प्रबोधनकार म्हणजे निस्पृहपणा आणि स्वाभिमानाचं मूर्तिमंत प्रतीक. चोरीचा बिनबुडाचा आरोप तोही थेट नाहीच, तरीही प्रबोधनकारांनी कूपरशेठच्या छापखान्याचा सोन्याचा पिंजरा सोडून दिला. त्यांनी पुढचा मागचा विचार न करता अक्षरशः रिकाम्या हाताने मित्रांकडून तिकीटाचे पैसे घेऊन सातारा सोडून पुण्याची वाट धरली.
– – –
बापूसाहेब चित्रेंनी पुण्यात ‘प्रबोधन’च्या नावाने छापखाना ताब्यात घेतला, हे कळल्यावर आधीच प्रबोधनकारांना पाडळीतून घालवण्यासाठी कामाला लागलेल्या धनजीशेठ कूपरच्या बगलबच्च्यांचा उत्साह द्विगुणित झाल्यास नवल नव्हतंच. पापामियां या धनजीशेठच्या भागीदाराने पहिली कळ लावली. त्याने प्रबोधनकारांवर बिनबुडाचा आरोप केला, तोही नामानिराळा राहून. प्रबोधनकारांच्या शब्दांत, साताराच्या छापखान्यातील माल गुपचुप नेऊन, ठाकरे साहेबांनी पुण्याला छापखाना काढला. ही कुटाळकी पापामियाने दिली हवेत भिरकावून.
थेट धनजीशेठच्याच गोटातून असे आरोप केले जात असल्यामुळे कारखान्याच्या छोट्या वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली. सगळेच लहानमोठे तशी चर्चा करू लागले. पण स्वत: धनजीशेठ सोडाच, कुणीही प्रबोधनकारांच्या तोंडावर हा आरोप करत नव्हतं. तशी कुणाची हिंमतच नव्हती. कुजबुज मात्र सुरूच होती. आजवर कधी कुणी प्रबोधनकारांकडे संशयाने पाहिले नव्हते. तशी त्यांना सवयच नव्हती. त्यामुळे प्रबोधनकार आतून दुखावले आणि प्रचंड संतापले. त्यांनी आपली मन:स्थिती ‘शनिमाहात्म्य’ या पुस्तकात लिहिली आहे. ती अशी, अत्यंत गरीब कुटुंबात मी जन्मला आणि विपन्नावस्थेची कमाल कसोटीची संकटे अनुभवून मी मला आणि माझ्या घराण्याला इभ्रतदार गृहस्थपदाला आणले. पण माझ्या दुर्दिनांच्या तुफानी काळातही माझ्यावर कोणी चोरीमारीचा अगर ठकबाजीचा आरोप कधी केला नाही. ‘माझी जीवनगाथा’मध्ये प्रबोधनकार लिहितात, `मला मात्र त्या कुटाळकीने भयंकर जखमी केले. एक सामान्य माणूस म्हणून माझ्या विचारांत काहीही दोष असले, तरी चोरी, चहाडी नि शिंदळकी या तिन्ही पातकांपासून मी या क्षणापर्यंत तरी कसोशीने अलिप्त राहिलो आहे.
आपल्याला गुरुस्थानी असलेल्या मित्रावर होत असलेल्या आरोपांमुळे कर्मवीर भाऊराव पाटीलही चिडले होते. पण प्रबोधनकारांनी त्यांना शांत केलं. आता इथलं काम थांबवून पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण जाताना कटुता ठेवून जाऊ नये, नाटकाचे भरतवाक्य शांतपणाने आणि चांगुलपणाने पार पडावे, यासाठी प्रबोधनकारांनी धनजीशेठसमोर या आरोपांचा सोक्षमोक्ष लावाचचं ठरवलं. त्यांनी थेट कूपरलाच जाब विचारायचा ठरवलं. कूपरशेठने अशी अनेक कारस्थानं केलेली होती. त्यामुळे करून सवरून प्रबोधनकारांसमोर स्वतःची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न कूपरशेठ यांनी केला. ते मुळात व्यापारी आणि त्यात राजकारणी, त्यामुळे ते त्यांच्यासाठी गरजेचं होतंच. शिवाय तो त्यांच्या हातचा मळ होता.
कर्मवीर अण्णांसोबत झालेल्या प्रत्यक्ष भेटीत कूपरशेठनी गोड शब्दांत प्रबोधनकारांना दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला, असे शक्य तरी आहे काय? छापखान्यातला माल म्हणजे काय कार्डपाकीट आहे, का टाकले पोष्टात नि झाले रवाना? मूर्ख आहेत असे बोलणारे. तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. `या आरोपांमध्ये आपला कोणताही सहभाग नाही. तसं काही झालं असेल मला दिसत नाही. त्यामुळे त्यावर विचार करू नका, असं सांगत धनजीशेठने कानांवर हात ठेवले. पोटात एक आणि तोंडावर एक, हा धनजीशेठचा कावा प्रबोधनकारांना माहीत होता. त्यामुळे त्यांनी धनजीशेठना स्पष्टपणे सांगितलं, `आपला छापखाना, साहित्य, हिशोब ठिशोब काय असेल नसेल ते स्वाधीन घ्या. मी आता इथे पाणी प्यायलाही राहणार नाही. हे वाक्य ‘शनिमाहात्म्य’नुसार आहे, `माझी जीवनगाथा’मध्ये थोडे वेगळे तपशील आहेत. प्रबोधनकारांनी धनजीशेठना हेच समक्ष नाही, तर धनजीशेठला चिठ्ठी पाठवून सांगितलं, `उदईक सकाळी ८ वाजता येऊन आपण आपल्या छापखान्याचा चार्ज घ्यावा. असे होईपर्यंत मी कारखान्याच्या हद्दीत पाण्याचा घोटही घेणार नाही. फरक फक्त तपशीलाचा आहे, मतितार्थ तोच आहे.
प्रबोधनकारांनी ठरवलं होतं, त्यामुळे ते त्यापासून मागे फिरणार नव्हतेच. त्यांनी सातार्याहून पाडळीला जाऊन सगळ्यात आधी सामान आवरून कुटुंबाला त्याच रात्री बंगलोर मेलने दादरला रवाना केलं. आता ते आणखी मोकळे झाले. त्यांनी किन्हई या गावातून नेहमी भेटीला येणारे जुने मित्र पंत पराडकर आणि डॉ. पाटणकर यांना बोलावून घेतलं. तिघांनी मिळून चार दिवस आणि रात्र राबून छापखान्यातल्या प्रत्येक वस्तूची इन्वेंटरी तयार केली. इन्वेंटरी हा प्रबोधनकारांनी वापरलेला शब्द आहे. इथे त्याचा अर्थ छापखान्यातला सगळा कच्चा माल आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधनसामग्री यांची सविस्तर यादी असा आहे.
जवळच्याच कोरेगाव तालुक्याचे मामलतदार रावबहाद्दूर दुदुस्कर पाडळीला आले होते, असं प्रबोधनकार सांगतात. त्यांच्याविषयी शोध घेतल्यानंतर रावबहाद्दूर संभाजीराव मोरे दुदुस्कर यांचं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सातारा शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असल्याचं आढळून येतं. ते कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या `कृषि सुधारणा मंडळा’त त्यांचे सहकारी होते. त्यांनाr `सातारा जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळा’च्या माध्यमातून सातारा परिसरात उच्चशिक्षणाचीही वाट मोकळी केली होती. या दुदुस्करांना प्रबोधनकारांनी एक दिवस आणखी थांबवून घेतलं. प्रबोधनकार पनवेलमध्ये असल्यापासून म्हणजे त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षाचे पासून दुदुस्कर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ओळखत होते.
प्रबोधनकारांनी त्यांना विनंती केली, आपल्या समक्ष छापखान्याच्या साहित्याची खरेदीपत्रकं आणि आता तयार केलेली इन्वेटरी यांचा ताळमेळ घालून मला उद्या सकाळीच छापखाना कूपरच्या ताब्यात देऊन येथून कायमचे जायचे आहे. `दुदुस्करांनी त्यांना जाण्याचं कारण विचारलं. ते त्यांनी सविस्तर सांगितलं. त्यावर दुदुस्करांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला. म्हणाले, `तुमच्यासारख्या निस्पृहाने असेच केले पाहिजे. येथल्या भांडवलदारीच्या खतात तुमच्या लोकसेवेचा वृक्ष साफ करपून जाईल.
ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजताच धनजीशेठ कूपर आले. त्यांनी सुरुवातीला वरवर अत्यंत जिव्हाळ्यानेच चौकशी केली. पुढचे तीन तास दुदुस्करांच्या समक्ष इन्वेंटरीच्या प्रमाणे प्रत्येक वस्तू धनजीशेठना दाखवून त्यांच्या सह्या घेतल्या. शेवटी प्रबोधनकार त्यांच्या कपड्याची बॅगही उघडून दाखवायला गेले. त्यात काही चोरीचा माल असेल तर बघून घ्या, असं म्हणाल्यावर धनजीशेठनाही राहवलं नाही. त्यांनी प्रबोधनकारांना मिठीच मारली. ते म्हणाले, अण्णासाहेब, आपण जात असला तरी आपल्याबद्दलचा आदर माझ्या मनात चिरकाल राहील. आपल्यासारखा एक स्पष्टवक्ता दोस्त मी आज गमावत आहे. याचेच मला फार वाईट वाटत आहे. प्रबोधनकारांना अपेक्षित असं नाटकाचं भरतवाक्य नीट शांततेत पार पडलं. प्रबोधनकार आणि धनजीशेठ यांनी सह्या केल्या. त्यावर साक्षीदार म्हणून दुदुस्करांची सही झाली.
सगळं झाल्यावर धनजीशेठनी चहा मागवला. पण प्रबोधनकारांनी तो नाकारला, खानबहाद्दूर, आपल्या कारखान्याच्या हद्दीत मी पाण्याचा घोटही घेणार नाही, अशी माझी प्रतिज्ञा आहे. तेव्हा आग्रह करू नका. प्रबोधनकार आणि त्यांचे सहकारी भा. र. कद्रेकर आणि दत्तोपंत देशमुख आपापल्या बॅगा उचलून समोरच्या पोष्ट ऑफिसात गेले. सोबत कर्मवीर अण्णाही होतेच. तिथे जोशी मास्तरांनी चहा तयारच ठेवला होता. तिथे चहा पिऊन सगळे सातारा शहरात नारायणराव वाळवेकरांच्या घरी निघून आले.
‘शनिमाहात्म्य’मध्ये एका तळटीपेत प्रबोधनकारांनी या घडामोडीतले आणखी काही तपशील दिले आहेत, या प्रसंगातल्या मंडळींचे आभार मानताना ते लिहितात, `पाडळी सोडली तेव्हा मी अक्षरशःनिर्निकल स्थितीत होतो. माझे मित्र किन्हईचे डॉ. पाटणकर आणि सातारचे सराफ श्री. नारायणराव वाळवेकर यांनी द्रव्यसहाय्य दिले, तेव्हा मी पुण्यास जाऊ शकलो. शिवाय, छापखान्याचा चार्जशीट, हिशोब, खरेदीपत्रकानुसार साहित्याची मोजदाद करण्याच्या कामी डॉ. पाटणकर, पंत पराडकर, दत्तोपंत देशमुख या मित्रांनी मला जे सहाय्य दिले व माझ्या चित्तक्षोभाला विवेकाचा पाठिंबा दिला, तो मी आमरण विसरणार नाही. त्याचप्रमाणे माझ्या खासगी सामानाची बांधाबांध होत असताना, त्यात नजरचुकीने जाणून अगर नेणून काही चोरीचा माल जात आहे की काय, हे माझ्या खास आग्रहावरून तपासण्याचे काम माझे मित्र व कूपर फॅक्टरीचे पेशवे रा. रा. बंड यांनी केले व माझ्या झोपडीची झडती निर्दोष राहिली, याबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहे.
याच तळटीपेत उल्लेख आहे की वाजवी घेण्यावर थुंकून नुसत्या देण्याची प्रॉमिसरी नोट का लिहून दिली, याची हकीकत ‘लोकहितवादी’ आणि ‘प्रबोधन’ पत्रांत स्पष्ट प्रसिद्ध केलीच आहे. साप्ताहिक ‘लोकहितवादी’चे अंक काही उपलब्ध नाहीत. पण ‘प्रबोधन’च्या नोव्हेंबर १९२७च्या अंकात ही सविस्तर कहाणी आली आहे. संदर्भ आहे तो कूपरशेठने पैशांच्या वसुलीसाठी कोर्टात केलेल्या फिर्यादीचा. तो स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.
खरं तर आरोप हे बिनबुडाचे होते. ते कुणीही करत नव्हतं. स्वतः कारखान्याच्या मालकाची काही तक्रार नव्हती. त्याने दुर्लक्ष करायला सांगितलं होतं. तरीही केवळ स्वाभिमानापोटी प्रबोधनकारांनी हातातला छापखाना सोडला. जवळपास ११ महिने ते सातार्यात होते. दादरमधला समाधानी प्रपंच सोडून ते पाडळीत आले होते. तिथे त्यांना ना स्वत:च्या मालकीच्या छापखान्याचं समाधान मिळालं ना कोणत्या सोयीसुविधा. उलट तब्येतीच्या समस्या वाढल्या. आर्थिकदृष्ट्या तर ते सगळ्या कमाईवर पाणी सोडून निघाले. त्यांच्या हातात फक्त प्रबोधन होता, बाकी एक छदामही नव्हता. पण तेवढं त्यांच्यासाठी पुरेसं होतं. ते पुण्यातून प्रबोधनचा नवा अंक काढण्यासाठी नव्या उत्साहाने सरसावले होते.