ती म्हणते, ‘शोधू मी कशी कुठे प्रिया तुला’; पण माझं नाव तर सुरेश आहे आणि प्रिया तर तिच्याबरोबरच असते रोज. काय करायचं आता?
सुरेश वैराळे, बेलापूर
– पण तुम्हाला का वाटतंय की, ती तुम्हालाच शोधतेय म्हणून? तुमचं नांव काही का असेना, ती खरंतर प्रियालाच शोधते आहे.
कोरोनाने शूटिंग बंद पाडलं. तुम्हीही घरात बंदिवान असाल. हा काळ कसा सुसह्य करायचा. काही टिप्स द्या.
शैलेश कांबळे, घोरपडी पेठ, पुणे
– कलावंताला दोन फुफुसं जी मिळालेली असतात त्याचं मुळात फंक्शन कायमचं समजून घ्या. एक फुफुस श्वास घेण्यासाठी आणि दुसरं वाट बघण्यासाठी.
फेसबुकवर दुसर्यांच्या पोस्टींवर अचकट-पाचकट-हलकट कमेंटी करणार्यांची प्रोफाइल नेहमी लॉक्ड असतात. आपलं झाकून ठेवणारे नेहमी इतरांचं वाकून का पाहतात?
श्रीधर परब, भायंदर
– भेकडांचं वैशिष्ट्यच आहे ते. त्यांना उजळ माथ्याने वावरता येत नाही.
तुम्ही, अमृता सुभाष, जितेंद्र जोशी आणि असे अनेक गुणी मराठी कलावंत आज ओटीटीच्या जगात हिंदीमध्ये जबरदस्त भूमिका साकारत आहात. पण तुम्ही सगळे प्रमुख भूमिकांमध्ये कधी झळकाल हिंदीत? आम्ही उत्सुकतेने वाट पाहात आहोत.
राजश्री साने, डोंबिवली
– आपल्या सदिच्छा अशाच टिकून राहोत. वह सुबह कभी तो आयेगी!
‘आईचा घो, आईचा घो येडा झाला का रे’ हे गाणं कुणाला उद्देशून असेल असं वाटतं तुम्हाला?
माया थोरात, कोल्हापूर
– एकास एक याप्रमाणे सरासरी शेकडा १०० टक्के लोकांसाठी वापरलं जाणारं गाणं आहे हे.
अभिषेक बच्चन कसा आहे हो माणूस म्हणून? त्याला मराठी येतं का थोडं तरी?
अशोक सहस्रबुद्धे, चिपळूण
– अभिषेक बच्चनही एक माणूसच आहे. आणि मुंबईत वाढलेल्या बहुतांशी बर्याच तरुण हिंदी नटांना मराठी व्यवस्थित समजतं आणि खासगीत ते थोड्या प्रमाणात बोलतातही. अमिताभ बच्चन रोज रात्री मराठी वाचतात असं अभिषेक यांनी मला स्वतः सांगितलं आहे.
काही लोक ब्रेक द चेन मोहीम राबवणार्या सरकारचे चेक द ब्रेन असं म्हणतायत़… त्यांना नेमका कोणता आजार झाला असेल?
बंडू डोंगरे, बेळगाव
– हल्ली सगळ्यांनाच चेक द चेन ऐवजी ब्रेक द ब्रेन नावाचा आजार झाला आहे.
तुम्ही किंवा कोणतेही अभिनेते हुकमी अभिनयात नेत्यांची बरोबरी करू शकाल असं वाटतं का?
श्रद्धा सोनवणे, भिगवण
– वाटत नाही.
पोलीस म्हणतात घरात बसा, बायको म्हणते, तोंड काळं करा इथून. आता काय करू?
सिद्धेश ननावरे, सोलापूर
– तिच्यासाठी एकवेळ तोंडाला प्रत्यक्षात काळं फासून घ्यावं लागलं तरी चालेल, पण घरातच थांबा. म्हणजे बाहेर आपली धिंड निघाली असंही होणार नाही.
तुम्हाला घेऊन दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’चा रिमेक करायचा विचार आहे.. मुंबईची केळेवाली कोण शोभेल तुमच्यामते?
अमित शिंदे, कर्हाड
– शोभा आणणार नाही अशी कुणीही घ्या.
लॉकडाऊन तुम्ही कसा सार्थकी लावणार?
रूपाली परांजपे, पुणे
– मागच्या सारखं यंदाही काहीही झालं तरी आनंदाने जगावर हसत हसत जगायचा प्रयत्न करणार.
तीन अंकाचं नाटक रंगवून थकल्यावर श्रमपरिहारार्थ `चौथा अंक’ रंगवायला आवडते का?
वनिता साखरदांडे, किनवट
– हल्ली दोनच अंकी नाटक असल्याने, मी फक्त पहिल्या दोनच अंकात काम करणारा नट आहे. नंतरच्या अंकांची प्रथा बंद होऊन काळ लोटला आता. आता सर्व कलाकारांचा तिसरा, चौथा अंक त्यांच्या त्यांच्या घरांच्या अंतरानुसार ट्रॅफिक तुडवणे हाच असतो.