडेस्वारीचे कौशल्य इतरांकडे असण्याची शक्यता नव्हतीच. अत्यंत कडक असे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी त्याला विचारले गेले की तुला कोणती रेजिमेंट काम करण्यासाठी आवडेल? क्षणाचाही विचार न करता त्याने जोधपूरच्या रॉयल हॉर्स रेजिमेंटचे नाव सांगितले. अर्थात त्याला ती मिळाली, पण या रेजिमेंटचे वैशिष्ट्य असे की सर्व स्वरूपाच्या घोड्याच्या मदतीने केल्या जाणार्या कसरतींचे खेळामध्ये या रेजिमेंटतर्पेâ निवडलेले अधिकारी भाग घेतात. समीरने कामाच्या पहिल्या वर्षातच अशा विविध खेळांत पदकांची लयलूट करण्यास सुरुवात केली. स्वाभाविकपणे कुठेही खेळाकरता टीम पाठवायची झाली तर त्याच्या नावाचा समावेश नकळत सुरू झाला होता. यानंतरचा समीरचा सगळा प्रवास मुख्यतः खेळाची प्रॅक्टिस, विविध स्पर्धांत भाग घेणे आणि अन्य वेळेला रेजिमेंटची कामे असा सुरू झाला. एका दिवशी अचानकपणे त्याला सांगितले गेले की यंदाच्या २६ जानेवारीच्या परेडमध्ये घोडदळ तुकडीचे नेतृत्व तुला करायचे आहे. कॉलेजमध्ये असताना एनसीसीद्वारे झालेल्या रिपब्लिक डे परेडमध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यासाठीची निवडप्रक्रिया किती स्पर्धात्मक असते, हे त्याला चांगलेच माहिती होते. त्या सगळ्या आठवणी त्याच्या मनात उचंबळून आल्या. पण या वेळेला राष्ट्रपतींना सलामी देण्याचे काम त्याच्याकडे होते. एवढेच नव्हे तर या तुकडीकडे सगळ्या देशाचे डोळे दूरदर्शनमुळे लागून राहिलेले असतात. डौलदार सजवलेले घोडे, त्यावरचे देखणे जवान या सार्या परेडची शोभा वाढवतात. हा मान समीरला मिळाला. यथावकाश प्रमोशनही मिळाले. दोनाचे चार हात होऊन छान सहचारिणी घरी आली. त्यानंतर समीरच्या मनातील एका अधुर्या स्वप्नाला गवसणी घालण्याचा क्षण अलीकडेच आला. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात निवडल्या गेलेल्या चमूमध्ये समीर व त्याचा एक दुसरा शाळामित्र असा दोघांचा चमू निवडला गेल्याची बातमी समीरच्या कुटुंबीयांना मिळाली.
लहानपणापासूनचा आवडता घोडा, त्यासोबतची सैन्य दलातील मानाची करिअर आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामधे त्याच खेळात भारतातर्फे सहभागी होण्याची संधी, असे तिहेरी यश जेमतेम तिशी ओलांडलेल्या समीरच्या हाती आले आहे.
तात्पर्य : अपवादात्मक असले तरी नशिबाची साथ असल्याने झालेल्या दुखापतीतून उभारी घेऊन पुन्हा सैन्यदलात मिळणार्या प्रवेशाचे सोने करणे सोपे नसते. म्हणूनच अपवादात्मक असली तरी समीरची ही क्रीडा कथा अनेकांना प्रेरणादायी ठरते.