हरलेले आणि बिथरलेले सदावर्ते
गेली सहा महिन्यांपासून शासनात विलीनीकरण या एकाच मागणीवर सुरू असलेला एसटी कर्मचार्याचा संप अखेर कोर्टाने निकाली काढला. कोर्टाचा निर्णय हा योग्य आहे. एसटी महामंडळाने एसटी कर्मचार्यांच्या सर्व मागण्या मान्य करूनही वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली हा संप सुरूच होता. त्रिसदस्यीय समितीनेही विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल कोर्टाला दिला आणि कोर्टानेही एसटीच्या नफ्यातोट्याचा विचार करून निकाल दिला. शासनाने सर्व प्रकारे प्रयत्न करूनही निव्वळ सदावर्ते याच्या वकिलीवर भाळून एसटी कर्मचारी कामावर गेले नाहीत. सदावर्ते यांनी एसटी कर्मचार्यांना हाताशी धरून अनेकवेळा महाविकास आघाडी सरकारवर खालच्या पातळीवर टीका केली. त्याला भाजपनेही रसद पुरवून साथ दिली. वास्तविक त्याचवेळी या गुणरत्नेना अटक व्हायला हवी होती. अखेर कोर्टाने एसटी कर्मचार्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आणि वकील सदावर्ते याची हार झाली.
एकीकडे कोर्टाचा निर्णय मान्य करून जल्लोष दाखवायचा तर दुसरीकडे खुन्नस म्हणून वेगळेच करायचे हा प्लॅन सदावर्तेनी आखला आणि त्याचीच परिणीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेला हल्ल्यात दिसली. मी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे म्हणणारे सदावर्ते हरल्यानंतर मात्र मनातल्या मनात चरफडत होते आणि आपली मागणी मान्य झाली नाही म्हणून ते बिथरल्याचे चित्र समोर आले.
– अरुण पां. खटावकर, लालबाग
मोजक्या फटकार्यांत श्याम जोशी उभे राहिले…
ज्ञानेश सोनार यांनी श्याम जोशी यांच्यावर फार छान लेख लिहिला आहे. एखादा चित्रकार काही मोजक्या फटकर्यात माणूस उभा करतो तसे त्यांनी जोशी यांना समोर उभे केले. वरवर फटकळ आणि तापट माणसे आतून फार हळवी आणि संवेदनशील असतात, हे कळले.
– प्रमोद टेंब्रे
सुरेख व्यक्तिचित्र
ज्ञानेश सोनार यांचा लेख अतिशय सुंदर! खूपच छान!! संपूर्ण लेख वाचल्यावर श्याम जोशी यांची चित्रे आठवली. सुंदर आणि मार्मिक चित्रे असत. त्यांचे व्यक्तिचित्र फारच सुरेख शब्दात मांडलेत आहे.
– रमेश नावडकर, जेष्ठ चित्रकार
व्यंगचित्रकारच नव्हे, अफलातून लेखकही
ज्ञानेश सोनार हे नुसतेच व्यंगचित्रकार नाहीत, तर अफलातून लेखक आहात. एक विशिष्ट शैली त्यातही जाणवते.जादूची भाषा फक्त आश्चर्य असते, तसेच आपल्या लिखाणात आणि चित्रांत एक विचार, कल्पना आणि काहीतरी दडलेले असते जे मला प्रकर्षाने जाणवते. एवढा मोठा माणूस नाशिकला दडला आहे हेही खरे!
– सतीश देशमुख
अमृताची स्पृहणीय कामगिरी
साप्ताहिक ‘मार्मिक’ वाचनीय असतो यात शंकाच नाही. त्यातही काही लेख प्रेरणा देणारे असतात. याच आठवड्यात संदेश कामेरकर यांच्या ‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या सदरात अमृता माने या एका सर्वसामान्य तरुणीने जिद्दीने महिलांना बॅकसीटवरून फ्रंटसीटवर आणण्याची केलेली कामगिरी खरोखरच स्पृहणीय आहे. तिचे वडील भाजीविक्रीचे काम करत. तरीही तिला डॉक्टर व्हायची दुर्दम्य इच्छा होती. पण तिने ‘वुमन ऑन व्हिल्स’ नावाने महिला बाईक ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आणि पाहता पाहता तिने लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. आमच्यासारख्या सामान्य तरुणींनाही यातून बरेच काही घेण्यासारखे आहे.
– दीपा राणे
ऐश्वर्याला भेट दिला चिम्पान्झी
ज्ञानेश सोनार यांचा श्याम जोशी यांच्यावरचा लेख वाचला. त्यात एका स्पर्धेच्या निमित्ताने जगत्सुंदरी ऐश्वर्या राय श्याम जोशींच्या घरी आली होती, हा किस्साही वाचला. त्यात आणखी छोटीशी भर घालतो. ऐश्वर्या त्यांच्या घरी आली होती, त्यावेळी त्यांनी तिला चिंपान्झीचे पेंटिंग दिले होते. मी ते पाहिले आहे. त्यावेळी मला जरा धक्काच बसला होता. कारण अतिशय जगविख्यात सुंदरीला माकडाचे पेंटिंग देणे याचे मला आश्चर्य वाटलं होतं. त्यावेळी श्याम जोशी म्हणाले की त्याखाली मी एक वाक्य लिहिलंय, ‘ब्युटी लाईज एव्हरीव्हेअर’. या एका वाक्यामुळे ते पेंटिंग एकदम वेगळ्याच पातळीवर गेले. जोशींच्या या चातुर्याला सलाम!
– प्रशांत कुलकर्णी, ज्येष्ठ व्यंगचित्रकार