साधे सीसीटीव्ही देखील नसलेल्या त्या पतपेढीत किंमती वस्तू ठेवणार्या व्होराला हुशार म्हणावे की गाढव असा विचार करत सारंग बाहेर आला आणि त्याने बाहेरच्या हॉलचे निरीक्षण करायला सुरुवात केली. सहज त्याचं लक्ष खिडकीतून खाली गेले आणि तो चमकला. खिडकीच्या मागे ओसाड माळरान होते आणि तिथे काटेरी झाडात एक बुरखा अडकलेला होता… ‘सीताराम तू बाहेर असताना कोणी शटर कसे काय खाली घेऊ शकते?’ सारंगने दबक्या आवाजात सीतारामला विचारले; कारण पोलीस अजूनही आसपास घुटमळत होतेच. ‘दुसरे कशाला कोण खाली घेईल साहेब? मी स्वत:च खाली घेतले होते.’ सीताराम म्हणाला आणि सारंग चमकला.
– – –
मनोहरपंतांनी देवाजवळ उदबत्ती लावली आणि मनोभावे देवाला हात जोडले आणि पेढ्याचा पुडा देवासमोर ठेवला. आजच त्यांचा मुलगा जय अमेरिकेसाठी रवाना झाला होता. त्यांच्या प्रामाणिकपणाला आणि मेहनतीला दैवाची साथ लाभली होती ह्याबद्दल ’जय भवानी पतपेढी’मधील कोणत्याच कर्मचार्याला शंका नव्हती. बत्तीस वर्षे प्रामाणिकपणे आणि कर्तव्यकठोर भावनेने मनोहरपंत ’जय भवानी’मध्ये कार्यरत होते. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून दोन वर्षापूर्वीच त्यांना मॅनेजर म्हणून बढती मिळाली होती. मनोहरपंतांनी सदाला हाक मारली आणि त्याच्याकडून सगळे आल्याची खात्री करून ते स्वत: पेढे वाटायला बाहेर पडले.
पतपेढीत मनोहरपंत धरून इन मीन चार कर्मचारी होते. कॅशियर साबळे, ऑफिस बॉय सदानंद, संगणकावर बसणारी रेखा चव्हाण आणि बाहेरचा गार्ड सीताराम. मनोहरपंतांनी गडबडीने सगळ्यांना पेढे वाटले आणि सर्वांचे आभार स्वीकारत ते घाईघाईने केबिनमध्ये शिरले. थोड्याच वेळात पतपेढीच्या संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्य कांतीलाल व्होरा स्वत: पतपेढीत येणार होते. व्होरा साहेबांचे अनेक व्यवसाय होते. मूल्यवान आणि प्राचीन वस्तूंची खरेदी-विक्री हा त्यातलाच एक प्रमुख व्यवसाय. अशा सगळ्याच वस्तूंची काही उघडपणे खरेदी-विक्री होत नाही हे देखील सत्य होतेच. त्यामुळे अशा वस्तूंपैकी काही मोलाच्या वस्तू जसे की एखादी मूर्ती, हिरे, दागिने हे व्होरा शेठ पतपेढीच्या लॉकरमध्ये अलगद जमा करत असत. वस्तूला ग्राहक मिळाला की वस्तू लगेच लॉकरमधून ग्राहकाच्या हातात. गेल्या वर्षी व्होरा शेठवर इन्कम टॅक्स आणि जीएसटी खात्याची एकत्र धाड पडली; तेव्हापासून त्यांनी हा मार्ग पत्करला होता. पतपेढीतले खाते देखील त्यांच्या ड्रायव्हरच्या मेव्हण्याचा नावाने उघडलेले होते. सगळे कसे बेमालूम काम चालू होते. मनोहरपंताना हे बिलकुल पसंत नव्हते, मात्र जयच्या अमेरिकावारीसाठी व्होरा शेठची सढळ मदत मिळाली आणि मनोहरपंताचे हात बांधले गेले. मदत नको म्हणून पंतानी थोडी कुरबूर केली, पण जय आणि बायको यांच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही.
बाहेर जरा जोरात बोलण्याचा आवाज झाला आणि पंत तंद्रीतून जागे झाले, केबिनचे दार उघडून बाहेर आले. बाहेर दहा बारा ग्राहक होते आणि त्यातल्याच एकाशी कॅशियर साबळेंचे वाद सुरू होते.
‘काय झाले साबळे?’ पंतांनी पुढे होत विचारले.
‘साहेब दहा हजार रुपये काढायला आलेत, अन त्यांना सगळ्या शंभरच्या नोटा पाहिजेत म्हणून मागे लागलेत. इतरांना कसे सुट्टे देणार मग?’
‘अहो साहेब, मला पण कामगारांची मजुरी द्यायची आहे. माझी पण अडचण समजून घ्या ना,’ समोरचा ग्राहक वैतागून बोलला.
त्याला कसे समजवावे हा विचार पंत करत असतानाच व्होरा शेठ बँकेच्या दारातून आत आले. त्यांचे स्वागत करायला पंत पुढे सरसावले आणि अचानक मागून बुरखा घातलेली एक व्यक्ती आत आली. क्षणार्धात तिच्या हातातले पिस्तूल व्होरा शेठच्या डोक्याला चिकटले आणि बाहेरुन कोणीतरी बँकेचे शटर ओढून घेतले. बुरखाधारी व्यक्तीने हातातली बंदूक नाचवत सगळ्यांना भिंतीकडे जाण्याचा इशारा केला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सगळेजण एकेक करत भिंतीशी घोळका करून उभे राहिले. मात्र प्रसंगावधान राखून साबळेंनी बाहेर पडता वॉर्निंग अलार्मचे बटण गुडघ्याने दाबले होते. काही मिनिटांतच चौकातल्या पोलीस चौकीचे पोलीस इथे थडकणार हे नक्की होते. उजव्या हातातली बंदूक घट्ट धरत त्या व्यक्तीने खिशातून कोणतासा स्प्रे बाहेर काढला आणि सगळ्यांच्या दिशेनं फवारला; त्यानंतर तो स्प्रे त्याने व्होरा शेठच्या नाकासमोर धरला आणि फवारा उडवला. व्होराशेठने प्रतिकाराचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. काही सेकंदातच सगळ्यांची शुद्ध हरपली. अवघ्या काही मिनिटांत हा सर्व प्रकार घडला.
—
सर्वात आधी पाण्याच्या हबक्याने शुद्धीवर आले ते मनोहरपंत. बाजूलाच चार पाच पोलिसांचा घोळका उभा होता. हळूहळू सर्वजण शुद्धीवर आले आणि पंतांनी पहिल्यांदा बँकेची तपासणी सुरू केली. बँकेतल्या कॅशला हात देखील लावला गेला नव्हता. मग चोराने नक्की लुबाडले तरी काय? त्यांचे लक्ष व्होरा शेठच्या चेहर्याकडे गेले आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
‘पंत आत चला…’ केबिनकडे इशारा करत व्होरा शेठ घाईघाईने म्हणाले आणि स्वत: लगबगीने केबिनमध्ये शिरले.
‘व्होरा शेठ काय झाले?’
‘हिरा पंत.. हिरा. साडेतीन कोटीचा.’ हताशपणे व्होरा शेठ म्हणाले आणि पंत धप्पकन खुर्चीत बसले.
‘पोलीस?’
‘नाही.. पोलिसांची मदत घेता येणार नाही. तो हिरा स्मगलिंगचा होता,’ निराशेने मान हलवत व्होरा म्हणाले.
‘मग आता?’
हे प्रकरण खाजगीतच सोडवावे लागणार आहे. मी त्याची व्यवस्था करतो, मात्र तुम्ही तपासात पूर्ण सहकार्य द्या. पोलिसांना ह्यातले काही बोलू नका.’
मनोहरपंतानी मान हालवली आणि व्होरा शेठने खत्रींना फोन लावला. खत्री माजी पोलिस अधिकारी आणि व्होरा शेठचे एकदम लंगोटी यार. व्होरा शेठनी सगळी हकिगत खत्रींच्या कानावर घातली.
‘आता तूच काहीतरी मदत करू शकशील खत्री. माझी तर बुद्धीच काम करेनाशी झाली आहे!’
‘सारंग दर्यावर्दी.. हा एकच माणूस आहे जो ह्या परिस्थितीत तुझी मदत करू शकेल,’ खत्री व्होरा शेठला धीर देत म्हणाले.
‘सारंग दर्यावर्दी म्हणजे तो गुप्तहेर?’
‘येस! अत्यंत चतुर आणि धाडसी माणूस आहे तो. अशा केसेसमध्ये तर माहिर माणूस आहे.’
—
व्होरा आणि पंत समोर बसलेल्या त्या उमद्या युवकाचे निरीक्षण करण्यात गुंतले होते. एखाद्या जाहिरातीतल्या
मॉडेलसारखा दिसणारा हा तरुण ’गुप्तहेर’ आहे असे वाटणे देखील अशक्य होते.
‘तुमच्याकडे हिरा असल्याची माहिती कोणाकोणाला होती?’ सारंगने बाणासारखा प्रश्न फेकला आणि व्होरा शेठला त्याच्या हुशारीची खात्री पटली.
‘ज्याने मला तो हिरा विकला त्याला आणि मला सोडून कोणालाही नाही.’
‘तुम्ही घरातून थेट इकडे आलात?’
‘नाही! मी हिर्याची खरेदी केली आणि थेट इकडेच आलो.’
‘तिथून बाहेर पडून इथे पोहोचेपर्यंत वाटेत काही विचित्र, निराळे असे आढळले? कोणी पाठलाग करत आहे असे काही जाणवले?’
‘बिलकुल नाही!’
‘तुम्ही एकटेच गाडी चालवत आलात?’
‘अशा कामाच्या वेळी मी एकटाच असतो. माणसे जेवढी कमी असतील तेवढी गुप्तता सांभाळली जाते,’ व्होरा पुटपुटले आणि सारंगने मान डोलवली.
साधे सीसीटीव्ही देखील नसलेल्या त्या पतपेढीत किंमती वस्तू ठेवणार्या व्होराला हुशार म्हणावे की गाढव असा विचार करत सारंग बाहेर आला आणि त्याने बाहेरच्या हॉलचे निरीक्षण करायला सुरुवात केली. सहज त्याचं लक्ष खिडकीतून खाली गेले आणि तो चमकला. खिडकीच्या मागे ओसाड माळरान होते आणि तिथे काटेरी झाडात एक बुरखा अडकलेला होता…
—
‘सीताराम तू बाहेर असताना कोणी शटर कसे काय खाली घेऊ शकते?’ सारंगने दबक्या आवाजात सीतारामला विचारले; कारण पोलीस अजूनही आसपास घुटमळत होतेच.
‘दुसरे कशाला कोण खाली घेईल साहेब? मी स्वत:च खाली घेतले होते,’ सीताराम म्हणाला आणि सारंग चमकला.
‘तू कशाला खाली घेतलेस शटर?’
‘मॅनेजर साहेबांनी शटरला ग्रीस लावायला माणूस पाठवला होता ना? त्याला शटर खाली घेऊन दाखवले,’ सीताराम भाबडेपणाने म्हणाला आणि सारंगने हिरेचोराच्या हुशारीला मनातल्या मनात दाद दिली.
‘शटर किती वेळ खाली होते?’
‘दोन तीन मिनिटे असेल साहेब.’
‘शटर वर केल्यावर कोणाला बाहेर पडताना पाहिलेस?’
नाही साहेब. माझी शटरकडे पाठ होती ना..’
सारंग विचाराच्या चक्रात अडकला असतानाच, त्याच्या पाठीवर इन्स्पेक्टर जयराजची थाप पडली.
‘खुद्द महाराज सारंग दर्यावर्दी इथे हजर आहेत, म्हणजे मामला नक्कीच गुंतागुंतीचा आहे..’ जयराज हसत म्हणाला.
‘नाही यार जय! पोलिसांप्रमाणे मी देखील चक्रावून गेलोय. इतका बेमालूम प्लॅन आखून देखील चोर चोरी न करता पळाला? काय गौडबंगाल असावे?’ सारंगने बेमालूम थाप सोडून दिली.
‘आम्ही देखील चक्रावलो आहे सारंग. अर्लाम वाजला तेव्हा आम्ही जीपमध्ये बसून गस्तीसाठीच निघालो होतो. त्यामुळे अवघ्या पाच ते सात मिनिटात आम्ही इथे पोहोचलो. आम्हाला बँकेच्या बाहेर पडणारा किंवा संशयास्पद असा कोणीच माणूस आजूबाजूला आढळला नाही. रादर, त्यावेळी बिल्डिंगच्या आसपास असलेल्या किंवा बाहेर पडणार्यांना देखील आम्ही थांबवून ठेवले होते. त्यांची तपासणी देखील केली, पण काही सापडले नाही.’ जयने त्याच्याकडची माहिती दिली आणि सारंग एकदम सावध झाला. जयचे टायमिंग बरोबर असेल, तर सीतारामने शटर वर केले त्याच्या एखाद दोन मिनिट मागे पुढे पोलिस हजर झाले होते. चोर कितीही लगबगीने बाहेर पडला असता, तरी तो दिसायलाच हवा होता. मुख्य म्हणजे सगळ्यांना बेशुद्ध करून, हिरा ताब्यात घेऊन, बुरखा आणि स्प्रे फेकून बाहेर पडायला त्याला कमीत कमी पाच मिनिटे तरी लागायला हवीत. कुठेतरी काहीतरी चुकत होते हे नक्की.
—
थोड्याच वेळात सीतारामने वर्णन केल्याप्रमाणे ग्रीस लावायला आलेल्याचे रेखाचित्र तयार करून घेण्यात आले. अशा कोणत्याही माणसाला आपण बोलावले नव्हते असे पंत ठामपणे सांगत होते. हा खेळ काहीतरी वेगळाच चालू होता. रेखाचित्रावरून एका हवालदाराने त्या संशयिताला, विकास दुबेला ओळखले आणि तासाभरातच त्याला जेरबंद करण्यात आले. त्याने सांगितले की, त्याला एका लहान मुलाने एक कागद आणून दिला होता; ज्यावर त्याला सूचना देण्यात आल्या होत्या. त्याने एका ठराविक वेळी बँकेत आत जाऊन बाहेर यायचे होते आणि ग्रीस लावण्याच्या बहाण्याने सीतारामला बोलण्यात गुंतवायचे होते. विशिष्ट वर्णनाच्या गाडीतली व्यक्ती आणि तिच्यामागे एक बुरखाधारी आत शिरला की ताबडतोब शटर खाली घ्यायला लावायचे. काही मिनिटांनी शटर वर करत पुन्हा सीतारामला बोलण्यात गुंतवायचे होते. ह्यासाठी त्याला रोख पाच हजार देखील दुसर्या एका मुलाकडून पोहोचवण्यात आले होते. त्याप्रमाणे आपण जणू आत जाऊन मॅनेजरला भेटून आलो आहोत असा बहाणा करत विकासने आपली ’कामगिरी’ चोख पार पाडली होती. त्याने त्याला निरोप लिहून आलेला कागद देखील पोलिसांना दाखवला.
पोलिसांचा जवाब नोंदवून झाला आणि सारंग पुढे झाला.
‘विकास पोलीस आले तेव्हा तू काय केलेस?’
‘सीताराम शटर उघडायला वळला आणि मी लगेच तिथून धूम ठोकली. मी चार पाच इमारती मागे टाकल्या, तोवर पोलिसांची गाडी मला पास झाली.’
—
तपासाचा प्रत्येक मार्ग अर्ध्यावर येऊन बंद होत होता. पोलिसांनी तपास पूर्ण केला आणि ते माघारी परतले. सगळ्या प्रकाराला आता तब्बल चार तास उलटून गेले होते. व्होरा शेठचे बीपी आता चढायला लागले होते.
‘सारंग काहीच लागले नाही हाताला?’ त्यांनी उद्वेगाने विचारले.
‘माफ करा व्होरा शेठ, पण माझे देखील डोके चालत नाहीये. अवघ्या सेकंदाच्या फरकात चोर शटरमधून बाहेर पळतो, तो कोणाला दिसत नाही. पोलीस तातडीने आजूबाजूच्या लोकांना ताब्यात घेतात, तपासणी करतात, तरी काही सापडत नाही. चोर बुरखा घालून येतो आणि जाताना मात्र बुरखा फेकून जातो… जातो… जातो… जर चोर बाहेर गेलाच नसेल तर?’ एकदम ताडकन उठत सारंग म्हणाला आणि व्होरा शेठ त्याच्या तोंडाकडेच पाहायला लागले. सारंगने घाईघाईने इन्स्पेक्टर जयराजचा फोन लावला.
‘जय, तुम्ही बँकेत शिरलात तेव्हा पोझिशन काय होती?’
‘आतले सगळेच बेशुद्ध होते. पंतांना मी पर्सनली ओळखतो, त्यामुळे सगळ्यात आधी त्यांना शुद्धीवर आणले. तोवर हवालदारांनी इतरांना जाग आणली.’
‘पुढे?’
‘पंत, व्होरा आणि साबळे व्यवस्थित वाटत होते. इतर कर्मचारी आणि ग्राहकांना मात्र पोलिस जीपमधून हॉस्पिटलला रवाना केले.’
‘त्या ग्राहकांची नावे, फोन नंबर घेऊन ठेवले होतेस?’
‘हो! पण तू हे सगळे का विचारतो आहेस?’
‘कळेल तुला लवकरच. मला ती माहिती मात्र लगेच मेसेज कर.’
जयराजकडून माहिती आली आणि त्यातल्या सगळ्या नावांच्या फायली सारंगने मागवून घेतल्या.
‘साबळे ह्या सगळ्या ग्राहकांना तुम्ही ओळखता?‘
‘हो साहेब. जवळ जवळ सर्वच आमचे खात्रीचे आणि जुने कस्टमर आहेत.’
‘जवळ जवळ म्हणजे?’
‘म्हणजे ह्यातले दोन ग्राहक नवे आहेत. एकाला दोन महिने तर एकाला नुकताच आठवडा झाला आहे. पण आठवडा झालेला ग्राहक तेव्हा नेमका माझ्या समोरच उभा होता जेव्हा बुरखेधारी आत आला.’
‘आणि ही दुसरी व्यक्ती?’
‘बहुदा लायनीत मागे असणार.’
‘हिला बँकेत येताना कोणी पाहिल्याचे आठवते?’
सर्वांनीच नकारार्थी माना हालवल्या आणि सारंग गालात हसला.
‘व्होरा साहेब, तुमचे हे जे ’खास व्यवहार’ चालतात. ते नक्की कुठे होतात?’
‘हॉटेल शांग्रीला,’ व्होरा शेठ म्हणाले आणि जयने टिचकी वाजवली. विकास दुबेने दाखवलेला कागद आपल्याला का खुणावत होता, ते त्याच्या आता लक्षात आले. शांग्रीलाच्या लेटरपॅडचा फाडलेला कागद होता तो. गेल्या वर्षी शांग्रीलाची एक केस सोडवून दिल्याबद्दल मॅनेजमेंट तर्फे त्याला अशाच कागदावर सुवाच्य अक्षरात आभाराचे पत्र आले होते.
‘पुढच्या अर्ध्या तासात तुमचा हिरा तुमच्या ताब्यात असेल शेठजी. मग इच्छा असेल तर गुन्हेगाराचे नाव पोलिसांकडे देऊ शकता किंवा सगळे विसरू देखील शकता.’ सारंगने वाक्य पूर्ण केले आणि तो दाराबाहेर पडला देखील.
—
व्होरा शेठजींच्या आलिशान दिवाणखान्यात स्वत: व्होरा साहेब हातातला तो दुर्मिळ हिरा कुरवाळत बसले होते आणि सारंग टेबलावरच्या नोटा मोजत होता.
‘पण सारंग तुला संशय आला कसा?’
‘चोर तुमचा हिरा घेऊन पळाला ह्या एकाच कल्पनेवर आपला सगळा तपास चालू होता. पण मला काही वेळेचे गणित सुटत नव्हते. इतक्या कमी कालावधीत जादूगार देखील हे करणे मुष्किल. चोर अदृश्य कसा झाला, त्याने बुरखा का टाकून दिला असे अनेक प्रश्न होते. शेवटी अनेक बाजू तपासल्यावर माझ्या लक्षात आले की, चोर बाहेर गेलाच नसेल तर? त्याची तपासणी झालीच नसेल तर? आणि तपासणी झाली नसेल तर का झाली नसेल? आणि इथेच मला ह्या कोड्याचे उत्तर मिळाले.’
‘शांग्रिला?’
‘बरोबर! चोर पुरुष आहे आणि तो हिरा घेऊन पळून गेला ही आपली दोन्ही गृहीतके पूर्ण चुकीची होती. चोराने ऐनवेळी शक्कल जबरदस्त लढवली, पण तिथेच त्याची चूक देखील झाली. तुमच्या व्यवहारांची कल्पना शांग्रिलाच्या मॅनेजरला, हसनला आली होती. त्याने तुमच्यावर पाळत ठेवली आणि वस्तू मिळाली की तुम्ही थेट ’जय भवानी’ गाठता हे त्याच्या लक्षात आले. तुम्ही तिथे का जात असाल हे त्याच्या बरोबर लक्षात आले होते. त्याने तिथल्याच वेट्रेसला, रुबीला सामील करून घेतले आणि तिची सर्व्हिस फक्त तुमच्याच टेबलला ठेवायला सुरुवात केली. रुबीकडून त्याला तुम्ही सोमवारी पुन्हा ’शांग्रिला’ला येणार असल्याचे समजले आणि तुम्ही कोणता तरी ’सौदा’ करणार आहात हे त्याने ओळखले. त्याने डोके लावून दोन महिने आधीच रुबीला ’जय भवानी’मध्ये खाते उघडायला लावलेले होते. तयारी तर अगदी पक्की केली होती पण साबळेंनी अर्लाम वाजवला आणि घात झाला. पोलीस तातडीने बँकेच्या दारात पोहोचले. आता हुशार रुबीने डोके लावले आणि बुरखा काढून फेकला आणि स्वत:च्या तोंडावर थोडा स्प्रे मारून तो देखील खिडकीतून बाहेर फेकला. पोलीस आत आले तेव्हा बाकी सगळे खरे बेशुद्ध होते तर रुबी नाटक करत होती. शुद्धीत आल्याचे दाखवत ती जागी झाली आणि इतर काही ग्राहकांबरोबर तिची पण रवानगी हॉस्पिटलला झाली. तिथले उपचार उरकताच रुबी वंटास झाली. बँकेचा एकही रुपया चोरीला गेलेला नसल्याने आपल्या मागे पोलिसांचा ससेमिरा देखील लागणार नाही हे दोघेही ओळखून होते. पण दुर्दैवाने मी ह्या केसमध्ये शिरलो आणि…’
‘..आणि बुरखा फाटला.’ सारंगला टाळी देत व्होरा शेठ गडगडाटी हसले.