प्रबोधनकारांचं कायम दुर्लक्षित राहणारं पुस्तक म्हणजे कुमारिकांचे शाप. त्यासोबतच प्रकाशित झालेल्या इतर पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक छोटं असल्याने त्याकडे लक्ष लागत नाही. पण या पुस्तकाने प्रबोधनकारांच्या हुंडाविरोधी चळवळीचा पाया घातला.
– – –
१९१८ आणि १९१९ ही वर्षं प्रबोधनकारांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरली. `वक्तृत्वशास्त्र` आणि `कोदंडाच्या टणत्कार` या पुस्तकांनी १९१८ साली त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा अधिक विस्तार केला. त्यातून १९१९ या एकाच वर्षांत त्यांची `कुमारिकांचे शाप`, `ग्रामण्याचा साद्यंत इतिहास` आणि `हिंदू धर्माचे दिव्य` ही तीन महत्त्वाची पुस्तकं आली. त्यातलं `कुमारिकांचे शाप` हे पुस्तक इतर चारही जाडजूड ग्रंथांच्या तुलनेत छोटेखानी असल्याने त्याला तितकं महत्त्व मिळालं नाही. पण हे पुस्तक जे वाचतील, त्यांना त्याचं महत्त्व कळू शकेल. हे छोट्या आकारातलं पण १३२ पानांचं पुस्तक प्रबोधनकारांच्या आयुष्यात नवा विचार घेऊन आलं. त्यांनी या पुस्तकात हुंडाविरोधाचं क्रांतिकारक विवेचन ओघवत्या संवादी शैलीत मांडलेलं आहे.
प्रबोधनकारांची शैली मुळातच संवादी असली, तरी त्यातही यातली मांडणी अधिक संवादी आहे. कारण हे मुळात एक भाषण आहे. आजचं छबिलदास हायस्कूल तेव्हा दादर इंग्लिश स्कूल होतं. या शाळेच्या हॉलमध्ये दादरकर मंडळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम आयोजित करत असत. `दादर स्टुडंट्स सोशल युनियन` ही संस्था तिथे सामाजिक मदतीचे उपक्रमही चालवत असे. शाळेचे प्रिन्सिपल कोल्हटकर यांच्या प्रोत्साहनामुळे तो `दादरचा टौन (टाऊन) हॉल`च बनला होता. दादरमधल्या सामाजिक कामांत सक्रिय असणारी तरुण मुलं प्रबोधनकारांच्या वक्तृत्वाने प्रभावित होती. त्यामुळे ते त्यांची व्याख्यानं शाळेच्या हॉलमध्ये आयोजित करत.
त्यातलं फक्त एकच भाषण आज आपल्याला माहीत आहे. `स्टुटंट्स सोशल युनियन`ने २३ जुलै १९१८ला `कुमारिकांचे शाप` या विषयावर ठेवलेलं हे व्याख्यान. कारण काही तरूण श्रोत्यांनी हे व्याख्यान टिपून घेतलं होतं. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्रिं. कोल्हटकरांनी तेव्हाच सूचना केली होती की प्रबोधनकारांनी या टिपणांच्या आधारे एक पुस्तक लिहावं. पण त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. इन्फ्युएंझाच्या साथीत त्यांचं सगळं कुटुंबच आजारी पडलं होतं. आताच्या कोरोनाच्या साथीसारखीच भयंकर परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती. त्यात प्रबोधनकारांच्या आईचाही मृत्यू झाला. ते आजारी असतानाही त्यांचे स्नेही यशवंत राजे यांनी पुस्तकासाठी फारच आग्रह केला. त्याचं कारणही तसंच होतं. इन्फ्लुएंझातल्या मृत्यूंमुळे लोकांची हाव कमी होण्याऐवजी लोकांमध्ये हुंड्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे प्रबोधनकारांचे हुंड्याला विरोध करणारे विचार लोकांपर्यंत जावेत असं राजे यांना वाटलं. त्यांनीच २८ फेब्रुवारी १९१९ म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी याचं प्रकाशन केलं. त्यांनीच प्रस्तावनाही लिहिलीय. या प्रस्तावनेत त्यांनी प्रबोधनकार आणि त्यांचे भाऊ यशवंतराव या दोघांचंही वर्णन कर्ते सुधारक असं केलंय. प्रबोधनकारांनी तर हुंडा घेतला नव्हताच, पण यशवंतरावांनीही तो घेतला नसावा, असं दिसतं. मुळात ठाकरेंच्या घराण्याचं वळण हुंड्याला थारा देणारं नव्हतंच.
प्रबोधनकारांच्या इतर पुस्तकांसारखीच त्यांची या पुस्तकाची अर्पणपत्रिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी हे पुस्तक `श्रीमंत नामदार सर गंगाधरराव माधवराव चिटणवीस, के. सी. आय. ई.` यांना अर्पण केलंय. त्यात छत्रपतींचे चिटणीस म्हणून त्यांच्या घराण्याच्या लौकिकाचा उल्लेख केला आहे. पण हे पुस्तक अर्पण करण्याचं कारण असं दिलंय, `या लौकिकाला अनुसरून आपण आपल्या चिरंजीवाचा विवाह करताना आपले सन्मान्य व्याही रायबहादूर भाईसाहेब गुप्ते यांच्यापासून मुळीच हुंडा न घेता जे स्तुत्य व अनुकरणीय उदाहरण घालून दिले, याबद्दल मला जो आनंद झाला, त्याचे दृश्य फळ म्हणून हे छोटेखानी पुस्तक, आपली परवानगी न घेता, अत्यंत आदराने व नम्रतेने आपणांस अर्पण करीत आहे, त्याचा स्वीकार व्हावा.`
या पुस्तकाला कारण ठरली होती ती कोलकात्यातली स्नेहलता नावाच्या पंधरा वर्षांच्या मुलीने केलेली आत्महत्या. आपले वडील हुंडा देण्यासाठी वडिलोपार्जित घर विकण्याची तयारी करत असलेली बघून या मुलीने स्वतःला जाळून घेतलं होतं. तसं पत्र तिने वडिलांच्या नावे लिहून ठेवलं होतं. त्या काळात हुंड्यासाठी अविवाहित मुलींनी आत्महत्या करण्याची प्रकरणं अनेक होत. पण पत्रं लिहिल्यामुळे ही आत्महत्या हुंड्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आपल्या बलिदानामुळे देशभरातल्या लोकांच्या हृदयाला पाझर फुटतील, अशी अपेक्षा तिने पत्रात व्यक्त केली होती. त्यामुळे बंगाल आणि त्यानंतर महाराष्ट्रातही हुंडाविरोधी चळवळीला जोर आला होता.
`सेंटर ऑफ लॉ अँड पॉलिसी रिसर्च` या संस्थेतील अभ्यासक मीनाक्षी रामकुमार यांनी लिहिलेल्या टिपणात या प्रकरणाची माहिती आहे. त्यानुसार २९ जानेवारी १९१४च्या दुपारी कोलकात्यात स्नेहलता मुखोपाध्याय हिने आत्महत्या केली. त्यामुळे बंगालमध्ये आधीपासून सुरू असलेल्या हुंडाविरोधी आंदोलनाला बळ मिळालं. वर्तमानपत्रांनी या घटनेला चांगली जागा दिली. त्यावर प्रसिद्ध कवींनी कविता लिहिल्या. `द मॅरेज रिफॉर्म लीग` नावाची संस्थाच स्थापन झाली. २१ फेब्रुवारीला कॉलेज चौक मैदानात झालेल्या श्रद्धांजली सभेला मोठी गर्दी उसळली. तिथे अनेकांनी हुंडा न घेण्याच्या शपथा घेतल्या. प्रबोधनकार सांगतात त्यानुसार मुंबई आणि पुण्यातल्या विद्यार्थ्यांवर या घटनेचा प्रभाव पडलेला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये स्नेहलताच्या स्मरणार्थ तिची लॉकेटं वाटली होती. शिवाय तिथेही हुंडा न घेण्याच्या शपथेचा कार्यक्रम झाला होता.
पण प्रबोधनकारांचं पुस्तक या घटनेच्या भोवती फिरत नाही. ते हुंडा या विषयावर त्या काळाच्या संदर्भात आणि त्यांच्यासमोरचा वाचक लक्षात घेऊन सखोल चर्चा करतं. पण या पुस्तकाची प्रेरणा या घटनेत नक्की आहे. पुस्तकाची सुरुवातच होते, `कुमारी श्री स्नेहलतेचा जयजयकार असो.` या पुस्तकात प्रबोधनकारांनी हुंड्यांचे दुष्परिणाम प्रभावीपणे दाखवून दिले आहेत. त्यामागची अमानुषता ठसवली आहे. धर्मशास्त्राच्या दृष्टीनेही हुंडा चुकीचा असल्याचं प्रतिपादन केलं आहे. शिवाय हिंदू मिशनरींच्या वैदिक विवाह विधीची आवश्यकताही सांगितलीय. प्रबोधनकार प्रत्येक पुस्तकात किंवा लेखातही वैचारिक चर्चा झाल्यानंतर एक उपाय सुचवतात. तसं आवाहनही ते करतात. या पुस्तकातलं आवाहन तर स्फोटकच आहे. मुलींनी हुंडा देण्यापेक्षा कुमारिका राहण्याचा उपाय त्यांनी सुचवलाय, तो असा,
`तुमच्या एका लग्नाच्या पायी तुमच्या पित्याची मान कर्जाच्या फासावर लटकविण्यापेक्षा कुमारिकांनो, सत्याग्रह करा, सत्याग्रह करा, सत्याग्रह करा.
अविवाहित राहून शिक्षण संपादन करा आणि आपल्या समाजाच्या व राष्ट्राच्या कार्यक्षेत्रात स्वयंसेविका होऊन त्याचा भाग्योदय केल्याचे श्रेय संपादन करा; हुंड्याच्या रक्ताने बरबटलेल्या वाटेल त्या तरुणाच्या हातात आपला निष्कलंक हात देऊन आपल्या जन्माचे वाटोळे करून घेऊ नका.` महिलांविषयीचा आत्यंतिक आदर आणि स्त्रीमुक्तीच्या संदर्भात मांडलेले टोकाचे विचार, हे प्रबोधनकारांच्या विचारांचं एक वैशिष्ट्यच मानायला हवं. या विषयावरच्या या पहिल्या भाषणापासून ‘माझी जीवनगाथा’च्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात केलेल्या शेवटच्या भाषणापर्यंत हे अनुभवता येतं. जातिभेदांना आणि विशेषतः ब्राह्मणवर्चस्वाला विरोध करणारे प्रबोधनकारांचे समकालीन बहुसंख्य समाजसुधारक विचारवंत स्त्रियांच्या प्रश्नावर शांत असताना, प्रबोधनकार मात्र आक्रमक दिसतात. त्यात ते महात्मा जोतिराव फुलेंच्या विचारांशी थेट नातं सांगतात. प्रबोधनकारही जोतिबांसारखंच फक्त बोलून किंवा लिहून शांत बसले नाहीत, तर त्यांनी महिला सक्षमीकरणाचे विचार लोकांच्या जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्नही केले.
आपल्यात तेव्हा आणि आजही रूढ असलेली लग्नाची पद्धत ब्राह्मविवाहाची आहे आणि त्यातल्या वरदक्षिणेचं विकृत रूप म्हणजे हुंडा, अशी मांडणी ते करतात. त्याला पर्याय म्हणून मुलींना आपला जोडीदार स्वतः शोधण्याच्या अधिकाराचा ते शास्त्रांचाच दाखला देऊन आग्रह धरतात. त्यासाठी पुराणातल्या सावित्रीपासून इतिहासातल्या संयोगितेपर्यंतची उदाहरणं देतात. विशेष म्हणजे प्रबोधनकारांनी गजाननराव वैद्य यांनी तयार केलेल्या वैदिक विवाह विधी हा पर्याय उभा केला होता. त्यात हुंड्याला स्थान नव्हतंच आणि वेदांचा आधारही होता.
प्रबोधनकारांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच `कुमारिकांचे शाप` या पुस्तकाला जोरदार प्रतिसाद लाभला. त्याच्या ३५०० प्रती विकल्या गेल्याचं प्रबोधनकार सांगतात. त्यामुळे हा विषय प्रबोधनकारांशी जोडला गेला. त्यांच्या या व्याख्यान आणि पुस्तकाने प्रभावित झालेल्या तरुणांना सोबत घेऊन त्यांनी दोनच वर्षांनी दादरमधे एक हुंडाविरोधी चळवळ उभी केली. प्रबोधनकार सांगतात, तसं या पुस्तकाच्या प्रसाराने `सन १९२१ सालच्या हुंडा विध्वंसक आंदोलनाचा पाया चांगलाच घातला.` हुंडाविरोधाची वैचारिक भूमिका तर या पुस्तकाने बांधली होतीच. पण त्यासाठीचे कार्यकर्तेही उभे केले. यातली भाषा आणि विचारांची मांडणीच इतकी मजबूत होती, ते होणारच होतं. हे विचार ऐकून कुणी तरुण शांत बसला असता तरच नवल!