शिवरायांनी मंडी बागला बंदरातून आपली जहाजे तेथून फक्त ४९ कोसावर असलेल्या मंगळूरकडे वळवली होती. प्रवास सुरूही झाला होता. परंतु तेवढ्यात दुर्दैवाने मिर्झा राजा जयसिंग हा खूप वेगाने हिंदवी स्वराज्यावर चालून येतो आहे. उत्तरेतून बुर्हाणपूर मार्गे औरंगाबाद, अहमदनगर पार करून पुण्याकडे सरकतो आहे हे वृत्त राजांच्या कानावर पडले. मोगलांचे महासंकट आपल्या स्वराज्याच्या दरवाजावर येवून धडकलेले होते. केवळ त्याचमुळे शिवरायांना आपल्या त्या मंगलोरच्या माथ्यावर भगवे निशाण फडकवायच्या जबरदस्त मोहिमेला लगाम घालणे भाग पडले. अन्यथा वेगळाच इतिहास घडला असता..
– – –
हिंदुस्तानची पश्चिम किनारपट्टी गुजरातच्या सुरत बंदरापासून ते खाली कर्नाटकाच्या मेंगलोरपर्यंत पादाक्रांत करायचा छत्रपती शिवरायांचा पक्का निर्धार होता. हरणे बंदराजवळचा सुवर्णदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाल्याची आनंदवार्ता राजाना मालवणात समजली होती. कुडाळच्या युद्धातून थोडीशी उसंत मिळताच राजांनी फेब्रुवारी १६६५च्या आरंभी दक्षिणेकडे झेप घेतली होती.
हिंदुस्थानातील एखाद्या राजाने अशी सागरी मोहीम उघडण्याची मध्यकाळातली ही पहिलीच क्रांतिकारी घटना!
बसरुरचा राजा शिवाप्पा नाईक १६६०मधे मृत्यू पावला होता. त्यानंतर त्याच्या राज्यात खूप अनागोंदी माजली होती. म्हणूनच बसरुर, कुंदापूर आदी कर्नाटकातील अनेक गावांतील गोरगरीब जनतेने शिवरायांकडे ‘या मुलखातील आदिलशाही अंमलदार व मलबारातील नायर सरदार व केरळी व्यापार्यांच्या कचाट्यातून आम्हाला सोडवा,’ अशी गुप्तपणे कळकळीची विनंती केली होती.त्यादरम्यान नुकतेच कुठे म्हणजे फक्त दोन-तीन महिने आधी सिंधुदुर्गाचे बांधकाम शिवरायांनी सुरू केलेले होते. तिथेच कर्नाटकातील जनतेचे प्रतिनिधी शिवरायांना येऊन गुपचूप भेटत होते. आमच्या मुलखात यावे म्हणून विनंती करत होते. त्यावेळी शिवरायांचे वय फक्त पस्तीस वर्षे होते!
मालवणच्या बंदरातून सोबत सुमारे ८० छोटी-मोठी गलबते घेऊन राजे दक्षिण मोहिमेवर बाहेर पडले. या धाडसी आक्रमणासाठी सागरी मार्गाने बाहेर पडताना त्यांनी मुहूर्तसुद्धा किती नामी शोधून काढला होता. त्याचा अभ्यास केल्यावर या महावीराच्या अचाट बुद्धिवैभवाची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.
जेव्हा सारे गोवेकर, चोलकर पोर्तुगीज अंमलदार मुंबईकडे निघून गेले होते. आपली पोर्तुगालची राजकन्या लेडी कॅथरीन हिच्या लग्नावेळी पोर्तुगालच्या राजा जॉन चतुर्थ याने आपला जावई इंग्लंडचा राजकुमार चार्ल्स दुसरा याला मुंबईचे बेट लग्नात आंदण म्हणून द्यायचे १६६२मध्येच जाहीर केले होते. प्रत्यक्षात मुंबई हस्तांतरणाचा तो लांबवलेला सोहळा आठ फेब्रुवारी १६६५ला आयोजित केला गेला होता.तेव्हा त्या भव्य सोहळ्यासाठी पोर्तुगीजांचे बहुतांशी सैनिक व ठाणेदार मुंबईकडे रवाना झाले होते. त्यामुळे सर्वत्रच पोर्तुगीजांच्या बंदरांवर सन्नाटा पसरला होता. नेमक्या त्या परिस्थितीचा फायदा राजांनी उठवायचे ठरवून धाडसाने पाण्यात गलबते घातली.
ह्या महत्वाकांक्षी योजनेत राजांच्या सोबत नेताजी पालकर, मोरोपंत पेशवे, राजापूरचा वीर दारोजी फाकडे असे एकापेक्षा एक जबरदस्त ताकदीचे आणि युक्तीचे मोहरे सहभागी झाले होते. कारवार, गोकर्ण, कुमठे, होनावर, भटकळ, गांगोळी अशी बंदरे पाठीमागे टाकत राजे कुंदापूरच्या खाडीजवळ पोहोचले. त्यांनी पश्चिम कर्नाटकात बसरूरवर आक्रमण केले.
अलीकडेच १८ जानेवारीला मी व माझे काही सहकारी राजांच्या या मोहिमेचा वेध आणि शोध घेण्यासाठी बसरूरला गेलो होतो. आजच्या कुंदापूर गावापासून आठ किलोमीटर व कुंदापूर रेल्वे स्टेशनपासून बसरुर हे गाव जेमतेम दोन किलोमीटरवर येते.
त्या काळातला कर्नाटकातला एक पराक्रमी राजा शिवाप्पा नाईक म्हणून होता. शिवरायांची त्याच्याशी दोस्ती होती. एकावेळी मिळून परकीय सत्तांविरुद्ध उठाव करायच्या गोष्टी शिवरायांनी याच शिवाप्पा नाईक राजाशी केल्या होत्या. परंतु दुर्दैवाने १६६०मध्ये शिवाप्पाचे निधन झाले. त्यानंतर त्याचा पुत्र आणि भावामध्ये वारसा हक्काचे युद्ध सुरू झाले. तेव्हा शिवाप्पाचे राज्य काबीज करण्यासाठी केरळातून नायर राजे बसरूरकडे झेपावले होते. त्याचवेळी आदिलशहाला सुद्धा हे ठाणे गिळून टाकायचे होते. त्यातच या परिसरातील गोरगरीब जनतेने शिवरायांना आमच्या मुलखात या, आम्हाला वाचवा, असे निमंत्रण धाडले होते.म्हणूनच कर्नाटकातील या महत्वपूर्ण ठाण्याला मराठ्यांच्या तलवारीचे पाणी दाखवावे असा निर्धार करून राजांनी इकडे हल्ला चढवला.
तेव्हा कुंदापूरजवळ पोर्तुगीजांच्या एक जलदुर्ग होता. बहुतांशी मंडळी मुंबईकडे गेल्यामुळे शिबंदी कमी होती. त्यामुळेच किल्ला दृष्टीस पडताच शिवरायांचे बहाद्दर सहकारी नेताजी पालकर आणि दारोजी फाकडे यांनी पोर्तुगीजांची उरलीसुरली शिबंदी कापून काढली. मोठी जहाजे समुद्रात नांगरून छोट्या जहाजातून तरांडी व नावातून राजांचे बहाद्दर मर्द मराठे वीर मंडी बागला व हट्टी कुदरू नावाच्या बंदरामधे घुसले… तिथूनच आदिलशहा व नायर राज्यांच्या तुकड्यांना कापत ते काठावरच्या बसरुर गावांमध्ये पोचले.
बसरूरच्या बाजूच्या समुद्रकिनार्यावर पंचगंगावळी म्हणजेच पाच नद्यांचा संगम आहे. त्यामुळे पाण्याचे वेगवेगळे प्रवाह एकत्र येत असल्यामुळे अडचणी निर्माण होतात. पाण्याचे उंच-सखल प्रवाह व लाटा पार करून छोटी जहाजेही पुढे नेणे जिकिरीचे असते. पण बसरूरपेक्षाही मोठे ध्येय उराशी बाळगून आलेले शिवराय, त्यांना अशा संकटांची अजिबात तमा नव्हती.
आज बसरुर हे कर्नाटकाच्या पश्चिम किनार्यावरील एक सामान्य खेडेगाव म्हणूनच पाठीमागे उरले आहे. एकेकाळी ही एक वैभवनगरी होती. अनेक पाषाणी अतिभव्य इमारती, डोळे दिपवणारे महाल, वाडे आणि राजवाडे या गावात होते. काळाच्या ओघात या सुंदर नगरीचे सारे वैभव आता पार लयाला गेले आहे. आता गावाच्या मध्यभागी एक छोटेसे जंगल उरले आहे. त्या ठिकाणाला आम्ही भेट दिली. इथे मोठ-मोठ्या वारुळाच्या रांगात सदानंदेश्वर नावाचे एक देवस्थान फक्त उरले आहे. तिथेच महावारुळे व मोठे सपॅराज असल्याने आत जायला लोक घाबरतात. आम्हाला तिथे काही पाषाणांचे मोडके खांब व काही विशाल दगड आढळून आले.
गावकर्यांचा कानोसा घेतला, तेव्हा असे कळले की या नगरीत एकेकाळी पाण्याचे सात मोठे तलाव होते. शंकराची सात भव्य मंदिरे तसेच गावात सात राजवाडे होते. आता फक्त पूर्वीच्या सात गल्ल्या कशाबशा टिकून आहेत. काळाने सारे काही गिळून टाकले. ७०–८० वर्षांपूर्वी जेव्हा कुंदापूर जवळच्या मोठ्या खाडीवर भव्य पूल बांधण्यात आला. तेव्हा या गावातील भग्न मंदिरांचे आणि महालांचे मोठे मोठे पाषाण तसेच शिलाखंड उचलून ते या खाडीवरच्या पुलाच्या पायामध्ये निर्दयपणे गाडून टाकले गेले. एकेकाळच्या वैभवनगरीच्या स्मृतींचे वाटोळे मूर्ख कंत्राटदाराने व जनतेने केले. यासारखे दुर्दैव दुसरे नाही.
त्या काळात शिवरायांनी सलग तीन दिवस बसरूरची लूट केली होती. त्या नगरातील मोठ्या व्यापार्यांना व जमीनदार, अंमलदारांना लुटून राजांनी धडा शिकवला होता. त्याच वेळी बसरूर इलाख्यात नारळ व सुपारीचे मोठे पीक घेतले जायचे. कष्ट इथली जनता करायची, पण पिकाची मालकी मलबारी व्यापार्यांच्या मुठीत असायची. ते सारे गरीब कष्टकरी शेतकर्यांना गुलामासारखे वागवायचे. ती गरीब जनता शिवरायांच्या भेटीस आली. त्यांचे हाल बघून शिवरायांनी त्या जुलमी व्यापार्यांना खांबांना बांधले. गरिबांची केलेली लूट व्यापार्यांना तिथेच देणे भाग पाडले, अशा अनेक कथा दंतकथा आणि काव्ये सुद्धा कर्नाटकाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये भटकल्यावर ऐकायला मिळतात. इथली गरीब जनता शिवाजी राजांवर एवढी फिदा झाली होती की, मंडी बागला बंदरांमध्ये शिवराय जेव्हा परतीसाठी जहाजावर चढू लागले, तेव्हा ‘राजे तुम्ही इथंच राहा. इथल्या या सागरावर राज्य करा. आम्ही या मातीतून अनेक सैनिक तुमच्या पाठीशी उभे करतो,’ असा आग्रह जनता करत होती. तेव्हा मोठ्या कष्टाने शिवरायांनी त्यांचा निरोप घेतला.
मुळात बारकाईने संशोधन करता असे दिसून येते की, शिवरायांच्या धाडसी मोहिमा या अत्यंत गुप्त व वेगवान असायच्या. त्यांच्या पोटातले पाणी शेजारच्या सरदाराला सुद्धा कळायचे नाही. शिवराय हे इतके कर्तव्यशूर होते की ते एकावेळी किमान नऊ ते दहा माणसांचे काम एकट्याने उरकत. त्यांच्या अंगी विलक्षण चपळता होती. दिवसातून ते एकाच वेळी अल्पसा आहार घेत असत, असे त्याकाळची कागदपत्रे सांगतात.
मुळात बसरूरवर आक्रमण हे एक जगाच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करण्यासाठी राजांनी निवडलेले एक वरपांगी कारण होते. त्यासाठी राजांना ८० जहाजे व पाच हजाराची फौज सोबत नेण्याची काही गरजच नव्हती. वस्तुतः मोठ्या शिताफीने व शौर्याने मेंगलोरच्या बंदरावर जाऊनच हल्ला चढवायचा शिवरायांचा मनसुबा होता. आपला भगवा झेंडा मेंगलोरच्या टेकडीवर उभारून असामान्य पराक्रमाच्या दुदुंभी त्यांना वाजवायच्या होत्या. त्या मुलखात कीर्तीच्या पताका नाचवायच्या होत्या. त्याच दृष्टीने शिवरायांनी मंडी बागला बंदरातून आपली जहाजे तेथून फक्त ४९ कोसावर असलेल्या मंगळूरकडे वळवली होती. प्रवास सुरूही झाला होता. परंतु तेवढ्यात दुर्दैवाने मिर्झा राजा जयसिंग हा खूप वेगाने हिंदवी स्वराज्यावर चालून येतो आहे, उत्तरेतून बुर्हाणपूर मार्गे औरंगाबाद, अहमदनगर पार करून पुण्याकडे सरकतो आहे, हे वृत्त राजांच्या कानावर पडले. मोगलांचे महासंकट स्वराज्याच्या दरवाजावर येऊन धडकलेले होते. केवळ त्याचमुळे शिवरायांना मंगलोरच्या माथ्यावर भगवे निशाण फडकवायच्या जबरदस्त मोहिमेला लगाम घालणे भाग पडले. अन्यथा वेगळाच इतिहास घडला असता..