इच्छा नसतानाही धरून बांधून घोड्यावर बसवलेले भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची दारुण अवस्था पाहून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या अस्वस्थ झाला आणि मला म्हणाला, त्यांच्या जागी मी असतो तर महाराष्ट्रातले मंत्रीपद सोडून उड्या मारत दिल्लीत गेलो असतो. महाराष्ट्रात घरकोंबड्यासारखा राहिलो नसतो. दिल्लीत मोठमोठी स्वप्नं बघितली असती. उच्चपदावर जाण्यासाठी सारी राजकीय कारकीर्द पणाला लावली असती… त्यावर मी पोक्याला म्हणालो, पोक्या, एवढंच वाटत असेल तर त्यांनाच जाऊन विचार… पोक्या पळत सुटला आणि दुसर्या दिवशी त्यांची ही मुलाखत घेऊनच हजर झाला…
-नमस्कार मुनगंटीवार साहेब. तुमचं मनापासून अभिनंदन. अखेर घोडं गंगेत न्हालं. खूप बरं वाटलं ही बातमी ऐकून.
-काय तरी काय बोलतोयस पोक्या. उमेदवारी जाहीर झाल्यापासून माझी घाबरगुंडी उडालीय. मी त्यांना अप्रत्यक्षपणे आधीपासून सांगत होतो की मला माझी चंद्रपूरची गल्लीच बरीय. मला ती दिल्ली-बिल्ली नको. पण कोण ऐकायलाच तयार नाही.
– काय प्रॉब्लेम काय तुमचा?
– तुला काय सांगू पोक्या आणि कसं सांगू?
– सांगा बिनधास्त. कुरुक्षेत्रावर अर्जुनसुद्धा तुमच्यासारखाच गलितगात्र झाला होता. तेव्हा कृष्णाने त्याला गीता सांगितली नसती तर तो रणांगणातून पळून गेला असता.
– हे बघ, मी काही अर्जुन नाही आणि माझ्यासमोर कुणी कौरवही नाहीत. सगळी आपलीच माणसं आहेत. आमच्या पार्टीची सुद्धा आणि विरुद्ध पार्टीची सुद्धा.
– मग भीती कशाची वाटते?
– खरं सांगू? खरं काय आणि खोटं काय तेच माझं मला समजत नाही. माझा मी जसा मला वाटतो आणि जसा तुला दिसतो तो तरी खरा आहे का? उजवीकडून पाहशील तर म्हणशील हाच तो पराक्रमी, पुण्यश्लोक सांस्कृतिक वनमंत्री नायक, तर डावीकडून पाहशील तर म्हणशील, हाच तो घाबरट, डरपोक, दिल्लीला घाबरणारा आणि त्यासाठी परपक्षाच्या नेत्याची दाढी कुरवाळणारा आत्मविश्वास गमावलेला खलनायक. पण नेमका समोरचा मध्य गाठून पाहशील तर म्हणशील तुझ्यासमोर नाचतोय तो मजेदार शब्दबंबाळ विदूषक. यात खरं काय आणि खोटं काय! खरं एकच आहे पोक्या, अजून मोह मरत नाही, पाश सुटत नाहीत, नाळ तुटत नाही रे पोक्याऽऽऽ
– अरे बापरे, हे काय झालं?
– ही अश्रूंची झाली फुलं!
– मग आता खूष आहात ना?
– न खूष राहून सांगतो कुणाला? अवघड जागेचं दुखणं आहे पोक्या ते. अरे, जीव गुंतलाय माझा महाराष्ट्राच्या वनावनामध्ये! महाराष्ट्रातली ती हिरवीगार वनश्री, आमच्या विदर्भातील ती टवटवीत रसाळ नागपुरी संत्री, संत्र्याची चविष्ट बर्फी… तोंडाला पाणी सुटतंय नुसतं. दिल्लीत काय बघायला मिळणाराय यातलं?
– दिल्लीचा पेठा आहे ना साखरेहून गोड आणि तिथेही बरंच काही आहे जीव रमवणारं सांस्कृतिक गोड गोड. दिल्लीतल्या मंत्र्यांना आणि खासदारांना विचारा.
– तुला माहीत नाही पोक्या. इथल्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्याला आपल्या मर्हाटमोळ्या लावणीसारखा जो ठसकेबाज नजारा अनुभवायला मिळतो ना, त्याची मजा काही औरच असते. आपल्या सुशीलकुमारांना विचार.
– आपल्या?
– हो. आपला दृष्टिकोन व्यापक पाहिजे. मी तेवढा लोकप्रिय नाही, पण आत्ता कुठे जरा जम बसत चालला होता, तोवर या निवडणुकांचा बाजार आला. आमच्यासारख्यांची कुचंबणा होते रे अशाने.
– तरीही तुमची संमती नसताना तुम्हाला दिल्लीला धाडण्याचा घाट घातला कोणी?
– आमच्यातल्या विघ्नसंतोषी नेत्यांनी. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या मार्गातले काटे दूर करण्याचा प्रयत्न करताहेत ते.
– ते म्हणजे कोण?
– स्वत:ला भावी मुख्यमंत्री समजणारे आमच्यातीलच काहीजण.
– अहो, पण त्यासाठी आधी येत्या विधानसभा निवडणुका जिंकाव्या लागतील ना तुमच्या पक्षाला! तुमच्या सत्तेतल्या एका मुख्यमंत्र्याचं आणि दोन उपमुख्यमंत्र्याची तोंडं तीन दिशांना. आत्तापासून एकमेकांच्या पक्षाचे उमेदवार पाडण्याच्या कारवायांना जोर आलाय. महाराष्ट्रात तुमची पुन्हा सत्ता येण्याची अजिबात चिन्हं नाहीत. लोक पण कंटाळलेत तो गारंटीचा नारा ऐकून.
– मला तर भीतीच वाटतेय हे सगळं पाहून. जाहिरातींचा हा धबधबा पाहण्यापेक्षा एखाद्या खर्याखुर्या धबधब्याखाली बसून मन:शांती अनुभवावी असं वाटायला लागलंय.
– होणारच. पण फक्त सीटांच्या मागे अधाशासारखे लागलेल्या आणि त्यासाठी महाराष्ट्रावर सवलतींचा तुफान मारा करणार्या या गारंटीवाल्यांच्या अब्रूची लक्तरं सुप्रीम कोर्टाने चव्हाट्यावर आणली तरी त्यांना लाज शरम कशी वाटत नाही? हे एवढा पैसा कुठून आणतात, महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोजा असताना.
– या बाबतीत मी काहीच बोलू शकत नाही. आता सगळंच उघड्यावर पडलंय. तोंड लपवायलाही जागा नाही उरलीय. प्रचाराला घरोघरी जायचीसुद्धा लाज वाटतेय. ‘तेलही गेलं आणि तूपही गेलं’ अशी अवस्था होऊ नये, म्हणून घाबरत होतो लोकसभा उमेदवारीला. तिथे गेल्यावर अडगळीत पडल्यासारखी अवस्था होईल माझी.
– पण निवडून आलात तर ना?
– माझा चंद्रपुरातील समाज माझ्या शब्दाबाहेर नाही. माझी दिल्लीत जाण्याची मनापासून इच्छा नाही, हे त्यांच्या लक्षात आलं तर तेच मला दिल्लीपासून वाचवतील.
– मानलं पाहिजे त्यांना. ते जाऊं दे. पण पडण्यासाठी आणखी कोणतं प्लॅनिंग केलंय तुम्ही?
– ते तुला उघडपणे सांगता येत नाही. पण आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाला मला उमेदवारी दिल्याचा पश्चात्ताप होईल आणि सारं काही माझ्या मनासारखं होईल, हे तू पाहशीलच!