ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. निमित्त होते पोस्टर फाडण्याचे. १० ऑक्टोबर २००६च्या संध्याकाळी शिवसेना भवनाजवळील स्वामींच्या मठाच्या गल्लीत विद्यार्थी सेना आणि मनसे कार्यकर्त्यांत वाद निर्माण झाला, तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर दगड भिरकवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनाप्रमुखांचे बॅनर फाडल्यामुळे हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला. त्यात दोन-चार शिवसैनिकांची डोकी फुटली. जवळजवळ चार तास त्या परिसरात रणकंदन झाले.
या घटनेने दादर परिसरातील मराठी माणूस हळहळला. दादर ही शिवसेनेची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. मुंबईतील मराठी माणसाला मानाचे स्थान देणारी व आत्मविश्वास जागवणारी, ऊर्जा देणारी, शिवसैनिकांना मंदिराप्रमाणे पवित्र वाटणारी आणि रंजल्या-गांजल्यांना न्याय देणारे मंदिर, शिवाजी पार्कच्या परिसरात ‘शिवसेना भवन’ आहे. त्यामुळे मराठी माणूस व्यथित होणे स्वाभाविक होते.
दुसर्या दिवशी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिल्या. उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की, ‘कुणाच्या अंगावर जायचे नाही, पण कुणी अंगावर आलं तर सोडायचं नाही ही बाळासाहेब ठाकरे यांची आपल्याला शिकवण आहे.’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत म्हणून मनसेने हे पापी कृत्य वैफल्यग्रस्तातून केले. ‘शिवसेनाप्रमुखांविषयी आम्हाला आदर आहे. त्यामुळे त्यांचे बॅनर फाडण्याचे काम आम्ही करणार नाही. मुद्दे नसल्यामुळे शिवसेना गुद्द्यावर आली आहे,’ अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. या विषयावर ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रविवारच्या रोखठोकमध्ये ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या शीर्षकाखाली सद्य:परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारा लेख लिहून शिवसेनाप्रमुखांची प्रतिक्रिया छापली ती थोडक्यात अशी होती.
‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना इतके व्यथित झालेले मी कधीच पाहिले नव्हते. ‘राजच्या शिवसेना सोडून जाण्याने मी सर्वाधिक दु:खी झालो,’ असे विधान त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या दिवाळी अंकाला दिलेल्या मुलाखतीत केले. ही मुलाखत दिवाळीत प्रसिद्ध झाली असली तरी गणेशोत्सवाच्या काळात घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनाच्या दिशेने भिरकावलेले दगड पाहून शिवसेनाप्रमुख किती व्यथित झाले हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. चाळीस वर्षांत ज्या नेत्याने अनेक संकटे व वादळे अंगावर घेतली त्यांच्यासाठी तो दिवस सगळ्यात दुर्दैवी असावा. मोगलांशी अनेक लढाया शिवाजी महाराजांनी लढल्या. पण संभाजी राजेच मोगलांना जाऊन मिळाले व हिंदवी स्वराज्यावर घाव घालण्यासाठी चाल करून आले, तेव्हा शिवाजी महाराजांना काय यातना झाल्या असतील? अर्थात हिंदवी स्वराज्यापुढे संभाजी महाराजांचीही पर्वा छत्रपतींनी केली नाही.
राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या कार्यालयासमोरच स्वामी समर्थांचा मठ आहे. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ असा दिलासा स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. चाळीस वर्षांपासून शिवसेनासुद्धा मराठी माणसाला हाच आधार देत आली की, ‘भिऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.’ पण स्वामी समर्थांच्या मठासमोरील नारळ मराठी माणसावर व शिवसेना भवनाच्या दिशेने भिरकावण्यात आले. मराठी माणसांची डोकी फुटली, त्यात फावले कुणाचे? तर महाराष्ट्राच्या शत्रूंचे. त्या घटनेस पंधरवडा होत आला. पण दादरच्या रस्त्यावरील या संघर्षाची सल मराठी माणसाच्या मनात कायम आहे.
एकजूट फोडण्याचे प्रयत्न
शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखालील ‘मराठी’ एकजूट फोडण्याचे आतापर्यंत काय कमी प्रयत्न झाले! अगदी अलीकडच्या काळात छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते सोडून गेले. त्यानंतर राज ठाकरेही गेले. जाणारा प्रत्येकजण आपला ‘शेर’ आणि ‘शेअर’ घेऊन गेला. तरी शिवसेनेच्या लोकप्रियतेचा निर्देशांक कोसळला असे झाले नाही. जो ‘शेअर’ राणे, भुजबळ वगैरे घेऊन गेले. तो त्यांना मराठी माणसांच्या रक्त आणि मेहनतीतून मिळाला हे नंतर ते विसरले. भुजबळ व राणे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली व राज ठाकरे यांचे समर्थक म्हणवणार्यांनी शिवसेना भवनावर दगड भिरकावले. शेवटी मराठी माणसालाच महाराष्ट्राची अस्मिता ठरलेल्या शिवसेना भवनावर दगड भिरकवण्याची दीक्षा देण्यात आली. बाळासाहेब ठाकरे हे आजही आपले दैवत असल्याचे या नव्या पक्षाचे नेते सांगतात, पण ज्या शिवसेना भवनावर दगड फेकण्याची रंगीत तालीम झाली, त्या शिवसेना भवनाची वास्तू बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाने मराठी माणसांचे मंदिर बनले आहे, हे दगड फेकणारे विसरले. संभाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत व हिंदवी स्वराज्याच्या बाबतीत नेमके असेच वर्तन केले होते. ज्या मोगलांना ते जाऊन मिळाले त्या मोगलांनीच शेवटी त्यांचा घात केला. धिंड काढली. हाल हाल करून मारले. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांनी याचे भान ठेवायला हवे.
शिवसेनेने काय केले? असे सवाल आजही निर्लज्जपणे केले जातात तेव्हा आश्चर्य वाटते. शिवसेनेत सर्व काही भोगून, उपभोगून कोट्याधीश झालेलेच असे प्रश्न आज विचारतात. शिवसेनेने महाराष्ट्राला व मराठी माणसाला स्वाभिमान आणि अस्मिता दिली. शिवसेनेने मराठी माणसाला नोकर्या दिल्या. लहान-मोठ्या उद्योगांत स्थिरस्थावर केले. मुख्य म्हणजे ज्यांना पक्षीय राजकारणात स्थान नव्हते, अशांना नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचवले. सामान्यातल्या सामान्य मराठी माणसाला मुंबई महाराष्ट्राच्या सत्तेतील वाटेकरी बनविण्याचा चमत्कार शिवसेनेने केला. शिवसेना नसती तर गँगवॉरमध्ये पोलिसांनी आपले एन्काउंटर केले असते, अशी कबुली सध्याचे गांधीवादी नारायण राणे यांनीच दिली आहे. अशी अगणित उदाहरणे देता येतील. प्रत्येक संकटाच्या वेळी ‘शिवसेना आमच्या पाठीशी आहे’ हा धीर व आत्मविश्वास मराठी माणसाला मिळत गेला. हे भाग्य अन्य एखाद्या पक्षाला मिळाले असेल असे वाटत नाही.
राजकारण हे आज निष्ठेचे व श्रद्धेचे राहिले नाही. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनाही विश्वासघाताचा अनुभव राजकारणात अनेकदा आला. शिवसेनाप्रमुखांनी तर असे घाव चाळीस वर्षात अनेकदा झेलले. फरक इतकाच आहे की, यशवंतराव काय किंवा वसंतदादा काय, त्यांनी स्वत:चे संघटन निर्माण केले नाही. काँग्रेस पक्षाच्या वृक्षाखालीच त्यांचे नेतृत्व वाढले. बाळासाहेब ठाकरे यांनी चाळीस वर्षांपूर्वी शिवसेनेची ठिणगी टाकली व चाळीस वर्षे ती धगधगत ठेवली. हे सोपे काम नाही. दक्षिणेतील अनेक दिग्गज नेत्यांनाही ही कर्तबगारी दाखवता आली नाही. रामारावांचाही करिश्मा मोठा, पण त्यांच्या हयातीतच तेलगू देसम संपले. द्रमुक व अण्णा द्रमुकमध्येही चढाया सुरूच असतात. समतापासून ममतापर्यंत, जनता दलापासून अकाली दलापर्यंत सगळ्यांच्याच चिरफळ्या उडाल्या. काँग्रेसचीही ती ताकद उरली नाही व उमा भारतींपासून केशूभाई पटेलांपर्यंत सगळेच जण भारतीय जनता पक्षाला गदागदा हलवीत आहेत. या सर्व पक्षांत शिवसेना हाच सर्वात जुना जाणता पक्ष आहे व तो इतक्या वादळातही मजबुतीने टिकला आहे. नाराजीचे व द्वेषाचे अनेक सूर उमटले. बंडोबांनी अनेक मनसुबे रचले ते धुळीस मिळविले. अनेक पत्रकारांनी देवांबरोबर लेखण्याही पाण्यात बुडवून शिवसेनेचा द्वेष केला. त्यावर मात करून शिवसेना तरली आहे ती मराठी माणसांच्या भक्कम पाठबळावर. शिवसेना ही मराठी माणसांची आई आहे. आई कधी मुलावर रुसते काय? रुसते ते मूल. शिवसेनेची चिंता वाहणार्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.
या सर्व प्रकारानंतर मी दुसर्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो. ते नेहमीप्रमाणेच शांत होते. तितक्याच शांतपणे ते म्हणाले, ‘मी अजिबात विचलित झालो नाही. कधी होतही नाही. शांतपणे सर्व पाहतोय. अशी अनेक संकटे झेलून मी शिवसेना इथपर्यंत आणली आहे. दोन दगड लपून भिरकावल्याने शिवसेनेची उंची लहान होत नाही. पण घडला प्रकार दुर्दैवीच आहे.’ महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी शिवसेना निर्माण करणार्या एका तपस्व्याची ही खंत आहे. महाराष्ट्राने याची दखल घ्यायला हवी.
२०२२ साली शिवसेनेतील काही स्वार्थी लोकांनी सत्तेसाठी गद्दारी करून शिवसेनेत फूट पाडली. आता शिवसेना संपली असेच तेव्हा सर्वांना वाटले. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विचलित झाले नाहीत. अशी अनेक संकटे झेलून त्यांनी शिवसैनिकांना व मराठी माणासांना ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ असा धीर दिला. त्यांनी शिवसेनेची वाटचाल सुरूच ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेचा जाज्वल्य इतिहास वर्तमानातही दिसत आहे!