शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै हा वाढदिवस. स्वाभिमानाने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून जनमानसात अढळ स्थान मिळविणारा, शिवसेना प्रचंड संकटातून वाटचाल करीत असताना बाळासाहेबांचा करारीपणा, माँसाहेबांचा शांत, सुसंस्कृत स्वभाव अंगिकारणारा, कलावंत मनाचा हा नेता जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयात किती निगर्वी, अबोल, तरीही अंगभुत नेतृत्त्वगुण असलेला विद्यार्थी होता, हे त्यावेळी त्यांचे वर्गमित्र आणि नंतर प्रसिद्ध छायाचित्रकार झालेले घनश्याम भडेकर यांनी आपल्या लेखात सांगितले आहे. उद्धवजींच्या नेतृत्त्वाचे अनेक पैलू ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी आपल्या लेखात दर्शवले आहेत. या लेखांमधून साकार झालेला उद्धवजींच्या विविध गुणांचा हा समुच्चय त्यांची खरी ओळख करून देणारा आहे.
– – –
माझ्या शेजारीच मांडीची घडी घालून चित्र काढत असलेला विद्यार्थी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा मुलगा आहे याची कल्पना नव्हती. वर्गात दोन-चार जणांनाच तो माहित होता. बाकीचे त्याला ठाकरे म्हणून हाक मारायचे. तेव्हा तो १६ वर्षाचा होता.
सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयात १९७६ साली आम्ही फाऊंडेशनच्या वर्गात शिकत असताना एकदा बोरीवलीच्या नॅशनल पार्कात आमचा अभ्यास दौरा निघाला. दोन वर्गांतील मुले मिळून आम्ही लोकल ट्रेनने प्रवास करून बोरीवली स्थानकात उतरलो. सर म्हणाले, जोडीजोडीने एका रांगेत शिस्तीत चला. काहींच्या जोडीला मुली मिळाल्या, त्यामुळे त्यांचे मनोरंजन चालू होते. त्या मागच्या रांगेत रमत गमत चालत होत्या. आम्हा पुढे चालणार्यांची चलबिचल होऊ लागली. मग आम्ही संथगतीने पाऊले टाकू लागलो, तसे सर म्हणाले, दमलात काय रे चालून! मुकाट पुढे बघून चला, इकडे तिकडे पाहाल तर गाडीखाली याल. रस्ता ओलांडून आम्ही नॅशनल पार्कात प्रवेश केला. सर पांडवकालीन गुंफा दाखवतील असे वाटले होते. गुंफेतील अंधारात बसून अभ्यास करण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट होता, पण मुलांचा टवाळपणा सरांना ठाऊक असावा. त्यांनी सर्वांना गांधीजींच्या छत्रीवर नेले. छत्रीखाली आणि इतरत्र बसून समोर दिसणारे दृश्य कागदावर टिपायचे, हा अभ्यासदौर्यातील एक भाग. समोर विहंगम दृश्य दिसत होते. त्या काळी आतासारखे उत्तुंग टॉवर नसल्यामुळे मालाड-कांदिवलीपासून दहिसरच्या टोकापर्यंतचा परिसर स्पष्ट दिसत होता. हिरवीगार झाडी, काही टुमदार बंगले आणि चार पाच मजली इमारती छान दिसत होत्या.
छत्रीखाली मोक्याची जागा पकडून मी कामाला लागलो. माझ्या शेजारी डावीकडे एक उंच, गोरा, चष्मा लावलेला मुलगा येऊन बसला. खांद्यावरची वॉटरबॅग काढून त्याने बाजूला ठेवली. एकटक समोरचा परिसर न्याहाळून पाहिला आणि ड्रॉइंग पॅड काढून त्यावर चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. इतर मुलं एकमेकांची चेष्टामस्करी करत डायलॉगबाजी करत होती. पण हा गोरटेला आपली ओळख लपवून चित्र काढण्यात मग्न होता. स्वभावाने अतिशय शांत, अबोल, अगदीच कमी बोलणारा, पण निगर्वी, संयमी आणि सोज्वळ असा हा कोण असावा? मला प्रश्न पडलेला.
आम्हा कलाकारांना सूक्ष्म निरीक्षण करून व्यवस्थित अवलोकन करण्याची सवय. त्याचा गोरेपणा, शरीराची ठेवण आणि चेहरा पाहून हा उल्हासनगरच्या एखाद्या सिंधी कुटुंबातला मुलगा असावा, अशी माझी प्राथमिक समजूत झाली. ‘सिंधी का बच्चा कभी नहीं सच्चा’ असं गमतीत म्हटलं जातं. पण हा चेहर्यावरून मोठ्या घरातील सुसंस्कृत मुलगा वाटत होता.
मागून एकाने ओरडून विचारले, सुन्या, आपल्याबरोबर बाळासाहेबांचा मुलगा आला आहे काय रे इथे?
समोरच बसलेला सुनील नाईक ताडकन् म्हणाला, हा काय इथे.
समोर बसलाय तोच बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे ऐकून मी अवाक् झालो. आम्ही शिवसेनाप्रेमी माणसं. आमच्या नेत्याचा मुलगा माझ्या मांडीला मांडी लावून बसलाय हे माझे केवढे भाग्य?
मी त्याला कुतूहलाने विचारले, हो काय रे? तू खरंच साहेबांचा मुलगा आहेस.
त्याने मान हलवून होकारार्थी उत्तर दिले. ते ऐकून मला बसल्या जागीच आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. अभ्यास राहिला बाजूला, मी त्याच्याकडे पाहातच राहिलो. कमाल आहे, एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा कोणतीही सुरक्षा न घेता एकटाच कसा आला? कोणताही मोठेपणा नाही की बडेजाव नाही. एकदम सिम्पल साधा सरळ मुलगा.
तुझं नाव काय, विचारलं तर उद्धव म्हणाला आणि मला स्माइल दिले. मी एकदम खूष…
आता याच्याशी गट्टी करायचीच आणि शेवटपर्यंत टिकवायची असा निश्चय करून मी मैत्रीला सुरुवात केली.
बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव या तीन नातवंडांना प्रबोधनकारांनी लाडाने टिबा, डिबा आणि डिंगा अशी नावे ठेवली होती. याच नावाने घरचे त्यांना हाक मारीत. जे.जे.चे काही मित्रही मातोश्रीवर जाऊन डिंगा डिंगा म्हणायला लागले. एक दिवस माँसाहेबांनी त्यांना बोलावून घेतले आणि म्हणाल्या, हे पहा, तो आता मोठा झाला आहे. त्याला उद्धव म्हणत जा. यापुढे डिंगा म्हणू नका.
आमच्या परीक्षेचा निकाल महिन्याभरानंतर लागायचा. कॉलेजमधील पटवर्धन नावाचा शिपाई माझा मित्र होता. त्याला चिरमिरी दिली की दहा पंधरा दिवसांत तो निकाल सांगायचा. माझ्या निकालापेक्षा उद्धवचे काय झाले यात मला जास्त इंटरेस्ट. त्याला कोणत्या विषयात किती मार्क मिळाले, ते तो एका कागदावर लिहून द्यायचा. तो कागद घेऊन मी मातोश्रीवर गेलो की निकाल ऐकून माँसाहेबांना आनंद व्हायचा. त्या लाडू-पेढा वगैरे गोड खाऊ घालायच्या आणि म्हणायच्या काही काम असेल तर साहेबांना सांगा. तुमचे जे कलासंचालक आहेत, ते बाबुराव सडवेलकर साहेबांचे मित्र आहेत. साहेब बोलतील त्यांच्याशी.
साहेब हॉलमध्ये लोकांशी बोलत असले की माँसाहेब स्वयंपाक खोलीतून त्यांना हाक मारायच्या. उद्धव पास झाल्याचे खुणेने सांगायच्या.
मातोश्रीच्या डावीकडील खोलीत प्रबोधनकार राहायचे. नंतर बाळासाहेब त्या खोलीत बसून व्यंगचित्रे काढत. याच खोलीत उद्धव आमच्याशी गप्पाटप्पा मारत असे. आम्हा मित्रांशी उठबस, चहापान याच खोलीत व्हायचे.
मुख्य दरवाजाच्या उजवीकडे ठळक अक्षरात ‘कठीण समय येता कोण कामास येई’ असा बोर्ड बरेच दिवस होता. बाहेर पाहुण्यांच्या चपलांचा ढीग आणि बंगल्यात लोक दाटीवाटीने बसलेले असत. प्रत्येकजण काही कामे घेवून आलेला. साहेबांनी सांगितले की त्यांचे पीए राजे लगेच फोन लावून देत आणि खड्या आवाजात साहेब समोरच्या माणसाला जाब विचारीत, सर्वांसमक्ष जागीच सोक्षमोक्ष लावून झटपट न्यायनिवाडा होत असे.
यात उद्धवला काहीही रस नसे. तो चित्रकला आणि फोटोग्राफी या विषयांवरच आमच्याशी बोले. माझ्याकडे निकॉन कंपनीचा एफटी-२ सीरीजचा कॅमेरा होता. मुंबईत फार कमी लोकांकडे तो होता. फोर्ट येथील एका स्टॉलवरून मी विकत घेतलेला. त्यावेळी परदेशी वस्तू काळ्या बाजारात पावतीशिवाय मिळायच्या. उद्धवला हाच कॅमेरा पाहिजे होता, पण अट अशी होती की त्याची पावती मिळाली पाहिजे. त्याने खूप तपास केला, पण पावती द्यायला कोणी तयार नाही. मी उद्धवला म्हटलं, अरे कशाला डोकेफोडी करतोस? साहेबांचं नाव सांग. लोक घरी येऊन शेकडो कॅमेरे टाकतील. परंतु उद्धवच्या तत्त्वात ते बसणारे नव्हते. त्याने कधीही साहेबांच्या नावाचा वापर करून घेतला नाही.
आमच्या जे.जे.मध्ये प्राध्यापकांनी त्यांच्या मागण्यांसाठी तीन महिने संप केला होता. या काळात आम्ही वर्गाबाहेर बसून दिवस काढले. अभ्यासाच्या नावाने ठणठण गोपाळ. काहीही अभ्यास होईना. उद्धवला अनेकांनी विनंती केली, अरे साहेबांना घेऊन ये की कॉलेजमध्ये. त्यातून निश्चित मार्ग निघेल. पण त्याने कधीही त्यांच्या पदाचा, नावाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला नाही.
अखेरीस इतर मुलांचे पालक मातोश्रीवर येऊन साहेबांना भेटले. त्यांच्या आग्रहाखातर साहेब जे.जे.मध्ये आले व त्यांनी जाहीर भाषणात संपावर गेलेल्या प्राध्यापकांना तात्काळ कामावर येण्याचा आदेश दिला. तुम्ही कामावर येऊन मुलांना शिकविले नाहीत तर माझ्याशी गाठ आहे, असा इशारा दिला. साहेबांच्या भाषणानंतर दुसर्या दिवशी सर्व प्राध्यापक खाली मान घालून
कॉलेजमध्ये आले आणि पुन्हा सर्व सुरळीत चालू झाले. झक मारत मुलांना शिकवावे लागले, याचा राग मनात ठेवून काही प्राध्यापकांनी संगनमताने कट रचून त्या वर्षी उद्धवला परीक्षेत मुद्दाम नापास केले. बाळासाहेबांना या गोष्टीचा राग आला. पण माझ्या मुलाला नापास का केलेत, हे विचारायला ते पुन्हा कॉलेजमध्ये आले नाहीत आणि कुणावरही वरून दबाव आणला नाही.
उद्धवने स्वत:च्या कर्तृत्वावर अंतिम वर्षाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम श्रेणीत तिसर्या क्रमांकावर पास होण्याचा विक्रम केला. त्याचे फोटोग्राफीत खूप नाव झाले. अनेक ठिकाणी त्याची प्रदर्शनेही झाली, पण तत्पूर्वी तो उत्तम प्रतीचा चित्रकार आहे. त्याचे ड्राय ब्रश टेक्निक पाहण्यासारखे होते. प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांच्याकडे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तो कलाकार असूनही निर्व्यसनी आहे. त्याला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही.
तो कलानगर येथून ८७ नंबरच्या बसमधून किंवा हार्बर लोकल ट्रेनने सीएसटीला उतरून कॉलेजमध्ये यायचा. कॉलेजमध्ये वेळेवर येणारा कधीही दांडी न मारणारा असा विद्यार्थी होता. त्या काळी तो कुणाशी जास्त बोलत नसे, पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा. माझ्या हास्यविनोदावर पोट धरून हसायचा.
कॉलेजच्या निवडणुकीत तो स्वत: उभा राहिला नाही, पण अनेकांना पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणायचा. कितीही संकटे आली तरी डोकं शांत ठेवून योग्य निर्णय घेण्यात तो पटाईत. त्याचे कुणाशीही भांडण नाही. तो कुणावरही डाफरत नाही. आक्रस्ताळेपणा करीत नाही. परंतु कुणी मनातून उतरला की त्याला कायमचा लक्षात ठेवतो, मग चुकीला माफी नाही.
१९८१ साली जे.जे.चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याने १९८४ साली अजित जयकर या मित्राबरोबर प्रभादेवी येथील बंगाल केमिकलसमोर चौरंग नावाची जाहिरात एजन्सी काढली. १९८९ साली चौरंगचा कारभार आटपून त्याने `सामना’ दैनिकाच्या उभारणीस सुरुवात केली. बाळासाहेबांचे स्वप्न आणि उद्धवच्या धावपळीमुळे `सामना’ला चांगले दिवस येऊ लागले. तो नियमितपणे `सामना’ कार्यालयात येऊन बसे. त्याच्या निमंत्रणावरून मी ‘सामना’त भेटायला जात असे. तो म्हणायचा, मला रोज असा एक फोटो दे की तो अग्रलेखाचा विषय झाला पाहिजे.
`सामना’ पाहात असताना कळत नकळत उद्धव राजकारणाकडे ओढला गेला. त्यातही त्याने बाजी मारली. इतरांच्या आग्रहाखातर त्याला मुख्यमंत्र्यांच्या काटेरी खुर्चीवर बसावे लागले. अडीच वर्षाच्या काळात त्याने झटपट जनहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. देशात नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणून मान मिळवला. मानाच्या खुर्चीवर बसून कामाच्या ताणाने मानेचे दुखणे सुरू झाले. त्यावर शस्त्रक्रिया करून तो पुन्हा मानाने उभा राहिला. कोरोनाच्या भस्मासुराने तर कहरच केला. लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले, त्यामुळे कोरोना आटोक्यात आला. समोरून येणार्या संकटाशी त्याने यशस्वीरित्या सामना केला, पण मागून येणार्या फंदाफितुरांनी त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. ठाकरे कुटुंबाने कोणाला काय दिले नाही? सर्व जातीधर्माच्या लोकांना जे जे देता येईल ते ते भरभरून दिले. देणार्याने देत जावे आणि घेणार्याने एक दिवस देणार्याचे हातच काढून घ्यावे?
२७ जुलै हा माझे प्रिय मित्र उद्धव साहेब यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व प्रकारच्या संकटांमधून तरून जाण्यास आणि शिवसेनेलाही सुखरूप नेण्यास तो खंबीर आहेच.