काल आगरकरांची आठवण आली, ती अजून एका घटनेमुळे. दिल्लीत ’नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी’ आहे. किंवा होती. त्रिमूर्ती भवनात. या लायब्ररीत आगरकरांच्या ‘सुधारका’चे काही अंक आहेत. आगरकरांच्या हयातीतला संपूर्ण ‘सुधारक’ आज कुठेच उपलब्ध नाही. ‘सुधारकाच्या फायली हव्या आहेत’ या जाहिराती स्वत: आगरकरांनीच दिल्या होत्या. त्या फायली त्यांना मिळाल्या की नाहीत, हे ठाऊक नाही. पण काल ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी’ या संस्थेचं नाव बदलून ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ असं झालं. संस्थेच्या नावातून नेहरू आणि लायब्ररी हे दोन्ही शब्द उडवण्यात आले.
– – –
आज गोपाळ गणेश आगरकरांच्या मृत्यूला १२८ वर्षं पूर्ण झाली. आगरकरांची हल्ली कुणाला आठवण होण्याचं फारसं कारण नाही. त्यांचे उल्लेख मुख्यत: होतात ते टिळकांच्या संदर्भात- टिळकांचे मित्र किंवा टिळकांचे विरोधक, म्हणून. सुधारक, बुद्धिप्रामाण्यवादी वगैरे शब्द आले की आपण थेट सावरकरांचा उल्लेख करतो. फारतर र. धों. कर्वे. आगरकर कुणाच्या खिजगणतीत नसतात. काल ’आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यावर ‘लोकमान्य’ आठवला. त्यातले आगरकर बघून वाईट वाटलं होतं. विश्राम बेडेकरांनी ‘टिळक आणि आगरकर’ लिहिलं, तेव्हा य. दि. फडके त्यांच्यावर संतापले होते. नाटकात आगरकरांवर तुम्ही अन्याय केला, असा त्यांचा आरोप होता. आता यदि नाहीत, आणि खुद्द यदिही आता अनेकांनी निकालात काढले आहेत.
काल आगरकरांची आठवण आली, ती अजून एका घटनेमुळे. दिल्लीत ’नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी’ आहे. किंवा होती. त्रिमूर्ती भवनात. या लायब्ररीत आगरकरांच्या ‘सुधारका’चे काही अंक आहेत. आगरकरांच्या हयातीतला संपूर्ण ‘सुधारक’ आज कुठेच उपलब्ध नाही. ‘सुधारकाच्या फायली हव्या आहेत’ या जाहिराती स्वत: आगरकरांनीच दिल्या होत्या. त्या फायली त्यांना मिळाल्या की नाहीत, हे ठाऊक नाही. ज्ञानप्रकाशाच्या कचेरीत मोठी लायब्ररी होती. तिथे १८४०-५० सालापासूनची सारी वर्तमानपत्रं जपून ठेवली होती. २६ मे, १९२६ रोजी इमारतीला आग लागली आणि सगळी वर्तमानपत्रं, पुस्तकं नष्ट झाली. त्यात तिथे असलेला ‘सुधारक’ गेला, ‘ज्ञानप्रकाश’ व इतर असंख्य वर्तमानपत्रं गेली. त्या जागी मग किबे लक्ष्मी थिएटर सुरू झालं. न. र. फाटकांच्या संग्रहातले काही अंक दिल्लीत जपून ठेवले आहेत.
फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीतल्या जयकर कलेशनमध्ये मला काही वर्षांपूर्वी ’सुधारका’चे काही अंक अतिशय वाईट अवस्थेत कपाटांच्या वर ठेवलेले दिसले होते. ते कॉलेज आगरकरांनीच सुरू केलेलं आहे. ते काही काळ तिथले ‘प्रिन्सिपॉल’ होते. पण ‘सुधारक’, आणि ‘केसरी’ही कचर्यात होते. हे अंक प्लीज नीट जपून ठेवा, अशी विनंती मी केली होती. पुढे काय झालं, माहीत नाही.
दिल्लीच्या लायब्ररीत आगरकरांची काही पत्रंही आहेत. त्यांच्या अकोल्याच्या मामांच्या संग्रहातली ही पत्रं आहेत. ‘दोन रुपये मिळाले तर अजून काही महिने जिवंत राहू शकेन’, असं पत्रात लिहिणारे आगरकर पुण्यात एलफिन्स्टन कॉलेजाच्या तोडीची लायब्ररी असावी, अशी स्वप्नं बघत होते. पंडिता रमाबाईंच्या संस्थेची माहिती मामांना कळवून आपल्या विधवा मामेबहिणीला पुण्याला शिकवायला आणू पाहत होते. ‘ती शिकली नाही, तर तिच्या हाती जन्मभर पोळपाट-लाटणे येईल’, असं कळवळून सांगत होते. त्याच वेळी टिळक त्यांच्याशी बक्षिसादाखल मिळालेल्या पाचशे रुपयांवरून भांडत होते. ‘आजसे तुम्हारी मेरी दोस्ती खत्म’, असं आपल्या मित्राला सुनावत होते. ‘मित्राशी भांडण झालं नसतं, तर हे जास्त जगले असते’, असं यशोदाबाई आगरकरांनी नंतर लिहिलं.
तर, काल ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी’ या संस्थेचं नाव बदलून ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड सोसायटी’ असं झालं. संस्थेच्या नावातून नेहरू आणि लायब्ररी हे दोन्ही शब्द उडवण्यात आले.
मी गेली काही वर्षं नियमितपणे तिथे संदर्भ शोधायला, तपासायला जातो. तिथले कर्मचारी अत्यंत सौजन्यानं वागतात. सर्व प्रकारची मदत करतात. गेल्या काही वर्षांत या लायब्ररीला मिळणार्या निधीत मोठी कपात करण्यात आली आहे. तिथे जुनी वर्तमानपत्रं मायक्रोफिल्म्सच्या रूपात साठवून ठेवली आहेत. ती बघायला चौदा मशिनं आहेत. पूर्वी दोनतीन बिघडलेली असायची. बल्ब जायचे. पण लगेच दुरुस्तीही होई. या वेळी मार्च महिन्यात गेलो, तर फक्त तीन मशिनं सुरू होती. त्यामुळे मोठी प्रतीक्षा यादी होती. माझ्याकडे दोन आठवडे होते. दुपारी तीन वाजेपर्यंत इतर काम संपवून मी लायब्ररीत जातो. कोपर्यातलं एक तुटकं यंत्र होतं, जे फक्त उलट्या दिशेनं सुरू होतं. माझी निकड आणि हातात असलेला कमी वेळ बघून मी त्यावर काम केलं.
गेल्या पाचसहा वर्षांत यंत्रांच्या दुरुस्तीसाठी पैसा येणं बंद झालं आहे. लायब्ररीत पुस्तकांची मोजकी पानं फोटोकॉपी करून घेण्याची सोय होती. एक सरदारजी हे काम करत. कोव्हिडनंतर त्यांचं कंत्राट रद्द केलं गेलं. जुने कर्मचारी निवृत होत आहेत. पिरिऑडिकल सेक्शनच्या इनचार्ज मंजू
मॅडम होत्या. मला व माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी खूप मदत केली. त्या मी तिथे असताना निवृत्त झाल्या. जुने कर्मचारी निवृत्त होत असताना नवीन कर्मचार्यांची भरती बंद आहे. त्यामुळे अनेक कामं रखडतात. तरुण कर्मचार्यांना भीती वाटते, लायब्ररी बंद होण्याची, किंवा त्यांच्या जागी कंत्राटी कर्मचार्यांच्या नेमणुकीची.
लायब्ररी पूर्वीच्या त्रिमूर्ती भवनाच्या परिसरात आहे. त्रिमूर्ती चौकाचं नाव मागेच बदललं. नेहरूंचं म्युझियम होतं, तिथे ‘प्राईम मिनिस्टर्स म्युझियम’ झालं. गेटातून आत शिरल्यावर डावीकडे दाट झाडी होती. पन्नासेक मोर नक्की असतील. आता ती झाडं कापून तिथे वाहनतळ बांधलं आहे. उजवीकडची झाडं कापून तिथे तिकीट खिडकी बांधली आहे. मोर कुठे गेले, माहीत नाही. आता एखादा दिसतो.
रात्री ’साउंड अँड लाईट शो’ असतो, अंतरिक्ष विज्ञानातील प्रगतीला वाहिलेला. वेळ नसल्यानं ठरवूनही जाता आलं नाही. सात वाजता लायब्ररी बंद झाल्यावर पुन्हा गेस्ट हाऊसला जाताना अमिताभच्या आवाजात शो ऐकू येई. आजवरच्या आपल्या सर्व कामगिरीचं श्रेय केवळ एका व्यक्तीच्या पदरात टाकलेलं जाणवे.
लायब्ररीचं उत्तम खाद्यगृह होतं. राजमा चावल, कढी चावल, गाजर हलवा, गुलाबजाम असे कितीतरी पदार्थ उमदे मिळत. आता दिवसभर समोसा किंवा कचोरी आणि दुपारी जेवायला डाळभात एवढंच मिळतं.
लायब्ररीची वाईट स्थिती बघून एकदा तिथल्या काही कर्मचार्यांना विचारलं, सुरू राहील ना ही लायब्ररी? एक बाई म्हणाल्या, पता नहीं… आप अपना सुधारक और ज्ञानप्रकाश और सुबोधपत्रिका सारा कॉपी करके पुना ले जाईये…
सरकार ही वर्तमानपत्रं ऑनलाइन अपलोड करणार आहे, असं ऐकून आहे. पण ते कधी, हे कोणालाच माहीत नाही. आणि तिथल्या खाजगी कागदपत्रांचं काय? कोणी म्हणतं, सगळं नॅशनल आर्काइव्हजला जाणार आहे.
शेवटच्या दिवशी मंजू मॅडमच्या जागी आलेल्या बाईंना म्हटलं, चलता हूं, सप्टेंबर में आने की कोशिश करूंगा. त्या म्हणाल्या, देखते है, अगर हम और ये किताबे और ये आपका सुधारक, यहीं रहते है, तो जरूर मिलेंगे.
बाहेर पडताना डोळ्यात पाणी होतं.
संस्था उभ्या करणं कठीण, बंद करणं सोपं. शेकडो पत्रं, रिपोर्ट, वर्तमानपत्रं कुठे ठेवली जातील? नव्या बांधकामात नॅशनल आर्काइव्ह्जमधली कागदपत्रं खराब झाली, असं ऐकू येत होतं. मग त्या बातम्याही बंद झाल्या.
काल लायब्ररीचं नाव बदललं, नावातून नेहरू काढले, त्याचं नवल वाटलं नाही. ते होणार होतंच. पण लायब्ररी हा शब्दही काढून टाकला, याचं अतोनात दु:ख झालं.
आज आगरकरांची पुण्यतिथी. त्यांचा ’सुधारक’ आणि इतर वर्तमानपत्रं, इतर संदर्भसाहित्य सुखरूप राहो, एवढीच इच्छा आहे.