`बेळगांव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…’, `कोण आला रे कोण आला… समितीचा सिंह आला…’, `अरे कोण म्हणतंय देत नाई… घेतल्याशिवाय राहत नाई…’ अंगात एक वेगळंच वारं संचारू देणार्या या घोषणा आणि त्यातल्या `झालाच पाहिजे’ हा `च’वरचा जोर आणि जोश कित्येक वर्षांनी पुन्हा बेळगांव आणि सीमाभागात घुमू लागला आहे. निमित्त आहे बेळगांव लोकसभेच्या पोटनिवडणुकीचं.
कोणतीही चळवळ किंवा संघटना म्हातारी झाली की ती संपण्याच्या धोका वाढतो. कोणत्याही सजीव गोष्टीबाबतचा सृष्टीचा नियमच संघटना किंवा चळवळीलाही लागू पडतो. म्हणून चळवळ किंवा संघटना नेहमी तरुण राहिली पाहिजे, तिचं सरासरी वय २५ ते ३० असायला हवं.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यातून पुढे सीमाभागात (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमाभागाला `कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र’ असा यथार्थ शब्दप्रयोग दिला आहे) स्थापन झालेली महाराष्ट्र एकीकरण समितीदेखील सृष्टीच्या या दुष्टचक्री नियमात अडकली होती. पण बेळगांव लोकसभेच्या पोटनिवडणुकीने म.ए.समितीचं वय पुन्हा थेट पंचवीस करून ठेवलं आहे आणि त्याला कारणीभूत ठरला आहे, शुभम विक्रांत शेळके हा अवघा पंचविशीतला मराठी तरूण.
सार्या देशाचं लक्ष बंगालच्या निवडणुकीकडे असताना अवघ्या मराठी माणसाचं लक्ष वेधून घेतलं आहे ते बेळगावच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीने. कारण देखील तसंच आहे. गेल्या ६५ वर्षांपासून सुरू असलेल्या आणि हल्ली काही वर्षात मरगळ आलेल्या सीमालढ्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला एक वेगळंच महत्व आलं आहे. भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर बेळगांववर तसा मराठी माणसांचा म्हणजे महाराष्ट्राचा हक्क, पण दिल्लीला असणारा महाराष्ट्राबाबतचा पोटशूळ आडवा येऊन बेळगांव कर्नाटकला देण्यात आलं आणि त्यानंतर बेळगांव भागात स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ (तेही लोकशाही मार्गाने) चाललेल्या लढ्याला सुरवात झाली आणि अद्यापही तो लढा सुरूच आहे. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, पण इथल्या मराठी माणसांची इच्छा आजही महाराष्ट्रातच येण्याची आहे. इथल्या मराठी माणसांच्या दोन पिढ्यांनी हा लढा अगदी शेकडो हुतात्मे देऊन जिवंत आणि ज्वलंत ठेवला. पण आजच्या तरुण पिढीला मात्र या लढ्याबाबत सोयरसुतक नाही, असं चित्र गेल्या काही वर्षांत निर्माण झालं आणि ते वास्तव देखील होतं, त्याला अनेक कारणं होती. यातूनच पुढे भाजपच्या राजकीय हिंदुत्वाच्या आहारी इथली तरुण पिढी गेली आणि सीमालढा उत्तरोत्तर म्हातारा होऊ लागला. महाराष्ट्र एकीकरण समिती हा काही राजकीय पक्ष नव्हे, पण एकेकाळी विधानसभेला बेळगांव आणि परिसरातील विधानसभेच्या पैकीच्या पैकी जागा म्हणजे सहा आमदार निवडून आणणार्या म.ए.समितीमध्ये पुढे राष्ट्रीय पक्षांच्या अवकृपेने दुही माजली आणि एकीकरण समितीची बेकीकरण समिती कधी झाली ते मराठी माणसाला देखील समजलं नाही. गेल्या कित्येक लोकसभा निवडणुकीत म.ए. समितीने उमेदवारदेखील दिलेला नव्हता. आज कर्नाटक विधानसभेत एकही आमदार समितीचा नाही, इतकंच काय तर इथे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यावर होणार्या अत्याचाराबाबत आवाज उठवणारा एकही आमदार नाहीय. मराठी तरूणांच्या मतांवर निवडून आलेले राष्ट्रीय पक्षांचे चारही आमदार या अत्याचारांबाबत अवाक्षरही बोलत नाहीत. मराठी मातीशी हे एक प्रकारचं बेईमान होणंच आहे.
मराठी माणसाच्या दृष्टीने निराशामय असलेल्या या वातावरणातच इथल्या काही तरुणांनी एकत्र येऊन म.ए. समितीच्या युवा समितीची स्थापना केली आणि मराठी भाषेची गळचेपी आणि माणसांवर होणार्या अत्याचाराबाबत जोरदार आवाज उठवायला सुरुवात केली आणि त्यातूनच शुभम शेळके या अवघ्या २५ वर्षाच्या एका मराठी तरुणाला आज अवघा सीमाभागच नव्हे, तर महाराष्ट्रासह जगभरातील मराठी माणूस ओळखू लागला आहे. परवापरवापर्यंत बेळगांव वगळता इतरत्र कोणालाही माहिती नसलेला शुभम आज महाराष्ट्रात व सीमाभागात सीमालढ्याचं तरूण नेतृत्व म्हणून ओळखला जाऊ लागलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून शुभम आज भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना तगडं आव्हान देतो आहे. शुभमच्या उमेदवारीमुळे सीमा लढा आता तिसर्या पिढीच्या हातात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमधल्या दुहीचा फायदा घेत इथल्या `कर्नाटक रक्षा वेदिके’सारख्या भंपक संघटनांनी सरकारच्या आशीर्वादाने धुड्गूस घालायला सुरवात केलेली आहे आणि त्यातून होणार्या दंगली आणि आंदोलने यामुळे शेकडो मराठी माणसांवर पोलीस केसेस दाखल झाल्या आहेत. कानडी पोलिसांचा अमानुष अत्याचार मराठी माणसांना झेलावा लागत असल्याने पुन्हा एकदा तरूण पिढीने नव्याने सीमालढा उभारण्याची गरज निर्माण झाली होती आणि शुभमच्या उमेदवारीने त्याला बळ मिळालं आहे.
शुभमच्या प्रचाराला तरुणांचा मिळणारा प्रतिसाद अगदी अविश्वसनीय वाटावा असा आहे. हा प्रतिसाद फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नाही, तर रस्त्यावरदेखील त्याच जोशात प्रचार सुरू आहे. प्रचारसभा आणि रोड शोमधलं भगवं वातावरण म.ए. समितीच्या बुजुर्गांना देखील नवीन बळ देणारं आहे आणि त्यातूनच ९० वर्षांचा म्हातारा ते नऊ वर्षांचं शाळकरी पोर आणि शुभमच्या वयाच्या तरुणांची फौज या तिन्ही पिढ्यामध्ये समन्वय साधत सीमालढ्याची तुतारी नव्याने फुंकली गेली आहे. सीमालढ्यातली `बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…’ ही गाजलेली घोषणा अगदी इथल्या सर्व मराठी माणसांच्या तोंडी पुन्हा घोळवण्याचं काम आणि त्यातून सीमालढ्याचं स्फुलिंग पुन्हा मराठी मनांत चेतवण्याचं काम शुभमच्या उमेदवारीने केलं आहे.
शिवसेनेने बेळगांव सीमाप्रश्नी मोठी लढाई लढली आहे आणि अजूनही लढत आहे, शिवसेनेने या लढ्यात हुतात्मे दिले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना याच लढ्यादरम्यान तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली. त्यामुळे शिवसेना नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी असते. या निवडणुकीत देखील शिवसेनेने समितीला सक्रिय पाठिंबा दिला आहे. इतकंच नव्हे, तर सेनेचे राज्यसभा खासदार आणि तेजतर्रार नेते संजय राऊत, खासदार धैयशील माने हे दोन दिवस बेळगावला तळ ठोकून होते. त्यांच्या रोड शो व संयुक्त महाराष्ट्र चौकातल्या सभेला मिळालेला प्रतिसाद विरोधकच नव्हे, तर स्वकीयांना देखील तोंडात बोटं घालायला लावणारा होता. शरद पवारांनी देखील वेळोवेळी या लढ्यात सहभाग दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील महाराष्ट्रातून बेळगावात प्रचारासाठी येऊन गेले आहेत. सीमाप्रश्नी असं एकमत होत असताना भाजपचे नेते मात्र मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करून खाल्ल्या घरचे वासे मोजत आहेत. असो!
सीमालढा ऐन जोशात होता त्यावेळी म.ए. समितीची निवडणुकांतील निशाणी होती `डरकाळी फोडणारा सिंह’. महाराष्ट्रात शिवसेनेची राजकीय चिन्ह धनुष्यबाण असलं तरीही `डरकाळी फोडणारा वाघ’ हीच शिवसेनेची खरी निशाणी आहे. अगदी तशीच म.ए.समितीची निशाणी होती `डरकाळी फोडणारा सिंह. ही निशाणी पाहूनच मराठी माणसांमध्ये उत्साह संचारायचा. पुढे हे चिन्ह गोठवण्यात आलं आणि म.ए.समितीला वेगवेगळी चिन्हं मिळायला लागली. यावेळी मात्र कर्मधर्मसंयोगाने म्हणा किंवा तरुणांनी नव्याने उभारलेल्या लढ्याला इतिहासाने दिलेलं बळ म्हणा, शुभमला निवडणूक चिन्ह मिळालं `डरकाळी फोडणारा सिंह’, आणि या चिन्हाचा महिमाच असा की, या चिन्हामुळेच बेकी झालेल्या समितीमध्ये पुन्हा एकीचं वारं वाहू लागलं आहे. संवैधानिक मार्गाने आपला लढा लढणार्या म.ए.समितीला आज खमक्या आणि युवा नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या तगड्या फौजेची गरज आहे. शुभमच्या रूपाने त्यांना लीडर सापडला आहे. आता लढ्यात लीड कसं नि किती घ्यायचं हे फक्त नेत्यांनीच नव्हे, तर सीमाभागातल्या प्रत्येक मराठी माणसाने ठरवायचं आहे.
निकाल जो लागायचा तो लागेल, पण सीमाप्रश्न आता तिसर्या पिढीच्या हातात आला आहे, आज प्रत्येक तरूण या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होतोय. इतकंच नव्हे तर पदरमोड करून प्रचार देखील करतोय. सीमाप्रश्न हाती आला की त्यावर उत्तर शोधणं हेच त्या लढ्यासाठीचं बळ ठरेल… आणि त्यावरचं उत्तर आहे की सीमाभागातल्या प्रत्येक निवडणुका मराठी माणसाने एकीने लढवल्या पाहिजेत आणि जिंकल्याही पाहिजेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी सीमाप्रश्नाबाबत ठराव संमत होत असतो, कारण बेळगांव हे मराठी संस्कृती-भाषा-साहित्य याचं संगोपन करणारं शहर आहे. इतक्या वर्षांच्या कानडी अत्याचाराला पुरून उरत इथल्या मराठी माणसांनी ते संगोपन सुरूच ठेवलं आहे… पोटनिवडणूक ही एक संधी आहे… दिल्ली दरवाजा ठोठावण्याची…नव्हे उघडण्याची!
– सुहास नाडगौडा
(लेखक मुक्त पत्रकार आहेत)